जगावरील दृष्टिक्षेप
जगावरील दृष्टिक्षेप
आध्यात्माच्या शोधात
द टाईम्स वृत्तपत्रानुसार, “हे शतक उलटण्याच्या बेतात असताना, ब्रिटिश लोक मोठ्या संख्येने देव-धर्म, गूढ आणि अलौकिक शक्ती अशा विषयांवरील पुस्तकांत रस घेऊ लागले आहेत; यावरून, ते आपल्या जीवनात देवाचा शोध करत असल्याचे दिसून येते.” मग, कल्चर्ल ट्रेन्ड्स यात प्रकाशित झालेल्या एक अभ्यासानुसार गेल्या पाच वर्षांत धार्मिक विषयांवरील पुस्तकांची संख्या ८४ टक्क्यांनी तर न्यू एज (नव युग) आणि गूढ शक्ती या विषयांवरील पुस्तकांची संख्या ७५ टक्क्यांनी वाढली आहे. पण, त्याच वेळी वैज्ञानिक विषयांवरील पुस्तकांची संख्या रोडावली आहे; उदाहरणार्थ, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रावरील पुस्तकांची संख्या २७ टक्क्यांनी घटली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता, सदर अहवालाच्या संपादिका सेरा सेलवूड म्हणतात, “या शतकाच्या शेवटी लोक अधिकाधिक अंतर्मुख होत आहेत आणि जीवनाचा नेमका अर्थ काय या विचारात ते पडले आहेत.” पण मग, नकाशा आणि भूगोल विषयक पुस्तकांची संख्या १८५ टक्क्यांनी वाढण्याचे कारण काय? सेला सेलवूडच्या मते: “लोक दररोजच्या नित्यक्रमाला इतके कंटाळून जातात की त्यांना काही तरी वेगळं हवं असतं आणि हा वेगळेपणा अशी पुस्तकं वाचून त्यांना मिळतो.”
युरोपमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन
कॅथलिक इंटरनॅशनल नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय हेल्सिंकी महासंघाने “१९ युरोपियन देशांना धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याबद्दल धारेवर धरले आहे.” सदर महासंघाच्या म्हणण्यानुसार, खासकरून ऑर्थोडॉक्स देशांतल्या अल्पसंख्याक धार्मिक गटांवर जास्त दबाव आणला जातो. इतकेच नाही तर युरोपियन संघाच्या अनेक सदस्य राज्यांनी “रूढीपरंपरेवर चालणाऱ्या धार्मिक गटांचे स्थान मजबूत करण्यासाठी आणि त्याचवेळी [यहोवाच्या साक्षीदारांसारख्या] अल्पसंख्याक गटांवर निर्बंध घालण्यासाठी कायदेकानून काढले आहेत,” असे सदर नियतकालिकाने म्हटले. महासंघाचे संचालक ॲरन ऱ्होड्स पुढे म्हणाले: “‘आपल्या पंथावर आक्रमण’ होण्याच्या भीतीपोटी पाश्चिमात्य समाज अल्पसंख्याक धार्मिक गटांवर दडपशाही करण्यास उद्युक्त होतात. तेव्हा, मूल्य-नियमांचा सर्वांना एकसारखा लाभ व्हायला हवा आणि याच मूल्य-नियमांचे धार्मिक स्वातंत्र्य देखील एक अंग आहे याची लोकांना जाणीव होणे जरूरीचे आहे; अन्यथा परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे.”
जगातले सगळ्यात उष्ण वर्ष
सायन्स न्यूज नियतकालिकाच्या अहवालानुसार, १८३० सालापासून आजपर्यंत १९९८ हे सगळ्यात उष्ण वर्ष होते. त्या वर्षी, पृथ्वीचे मध्यम पृष्ठ तापमान १९६१ ते १९९० काळादरम्यानच्या सरासरी तापमानाहून १.०४ अंश फॅरनहाईट वाढले असा अंदाज व्यक्त केला गेला. “प्रत्येक अंशांच्या शंभराव्या भागात किंचितही बदल झाल्यास चिंतातूर होणाऱ्या हवामानशास्त्रज्ञांसाठी १९९८ सालाचा दाह हिमालयाच्या शिखराइतका उच्च वाटला” असे वरील नियतकालिकाचे म्हणणे आहे. सदर अहवाल असेही म्हणतो, की आजवर नोंदलेली सगळ्यात उष्ण अशी सात वर्षे १९९० पासून तर सगळ्यात उष्ण अशी दहा वर्षे १९८३ पासून होऊन गेलीत. अमेरिकेचे राष्ट्रीय सागरी व वातावरणीय प्रशासनचे श्री. जोनाथान ओव्हरपेक यांच्या मते मागील १,२०० वर्षांच्या काळात गेली २ दशके सगळ्यात उष्ण दशके म्हटली जाऊ शकतात. पण, जागतिक हवामानशास्त्रीय संघटनेच्या अहवालांनुसार युरोप आणि आशियाचे उत्तर भाग मात्र याला अपवाद होते. पण, दक्षिण संयुक्त संस्थानांत भयंकर उष्णता होती आणि मध्य रशियात जून महिन्यातील उष्णतेच्या लाटेत शेकडाहून अधिक माणसे जागोजागी दगावली आणि अनेक ठिकाणी आगी लागल्या.
आगळेवेगळे ‘शीत युद्ध’
ल्यूवलाना शहराचे डेलो वृत्तपत्र म्हणते की, “हल्ली स्वोलेनियन लोक सर्व प्रकारच्या आणि चवींच्या आईस्क्रिम्सवर अक्षरशः तुटून पडत असल्याचे दिसते; तेव्हा, दुकानदारही फ्रिझर्समध्ये आईस्क्रिमचा भरपूर स्टॉक ठेवत आहेत.” सदर वृत्तपत्रानुसार, लोकांमध्ये आईस्क्रिमची चटक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आईस्क्रिमची वार्षिक विक्री २२ टक्क्यांनी वाढल्याची नोंद तिथल्या आईस्क्रिम उत्पादकांनी अलीकडे केली आहे. ही वाढ लक्षात घेता, दर वर्षी त्या राष्ट्रात खपणारे आईस्क्रिम प्रति माणशी ४.५ क्वार्टची मर्यादा ओलांडून शेवटी पश्चिम युरोपच्या
सरासरी ५.८ क्वाट्र्सच्याही पुढे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या मानाने युरोपच्या या शीत युद्धात स्वीडिश लोक एक पाऊल पुढेच आहेत. युरोमॉनिटर या बाजारपेठ माहिती गटानुसार, प्रत्येक स्वीडिश व्यक्ती वर्षाला सरासरी सतराएक क्वाटर्स आईस्क्रिम खातो. पण तरीही, जागतिक पातळीवर विचार केला तर या युद्धात अमेरिकन लोक सगळ्यात अग्रेसर आहेत असे म्हणता येईल कारण तिथे प्रत्येक व्यक्ती वर्षाला २१ क्वाटर्स आईस्क्रिम खाते.“बेमालून जडणारा रोग”
पर्यावरण वृत्त सेवेच्या अहवालानुसार, “विकसनशील देशात जवळजवळ १५ ते १८ कोटी मुलांच्या रक्तात मोठ्या प्रमाणात शिसे गेल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे.” उदाहरणार्थ, भारतात मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा त्यांच्या शरीरात गेलेल्या शिशासोबत संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. डॉ. एब्रहॅम जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, ‘सतत शिशाच्या संपर्कात आल्यामुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होऊन त्यांची बैद्धिक क्षमता कमजोर होते,’ असा दि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राचा अहवाल आहे. भारतातील अनेकानेक शहरांमध्ये, अजूनही गॅसोलीनचा उपयोग करणाऱ्या वाहनांमुळे शिशाची विषबाधा होते. दारिद्र्य, उपासमारी यांसारख्या समस्यांप्रमाणे शिशाची विषबाधा या समस्येची तितकीशी दखल घेतली जात नाही, त्यामुळे डॉ. जॉर्ज यांनी त्यास “अदृश्य रोग” म्हटले आहे.
औषधयुक्त पाणी
“आपण पीत असलेल्या पाण्यात केवळ कीटकनाशकेच नव्हे तर निरनिराळी औषधे देखील असल्याचे दिसते,” असे न्यू सायंटिस्टचे म्हणणे आहे. पण, पाण्यात ही औषधे येतात तरी कुठून? निरनिराळ्या माध्यमाने. उदाहरणार्थ, कधीकधी नको असलेली औषधे टॉयलेटमध्ये फ्लश केली जातात. याशिवाय, लघवीतून देखील औषधे उत्सर्जित होतात. रॉयल डेनिश स्कूल ऑफ फार्मसीचे बेन्ट हॉलिंग-सोरेन्सन यांच्या म्हणण्यानुसार, “मनुष्य आणि प्राणी यांच्या शरीरातील ॲन्टिबायोटिक्सपैकी जवळजवळ ३० ते ९० टक्के औषधे लघवीतून विसर्जित केली जातात.” तसेच, शेतकरी आपल्या शेतांमध्ये सुरवातीपासूनच पशूंच्या मलमूत्राचा खत म्हणून उपयोग करत आले आहेत. अशा निरनिराळ्या माध्यमांनी औषधे पर्यावरणात येतात तेव्हा ती मूळ स्वरूपाइतकीच क्रियाशील असतात किंबहुना मानवी शरीरात त्यांचे स्वरूप बदलल्यामुळे ती पूर्वीपेक्षा अधिक क्रियाशील व विषारी बनतात आणि पाण्यात सहज विरघळली जातात. ब्रिटनच्या पर्यावरण एजन्सीचे स्टीव्ह किल्लीन यांच्या मते, “पाण्यातील काही रसायनांची तितकी दखल घेतली जात नाही; आणि औषधेही या गोष्टीला अपवाद नाहीत.”
बाल दुर्व्यवहार जागृती वाढत आहे?
काराकासच्या एल युनिव्हर्सल वृत्तपत्रानुसार, व्हेनेझुएलामध्ये १९८० साली प्रत्येक १० पैकी एक मूल लैंगिक दुर्व्यवहाराला बळी पडत आहे; परंतु, आज तिथे प्रत्येक १० पैकी तीन मुले बाल संभोग्यांचे बळी ठरत आहेत. सन १९८० मध्ये दुर्व्यवहाराला बळी पडलेली ही मुले अवघ्या बारातेरा वर्षांची होती. पण, आज यांपैकी बरीच मुले तीनपेक्षा लहान वर्षांची आहेत. पण, कोण अशी भयंकर कृत्ये करण्यास उद्युक्त होतात? मुलांना खाऊचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या हेतूने शालेय मैदानाच्या आसपास दबा धरून बसलेले पुरुष अशी कृत्ये करत नाहीत. तर एल युनिव्हर्सल वृत्तपत्र म्हणते, की ७० टक्के अपराधी खुद्द मुलांचेच नातेवाईक किंवा कुटुंबातले सदस्य असतात. यांपैकी निम्मेअधिक अपराधी सावत्र पालक असतात आणि बाकीचे मोठा भाऊ, नातेवाईक किंवा शिक्षक अशी मोठी माणसे असतात.
शिक्षण समस्या
इंग्लंडच्या न्यूज अनलिमिटेडच्या अहवालानुसार, “विकसनशील देशांमध्ये शिक्षणासंबंधित आणीबाणीची परिस्थिती निर्माण होत आहे. तिथे १२.५ कोटी मुलांनी खासकरून मुली शाळेलाच जात नाहीत आणि आणखीन १५ कोटी लिहिणे वाचणे शिकण्याआधीच शाळा सोडत आहे.” विकसनशील देशांमध्ये सध्या प्रत्येक ४ प्रौढांपैकी एकजण किंवा ८७.२ कोटी लोक निरक्षर आहेत. त्यातच, निरक्षरतेचे प्रमाण जास्त असलेली राष्ट्रे समृद्ध राष्ट्रांकडून उसनावारी निधी घेतात तेव्हा शिक्षणाच्या या समस्यांमध्ये अधिकच भर पडते. असे का? कारण, बरेचदा शिक्षणासाठी लागणारा पैसा कर्ज फेडण्यासाठी वापरला जातो. यामुळे निरक्षरतेचे चक्र अखंड फिरत राहते आणि त्यामुळे दारिद्रय पसरते.