व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मं जूळ द्वंद्वगीत गायक

मं जूळ द्वंद्वगीत गायक

मं जूळ द्वंद्वगीत गायक

केनियातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

दोन गायक समोरासमोर उभे होते. जणू आपली कर्तबगारी दाखवण्यास ते सुसज्ज होते. पुढाकार घेणाऱ्‍या गायकानं जणू हलकेच वाकून विलक्षण मधूर, सुस्पष्ट असा स्वर काढला. स्वर इतका कोमल आणि मंजूळ होता, की सकाळच्या वातावरणात अगदी दूरपर्यंत तो निनादत राहिला. मग, दुसऱ्‍या गायकानंही काहीशा आदबीनं वाकून अगदी नेमक्या वेळी तितकाच कोमल पण उंच अष्टम स्वर काढला. द्वंद्वगीतानं वेग घेतला आणि या गायकांच्या आवाजाची पट्टी कमालीची वाढली तसे दोन नव्हे, एकच आवाज ऐकू येत होता; इतका त्यांचा आवाज एकजीव झाला. हे सर्व मी श्‍वास रोखून पाहत होतो, ऐकत होतो आणि त्यांच्या विलक्षण सुंदर कलेमुळे, त्यांच्या दर्जेदार आवाजामुळे थक्क झालो.

अर्थात, गायनाचा हा उत्कृष्ट प्रयोग खच्चून भरलेल्या कोणत्या संगीत गृहात नव्हे तर केनियातील माझ्या घरापाशी, एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या दोन पक्ष्यांनी केला होता. गाणे संपल्यावर पंख असलेले हे गायक जणू सरळ उभे राहिले, पंख उघडले आणि आकाशात उडून गेले.

“सहसा एका जातीचे पक्षी एकत्र उड्डाण करतात” असे इंग्रजीमध्ये म्हटले जाते. पण, काही पक्ष्यांना केवळ एकत्र उडायलाच नव्हे तर एकत्र गायलाही आवडते आणि तेही अगदी एकसूरात! त्यांचे द्वंद्वगीत इतके सुसंवादी असते, की प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय दोन पक्षी गात आहेत की एकच गातो आहे हे ठरवणे फार मुश्‍किल असते! आपल्यासारख्या सामान्यांचे सोडा, चक्क शास्त्रज्ञ देखील फसले आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात पक्षी तज्ज्ञांच्या लक्षात आले आहे, की द्वंद्वगीत पक्ष्यांच्या वर्तनरितीचे एक अविभाज्य अंग आहे.

बेलबर्ड (घंटा पक्षी)

उत्कृष्ट गाणारा उष्णप्रदेशांतला बूबू याचेच उदाहरण घ्या. आफ्रिकन खंडात आढळणाऱ्‍या या पक्ष्याचे गाणे अनन्यसाधारण असून ते बासरीच्या स्वरासारखे वाटते; धातूच्या दोन वस्तू वाजवल्याने पुन्हापुन्हा होणाऱ्‍या वादनासारखे त्याचे गाणे वाटते. त्यामुळे या पक्ष्याला सर्वसामान्यपणे घंटा पक्षी म्हटले जाते. चकचकीत काळा मुकुट, मान आणि पंख यांमुळे तो विलक्षण सुंदर दिसतो. छातीवरील पांढऱ्‍याशुभ्र पिसांमुळे आणि पांढऱ्‍या पंखांमुळे तर दोन रंगांचे अप्रतिम वैषम्य तयार होते. हे बूबू पक्षी नेहमी जोडीने आढळतात. विशेष म्हणजे, ठेवण आणि रंगांच्या बाबतीत नर-मादी दोघे सारखेच वाटतात.

दाट जंगलातून किंवा झाडाझुडपातून जात असताना बूबू पक्षी प्रत्यक्ष पाहिला नाही तरी दुरूनच त्याची चाहूल लागते. नर बूबू सहसा एकापाठोपाठ एक असे तीन वेळा घंटेसारखा स्वर काढतो. मग मादी क्वीक्वी असा कर्कश आवाज काढून त्याला त्वरित प्रतिसाद देते. कधीकधी यापैकी एकजण अखंडपणे साद घालत असतो आणि त्याचा सहचर एकच कर्णमधूर स्वर काढून त्या गाण्यात इतका प्रवाहून जातो की मध्ये कुठे खंड पडला तरी तो जाणवत नाही.

हे कसे काय शक्य होते हे आजपर्यंत शास्त्रज्ञांपुढेही एक कोडे आहे. काहींच्या मते, निदान काही पक्ष्यांच्या बाबतीत तरी हे सरावामुळे घडते. दिवसामागून दिवस नर-मादी एकत्र गात असल्यामुळे गाण्याच्या या कर्तबगारीत ते अधिकाधिक कुशल होत जातात.

मनोरंजक गोष्ट अशी, की बूबू पक्ष्याच्या ‘बोलीत’ परिस्थितीजन्य बदल होतो. परिसरातल्या आवाजांची किंवा इतर पक्ष्यांच्या गाण्यांची नक्कल केल्यामुळे हे होत असावं. यालाच अनुकृती म्हणतात. अनुकृतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या माळरानातील बूबूचे गाणे आणि पूर्व आफ्रिकेच्या ग्रेट रिफ्ट वॅलीतील बूबूचे गाणे यात जमीनआस्मानाचा फरक जाणवतो.

आजीवन सहचर

द ट्रायल्स ऑफ लाइफ या आपल्या पुस्तकात डेव्हिड ॲटनबरो म्हणतात: “द्वंद्वगीत गाणाऱ्‍या जोड्या आयुष्यभर नाही तरी वर्षांनुवर्षे, ऋतूमागून ऋतू एकत्र राहतात ही मानवी मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे.” त्यांच्यात इतके दाट बंधन कसे काय? ॲटनबरो स्वतःच याचे उत्तर देतात: “द्वंद्वगीत गाण्याचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर आपल्यातला स्नेहबंध अधिकाधिक मजबूत करण्यासाठी ते एखाद्या फांदीवर शेजारीशेजारी बसून या जटील द्वंद्वगीताचा सराव करतात आणि कधीकधी त्यातला एखादा पक्षी नसला तर दुसरा पक्षी त्या अनुपस्थित पक्ष्याचे भागही एकटाच गाऊन हे गुंतागुंतीचे मोठे गाणे गात राहतो.”

द्वंद्वगीतांचा उपयोग प्रामुख्याने दाट झाडीत जिथे सहचर दिसणे अवघड होते अशा वेळी एकमेकांशी संचारण ठेवण्यासाठी होऊ शकतो. आपला जोडीदार कुठे आहे हे नर पक्ष्याला जाणून घ्यायचे असल्यास नर पक्षी अखंडपणे साद स्वर काढतो. मग, मादी नरापासून लांब कुठेतरी असली तरी ती त्यात स्वरमेळ करते. स्वरमेळ करण्याची ही वेळ इतकी चोख असते जणू आधीपासूनच त्यांनी आपले द्वंद्वगीत ठरवले असावे.

काम करताना शीळ घालणे

काम करता करता तुम्हाला संगीताचा आस्वाद घ्यायला आवडतो? पण फक्‍त मनुष्यच नाही तर बऱ्‍याच पक्ष्यांना देखील ते आवडते असे दिसते. द प्रायव्हेट लाइफ ऑफ बड्‌र्स या पुस्तकाचे लेखक मायकल ब्राइट म्हणतात, की पक्षीगानाचा श्रोत्यांवर विलक्षण परिणाम होतो. उदाहरणार्थ, पक्षीगान ऐकल्याने “नर-मादी दोघांच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात.” तसेच, नराचे गाणे कानावर पडल्यामुळे काही माद्या “अगदी भराभर घरटी बांधतात” आणि “नेहमीपेक्षा अधिक अंडी घालतात.”

उष्णप्रदेशांतील बूबूसारख्या द्वंद्वगीत गायकांच्या अशा अनेक मनोरंजक गोष्टी शास्त्रज्ञ उलगडत राहतील यात शंका नाही. ऐकणाऱ्‍याला थक्क करून सोडणाऱ्‍या या पक्षीगानाचा कोणता का उद्देश असेना; एक मात्र खरे, की पक्ष्यांची ही गाणी एक उदात्त उद्देश साध्य करतात. तो म्हणजे, सृष्टीची कदर करणाऱ्‍या स्त्रीपुरुषांची मने आनंदीत करतात! आणि विशेष म्हणजे, हा चित्तथरारक संगीतप्रकार ‘आकाशातील पाखरांची’ निर्मिती करणाऱ्‍या निर्माणकर्त्याची प्रशंसा करतो.—स्तोत्र ८:८.