व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बेथलेहममध्ये बाळ येशूला पाहण्यासाठी किती लोक गेले होते? ते वास्तवात राजे होते का?

बेथलेहममध्ये बाळ येशूला पाहण्यासाठी किती लोक गेले होते? ते वास्तवात राजे होते का?

बायबलचा दृष्टिकोन

बेथलेहममध्ये बाळ येशूला पाहण्यासाठी किती लोक गेले होते? ते वास्तवात राजे होते का?

येशूचा जन्म झाला त्यानंतर यहुदी लोकांचा राजा जन्मला आहे असे मानून पूर्व देशांतले प्रख्यात लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी, त्याला नमन करण्यासाठी बेथलेहेमास गेले होते. जगभरात नाताळ साजरा करणाऱ्‍या लोकांना प्रत्येक नाताळाला या प्रसंगाची आठवण झाली नाही तरच नवल.

काही देशांत नाताळ साजरा करण्याचा एक भाग म्हणून देखावे तयार केले जातात. या देखाव्यांमध्ये नवजात येशूला पूर्वेच्या देशांतील तीन राजे भेटवस्तू देत असल्याचे दृश्‍य सर्रासपणे दाखवले जाते; तर इतर काही देशांमध्ये मुले ‘या पवित्र राजांसारखा’ पोषाख घालून जवळपासच्या परिसरातून मोठ्या थाटामाटाने मिरवणूक काढतात. होय, त्या घटनेला आज २० शतके झाली असली तरी येशूला पाहायला आलेल्या त्या आगळ्यावेगळ्या पाहुण्यांची आठवण आजही लोकांच्या मनात ताजी आहे. पण येशूच्या दर्शनासाठी आलेले हे लोक होते तरी कोण?

ते राजे होते का?

या ऐतिहासिक घटनेचा अहवाल बायबलमध्ये मत्तय नावाच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. तिथे असे म्हटले आहे: “येशूचा जन्म झाल्यानंतर पाहा, मागी [“ज्योतिषी,” तळटीप] लोक पूर्वेकडून यरुशलेमेला आले, ते म्हणाले, यहूद्यांचा राजा जो जन्मला आहे तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्वदिशेत त्याचा तारा पाहिला व त्याला नमन करायला आलो आहो.” (मत्तय २:१, २,  .र.भा.) या भाषांतरात पूर्वेकडून आलेले राजे म्हणण्याऐवजी पूर्वेकडून आलेले ज्योतिषी का म्हटले आहे?

या लोकांचा उल्लेख करण्याकरता बायबलमध्ये मागोस या ग्रीक शब्दाच्या अनेकवचनी रूपाचा प्रयोग करण्यात आला आहे. आणि या अनेकवचनी रूपाचा अनुवाद बायबलच्या काही भाषांतरांमध्ये “ज्ञानी लोक,” “खगोलशास्त्रज्ञ,” “ज्योतिषी” असा करण्यात आला आहे किंवा सरळ “मागी” असा ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे. हा शब्द ग्रहताऱ्‍यांवरून लोकांना सल्ला देणाऱ्‍या आणि भविष्य वर्तवणाऱ्‍या लोकांच्या संदर्भात वापरला जातो. त्यामुळे बायबलनुसार येशूच्या दर्शनाकरता आलेले लोक मुळात शकूनशास्त्री किंवा शकून पाहणारे होते. शकूनशास्त्र हा गूढशक्‍तीचा प्रकार असून परमेश्‍वराला त्याचा वीट आहे.—अनुवाद १८:१०-१२.

तर मग, येशूला पाहायला आलेले लोक ज्योतिषी किंवा शकूनशास्त्री होते हे आता आपल्याला समजले आहे. पण ते राजेही होते का? असते तर बायबलमध्ये तसे स्पष्टपणे सांगितले नसते का? बायबलमध्ये मत्तय २:१-१२ मध्ये चार वेळा “राजा” असा शब्दप्रयोग केल्याचे आढळते; एकदा येशूच्या संदर्भात आणि तीन वेळा हेरोदाच्या संदर्भात. पण, बायबल एकदाही मागी लोकांना राजे म्हणत नाही. या मुद्द्‌यावर बोलताना द कॅथलिक एन्सायक्लोपीडिया म्हणते: “मागी लोक राजे होते असे पाचव्या शतकापर्यंत ख्रिस्ती सिद्धान्तांवर लिखाण करणाऱ्‍या एकाही लेखकाने मानले नव्हते.” आणि विशेष म्हणजे, खुद्द बायबलही तसे मानत नाही.

ते किती होते—तीन?

येशूला पाहण्याकरता आलेल्या मागी लोकांची संख्या अमूक होती, असे बायबलमध्ये कोठेही सांगण्यात आलेले नाही. पण तरीसुद्धा परंपरेनुसार, नाताळ सणाच्या देखाव्यांतून तसेच नाताळाच्या गीतांतून हेच सुचवले जाते, की येशूला मुजरा करण्याकरता तीन लोक आले होते. कदाचित, त्या पाहुण्यांनी येशूकरता तीन भेटवस्तू आणल्या होत्या त्यावरून ते तीनजण होते असे मानले जाते. या घटनेविषयी बायबल म्हणते: “त्यांनी . . . आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने [येशूला] अर्पिली.”—मत्तय २:११.

पण, बाळ येशूला पाहण्यासाठी आलेल्या मागी लोकांनी तीन भेटवस्तू आणल्या होत्या त्यावरून ते तिघेजण असतील असे अनुमान काढणे उचित आहे का? हे समजण्यासाठी, इस्त्राएलला भेट देणाऱ्‍या आणखी एका ख्यातनाम, बड्या असामीचे अर्थात शबाच्या राणीचे उदाहरण आपण विचारात घेऊ या. शलमोन राजाला भेटण्यासाठी ती आली तेव्हा तिने त्याला भेट म्हणून “विपूल सोने, मोलवान रत्ने व मसाले” दिले होते. (१ राजे १०:२) या ठिकाणी तीन भेटवस्तूंचा उल्लेख असला तरी त्या तीन वेगवेगळ्या लोकांनी नव्हे, केवळ शबाच्या राणीने दिल्या होत्या असा उल्लेख आपल्याला आढळतो. या ठिकाणी तीन भेटवस्तूंचा उल्लेख आहे म्हणजे शलमोन राजाला भेटायला तीन लोक आले होते असे मुळीच सूचित होत नाही. त्याचप्रमाणे, येशूला भेट देण्यासाठी आलेल्या मागी लोकांनी तीन भेटवस्तू आणल्या होत्या म्हणून त्याला भेटायला तिघेजण आले होते असे म्हणणे साफ चुकीचे ठरणार नाही का?

द कॅथलिक एन्साक्लोपिडिया म्हणते: “येशूला पाहायला आलेल्या मागी लोकांची संख्या किती होती हे शुभवर्तमानाचे लेखक आपल्याला सांगत नाहीत. पण, वेगवेगळ्या परंपरांनुसार वेगवेगळी संख्या मानली जाते. उदाहरणार्थ, काही धर्मगुरूंचे म्हणणे आहे, की तीन मागी लोक होते; बहुधा भेटवस्तूंच्या संख्येवरून त्यांनी हे अनुमान काढले असावे.” वरील विश्‍वकोश पुढे असे म्हणतो, की काही देखाव्यांमध्ये किंवा चित्रांमध्ये दोन, तीन, चार आणि काही वेळा आठ लोक येशूला पाहायला आल्याचे दाखवले जाते. येशूला भेटायला चक्क १२ लोक आल्याचेही काही देखाव्यांमध्ये दाखवले जाते. परंतु, बाळ येशूला पाहायला नेमके किती मागी लोक आले होते हे माहीत करणे जवळजवळ अशक्यच आहे. त्यासाठी कोणताही आधार नाही.

एक लोकप्रिय पण खोटी कथा

सर्वसामान्यपणे असे मानले जाते, की मागी लोक प्रथम बेथलेहेमास गेले. पण, हे खरे नाही. मागी लोक प्रथम येरूशलेमेत गेले आणि तेही येशूचा जन्म होऊन काही काळ लोटल्यानंतर; त्याचा नुकताच जन्म झाला होता तेव्हा नव्हे. बायबल म्हणते, की त्यानंतर ते बेथलेहेमातील “त्या घरात गेले. तेव्हा तो बाळक . . . त्यांनी पाहिला.” (मत्तय २:१, ११) यावरून स्पष्ट होते, की मागी लोक येशूला पाहायला गेले तेव्हा येशू गव्हाणीत नव्हता. कारण ते त्याला भेटायला येईपर्यंत येशू आणि त्याचे आईवडील चारचौघांसारखे एका घरात राहायला गेले होते.

तेव्हा, बायबलच्या म्हणण्यानुसार येशूच्या जन्माच्या वेळी त्याला नमन करण्यासाठी आलेल्या तीन राजांची ही लोकप्रिय कथा खरी नाही. आधी चर्चा केल्याप्रमाणे येशूला भेटायला गेलेले मागी लोक राजे नव्हते; ते वास्तवात गूढविद्या करणारे ज्योतिषी होते. आणि ते नेमके किती होते याविषयी बायबल आपल्याला सांगत नाही. तसेच, येशूच्या जन्माच्या वेळी येशू गव्हाणीत होता त्यावेळी ते त्याला भेटायला गेले नाहीत; तर येशूचा जन्म होऊन काही समय उलटल्यावर येशू आणि त्याचे आईवडील एका घरात राहत होते त्यावेळी ते त्याला पाहायला गेले.

या तीन राजांची लोकप्रिय कथा आणि येशूच्या जन्मासंबंधित इतर खोट्या प्रथांना बायबलमध्ये कोणताही आधार नसला तरी बरेच लोक त्या मानतात आणि पाळतात देखील. खरे ख्रिस्ती मात्र खोटेपणाचा लवलेश नसलेली सत्य उपासना करतात. हीच सत्य उपासना येशूने देखील केली. किंबहुना, एकदा आपल्या पित्याला प्रार्थना करताना त्याने म्हटले: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) त्याने असेही म्हटले की, “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे.”—योहान ४:२३.

[१५ पानांवरील चित्र]

इटलीमध्ये “येशूला नमन करणारे मागी”