व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उच्च राहणीमानाच्या शोधात

उच्च राहणीमानाच्या शोधात

उच्च राहणीमानाच्या शोधात

“विसाव्या शतकाचा विकास होऊ लागला तसे अनेकांचे दैनिक जीवन . . . विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे पार बदलले.”— द ऑक्सफोर्ड हिस्ट्री ऑफ द ट्‌वेंटियथ सेंच्युरी.

यायुगातला एक सर्वात मोठा बदल लोकसंख्येत झाला आहे. इतर कोणत्याही शतकात जागतिक लोकसंख्येत इतकी प्रचंड वाढ झाली नाही जितकी या शतकात झाली आहे. १८०० च्या दशकाच्या सुरवातीला लोकसंख्या १०० कोटींपर्यंत पोचली आणि १९०० सालामध्ये ती १६० कोटींपर्यंत वाढली होती. पण १९९९ साली तर लोकसंख्या चक्क ६०० कोटींपर्यंत पोचली! आणि या वाढत्या लोकसंख्येतील अधिकाधिक लोकांना जीवनात तथाकथित चैनीच्या वस्तू हव्या आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाल्याने आणि जागोजागी आरोग्य निगा उपलब्ध झाल्याने लोकसंख्येच्या या वाढीला हातभार लागला आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान आणि संयुक्‍त संस्थाने यांसारख्या देशांमध्ये सर्वसाधारण आयुर्मर्यादा वाढली; या शतकाच्या सुरवातीला सर्वसाधारण आयुर्मर्यादा ५० हून कमी वर्षे होती तर आता ७० हून अधिक वर्षे झाली आहे. परंतु, हा सकारात्मक बदल सगळीकडेच पाहायला मिळत नाही. किमान २५ राष्ट्रांमधील लोकांची आयुर्मर्यादा अजूनही ५० किंवा त्याहून कमी वर्षांची आहे.

‘कसं जमायचं तुम्हाला . . . ?’

विमाने, कम्प्युटर, टीव्ही यांच्याविना आपल्या वाडवडिलांचे कसे चालायचे असे आजच्या तरुण पिढीला कोडे पडलेले आहे; कारण आजकाल या गोष्टींशिवाय त्यांचे एक पानही हालत नाही, इतक्या या गोष्टी सर्वसामान्य बनल्या आहेत. श्रीमंत देशांमध्ये तर या अत्यावश्‍यक गोष्टी मानल्या जातात. उदाहरणार्थ, मोटारगाडीमुळे आपले जीवन कसे बदलले आहे तेच पाहा. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात तिचा शोध लागला, पण टाईम पत्रिकेने अलीकडेच असे म्हटले: “मोटारगाडीचा शोध हा विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत उल्लेखनीय ठरलेल्या शोधांपैकी एक आहे.”

मोटारगाड्यांचे उत्पादन अचानक बंद पडले तर, युरोपियन कामगार वर्गातल्या प्रत्येक दहा व्यक्‍तींमधील एक व्यक्‍ती बेकार होईल असा अंदाज १९७५ साली काढण्यात आला होता. मोटारगाड्यांच्या उद्योगावरही याचा थेट परिणाम होईल; शिवाय, बँका, शॉपिंग मॉल (दुकानांचे मोठे संकुल), ड्राईव्ह-इन रेस्टॉरंट्‌स आणि वाहने चालवणाऱ्‍या ग्राहकांवर अवलंबून असणाऱ्‍या इतर सुविधा देखील बंद पडतील. शेतकऱ्‍यांना आपला माल बाजारात आणायला कोणताही पर्याय नसल्यामुळे अन्‍नाचे वाटप हळूहळू बंदच पडेल. उपनगरांमध्ये राहून शहरांमध्ये नोकरी करणाऱ्‍या कामगारांना नोकरीवर जाण्याचे साधन उरणार नाही. असंख्य महामार्ग सुनसान पडून राहतील.

मोटारगाड्यांचे उत्पादन वाढवण्याकरता आणि किंमती कमी करण्याकरता या शतकाच्या सुरवातीला असेंब्ली लाईन्स (गतिशील जुळणी मार्ग) बसवण्यात आले; आज असेंब्ली लाईन्स बहुतेक सर्व कारखान्यांमध्ये आढळतात. (असेंब्ली लाईन्समुळे किचन अप्लायन्सेससारख्या इतर उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य झाले.) या शतकाच्या सुरवातीला, बिगर घोड्याची गाडी फक्‍त श्रीमंतांचीच खेळणी होती; तेही मोजक्याच देशांमध्ये. आज मात्र बहुतेक ठिकाणी सर्वसामान्य माणूस याच गाड्यांवर अवलंबून आहे. एका लेखकाने अशा शब्दांत आपले मत व्यक्‍त केले की, “२० व्या शतकाच्या उत्तरार्धात मोटारगाड्यांविना माणसांच्या जीवनाची कल्पनाच करता येत नाही.”

चैनबाजीचा पाठलाग

पूर्वी, कोठे जावेच लागले तर प्रवास केला जात होता. पण २० व्या शतकात सगळे चित्रच पालटले—विशेषतः विकसित देशांमध्ये. चांगल्या पगाराच्या नोकऱ्‍या सहजगत्या उपलब्ध होऊ लागल्या आणि कामाचा आठवडा फक्‍त ४० तासांचा किंवा त्याहून कमी तासांचा झाल्यामुळे लोकांकडे प्रवास करण्यासाठी पैसाही होता आणि सवडही. मग, मनात येईल तेथे जाण्यासाठी प्रवास केला जाऊ लागला. मोटारगाड्या, बस, विमाने यांच्यामुळे तर दूरवर जाऊन मनोरंजन करणेही सुलभ बनले. पर्यटन तर एक मोठा व्यापारच होऊन बसला.

द टाईम्स ॲटलस ऑफ द ट्‌वेंटियथ सेच्युरी यानुसार, पर्यटनाचा फार मोठा प्रभाव “पर्यटनाच्या देशांवर त्याचप्रमाणे पर्यटकांच्या देशांवरही झाला.” काही हानीकारक परिणामही झाले आहेत. बहुतेकदा असे घडले की, ज्या स्थळांकडे पर्यटक आकर्षित झाले होते त्याच स्थळांचा त्यांनी नाश केला.

शिवाय, खेळ-क्रिडा यांचा शोक पूर्ण करण्याकरता देखील लोकांना भरपूर वेळ मिळू लागला. पुष्कळ लोक खेळांमध्ये भाग घेऊ लागले तर बाकीचे आपल्या आवडत्या गटाचे आणि खेळाडूंचे चाहते बनले. पण काहीजण तर उपद्रवी चाहते देखील बनले. टीव्ही आल्यावर तर जवळजवळ प्रत्येकालाच खेळ पाहता येऊ लागले. देशांतर्गत होणाऱ्‍या त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळी हजारो-लाखो लोक टीव्हीच्या समोरच बसून राहू लागले.

द टाईम्स ॲटलस ऑफ द ट्‌वेंटियथ सेंच्युरी म्हणते: “जनतेचे मनोरंजन करणाऱ्‍या उद्योगाला आज जे स्वरूप लाभले आहे ते क्रिडा आणि चित्रपट यांच्यामुळेच लाभले आहे; [मनोरंजन उद्योग] हा सर्वात जास्त कामगार वर्ग असणाऱ्‍या आणि नफा मिळवणाऱ्‍या उद्योगांपैकी एक आहे.” दरवर्षी, मनोरंजनावर लोक अब्जावधी डॉलर खर्च करतात; त्यात पुष्कळांच्या आवडीचे मनोरंजन अर्थात जुगारही सामील आहे. उदाहरणार्थ, १९९१ साली घेतलेल्या एका अभ्यासानुसार जुगार हा युरोपियन समाजातल्या मोठ्या उद्योगांमध्ये १२ व्या क्रमांकावर आहे; त्याची वार्षिक उलाढाल किमान ५७ अब्ज डॉलर इतकी आहे.

अशाप्रकारचे मनोरंजन सहजगत्या उपलब्ध होऊ लागले तसे थरारक मनोरंजनाच्या नवनवीन प्रकारांचा लोक शोध घेऊ लागले. उदाहरणार्थ, मादक पदार्थांचा इतक्या सर्रासपणे वापर होऊ लागला की, १९९० च्या दशकाच्या मध्यात बेकायदेशीर मादक पदार्थांच्या व्यापारातून वर्षाला अंदाजे ५०,००० कोटी डॉलर उत्पन्‍न मिळू लागले. एका सूत्रानुसार, तो “जगातल्या व्यापारी क्षेत्रात सर्वाधिक नफा मिळवून देणारा एकमेव उद्योग होता.”

“मनोरंजनाचा अतिरेक”

तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग जणू एका लहानशा गावाप्रमाणे बनले. आज राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बदलांचा परिणाम क्षणार्धात संपूर्ण जगभर पसरतो. फ्युचर शॉक या पुस्तकाचे लेखक, प्राध्यापक ॲल्व्हन टॉफ्लर १९७० साली असे म्हणाले होते: “महत्त्वपूर्ण उलाढाली आधीही घडल्या आहेत. पण, या उलाढालींचे पडसाद त्या त्या समाजामध्ये किंवा जवळपासच्या समाजांमध्येच उमटत. त्यांची झळ इतर समाजांपर्यंत पोहंचायला कित्येक पिढ्या किंवा कित्येक शतके लागायची. . . . आजची सामाजिक बंधने एकमेकांत इतकी गुंफलेली आहेत की, एखादी घटना घडताच तिचा परिणाम अगदी क्षणार्धात संपूर्ण जगभर पसरतो.” सबंध जगभरातील लोकांपर्यंत पोचण्यामध्ये सॅटेलाईट टीव्ही आणि इंटरनेट यांचाही पुष्कळ हातभार राहिला आहे.

काहींच्या मते, टीव्ही, २० व्या शतकातले सर्वात प्रभावशाली माध्यम ठरले आहे. एका लेखिकेने त्याविषयी असे म्हटले: “टीव्हीच्या कार्यक्रमांवर काहीजण टीका करत असले तरीही टीव्हीचे सामर्थ्य निर्विवाद आहे.” तथापि, कार्यक्रम बनवणाऱ्‍या व्यक्‍ती जशा आहेत तसाच टीव्हीसुद्धा आहे. चांगला प्रभाव पाडण्याची शक्‍ती असलेल्या टीव्हीकडे वाईट मार्गाला लावण्याची शक्‍तीसुद्धा आहे. हिंसा आणि अनैतिकता दाखवणाऱ्‍या अशा फालतू कार्यक्रमांद्वारे लोकांना जे हवे ते पाहायला मिळाले आहे; पण या कार्यक्रमांनी लोकांच्या आपापसातले संबंध सुधारले नाहीत तर उलट आणखीनच बिघडवले आहेत.

मनोरंजनाचा अतिरेक (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लेखक नील पोस्टमन आणखी एक धोका दाखवून देताना म्हणतात: “टीव्ही आपल्याला मनोरंजक कार्यक्रम दाखवतो ही खरी समस्या नाही. समस्या ही आहे की, टीव्हीने सर्वच गोष्टींना मनोरंजन बनवून टाकले आहे. . . . कार्यक्रमातून काहीही दाखवले जात असले किंवा कोणत्याही दृष्टिकोनातून ते दाखवले जात असले, तरी नेहमी असेच मानले जाते की ते आपल्या मनोरंजनासाठी आहे.”

सुखा-समाधानाला जास्त महत्त्व दिले जाऊ लागले तसतशी आध्यात्मिक आणि नैतिक मूल्ये रसातळाला पोहंचली. द टाईम्स ॲटलस ऑफ द ट्‌वेंटियथ सेंच्युरी म्हणते की, “जगातल्या अनेक भागांमध्ये २० व्या शतकादरम्यान संघटित धर्मव्यवस्थेची समाजावर असलेली पकड ढिली पडली आहे.” एकीकडे आध्यात्मिक मूल्यांचा ऱ्‍हास होताना चैनबाजीला मात्र प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व दिले जाऊ लागले आहे.

“दिसतं तसं . . . ”

विसाव्या शतकात अनेक फायदेकारक बदलही घडले आहेत पण “दिसतं तसं नसतं,” असे जे म्हणतात ते अगदी खरे आहे. आयुष्यमान वाढल्यामुळे लोकांना फायदा झाला असला, तरी जगातली लोकसंख्या वाढल्यामुळे आणखी मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अलीकडेच नॅशनल जिओग्रॅफिक पत्रिकेत असे म्हटले होते: “नवीन सहस्त्रकात प्रवेश करताना सर्वात निकडीची समस्या आहे लोकसंख्येत होणारी प्रचंड वाढ.”

मोटारगाड्या फार सोयीच्या आणि आरामदायी असतात. पण त्या घातकही ठरतात हे सिद्ध झाले आहे; वाहन अपघातात मरण पावणाऱ्‍यांची संख्या जगभरात दरवर्षी अंदाजे पंचवीस हजार इतकी आहे. शिवाय, वाहनांमुळेच तर प्रदूषणात आणखीन भर पडते. पृथ्वी वाचवायला ५००० दिवस (इंग्रजी) या पुस्तकाचे लेखक म्हणतात की, प्रदूषण “आता जागतिक समस्या बनली आहे; प्रदूषणामुळे पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत परिसंस्थांचा नाश केला जात आहे किंवा त्यांना हानी पोचवली जात आहे.” ते पुढे म्हणतात की, “आपण आता परिसंस्थांना हानी पोचवण्याच्या एक पाऊल पुढे गेलो आहोत; श्रेष्ठ जातीच्या प्राण्यांसाठी पृथ्वीला सुस्थितीत ठेवणाऱ्‍या प्रक्रियांमध्येच आपण बिघाड करू लागलो आहोत.”

विसाव्या शतकादरम्यान प्रदूषण ही एक अतिशय बिकट समस्या बनली आहे; आधीच्या शतकांना या समस्येची किंचितही कल्पना नव्हती. नॅशनल जिओग्रॅफिक पत्रिका म्हणते: “अलीकडेपर्यंत कोणालाही वाटले नव्हते की, मानवी कार्यांचा अशा जगव्याप्त प्रमाणावर प्रभाव होऊ शकतो. आता काही शास्त्रज्ञांची अशी खात्री पटली आहे की, लिखित इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारचे बदल घडत आहेत.” पुढे त्यात असा इशारा दिला आहे: “मानवजातीच्या कार्यांचा एकंदर परिणाम इतका भयंकर आहे की एकाच मानवी पिढीत [वनस्पती आणि प्राण्यांच्या] अनेक जाती नामशेष होऊ शकतात.”

विसावे शतक खरोखरच अद्वितीय ठरले आहे. उच्च राहणीमानाचा आनंद लुटण्याच्या अभूतपूर्व संधी प्राप्त झालेल्या लोकांचे जीवनच आता धोक्यात आले आहे!

[८, ९ पानांवरील तक्‍ता/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

१९०१

मार्कोनीला पहिल्यांदाच अटलांटिकपलीकडे रेडिओ संकेत पाठवण्यात यश मिळाले

१९०५

आइंस्टाईन यांनी सापेक्षतेचा खास सिद्धांत प्रकाशित केला

१९१३

फोर्डने मॉडेल-टी कारची असेंब्ली लाईन सुरू केली

१९४१

टीव्ही बाजारात आला

१९६९

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले

मोठ्या प्रमाणातले पर्यटन बडा उद्योग बनला

इंटरनेटची लोकप्रियता वाढत गेली

१९९९

जगाची लोकसंख्या ६०० कोटींपर्यंत पोचली