‘क्रांतिकारी बदल’
‘क्रांतिकारी बदल’
“मानवी इतिहासातले सर्वात क्रांतिकारी आणि दूरगामी बदल २० व्या शतकात झाले आहेत.”— द टाईम्स ॲटलस ऑफ द ट्वेंटियथ सेंच्युरी.
विसाव्या शतकाबद्दल विचार करताना, अनेकजण टाईम पत्रिकेचे कार्यकारी संपादक वॉल्टर आयझकसन यांच्याशी निश्चितच सहमत होतील; त्यांनी असे म्हटले: “इतर शतकांच्या तुलनेत हे शतक सर्वात अद्भुत ठरले आहे; काहीवेळा प्रेरणादायक तर काहीवेळा भीतीदायक, पण या शतकात नेहमीच काही न काही आश्चर्यकारक घडले आहे.”
नॉर्वेच्या भूतपूर्व पंतप्रधान, ग्रु हार्लम ब्रुंटलान्ट यांचे मत देखील असेच आहे की, हे शतक “अतिरेकांचे शतक ठरले आहे . . . ज्यात मानवाच्या दुष्टाईने कहर केला आहे.” त्या म्हणतात की, “या शतकात बऱ्याच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली [आणि काही ठिकाणी] अभूतपूर्व प्रमाणात आर्थिक वाढही” झाली. परंतु, दुसरीकडे गरीब ग्रामीण भागांचे भविष्य काय तर “लोकसंख्येत वाढ आणि गरिबीमुळे व घाणेरड्या परिसरामुळे होणारी रोगराई.”
राजकीय उलाढाली
विसाव्या शतकाच्या सुरवातीला चीनचे मांचू साम्राज्य, ऑटोमन साम्राज्य आणि अनेक युरोपियन साम्राज्यांची जगाच्या बहुतांश भागावर सत्ता होती. ब्रिटिश साम्राज्य तर जगातल्या एक चतुर्थांश भागावर सत्ता गाजवत होते; प्रत्येक ४ व्यक्तींमधील १ व्यक्ती ब्रिटिश साम्राज्याच्या वर्चस्वाधीन होती. पण हे शतक संपण्यापूर्वीच ही सर्व साम्राज्ये इतिहासजमा झाली. द टाईम्स ॲटलस ऑफ द ट्वेंटिथ सेंच्युरी म्हणते की, “१९४५ मध्ये साम्राज्यवादाचा अंत झाला.”
वसाहतवाद नाहीसा झाल्यावर, १७ व्या आणि १९ व्या शतकांदरम्यान युरोपमध्ये उठलेले राष्ट्रीयत्वाचे वादळ जगातल्या इतर भागांमध्येही पसरले. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो: “दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक युरोपियन राष्ट्रांमधील राष्ट्रीयत्वाचे वादळ शांत झाले . . . मात्र आशिया आणि आफ्रिका येथे ते झपाट्याने वाढू लागले. ही वसाहतवादाविरुद्ध दाखवलेली प्रतिक्रिया होती.” द कॉलिन्स ॲटलास ऑफ वर्ल्ड हिस्ट्री यानुसार, शेवटी “ऐतिहासिक दृश्यात तिसरे जग अवतरले आणि पाच शतकांआधी युरोपियन साम्राज्यवादामुळे सुरू झालेल्या युगाचा अंत झाला.”
साम्राज्ये लय पावल्यावर स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली
—यांतली बहुतेक राष्ट्रे प्रजासत्ताक होती. प्रजासत्ताक शासनपद्धतीला भयंकर विरोधाचा सामना करावा लागला; जसे की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान युरोप आणि आशियातल्या शक्तिशाली हुकूमशाही शासनपद्धतींकडून विरोध झाला होता. या शासनपद्धतींमध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्याला बंदी होती. तसेच अर्थव्यवस्था, प्रसारमाध्यम आणि सैन्य यांवर या शासनपद्धतींचे पूर्णपणे नियंत्रण होते. सरतेशेवटी, संपूर्ण जगावर अधिकार गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला खरा पण त्यासाठी वित्त आणि जीवितहानीची मोठी किंमत मोजावी लागली.युद्धाचे शतक
हे २० वे शतक इतर शतकांपासून एकदम वेगळे आहे ते युद्धामुळेच. पहिल्या महायुद्धाविषयी जर्मन इतिहासकार गीडो नॉप लिहितात: “ऑगस्ट १, १९१४: युरोपियन लोकांना प्रदीर्घ काळापर्यंत शांती मिळवून देणारे १९ वे शतक समाप्त झाले हे कोणाच्या लक्षातही आले नाही; आणि त्याच वेळी २० व्या शतकाची सुरवात झाली याकडे देखील कोणाचे ध्यान नव्हते. तेव्हा सुरू झालेल्या युद्धाचा काळ पुढील तीन दशकांपर्यंत कायम टिकून राहिला, शिवाय माणूस माणसावर किती अत्याचार करू शकतो याचाही प्रत्यय आला.”
इतिहासाचे प्राध्यापक, ह्यू ब्रोगन हे आपल्याला आठवण करून देतात की, “त्या युद्धाचा संयुक्त संस्थानांवर झालेला परिणाम फार मोठा आणि अचंबित करणारा होता; आणि त्याचा प्रभाव आजही [१९९८ मध्येही] जाणवतो.” हार्व्हर्ड विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापिका, आकिरा इरी यांनी असे लिहिले: “अनेक कारणांसाठी पूर्व आशिया आणि संयुक्त संस्थानांच्या इतिहासात पहिले महायुद्ध फार महत्त्वपूर्ण ठरले.”
म्हणूनच, द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका, म्हणतो की दोन्ही महायुद्धे “२० व्या शतकातल्या भूराजनैतिक इतिहासातील महत्त्वाच्या घटना” होत्या. त्यात
असेही म्हटले आहे की, “पहिल्या महायुद्धामुळे चार मोठ्या साम्राज्यांचा पाडाव झाला . . . , रशियात बोल्शेव्हिक राज्यक्रांती घडून आली आणि . . . दुसऱ्या महायुद्धाचा पाया घालण्यात आला.” या महायुद्धांमध्ये झालेला “रक्तपात आणि विध्वंस यापूर्वी कधीही झाला नव्हता.” हेसुद्धा त्यात सांगितले आहे. गीडो नॉप देखील म्हणतात की, “क्रूरता आणि माणसाच्या निर्दयतेला काही पारावार राहिला नाही. या युद्धातून अशा एका युगाचा उदय झाला ज्यामध्ये माणसाला माणूस नव्हे तर निर्जीव वस्तूच्या रूपात पाहण्यात येऊ लागले.”यांसारखी विनाशकारी युद्धे भविष्यात टाळता यावीत म्हणून १९१९ साली राष्ट्रांचे लीग स्थापण्यात आले. पण, जागतिक शांती टिकवण्याचे हे उद्दिष्ट यशस्वी ठरले नाही तेव्हा १९४६ साली त्याच्या जागी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्रसंघाला तिसरे महायुद्ध टाळण्यात यश मिळाले; मात्र शीत युद्ध टाळण्यात त्याला यश मिळाले नाही आणि त्यामुळे कित्येक दशकांपर्यंत आण्विक महाविनाशाची टांगती तलवार लटकत राहिली. त्याचप्रमाणे बाल्कन राष्ट्रांतील लढायांप्रमाणे इतर लहान संघर्षही संयुक्त राष्ट्रसंघाला टाळता आले नाहीत.
जगामधील राष्ट्रांची संख्या वाढली तसे त्यांच्यामध्ये शांती टिकवणेही कठीण बनले. पहिले महायुद्ध सुरू होण्याआधीचा नकाशा आणि आताचा नकाशा पाहिला तर, सध्या निर्माण झालेली ५१ आफ्रिकी आणि ४४ आशियाई राष्ट्रे या शतकाच्या सुरवातीला स्वतंत्र राष्ट्रांच्या रूपात हयातीतही नव्हती. संयुक्त राष्ट्रसंघाची १९४५ साली स्थापना झाली तेव्हा त्याच्या सध्याच्या १८५ सदस्यांपैकी ११६ सदस्य, स्वतंत्र राष्ट्रे म्हणून अस्तित्वातच नव्हती!
“सर्वात लक्षणीय घटनांपैकी एक”
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रशियायी साम्राज्य हेच जगातले सर्वात बलवान साम्राज्य होते. परंतु फार झपाट्याने त्याची पकड ढिली पडत होती. जेफ्री पॉन्टन या लेखकाप्रमाणे अनेकांना वाटले की, “सुधारणेऐवजी क्रांतीची जास्त आवश्यकता होती.” ते पुढे म्हणतात: “आणि ही क्रांती घडवून आणण्याकरता पहिल्या महायुद्धासारखे मोठे युद्ध आणि त्यानंतरची अराजकताही सोसावी लागली.”
त्या वेळी, बोल्शेव्हिक लोकांनी रशियाच्या सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतल्यावर नवीन साम्राज्याचा—सोव्हिएत युनियनने प्रसार केलेल्या जागतिक समाजवादाचा पाया घालण्यात आला. जागतिक युद्ध चालू असताना सोव्हिएत साम्राज्याचा जन्म झाला असला तरी गोळ्यांच्या वर्षावात त्याचा अंत झाला नाही. जुलमी सरकार मुर्दाबाद (इंग्रजी) या मायकल डॉब्स यांच्या पुस्तकात असा दावा केला होता की, १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत सोव्हिएत युनियन “एक प्रचंड बहुराष्ट्रीय साम्राज्य होते जे अशातऱ्हेने बुडत होते की त्याला पुन्हा डोके वर काढणे अशक्य होते.”
तरीही, रशियायी साम्राज्याचा पाडाव हा अचानकच झाला. नॉर्मन डेव्हिस यांचे युरोप—एक इतिहास (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “युरोपियन इतिहासात इतर कोणत्याही मोठ्या साम्राज्याचा पाडाव इतक्या झपाट्याने झाला नाही” आणि “तो [पाडाव] आपोआपच झाला.” पॉन्टन म्हणतात की, “सोव्हिएत युनियनचा उदय, विकास आणि पाडाव विसाव्या शतकातल्या सर्वात लक्षणीय घटनांपैकी एक ठरली.”
खरे पाहता, दूरदूरपर्यंत झळ पोचणाऱ्या क्रांतिकारी बदलांच्या मालिकेमध्ये सोव्हिएत युनियनचा पाडाव ही
२० व्या शतकातली इतर घटनांपैकी केवळ एक घटना होती. अर्थात, राजकारणातल्या उलाढाली काही नवीन नाहीत; हजारो वर्षांपासून त्या चालत आल्या आहेत.परंतु, २० व्या शतकामध्ये शासनांच्याच संबंधाने झालेला एक बदल विशेष लक्ष देण्याजोगा आहे. हा बदल कोणता आहे आणि तुमच्यावर व्यक्तिगतपणे त्याचा कसा परिणाम होतो याची आपण नंतर चर्चा करू या.
त्याआधी, २० व्या शतकात विज्ञान क्षेत्रातील काही पराक्रमांचे आपण परीक्षण करू या. यांच्याविषयी प्राध्यापक मायकल हॉव्हर्ड म्हणतात: “पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेतल्या लोकांना विसावे शतक हे मानवजातीच्या इतिहासातले नवीन आणि आनंदी युग असेल अशी खात्री होती.” या प्रगतींमुळे मानवांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला का?
[२-७ पानांवरील तक्ता/चित्रे]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
१९०१
व्हिक्टोरिया राणी ६४ वर्षे शासन केल्यावर मरण पावली
जगाची लोकसंख्या आहे १६० कोटी
१९१४
ऑस्ट्रियाचा युवराज फर्डिनंड याची हत्या. पहिले महायुद्ध सुरू
शेवटला झार, दुसरा निखलस आपल्या कुटुंबासमवेत
१९१७
लेनिन याच्या नेतृत्वाखाली रशियाई क्रांती
१९१९
राष्ट्रांच्या लीगची स्थापना
१९२९
अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या किंमती कोसळल्यामुळे महामंदी
भारताच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींचा संघर्ष सुरूच
१९३९
अडॉल्फ हिटलरचा पोलंडवर हल्ला, दुसरे महायुद्ध सुरू
विनस्टन चर्चिल १९४० साली ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान बनतात
नात्सी साम्राज्यात ज्यू आणि बिगर ज्यूंची कत्तल
१९४१
पर्ल बंदरावर जपानची बॉम्बफेक
१९४५
हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर संयुक्त संस्थानांकडून बॉम्बहल्ला. दुसरे महायुद्ध समाप्त
१९४६
संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना
१९४९
माओ त्से-तुंग चीनच्या प्रजासत्ताकाची घोषणा करताना
१९६०
सतरा नवीन आफ्रिकी राष्ट्रांचा जन्म
१९७५
व्हिएतनामचे युद्ध संपले
१९८९
समाजवादाची पकड ढिली झाल्यावर बर्लिन भिंत पाडण्यात आली
१९९१
सोव्हिएत युनियनचे विघटन