व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

कपडे “आपण घातलेल्या कपड्यांमुळे—काही फरक पडतो का?” (मार्च ८, १९९९) या लेखाच्या संदर्भात मी हे पत्र लिहित आहे. तुम्ही आम्हाला “यथाकाळी खावयास” देता याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत कृतज्ञ आहोत. (मत्तय २४:४५) पण, लेखातली एकदोन विधानं वाचून वाटलं, की ही कोणाची तरी व्यक्‍तिगत मतं आहेत. उदाहरणार्थ, “तुमच्या आवडत्या अभिनेत्याचं किंवा खेळाडूचं चित्र असलेलं टी-शर्ट घातल्यामुळे हळूहळू तुम्ही व्यक्‍तिपूजेकडे वळू शकता; ही देखील एकप्रकारची मूर्तिपूजाच आहे,” हे फारच झालं. मला असं वाटतं, की एखाद्या व्यक्‍तीला, उदाहरणार्थ एखाद्या खेळाडूला पसंत करणं, त्याचं कौतुक करणं हे बायबलच्या विरोधात नाही.

एम. डी., फ्रान्स

आपले मनोगत व्यक्‍त केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. पण, आपण कोणते कपडे घालावेत आणि कोणते घालू नयेत याबाबतीत विशिष्ट नियम बनवण्याचा आमचा हेतू नव्हता. कपडे घालण्याच्या बाबतीत ज्याने त्याने “मर्यादेने” वैयक्‍तिक निर्णय घ्यावा असे या लेखातून आम्हाला कळवायचं होतं. (१ तीमथ्य २:९, १०) त्यामुळे टी-शर्टच्या संदर्भात केलेलं विधान वैयक्‍तिक मत नसून आम्हाला त्यातून केवळ हे सुचवायचं होतं, की अशा स्टाईलचे कपडे घालणाऱ्‍या व्यक्‍तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्‍तीच्या कुशलतेचं, त्याच्या अंगच्या कलेचं कौतुक करण्यात चुकीचं असं काहीच नसलं तरी अशाप्रकारचे कपडे घालून, बायबलच्या दर्जांनुरूप जीवन न जगणाऱ्‍या व्यक्‍तीच्या जीवनशैलीबद्दल, त्याच्या आचरणाबद्दल आपण संमती दर्शवत आहोत असं इतरांना भासवणं ख्रिश्‍चनांसाठी खरोखरच शहाणपणाचं ठरेल काय?—संपादक.

पालकांना लिहिलेले पत्र “पालकांना लिहिलेले एक खास पत्र” हा लेख फार उत्तेजनात्मक होता. (एप्रिल ८, १९९९) खरं तर ते पत्र मी माझ्या आईबाबांना लिहायला हवं होतं. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यात, नियमितपणे क्षेत्र सेवेत जाण्यात आणि पाहुणचार करण्यात त्यांनी आमच्यापुढे फारच चांगला आदर्श ठेवला. ख्रिस्ती मंडळीत बाबा सेवा सेवक होते. त्यामुळे मंडळीच्या कामात ते अतिशय व्यस्त असायचे. पण तरी आमच्यासाठी ते वेळोवेळी काहीना काही मनोरंजनाची व्यवस्था करत. त्यामुळे मौजमजा करणाऱ्‍या शाळेतल्या मित्रमैत्रिणींचा आम्हाला कधीच हेवा वाटला नाही. एकदा अधिवेशनावरून घरी परत येताना मोटार अपघातात बाबा गेले आणि आमचे जीवन पार बदलले. पण, देवाची सेवा करण्याचं आम्ही कधी सोडलं नाही. बाबांनी त्यांच्या जीवनात देवाच्या राज्याला नेहमी पहिलं स्थान दिलं होतं आणि बाबा गेल्याचं इतकं मोठं संकट कोसळूनसुद्धा आईचा देवावरील विश्‍वास इतका देखील ढळला नाही. आईबाबांचं हेच उदाहरण आम्हाला देवाची सेवा करत राहण्याची प्रेरणा देतं.

एस. के., जपान

संकटग्रस्त मुले मे ८, १९९९ अंकातील “संकटग्रस्त मुले—त्यांचे संरक्षण कोण करील?” या लेखमालेसाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते. बाल दुर्व्यवहाराच्या भयंकर परिणामांविषयी लोकांना सांगितल्यानेच जनजागृती होऊ शकते. आपल्या चिमुरड्यांचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा, लोकांचं कल्याण व्हावं या उद्देशानं तुम्ही हाती घेतलेलं कार्य पुढेही चालू ठेवावं, अशी आमची नम्र विनंती आहे.

पी. पी., बाल कल्याण मंत्रालय, रोम, इटली

आपण नवीन सहस्त्रकात पदार्पण करण्याच्या बेतात असताना अजूनही असंख्य मुलं गुलामगिरीत जीवन कंठत आहेत आणि लोकांची हत्या करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जात आहे हे कळल्यावर मनात धस्स झालं. आणि यांपैकी बऱ्‍याच मुलांच्या भविष्यात फक्‍त अंधार आहे ही त्याहून धक्कादायक गोष्ट आहे. खरंच, सावध राहा! मासिकानं जगातल्या मुलांची दैन्यावस्था हुबेहूब रेखाटली आहे.

एस. आर. बी., ब्राझील

आमच्या लग्नाला ३६ वर्षं होऊन गेल्यानंतर आमचा घटस्फोट झाला. गेल्या कित्येक वर्षांपासून माझा नवरा (जो खरा ख्रिश्‍चन नव्हता) आमच्या स्वतःच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करायचा हे जेव्हा मला पहिल्यांदा समजलं तेव्हा मी अक्षरशः सुन्‍न झाले. लैंगिक अत्याचाराच्या भीषण परिणामांचा आणि त्यामुळे निष्पाप बालकांना होणारी अनामिक मनोवेदना कोणीच समजू शकत नाही असे मला वाटायचे. साथीच्या रोगाप्रमाणे आज समाजात फोफावणाऱ्‍या या समस्येविषयी तुम्ही लिहिल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानते.

एन. एम., संयुक्‍त संस्थाने