मला ऑस्ट्रेलियात खरे धन प्राप्त झाले
मला ऑस्ट्रेलियात खरे धन प्राप्त झाले
ते एप्रिल १९७१ चे वर्ष होते. ऑस्ट्रेलियात सात वर्षे घालवल्यावर मी माझ्या कुटुंबाला भेट देण्यासाठी अलिकडेच ग्रीसला परतलो होतो. संध्याकाळची वेळ होती. मी कॉरीजच्या गावातील चौकातल्या कॉफीच्या दुकानातील मेजाजवळ बसलो होतो, त्यावेळी स्थानिक पाळक व महापौर माझ्यासमोर येऊन बसले. त्यांना माझ्याशी वादविवाद करण्याची इच्छा होती हे स्पष्टच दिसत होते.
अभिवादन देखील न करता पाळकाने माझ्यावर आरोप केला की, मी केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशानेच ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. मला आश्चर्य वाटले असे म्हटले तर, मुद्दामहून कमी सांगितल्यासारखे होईल. मी होईल तितक्या शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला की, ऑस्ट्रेलियात राहात असताना पैशांपेक्षाही अधिक मौल्यवान धन मी मिळवू शकलो.
माझ्या उत्तरामुळे त्याला आश्चर्य वाटले परंतु, माझ्या म्हणण्याचा कार्य अर्थ होतो ते त्याने विचारले. मी उत्तर दिले, पुष्कळ इतर गोष्टींपैकी मी हेही शिकलो की देवाचे एक नाव आहे. मी थेट त्याच्या नजरेला नजर भिडवून म्हटले: “ही गोष्ट शिकवण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले.” प्रतिसाद देण्याआधी मी त्याला विचारले, “येशू ख्रिस्ताने ‘तुझे नाव पवित्र मानिले जावो’ असे प्रार्थनेच्या नमुन्याप्रमाणे प्रार्थना करण्यास शिकवली तेव्हा त्याने देवाच्या ज्या नावाबद्दल उल्लेख केला ते नाव तुम्ही मला कृपया सांगाल का?”—मत्तय ६:९.
आमच्यातील वादविवादाबद्दल गावातील चौकात लगेचच बातमी पसरली व दहा मिनिटात जवळजवळ २०० लोक जमा झाले. पाळकाला अस्वस्थ वाटू लागले. तो देवाच्या नावाबद्दलच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नव्हता व पवित्र शास्त्रीय प्रश्न पुढे नेण्यासाठी त्याच्याकडे मिळमिळीत उत्तरे होती. तो नेहमीच वेटरकडे अधिक ओझो, एक ग्रीक मद्य मागवत होता त्यावरून तो गोंधळून गेला होता हे दिसत होते.
अशाप्रकारे दोन तास गेले. माझे वडील माझ्या शोधात तेथे आले, पण काय चालले आहे ते पाहिल्यावर ते शांतपणे एका कोपऱ्यात बसून दृश्य पाहू लागले. अशी ही उत्साहपूर्ण चर्चा रात्रीच्या ११.३० पर्यंत चालत राहिली व तेव्हा एक उन्मादित झालेला मनुष्य रागाने ओरडू लागला. त्यावेळी मी जमावास असे सुचवले की, बराच उशीर झाल्यामुळे आपण सर्वांनी घरी गेलेले बरे.
हे समोरासमोर येणे कशामुळे घडले? पाळक व महापौराने माझ्यासोबत भांडण्याचा प्रयत्न का केला? ग्रीसच्या या भागात मी कसा वाढलो याची पार्श्वभूमी तुम्हाला हे समजण्यात मदत करील.
सुरवातीची बिकट परिस्थिती
माझा जन्म, पेलोपोनिसोसमधील कॉरीज या गावात, डिसेंबर १९४० साली झाला होता. आम्ही अतिशय गरीब होतो. मी शाळेत उपस्थित राहात नव्हतो तेव्हा, आईच्या शेजारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाताच्या शेतात, गुडघाभर पाण्यात उभा राहून काम करीत होतो. माझी प्राथमिक शाळा, १३ व्या वर्षी संपल्यावर, माझ्या पालकांनी माझ्यासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्यासाठी योजना केली. मला प्लंबर व खिडक्या बसविण्याच्या कामाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी माझ्या पालकांनी माझ्या मालकाला ५०० किलोग्रॅम गहू व २० किलोग्रॅम गोडे तेल दिले. ते जवळजवळ त्यांचे संपूर्ण वार्षिक उत्पन्न होते.
शिकाऊ उमेदवारीचे जीवन—घरापासून पुष्कळ मैल दूर व बहुधा पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत काम करणे—फारच कठीण होते. कधीकधी माझ्या मनात घरी परतण्याचा विचार यायचा परंतु, मी माझ्या पालकांमुळे तसे करू शकत नव्हतो. त्यांनी माझ्यासाठी एक निःस्वार्थ त्याग केला होता. यास्तव, मी त्यांना माझ्या समस्यांबद्दल कधीच कळवले नाही. मी स्वतःस म्हणालो: ‘कितीही कठीण असले तरी तुला हे चालू ठेवावेच लागेल.’
या वर्षांमध्ये मी वेळोवेळी माझ्या पालकांना भेटू शकलो. शेवटी, १८ व्या वर्षी माझे शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर, मी जेथे कामाच्या संधी अधिक होत्या त्या अथेन्स् राजधानीत जाण्याचा निश्चय केला. तेथे मला नोकरी मिळाली व मी एक खोली भाड्याने घेतली. प्रत्येक दिवशी कामानंतर, मी घरी परत जाई, स्वतःहून स्वयंपाक करी, खोली स्वच्छ करी व त्यानंतर जो थोडा रिकामा वेळ मिळत असे तो इंग्रजी, जर्मन व इटालियन भाषा शिकण्यात घालवत असे.
इतर युवकांची अश्लील भाषा व वागणूकीमुळे मला त्रास होत असे म्हणून मी, त्यांची संगत टाळत होतो. परंतु, त्यामुळे मला बराच एकटेपणा जाणवत होता. मी २१ वर्षांचा झाल्यावर, मला लष्कर सेवा पत्करण्यास भाग पाडले गेले. त्या वेळेदरम्यान मी माझा भाषांचा अभ्यास चालूच ठेवला. त्यानंतर, मार्च १९६४ मध्ये मी लष्कर सोडले, ऑस्ट्रेलियामध्ये देशांतर केले व मेल्बॉर्न येथे स्थायिक झालो.
नव्या देशात धर्माचा शोध
मला लवकरच काम मिळाले. येथे स्थायिक झालेली आणखी एक ग्रीक व्यक्ती मला भेटली. तिचे नाव ऑलेक्साँद्रा होते व मी तेथे गेल्यावर सहा महिन्यांनंतर आमचा विवाह झाला. पुष्कळ वर्षांनंतर, १९६९ मध्ये एका वृद्ध यहोवाची साक्षीदार असणाऱ्या स्त्रीने आमच्या घरी भेट दिली व द वॉचटावर व अवेक! ही नियतकालिके सादर केली. ती नियतकालिके चित्तवेधक असल्याचे मला आढळले त्यासाठी मी त्यांना एका सुरक्षित जागेत ठेवले व माझ्या पत्नीला, त्यांना टाकून देऊ नकोस असे सांगितले. एका वर्षानंतर आणखी दोन साक्षीदार आले व त्यांनी मला मोफत गृह पवित्र शास्त्राभ्यास सादर केला. मी त्याचा स्वीकार केला. माझ्या जीवनातील निरर्थकता भरून काढण्यासाठी मी ज्याच्या शोधात होतो अगदी तेच मी शास्त्रवचनांतून शिकलो होतो.
मी साक्षीदारांसोबत अभ्यास करत असल्याचे माझ्या शेजारणीने पाहिले तेव्हा, ती मला एव्हेंजलीस्टस्बद्दल सांगू लागली की त्यांचा धर्म उत्तम आहे. परिणामांती, मी एव्हेंजलीस्ट चर्चमधील एका वडिलांशी देखील अभ्यास करू लागलो. लवकरच, मी एव्हेंजलीस्ट व साक्षीदार या दोघांच्या सभांना उपस्थित राहू लागलो कारण खऱ्या धर्माचा शोध लावण्याचा मी निश्चय केला होता.
त्याच वेळी, मी ग्रीक धर्मात वाढल्यामुळे, मी कर्मठ धर्माचा खोलवर अभ्यास करू लागलो. एके दिवशी मी, तीन ग्रीक कर्मठ चर्चेसमध्ये गेलो. पहिल्या ठिकाणी मी तेथे येण्याबद्दलचा उद्देश सांगितल्यावर, पाळकांनी दरवाज्याकडे बोट दाखवले. तसे करत असताना त्याने स्पष्टीकरण दिले की, आम्ही ग्रीक असल्यामुळे साक्षीदार किंवा एव्हेंजलीस्ट यांच्यासोबत संबंध ठेवणे चुकीचे होते.
त्याच्या वृत्तीमुळे मला आश्चर्य वाटले परंतु मी विचार केला: ‘कदाचित हा विशिष्ट पाळक चर्चचा चांगला प्रतिनिधी नसेल.’ आश्चर्याचे म्हणजे, दुसऱ्या चर्चमधील पाळकाने देखील अशीच प्रतिक्रिया दर्शवली. परंतु त्याने मला सांगितले की, त्याच्या चर्चमध्ये दर शनिवारी संध्याकाळी एक धर्मशिक्षक तेथे पवित्र शास्त्राभ्यास चालवीत असे. मी तिसऱ्या चर्चमध्ये गेलो तेव्हा माझा भ्रमनिरास झाला.
तथापि, दुसऱ्या चर्चच्या पवित्र शास्त्राभ्यासाला उपस्थित राहण्याचा मी निश्चय केला व नंतरच्या शनिवारी तेथे गेलो. प्रेषितांची कृत्ये या पवित्र शास्त्रीय पुस्तकाचे वाचन मला आवडले. कर्नेल्याने पेत्रासमोर गुडघे टेकले हा अहवाल वाचण्यात आला तेव्हा, या धर्मशिक्षकाने वाचन मध्येच थांबवले व म्हटले की, पेत्राने कर्नेल्याच्या उपासनेला योग्यरितीने नाकारले. (प्रेषितांची कृत्ये १०:२४-२६) त्या क्षणी मी हात उचलला व म्हटले की माझा एक प्रश्न आहे.
“होय, तुला काय जाणून घ्यायचे आहे?”
“जर, पेत्राने त्याची भक्ती करण्याचे नाकारले तर मग आपल्याकडे त्याची मूर्ती असून आपण तिची उपासना का करतो?”
बऱ्याच वेळासाठी स्मशान शांतता होती. मग जणू बॉम्ब स्फोटच झाला. लोक भडकले, व “तू कोठून आलास?” असे ओरडू लागले. दोन तासांसाठी पुष्कळ मोठ्या आवाजात क्रोधिष्ट वादविवाद झाला. शेवटी मी उठून येत असताना, मला घरी घेऊन जाण्यासाठी एक पुस्तक देण्यात आले.
मी ते उघडल्यावर, मी वाचलेले पहिले शब्द हे होते: “आपण ग्रीक आहोत, व आपल्या धर्माने आपली संस्कृती सांभाळून ठेवण्यासाठी रक्त सांडले आहे.” देव केवळ ग्रीक लोकांचाच नाही हे माहीत असल्यामुळे मी, तात्काळ सर्व ग्रीक कर्मठ चर्चेसशी माझे संबंध तोडले. त्यानंतर मी फक्त साक्षीदारांशीच माझा पवित्र शास्त्राभ्यास चालू ठेवला. एप्रिल १९७० मध्ये मी पाण्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवाला माझे समर्पण चिन्हांकित केले. माझ्या पत्नीचा सहा महिन्यांनंतर बाप्तिस्मा झाला.
गावातील पाळकाशी संपर्क
त्या वर्षाच्या शेवटी, ग्रीसमधील माझ्या गावातील पाळकाने, गावातील चर्चची दुरुस्ती करण्यासाठी पैशाची मदत करण्याच्या विनंतीचे पत्र पाठवले. त्याला पैसे पाठवण्याऐवजी मी सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे पुस्तक पाठवले व त्यासोबत एक पत्र लिहून त्यामध्ये असे स्पष्टीकरण दिले की, मी आता एक यहोवाचा साक्षीदार असून मला सत्य मिळाले आहे असा मी विश्वास बाळगतो. माझे पत्र मिळाल्यावर, त्याने चर्चमध्ये घोषणा केली की ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालेल्या एका व्यक्तीने बंड केले होते.
त्यानंतर, ज्या मातांची मुले ऑस्ट्रेलियामध्ये होती त्या, पाळकाला तो माझा मुलगा आहे का असे विचारू लागल्या. माझी आई देखील त्याच्या घरी गेली व त्याने तिला सांगावे अशी विनंती केली. “दुर्दैवाने, तो तुझाच मुलगा आहे,” असे तो म्हणाला. नंतर मला आईने सांगितले की, त्याने तिला माझ्याविषयी हे सांगण्याऐवजी ठार मारले असते तर बरे झाले असते.
ग्रीसमध्ये प्रत्यागमन
आमच्या बाप्तिस्म्यानंतर माझ्या बायकोला व मला ग्रीसला परतून आमच्या कुटुंबियांना व मित्रांना आम्ही पवित्र शास्त्रातून शिकलेल्या नवीन गोष्टींबद्दल सांगायचे होते. त्यासाठी एप्रिल १९७१ मध्ये, आमची पाच वर्षीय मुलगी, थिमित्रा हिच्यासोबत आम्ही दीर्घ काळाच्या सुटीसाठी पुन्हा आलो. माझ्या कॉरीज गावापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर आम्ही कीपॉरीस्यॉ या शहरात राहात होतो. आमच्या विमानाच्या तिकिटांची मर्यादा सहा महिन्यापर्यंत होती.
घरी दुसऱ्या रात्री, आई मला रडून सांगू लागली की, मी चुकीचा मार्ग अनुसरला होता व कुटुंबाच्या नावाला कलंक आणला होता. रडत व हुंदके देत तिने मला माझ्या “चुकीच्या” मार्गापासून वळण्यासाठी विनंती केली. त्यानंतर, ती बेशुद्ध होऊन माझ्या हातावर कोसळली. दुसऱ्या दिवशी मी तिच्यासोबत कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला. मी तिला समजावले की, ज्या देवाबद्दल तिने आम्हाला लहानपणापासून इतक्या प्रेमाने शिकवले होते त्याच्याबद्दलच मी केवळ माझे ज्ञान वाढवले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी स्थानिक पाळक व गावातील महापौर यांच्याशी माझी ती अचानक अशी अविस्मरणीय गाठ पडली.
अथेन्स्मध्ये स्थायिक झालेले माझे दोन धाकटे भाऊ इस्टर सणासाठी आले होते. मी जणू कुष्ठरोगी असल्याप्रमाणे ते दोघे माझ्यापासून दूर राहात. परंतु, एके दिवशी, त्या दोघांतील थोरला ऐकू लागला. पुष्कळ तासांच्या चर्चेनंतर, मी त्याला पवित्र शास्त्रातून दाखवलेल्या सर्व गोष्टींशी तो सहमत आहे असे म्हणाला. त्या दिवसापासून, सर्व कुटुंबासमोर तो माझी बाजू घेऊ लागला.
त्यानंतर, मी अथेन्स्ला पुष्कळ वेळा माझ्या भावाकडे राहण्यासाठी जात असे. मी दर वेळी जात असे तेव्हा, तो इतर कुटुंबांना सुवार्ता ऐकण्यासाठी बोलवत असे. नंतर, त्याने व त्याच्या पत्नीने तसेच ते ज्यांच्यासोबत पवित्र शास्त्राभ्यास चालवीत होते, अशा आणखी तीन कुटुंबांनी पाण्याने बाप्तिस्मा घेऊन देवाला त्यांचे समर्पण चिन्हांकित केले, तेव्हा मला फारच आनंद झाला!
आठवडे फार लवकर निघून गेले, व आमचे सहा महिने संपण्याआधीच आमच्या गावापासून ७० किलोमीटर्स दूर असणाऱ्या मंडळीत सेवा करणाऱ्या साक्षीदाराने आम्हाला भेट दिली. त्या भागात प्रचार कार्यासाठी लागणाऱ्या मदतीबद्दल त्यांनी सांगितले व मी तेथेच कायम राहावे याबद्दल मी कधी विचार केला का असे त्यांनी विचारले. त्या रात्री मी माझ्या पत्नीसोबत त्या शक्यतेबद्दल बोलणी केली.
आम्हाला तेथे राहणे कठीण होईल असे आमच्या दोघांचेही मत होते. परंतु, लोकांना पवित्र शास्त्राचे सत्य ऐकण्याची फारच गरज होती हे स्पष्टच होते. शेवटी, निदान एक किंवा दोन वर्षांसाठी तरी राहावे असा आम्ही निश्चय केला. माझी पत्नी ऑस्ट्रेलियाला पुन्हा जाऊन, आमचे घर व कार विकून तिला जमतील तितक्या गोष्टी आणणार होती. आमच्या निश्चयामुळे, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शहरात गेलो व एक घर भाड्याने घेतले. तसेच, आमच्या मुलीचे नाव देखील प्राथमिक शाळेत नोंदवले.
विरोधाचा उद्रेक होतो
आमच्यासोबत प्रत्यक्षात युद्ध पुकारले गेले. पोलीस, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून विरोध आला. शाळेत, थिमित्रा क्रुसाचे चिन्ह करीत नव्हती. तिने करावे म्हणून शाळेतील अधिकाऱ्यांनी तिला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी एका पोलिसाला बोलवले. परंतु ती खंबीर राहिली. मला शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी बोलवले. त्यांनी मला आर्चबिशपकडील एक पत्र दाखवले. त्यात, मी थिमित्राला घेऊन जावे असे लिहिले होते. तथापि, मुख्याध्यापकांशी बराच वेळ चर्चा केल्यावर तिला शाळेत राहण्यास अनुमती मिळाली.
कालांतराने, मला असे कळाले की, कीपारीसियामध्ये एक जोडपे होते जे यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलनाला उपस्थित राहिले होते, व आम्ही त्यांची आस्था पुन्हा उत्तेजित करू शकलो. माझ्या पत्नीने व मी, जवळच्या गावातून साक्षीदारांना आमच्या घरी पवित्र शास्त्राभ्यासांसाठी देखील बोलावले. परंतु, थोड्याच वेळात, पोलीस आले व त्यांनी सर्वांची चौकशी करण्यासाठी आम्हाला पोलीस ठाण्यात नेले. परवाना नसताना मी माझे घर उपासनेची जागा म्हणून वापरत होतो, असा आरोप माझ्यावर केला. परंतु, आम्हाला तुरुंगात न टाकल्यामुळे आम्ही आमच्या सभा चालूच ठेवल्या.
मला नोकरी मिळाली पण, बिशपने त्याविषयी ऐकल्यावर, मला काढून टाकले जात नाही तोवर माझ्या मालकाचे दुकान बंद करण्यात येईल अशी धमकी दिली. एक प्लंबिंग व शीट मेटलचे दुकान विक्रीसाठी होते व आम्ही ते घेऊ शकलो. त्यानंतर लगेचच दोन पाळक आम्हाला ते बंद करण्याच्या धमक्या देऊ लागले, व काही आठवड्यांनंतर आर्चबिशपने आमच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्याची आज्ञा फर्मावली. त्यावेळी, ग्रीक कर्मठ चर्चमधून बहिकृष्त केलेल्या कोणालाही, पूर्णपणे समाजहीन व्यक्तीसारखे वागवले जाई. आत प्रवेश करणाऱ्या कोणालाही भीती दाखवण्यासाठी, दुकानाबाहेर एका पोलीस अधिकाऱ्याला उभे केले गेले. कोणतेही गिऱ्हाईक नव्हते तरीसुद्धा, आम्ही मुद्दाम दुकान दररोज उघडे ठेवत होतो. आमची ही बिकट अवस्था लवकरच शहरातील चर्चेचा विषय झाली.
अटक करून चौकशीसाठी उभे केले
एके शनिवारी, मी व आणखी एक गृहस्थ त्यांच्या मोटार सायकलवरून जवळील शहरात साक्षकार्य करण्यासाठी निघालो. तेथे आम्हाला पोलिसांनी अडवले व पोलीस ठाण्यात नेले. तेथे आम्हाला त्या सप्ताहांतासाठी ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी आम्हाला पुन्हा कीपारीसियाला रेल्वेने नेण्यात आले. आम्हाला अटक केल्याची बातमी सगळीकडे पसरली होती, व पोलीस संरक्षकांबरोबर आलेले पाहण्यासाठी एक जमाव रेल्वे स्टेशनवर उभा होता.
आमच्या बोटांचे ठसे घेतल्यावर आम्हाला सरकारच्या वतीने खटला चालवणाऱ्या वकीलाकडे नेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केलेल्या गावकऱ्यांकडून एकत्र केलेले आरोप तो माठ्याने वाचून दाखवेल, असे म्हणून त्याने कार्यवाहीची सुरवात केली. पहिला आरोप, “येशू ख्रिस्त १९१४ साली राजा झाला असे त्यांनी आम्हाला सांगितले.”
चिडून वकीलाने विचारले, “तुम्हाला ही कल्पना मिळाली तरी कोठून?”
मी पुढे सरसावलो, त्याच्या मेजावरील पवित्र शास्त्र घेतले, मत्तय २४ अध्याय काढला व त्यास वाचायला सांगितले. एका क्षणासाठी तो अडखळला परंतु, नंतर त्याने पवित्र शास्त्र घेतले व वाचू लागला. काही मिनिटांसाठी वाचल्यावर, तो उत्तेजित होऊन म्हणाला, “अरे, अशी जर गोष्ट आहे तर मी सर्व गोष्टींचा त्याग करून मठात जायला हवे!”
“नाही,” मी शांतपणे उत्तर दिले. “तुम्ही पवित्र शास्त्राचे सत्य शिकले पाहिजे व इतरांनाही ते शोधण्यात मदत केली पाहिजे.”
काही वकील आले, व आम्ही त्या दिवशी काहींना साक्ष देऊ शकलो. उपरोधिकपणे, यामुळे आणखी एक आरोप लावण्यात आला—धर्मांतर करण्याचा!
त्या वर्षी आमचे तीन न्यायालयीन खटले झाले परंतु, शेवटी आम्हाला सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले. विजय मिळाल्यामुळे, आमच्याबद्दल लोकांचा जो आस्थाशून्य दृष्टिकोन होता त्यावर मात करण्यात आली. त्यानंतर ते आमच्याकडे अधिक मोकळेपणाने येऊ लागले व देव राज्याबद्दल आम्हाला जे सांगायचे होते ते ऐकू लागले.
कालांतराने, कीपारिसिया येथे आमच्या घरातील छोट्या अभ्यासाच्या गटाची एक मंडळी झाली. आमच्या नवीन मंडळीत एका ख्रिस्ती वडिलांना पाठवले व मला सेवा सेवक म्हणून नेमण्यात आले. लवकरच आमच्या घरातील सभांना १५ क्रियाशील साक्षीदार नियमितपणे उपस्थित राहू लागले.
पुन्हा ऑस्ट्रेलियाला
दोन वर्ष व तीन महिने उलटल्यावर, आम्ही पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाण्याचे ठरवले. येथे वर्ष फार लवकर उलटली. माझी मुलगी थिमित्रा हिने तिचा विश्वास टिकवून ठेवला व आता मेल्बॉर्नच्या एका मंडळीतील सेवा सेवकाशी विवाहित आहे. मी आता मेल्बॉर्न येथील ग्रीक भाषेच्या मंडळीत वडील या नात्याने सेवा करीत आहे. तेथेच माझी पत्नी व १५ वर्षीय मुलगी, मार्था उपस्थित राहतात.
आम्ही सोडून आलेली कीपारिसियातील छोटी मंडळी आता मोठी झाली आहे. तेथील पुष्कळ पात्र जणांनी पवित्र शास्त्र सत्यासाठी त्यांची अंतःकरणे ग्रहणीय बनवली आहेत. १९९१ च्या उन्हाळ्यात, मी ग्रीसला काही आठवड्यांसाठी गेलो व कीपारिसियामध्ये जाहीर पवित्र शास्त्र भाषण दिले. त्यासाठी ७० जण उपस्थित होते. आनंदाची गोष्ट म्हणजे, माझी धाकटी बहीण मारिया, हिला कुटुंबाकडून विरोध असताना देखील ती यहोवाची सेविका झाली आहे.
मी याबद्दल उपकार मानतो की, ऑस्ट्रेलियामध्ये मला खरे धन—आपला निर्माणकर्ता, यहोवा व त्याच्या राज्य सरकाराचे ज्ञान व समज—प्राप्त करण्याची संधी मिळाली. माझ्या जीवनात आता खरा उद्देश आहे. देवाच्या स्वर्गीय राज्याने या संपूर्ण पृथ्वीवर आशीर्वाद पसरवलेले पाहण्यासाठी माझे कुटुंब व मी निकट भविष्याची वाट पाहात आहोत.—जॉर्ज कॉटसीकॉरोनीस यांनी निवेदित केल्याप्रमाणे. (g94 6/22)
[२४ पानांवरील चित्रं]
कीपारिसिया, मी ऑस्ट्रेलियावरून परत आल्यावर राहात होतो तेथे
[२४ पानांवरील चित्रं]
ऑलेक्सांद्रा, या माझ्या पत्नीसोबत