व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भविष्य उजळवणारा उल्लेखनीय बदल

भविष्य उजळवणारा उल्लेखनीय बदल

भविष्य उजळवणारा उल्लेखनीय बदल

“एकोणीसशेची पिढी मानव इतिहासातील सर्वात उल्लेखनीय बदलांच्या काळात प्रवेश करायला सज्ज होती. जुन्या व्यवस्थेच्या जागी नवीन व्यवस्था येत होती.”— द टाईम्स ॲटलस ऑफ द ट्‌वेंटियथ सेंच्युरी.

वर उल्लेखलेल्या ॲटलसनुसार, २० व्या शतकाच्या सुरवातीला “जगाने खूपच अशांततेच्या आणि हिंसात्मक युगात प्रवेश केला होता.” या शतकाने पाहिलेली युद्धे इतर कोणत्याही शतकाने पाहिली नाहीत; तसेच या युद्धांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १० कोटींपेक्षा अधिक आहे.

या युगात, युद्धांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या अभूतपूर्व आहे. पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्यांपैकी १५ टक्के लोक सर्वसाधारण नागरिक होते. पण दुसऱ्‍या महायुद्धात तर काही देशांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांपेक्षा सर्वसाधारण नागरिकांचीच संख्या कितीतरी पटीने अधिक होती. त्यानंतर घडलेल्या युद्धांमध्येही मरण पावलेल्या कोट्यवधी लोकांपैकी बहुतेक लोक नागरिकच होते. या सर्व हिंसात्मक कृत्यांमुळे बायबलमधील भविष्यवाणीची पूर्ती झाली आहे; ती भविष्यवाणी ‘अग्निवर्ण घोड्यावर’ बसलेल्या स्वाराविषयी आहे. त्याला “पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे” काम सोपवण्यात आले होते.—प्रकटीकरण ६:३, ४; मत्तय २४:३-७.

मूल्यांची पडझड

विसाव्या शतकात २ तीमथ्य ३:१-५ येथे दिलेल्या भविष्यवाणीची पूर्णता झाली आहे; त्यात असे म्हटले आहे: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.”

काही अंशी अपरिपूर्ण मानवांमध्ये हे गुण नेहमीच दिसून आले आहेत. परंतु, २० व्या शतकादरम्यान अशा मनोवृत्ती अधिक बळावल्या आणि पसरल्या. एखाद्याचे वर्तन वरील वर्णनानुसार असल्यास ते अगदीच अक्षम्य नसले, तरी निदान समाजाला हानीकारक असे समजले जात होते. आजकाल तर, ‘सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवणारे’ लोकही अशा वर्तणुकीला गैर समजत नाहीत.

एके काळी, अविवाहित स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याची कल्पना देखील धार्मिक वृत्तीच्या लोकांना असह्‍य वाटत होती. लग्नाआधी गरोदरपण आणि समलैंगिक संबंध म्हणजे कलंक होता. बहुतेक लोक गर्भपात किंवा घटस्फोटाचा विचारही करत नव्हते. अप्रामाणिक व्यवहार निंद्य मानला जात होता. आज मात्र, एका ग्रंथात म्हटल्याप्रमाणे “काहीही चालतं” अशी लोकांची मनोवृत्ती झाली आहे. का? कारण यामुळे “स्वैराचारी लोकांचा स्वार्थ पुरा होतो.”

या शतकात, उच्च नैतिक दर्जे झिडकारल्यामुळे लोकांना महत्त्वाच्या वाटणाऱ्‍या गोष्टीही बदलल्या आहेत. द टाईम्स ॲटलस ऑफ द ट्‌वेंटियथ सेंच्युरी म्हणते: “१९०० च्या शतकाच्या सुरवातीला सर्वकाही पैशांमध्ये तोलून पाहण्याची मनोवृत्ती राष्ट्रांत तसेच लोकांमध्येही नव्हती. परंतु या शतकाच्या शेवटी, राष्ट्रे आपल्याला मिळणाऱ्‍या यशाची मोजणी पूर्णतः आर्थिक दृष्टिकोनातून करू लागले. . . . संपत्तीविषयी लोकांचा दृष्टिकोनही पुष्कळ बदलला.” आज, सामान्य बनलेल्या जुगाराने पैशांसाठी हाव निर्माण केली आहे तर रेडिओ, टीव्ही, चित्रपट आणि व्हिडिओ यांच्याद्वारे भौतिक सुखवस्तूंच्या इच्छेला चाळवले जात आहे. गेम शो (टीव्हीवरील एखाद्या खेळाचे किंवा स्पर्धेचे कार्यक्रम) आणि जाहिरातींच्या स्पर्धांमधून पैसा सर्वकाही आहे असे प्रत्यक्षरित्या भासवले जात नसले तरी पैसा जवळजवळ सर्वकाही आहे हे अप्रत्यक्षपणे ठसवले जाते.

जवळ असूनही दूर

विसाव्या शतकाच्या सुरवातीला बहुतेक लोक ग्रामीण भागांमध्ये राहत होते. परंतु असे म्हटले जाते की, २१ व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत निम्मे-अधिक लोक शहरांमध्ये राहायला येतील. पृथ्वीला वाचवायला ५००० दिवस हे पुस्तक म्हणते: “आजच्याच शहरवासियांना चांगल्या राहणीमानाचा दर्जा पुरवण्यामध्ये अनेक अडथळे आहेत तर भविष्यातील पिढ्यांबाबतची गोष्ट दूरचीच.” जागतिक आरोग्य (इंग्रजी) ही संयुक्‍त राष्ट्रसंघाची पत्रिका म्हणते: “जगामध्ये शहरवासियांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. . . . आज लाखो लोक आरोग्याला हानीकारक तसेच घातक असलेल्या परिस्थितींमध्ये जगत आहेत.”

शहरे एकमेकांच्या जवळ येत आहेत तसे लोक एकमेकांपासून दूर जाऊ लागले आहेत ही केवढी उपरोधिक गोष्ट आहे! टीव्ही, टेलिफोन आणि इंटरनेट त्याचप्रमाणे फोनवरून खरेदी करणे कितीही फायदेशीर असले, तरी त्यामुळे लोकांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. म्हणूनच, जर्मन वृत्तपत्र बर्लिनर त्सायतुंग म्हणते: “लोकसंख्या हेच तेवढे या २० व्या शतकाचे वैशिष्ट्य नाही तर एकाकीपणा देखील एक वैशिष्ट्य आहे.”

यामुळे जर्मनीतल्या हॅम्बर्गमध्ये घडलेल्या दुर्घटनांसारख्या दुर्घटना घडतात; येथे एका माणसाचा मृतदेह चक्क पाच वर्षांनी आढळला! डर श्‍पीगेल या पत्रिकेत म्हटल्यानुसार, “कोणालाच त्याची अनुपस्थिती जाणवली नाही; नातेवाईकांना नाही की शेजाऱ्‍यांना नाही की अधिकाऱ्‍यांना नाही. बड्या शहरांमधले बहुतेक नागरिक असेच अनामिक आणि समाजापासून अलिप्त असलेले जीवन जगतात त्याचे हे थक्क करून सोडणारे उदाहरण आहे.”

अशा या दुःखदायक परिस्थितींसाठी केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान दोषी नाही. खरे तर लोक त्यासाठी दोषी आहेत. या शतकात, माणसे पूर्वी कधी नव्हती इतकी “स्वार्थी, धनलोभी, . . . उपकार न स्मरणारी, . . . ममताहीन, शांतताद्वेषी, . . . चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, . . . देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी” झाली आहेत.—२ तीमथ्य ३:१-५.

१९१४ एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ष

विन्स्टन चर्चिल यांच्या मते, “विसाव्या शतकाची सुरवात उज्ज्वल आणि शांतिमय वाटत होती.” पुष्कळांना वाटले होते की, हे शतक अभूतपूर्व शांतीचे आणि संपन्‍नतेचे युग असेल. परंतु, १९०५ साली टेहळणी बुरूजच्या सप्टेंबर १ च्या अंकात असा इशारा दिला होता की, “लवकरच आणखी युद्ध होईल;” त्यात असेही म्हटले होते की, १९१४ मध्ये “फार मोठे संकट” येईल.

खरे तर, त्या प्रकाशनाने १८७९ सालीच हे स्पष्ट केले होते की १९१४ ही महत्त्वपूर्ण तारीख ठरणार आहे. नंतरच्या वर्षांमध्ये त्यात स्पष्ट करण्यात आले की, बायबलमधील दानीएल या पुस्तकातल्या भविष्यवाणींनुसार १९१४ साली देवाचे राज्य स्वर्गात स्थापन झाले. (मत्तय ६:१०) देवाच्या राज्याने १९१४ मध्ये पृथ्वीवरील सर्व व्यवहार आपल्या हाती घेतले नाहीत; पण त्याच वेळी त्या राज्याचे शासन मात्र सुरू झाले.

बायबलमधील भविष्यवाणीत असे भाकीत केले होते की, “त्या राजांच्या अमदानीत [आपल्या काळात] स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना [स्वर्गात] करील, त्याचा कधी भंग होणार नाही.” (दानीएल २:४४) त्या राज्याने (ज्याचा राजा ख्रिस्त आहे) येथे पृथ्वीवर, प्रजा होण्यास इच्छुक असणाऱ्‍या देव-भिरू लोकांना गोळा करण्याचे काम सुरू केले.—यशया २:२-४; मत्तय २४:१४; प्रकटीकरण ७:९-१५.

स्वर्गात घडलेल्या घटनेसोबतच १९१४ मध्ये ‘शेवटल्या काळाची’ सुरवातही झाली; या काळाचा अंत सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवस्थीकरणाचा नाश झाल्यावर होईल. येशूने आधीच भाकीत केले होते की, जागतिक युद्धे, अन्‍नटंचाई, रोगाच्या साथी, विध्वंसक भूकंप आणि वाढती अधार्मिकता त्याचप्रमाणे देवाबद्दल आणि सहमानवाबद्दल प्रेम कमी होणे ही त्या काळाच्या सुरवातीची लक्षणे असतील. त्याने म्हटले, या सर्व गोष्टी “वेदनांचा प्रारंभ” असतील.—मत्तय २४:३-१२.

पूर्णतः नवीन जग लवकरच

या ‘शेवटल्या काळात’ पदार्पण करून आपल्याला ८५ वर्षे होऊन गेली आहेत आणि आपण झपाट्याने सध्याच्या असमाधानकारक व्यवस्थीकरणाच्या अंतापर्यंत पोहंचत आहोत. लवकरच देवाचे राज्य ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली, “[सध्या अस्तित्वात असलेल्या] या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४; २ पेत्र ३:१०-१३.

होय, देव पृथ्वीवरून दुष्टाईचा अंत करील आणि धार्मिक अंतःकरणाच्या लोकांना पूर्णतः नवीन जगात नेईल. तेव्हा “सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल.”—नीतिसूत्रे २:२१, २२.

किती हा आनंदी संदेश! निश्‍चितच हा संदेश सगळीकडे जाऊन सांगितला पाहिजे. २० व्या शतकाने आणखीनच वाढवून ठेवलेल्या युद्ध, दारिद्र्‌य, आजारपण, अन्याय, द्वेष, असहिष्णुता, बेकारी, गुन्हेगारी, दुःख, मृत्यू या समस्यांचे लवकरच देवाच्या राज्यात निरसन केले जाईल.—पाहा स्तोत्र ३७:१०, ११; ४६:८, ९; ७२:१२-१४, १६; यशया २:४; ११:३-५; २५:६, ८; ३३:२४; ६५:२१-२३; योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:३, ४.

मनुष्याच्या आनंदाला जेथे पारावार राहणार नाही अशा धार्मिक जगात सदासर्वकाळ जगण्याची तुम्हाला इच्छा नाही का? यहोवाच्या साक्षीदारांकडे अधिक माहितीकरता विनंती करा. तुमच्या स्वतःच्या बायबलमधून ते तुम्हाला दाखवून देतील की, २० व्या शतकात सुरू झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण क्रांतिकारी वर्षांचा अंत लवकरच होईल आणि त्यानंतर तुम्हाला अगणित आशीर्वाद उपभोगता येतील!

[१० पानांवरील चित्र]

पूर्णतः नवीन जग लवकरच