प्रेषित पौल हा स्त्रियांच्या विरुद्ध होता का?
पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन
प्रेषित पौल हा स्त्रियांच्या विरुद्ध होता का?
प्रेषित “पौलाच्या शिकवणींचा आधार ख्रिस्ती चर्चमध्ये स्त्री-विरोधक विचार करण्यासाठी बहुतेक वापरला गेला आहे.” अशाप्रकारे ऑकलॅन्ड न्यू झीलंडच्या सेसीली रशटन या महिला न्यायाधीशाने, कॉमनवेल्थ लॉ परिषदेत सायप्रस येथे १९९३ च्या सुरवातीला लेखी प्रत्युत्तरात तिने असे म्हटले, “तीमथ्याच्या त्याच्या पत्रात त्याचे विचार प्रस्तुत करतो: ‘स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर धनीपण चालविण्याची परवानगी मी देत नाही; तिने निमूटपणे बसावे.’”—१ तीमथ्य २:१२.
जेव्हा पौल स्त्रियांच्या आदरयुक्त भूमिकेबद्दल किंवा स्थानाबद्दल लिहित होता, ते केवळ त्याचे स्वत:चेच व्यक्तीगत मत होते का किंवा त्याला दैवी प्रेरणा झाली होती? पौलाने लिहिलेली पत्रे एकंदरीत स्त्री-विरोधक विचाराला चालना देतात का? वर उल्लेखित पौलाचे शब्द तीमथ्याला कोणत्या संदर्भात लागू होतात?
पौलाची ओळखपत्रे
२७ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनातील पुस्तकांपैकी १४ पौलाची लिखाणे आहेत. अद्भुतरीतीने अनेक भाषांमध्ये बोलणे हे त्याच्यावर पवित्र आत्मा असल्याचे प्रमाण होते. अधिकतेत, त्याला आध्यात्मिक साक्षात्कार अनुभवण्यास मिळाला. (१ करिंथकर १४:१८; २ करिंथकर १२:१-५) त्याच्या स्वत्यागाच्या, पूर्ण हृदयाच्या व प्रेमळ उदाहरणाद्वारे त्याच्यामध्ये व त्याच्या समवयस्कांमध्ये जवळची व उबदार बंधुत्वाची आपुलकी उत्पन्न झाली. (प्रे. कृत्ये २०:३७, ३८) त्याने स्त्रियांबद्दल जे म्हटले व लिहिले ते “प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख” यांचा भाग असून ते “सद्बोध . . . ह्या करिता उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.
पौलाच्या पत्रातील स्त्रिया
पौलाची स्त्रियांबद्दल ओळख व त्यांच्याबद्दल असलेल्या आदराचे पुष्कळ पुरावे त्याच्या संपूर्ण लिखाणामध्ये आहेत. वारंवार, तो त्यांचा मंडळ्यामधील व कुंटुबातील निरनिराळ्या भूमिकेबद्दल संदर्भ घेतो. त्याच्या एका पत्रामध्ये, ख्रिस्ती मेंढपाळाच्या इष्ट गुणांची तुलना लालन पालन करणाऱ्या दाईच्या गुणासोबत केली आहे.—१ थेस्सलनीकाकर २:७.
त्याच्या पत्रातील नावाने उल्लेखलेल्या पुष्कळ ख्रिस्ती बहिणी, ह्या उबदार स्तुतीला पात्र आहेत. रोम येथील मंडळीच्या सभासदातील शुभेच्छेत विशिष्ट अशा मुख्य स्त्रिया होत्या, ज्यांचा “प्रभू मध्ये फार श्रम केले” असा उल्लेख आहे. (रोमकर १६:१२) युवदीयेला व सुंतुखेला उद्देशून, फिलिप्पै येथील बांधवाना त्यांने उत्तेजन दिले की, “ज्या स्त्रियांनी माझ्या . . . सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.” (फिलिप्पैकर ४:३) पौलाने तीमथ्याला त्याच्या पत्रामध्ये, त्याची आजी लोईस व त्याची आई युनीके ह्यांच्या विश्वासाबद्दलच्या उदाहरणाची सत्यता प्रदर्शित केली.—२ तीमथ्य १:५.
ह्या व्यतिरिक्त, पौलाच्या ख्रिस्ती भगिणींना त्याच्याबद्दल कसे वाटले याचा काही पुरावा आहे का? त्याचे आक्विला व प्रिस्का या विवाहीत जोडप्यांशी व्यक्तीगत जवळचे नातेसंबध होते. त्यांच्याबद्दल त्याने कृतज्ञपूर्वक निक्षून सांगितले की, केवळ आक्विलाच नव्हे तर त्याची बायको प्रिस्का हिने देखील [त्याच्या] “जीवाकरिता आपला जीव धोक्यात घातला.”—रोमकर १६:३, ४.
स्त्री-विरोधक मनाचा कल?
“वडील माणसाला टाकून बोलू नका, तर त्याला बापासमान समजून बोध कर, तरुणांस बंधूसमान मानून; वडील स्त्रियांस मातासमान मानून, तरुण स्त्रियांस पूर्ण शुध्दतेने बहिणींसमान मानून बोध कर.” (१ तीमथ्य ५:१, २) पौलाने तीमथ्याला सांगितलेले हे शब्द स्त्रीजातीला पूर्णपणे आदर प्रदर्शित करत नाही का? पौलाने ख्रिस्ती मंडळीच्या कामात स्त्रियांना आणि पुरुषांना समान आदर दाखविलेला आहे. त्याने लिहिले, “यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहा.”—गलतीकर ३:२८.
विवाहातील देवाने नियुक्त केलेल्या भूमिकेबद्दल पौल लिहितो: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे.” (इफिसकर ५:२२, २३; पडताळा १ करिंथकर ११:३.) होय, पती व पत्नीच्या आपआपल्या भूमिका ह्या वेगळ्या असल्या तरीही, त्यांचा सोबती हा कमी दर्जाचा आहे असा याचा अर्थ होत नाही. त्यांच्या भूमिका पूरक आहेत, व प्रत्येक भूमिका पूर्ण करण्यात एक आव्हान असते जे साध्य केल्यावर कौटुंबिक हित वाढते. याशिवाय, पतीचे मस्तकपद राखणे हे अन्यायी किंवा निष्ठूर असे असू नये. पौलाने पुढे म्हटले: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रिती करावी,” आणि त्यांच्यासाठी मोठे स्वार्थत्याग करण्याची इच्छा दाखवावी. (इफिसकर ५:२८, २९) मुलांनी माता व पिता दोघांच्याही आज्ञा पाळायच्या होत्या.—इफिसकर ६:१, २.
वैवाहिक जवळिकीच्या बाबतीत देखील पौलाचे शब्द विचार करण्यासारखे आहेत. नि:पक्षपातीपणे पौलाने लिहिले होते की: “पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेहि पतीला द्यावा. पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाहि स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे.”—१ करिंथकर ७:३, ४.
“स्त्रीने . . . निमूटपणे बसावे”
सुरवातीच्या परिच्छेदात, १ तीमथ्य २:१२ हे वचन नमूदीत केलेल्या पौलाच्या शब्दांच्या संदर्भात, त्याचा स्त्रियांबद्दलचा “निमूटपणाचा” हा पुरस्कार स्त्री-विरोधक मनाचा कल राखून आहे का? नाही! तर हा “निमूटपणा” मंडळीमध्ये शिकविण्यास व आध्यात्मिक अधिकाराच्या संदर्भात होता, हे आदराच्या दृष्टीने पूर्वी उल्लेखलेल्या ईश्वरीय स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधाच्या बाबतीत वर्णिलेले आहे. *
याचा अर्थ, स्त्रिया ईश्वरी सत्याचे शिक्षण देणाऱ्या होऊ शकत नाहीत असा होत नाही. पौलाने वृद्ध स्त्रियांना उत्तेजन दिले की, त्या तरुण स्त्रियांना ‘सुशिक्षण देणाऱ्या’ असाव्या. लोईस व युनीके, यानी तीमथ्याला मार्गदर्शन दिले याचे अनुकरण करत असताना, ख्रिस्ती मातांनी त्यांच्या मुलांना इश्वरी मार्गांनी शिक्षण द्यावे. (तीतास २:३-५; २ तीमथ्य १:५) युवदीया व सुंतुखे ह्या स्त्रियांनी राज्याची सुवार्ता घोषित केली व स्त्री-पुरुषांना शिष्य बनविले. यांचे अनुकरण केल्यामुळे आज, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये लाखो ख्रिस्ती स्त्रियांना आध्यात्मिक पूर्णता मिळत आहे.—स्तोत्र ६८:११; मत्तय २८:२०; फिलिप्पैकर ४:२, ३.
मग, तुमचा निष्कर्ष काय आहे? पौलाचे लिखाण, एकंदरीत स्त्री-विरोधक मताचे समर्थन करते का? (g94 7/8)
[तळटीपा]
^ १ तीमथ्य २:११ (न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) या वचनातील “सर्वस्वी अधिनता” या वाक्य्प्रचाराच्या अनुषंगाने पवित्र शास्त्राचे विद्वान डब्लू. ई. वाईन लिहितात: “ती आज्ञा म्हणजे मनाने किंवा विवेकाने शरणागती पत्करणे तसेच, खाजगी रितीने निवाडा करण्याचे कर्तव्य सोडून देणे याला अनुलक्षून नाही. तर ‘अधिनता’ हा वाक्य्प्रचार अधिकाराविरुध्द बंडाळी करण्याच्या संबंधाने इशारा देण्यासाठी आहे व हेच उदाहणार्थ पुढील वचनात सांगितले आहे.”