व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी क्रेडिट कार्ड बनवावं का?

मी क्रेडिट कार्ड बनवावं का?

तरुण लोक विचारतात . . .

मी क्रेडिट कार्ड बनवावं का?

“मला पहिल्यांदा क्रेडिट कार्ड बनवण्याची ऑफर पोस्टानं आली तेव्हा मी अवघ्या १६ वर्षांची होते. . . . पण तुमचा विश्‍वास बसणार नाही, दोनच वर्षांनंतर म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षी मी चक्क ६०,००० डॉलरचं कर्ज करून बसले होते.”—क्रिस्टिन

सुरवातीला, क्रिस्टिनने विचार केला होता, की फक्‍त इमर्जेन्सीसाठी किंवा एखादी आवडलेली वस्तू खरेदी करण्यासाठी हातात पैसे नसले तरच क्रेडिट कार्डचा उपयोग करायचा. पण, तसे मुळीच घडले नाही. पाहता पाहता ती या क्रेडिट कार्डाचा अगदी स्वछंदपणे उपयोग करू लागली. क्रिस्टिन म्हणते: “काहीएक विचार न करता मी बेफाम खरेदी करू लागले, जणू खरेदीची मला धुंदच चढली होती. ज्या वस्तूंची मला गरज नव्हती, ज्या वस्तू मला मुळात आवडल्या नव्हत्या अशाही वस्तू मी विकत घेतल्या.” आज मात्र क्रेडिट कार्डाविषयी क्रिस्टिनचा विचार पूर्णपणे बदलला आहे. ती म्हणते: “या एका प्लॅस्टिकच्या तुकड्यांमुळे माझ्या आयुष्याची इतकी पुरेवाट लागेल याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती.”—टीन नियतकालिक.

पण, ही एकट्या क्रिस्टिनची गत नाही. प्लॅस्टिकच्या या तुकड्याचा अर्थात क्रेडिट कार्डाचा दुरुपयोग केल्यामुळे आज असंख्य युवक स्वतःवर आर्थिक संकट ओढवून घेत आहेत. काही क्रेडिट कार्ड कंपन्या मुद्दाम युवकांनाच आपल्या जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. याचे कारण सांगताना, आर्थिक सल्लागार जेन ब्रायंड क्विन म्हणतात, की आधीपासूनच खरेदीची नशा चढलेल्या युवकांसाठी क्रेडिट कार्ड इमानेइतबारे “आर्थिक ड्रग”चं काम करील हे कदाचित या कंपन्यांना माहीत असावं. क्विन असंही म्हणतात: “एकदा का याची चटक लागली की त्याचं व्यसन सुटता सुटत नाही.”

अर्थात, क्रेडिट कार्डाचे बरेच फायदेही आहेत, यात काही शंका नाही. उदाहरणार्थ, एखादा तातडीचा प्रसंग उद्‌भवला किंवा रोखरक्कम जवळ बाळगणे धोक्याचे असते तेव्हा क्रेडिट कार्डाला पर्याय नाही, हे मान्य आहे. त्यामुळेच तर आज अमेरिकेत आणि इतर अनेक देशांतही लोक क्रेडिट कार्डाचा इतक्या सर्रासपणे उपयोग करत आहेत. पण, क्रेडिट कार्डाचा विचारपूर्वक उपयोग केला नाही तर प्लास्टिकचा हा तुकडा एखाद्याला कर्जाच्या खोल दरीत लोटायला कमी करणार नाही. टोरेंटोच्या ग्लोब ॲण्ड मेल या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, “कर्जबाजारी झाल्यानंतर टोरंटोच्या क्रेडिट सल्लागार सेवा संस्थेकडे धाव घेणाऱ्‍या वीसबावीस वर्षांच्या युवकांची” संख्या आज तिप्पट झाली आहे. सदर अहवालाने असेही म्हटले, की यांपैकी बरेच जण २५,००० डॉलरच्या आसपास कर्ज करून बसले होते; पण, कशामुळे त्यांच्यावर इतके कर्ज झाले होते? शंकाच नाही, क्रेडिट कार्डाचा मनसोक्‍त वापर केल्यामुळे.

या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर क्रेडिट कार्ड बनवावे की नाही असा प्रश्‍न येतो. खरं तर, हा निर्णय तुम्ही स्वतः नव्हे तर तुमच्या पालकांनी, तुमच्या आईवडिलांनी घेतला पाहिजे. क्रेडिट कार्डाचा उपयोग करायला तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही थोडे थांबावे असे त्यांना वाटत असल्यास त्यांचे ऐकून घ्या. धीर धरा. तुम्ही जबाबदारीने, डोळसपणे खर्च करता हे तुमच्या पालकांच्या लक्षात आल्यावर तुमच्यावर मोठमोठ्या आर्थिक जबाबदाऱ्‍या सोपवताना त्यांच्या मनात शंका येणार नाही. (पडताळा लूक १६:१०.) एक गोष्ट मात्र आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की एखादे वाहन चालवण्यात ज्याप्रमाणे लाभ आणि धोके अशा दोन्ही गोष्टी संम्मिलित असतात तेच क्रेडिट कार्डच्या बाबतीतही खरे आहे.

किंमत मोजणे

क्रेडिट कार्डावर खरेदी करणे म्हणजे कुणाकडून तरी कर्ज घेण्यासारखेच आहे. घेतलेले कर्ज फेडावे लागते त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डावर घेतलेल्या वस्तूंचे पैसे देखील नंतर फेडावेच लागतात. (नीतिसूत्रे २२:७) परंतु, हे पैसे कसे फेडावे लागतात?

यात विशिष्ट प्रकारची स्टेटमेंट (बिल) दर महिन्याच्या शेवटी तुम्हाला पाठवली जाते. यात, क्रेडिट कार्डावर तुम्ही काय काय खरेदी केली याचा आणि क्रेडिट कार्ड कंपनीला तुम्हाला किती पैसे द्यायचे आहेत याचा तपशील दिलेला असतो. शिवाय, तुम्ही ताबडतोब किती रक्कम भरली पाहिजे याचाही स्टेटमेंटमध्ये उल्लेख केला जातो. ताबडतोब भरावी लागणारी ही रक्कम फारच कमी असते. त्यामुळे तुमच्या मनात कदाचित असा विचार येईल, ‘मग काय वाईट? मी जर दर महिन्याला ही छोटी रक्कम वेळच्या वेळी भरली तर काही दिवसांतच मला सगळं कर्ज आरामशीर फेडता येण्यासारखं आहे.’ पण मग, ग्रेस पिरिअड (खरेदी केल्यानंतर ज्या तारखेपासून व्याज सुरू होते त्या तारखेपर्यंतची मुदत) उलटल्यानंतर कंपनीला जितकी रक्कम परत करणे बाकी आहे त्या रक्केमवर विशिष्ट फायनॅन्शियल चार्ज अर्थात व्याज आकारला जातो. आणि क्रेडिट कार्डावर घेतलेल्या वस्तूंचे हप्ते भरताना त्यावर लावण्यात येणारा व्याजाचा दर फार जास्त असतो. *

या संदर्भात जोसफचे उदाहरण पाहा. दर महिन्याला त्याला मिळणाऱ्‍या स्टेटमेंटप्रमाणे जवळजवळ १,००० डॉलर इतकी रक्कम बॅलन्स (बाकी) होती. अर्थात, जोसफला ताबडतोब केवळ २० डॉलर भरायचे होते. पण, त्याने जेव्हा त्याच्या स्टेटमेंटचा काळजीपूर्वक अभ्यास केला तेव्हा त्याच्या लक्षात आले, की त्या महिन्याच्या बॅलन्समध्ये जवळजवळ १७ डॉलरचा फायनॅन्शियल चार्ज लावला होता. याचा अर्थ, जोसफने २० डॉलरची कमीतकमी रक्कम भरली तरी त्याचे कर्ज किंवा देणे फक्‍त ३ डॉलरने कमी झाले असते.

तर मग, फक्‍त कमीतकमी रक्कम भरून क्रेडिट कार्डाचे बिल भरायला किती वेळ लागेल? या संदर्भात, फेडरल ट्रेड कंपनी आणि अमेरिकन एक्सप्रेस या क्रेडिट कार्ड कंपनीने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत एक काल्पनिक उदाहरण दिले होते: “तुम्हाला जर क्रेडिट कार्ड कंपनीचे २,००० डॉलर देणे बाकी आहे आणि त्या कर्जावर १८.५ टक्के व्याज आकारण्यात येणार असेल आणि ताबडतोब भरावी लागणारी रक्कम अगदीच तुटपुंजी असली, तर संपूर्ण कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला ११ वर्षांपेक्षा जास्त वर्षं लागतील; त्याशिवाय, फक्‍त व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला आणखीन १,९३४ डॉलर भरावे लागतीत; मग, ही रक्कम तुमच्या मूळ खरेदी रकमेच्या दुप्पटच झाली नाही का?”

तेव्हा, क्रेडिट कार्डाचा उपयोग करताना खबरदारी बाळगली नाही तर तुम्ही खुद्द स्वतःसाठी एक आर्थिक कबर खोदत असल्यासारखे होईल. सुरवातीला उल्लेख केलेली क्रिस्टिन शेवटी भानावर आली. ती म्हणते: “खरेदी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी जवळजवळ दुप्पट पैसे देत होते. त्यातच पैसे द्यायला जरा उशीर झाला, की वर लेट फी देखील द्यावी लागत असे. काय करावं सूचत नव्हतं.”

क्रेडिट कार्डचा डोळस उपयोग कसा करावा

“आत्ता खरेदी करा, पैशाचं नंतर पाहू या” हे धोरण किती फसवे असू शकते याची प्रचिती आल्यानंतर किस्टिनचे डोळे उघडले. होय, तुमच्या नकळत तुमचे कर्ज वाढत जाते कारण तुम्ही दर महिन्याला कमीतकमी रक्कम भरत असला तरी त्यामुळे तुमचे कर्ज नव्हे, तुमचे फक्‍त फायनॅन्शियल चार्जेस भरून निघतात. अशा आर्थिक सापळ्यात सापडू नये म्हणून जबाबदार क्रेडिट कार्ड धारक काय करतात.

• प्रथम, ते काय काय खरेदी करतात त्याची अचूक नोंद ठेवतात आणि मग दर महिन्याच्या अखेरीस स्टेटमेंट मिळते तेव्हा सर्व हिशोब बरोबर आहे की नाही हे तपासून पाहतात.

• ते आपली सर्व बिलं वेळच्या वेळी भरतात; त्यांना याची जाणीव असते, की क्रेडिट कार्डचा उत्तम उपयोग करणारे अशी ख्याती असलेल्यांना एखादी नोकरी मिळवण्यासाठी, विमा उतरविण्यासाठी किंवा एखादी गाडी किंवा घर घेण्यासाठी जास्त त्रास होत नाही.

• शक्यतो त्यांना जितके पैसे देणे लागते तितके सगळे ते भरतात; काहीही बॅलन्स ठेवत नाहीत. त्यामुळे बॅलन्सवर सहसा आकारले जाणारे भरमसाठ व्याज त्यांना भरावे लागत नाही.

• ओळख असल्याशिवाय कोणत्याही व्यक्‍तीला किंवा कंपनीला ते फोनवरून आपला क्रेडिट कार्ड नंबर आणि एक्सपाइरी डेट (मुदत समाप्तीची तारीख) सांगत नाहीत.

• शिवाय कुणालाही ते आपले क्रेडिट कार्ड वापरायला देत नाहीत; मग, तो जवळचा मित्र का असेना. कारण कार्डाचा दुरुपयोग केल्यास दुसऱ्‍या कुणाला नाही, तर कार्ड धारकालाच फटका बसू शकतो.

• रोख रक्कम मिळवण्यासाठी बँक कार्डचा उपयोग केला जातो तसा ते आपल्या क्रेडिट कार्डाचा उपयोग करत नाहीत. हे देखील लक्षात ठेवा, आगाऊ रोखरक्कमेवर सहसा खरेदीच्या भावापेक्षा जास्त व्याज आकारला जातो.

• आपल्याला मिळणारा हरएक क्रेडिट कार्ड अर्ज भरून ते पाठवत नाहीत. बऱ्‍याचशा युवकांना एक कार्ड पुरेसे असते.

• क्रेडिट कार्डावर खरेदी करताना आपण प्रत्यक्षात नोटांचा किंवा नाण्यांचा उपयोग करत नसलो तरी एकअर्थी रोख रक्कमच खर्च करत आहोत हे ध्यानात ठेवून ते आपल्या क्रेडिट कार्डाचा फार विचारपूर्वक उपयोग करतात.

क्रेडिट कार्डाचे लाभ

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास किंवा नंतर केव्हा क्रेडिट कार्ड बनवण्याचा तुमचा विचार असल्यास त्याचे लाभ आणि धोके या दोन्ही गोष्टींविषयी पूर्ण माहिती करून घ्या. स्वतःला विचारा: क्रेडिट कार्ड बनवण्याचा माझा उद्देश काय? निरनिराळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी; हल्ली क्रेडिट कार्ड वापरण्याची फॅशन आहे म्हणून; मित्रांवर छाप पाडण्यासाठी? की प्रेषित पौलाने सांगितले त्याप्रमाणे “अन्‍नवस्त्र” यांसारख्या मुलभूत गोष्टींमध्ये मी समाधानी राहण्यास शिकावे? (१ तीमथ्य ६:८) क्रेडिट कार्डावर अफाट खरेदी करून कर्जबाजारी झाल्यामुळे आयुष्यातल्या श्रेष्ठ किंवा अतिमहत्त्वपूर्ण गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होईल काय?—मत्तय ६:३३; फिलिप्पैकर १:८-११.

या प्रश्‍नांचा शांत बसून विचार करा आणि आपल्या पालकांसोबत त्याची चर्चा करा. असे केल्यास, तुम्ही स्वतःवर कोणतेही आर्थिक संकट ओढवून घेणार नाही; मग तुमच्यापाशी क्रेडिट कार्ड असो अगर नसो.—नीतिसूत्रे २२:३

[तळटीपा]

^ क्रेडिट कार्ड धारकास दर महिन्याला पाठवल्या जाणाऱ्‍या अर्जामध्ये किंवा स्टेटमेंटमध्ये दिलेला ॲन्यूअल परसंटेज रेट (एपिआर) पाहून एखाद्या क्रेडिट कार्ड कंपनीकडून आकारला जाणारा व्याज दर किती आहे हे तुम्ही माहीत करून घेऊ शकता.

[२४ पानांवरील चौकट]

आईवडिलांच्या सल्ल्याचे महत्त्व

बऱ्‍याच युवकांना पोस्टाने पहिल्यांदाच अर्ज मिळतो तेव्हा क्रेडिट कार्ड बनवण्याची पहिली संधी त्यांना मिळते. त्यांना असे बरेच अर्ज मिळत राहतात. जेन ब्रायंट क्विन म्हणतात: “अभ्यासांवरून निष्पन्‍न झालं आहे, की युवक ज्या कंपनीचं क्रेडिट कार्ड पहिल्यांदा घेतात तेच कार्ड शेवटपर्यंत वापरतात; त्यामुळे आपल्या कंपनीचं कार्ड युवकांच्या गळी उतरण्यासाठी कंपन्यामध्ये बरीच चढाओढ चालू असते.”

क्रेडिट कार्ड अर्जावर सहसा बऱ्‍याच काळापासून क्रेडिट कार्ड वापरत आलेल्या पालकाची किंवा एखाद्या प्रौढ व्यक्‍तीची सही घ्यावी लागते; त्यामुळे वेळच्या वेळी पैसे मिळतील अशी खात्री कंपनीला होते. पण, बरेच युवक फसव्या मार्गांनी असे करतात. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. एका तरुणीने, आपल्या आजीच्या परवानगीशिवाय प्रमुख अर्जदार म्हणून अर्जावर आजीचे नाव घातले आणि जॉईंट (भागीदार) अर्जदार म्हणून स्वतःचे नाव घातले. आपल्या नावावर हजारो डॉलरचे कर्ज झाले आहे हे कळाल्यावर तिच्या आजीला किती धक्का बसला असेल याची आपण कल्पना करू शकतो.

क्रेडिट कार्डाच्या अर्जावर आपल्या आईवडिलांची किंवा एखाद्या प्रौढाची सही करणे वास्तवात लबाडी आहे; आणि आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, की देवाला लबाडीचा वीट आहे. (नीतिसूत्रे ११:१; इब्री. १३:१८) तेव्हा, तुम्हाला क्रेडिट कार्ड बनवायची इच्छा असल्यास त्याबद्दल आपल्या आईवडिलांशी स्पष्टपणे बोला. त्यांचा सल्ला तुम्हाला पुढे लाभदायक ठरेल. कर्ज फेडण्याबाबत तुमच्या पालकांना बहुधा कल्पना असेलच; आणि या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करण्यास त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही योग्य असू शकत नाही. तेव्हा, क्रेडिट कार्ड प्राप्त करण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नका; त्याबद्दल आपल्या पालकांशी बोला.

[२३ पानांवरील चित्र]

क्रेडिट कार्डाचा अविचारीपणे उपयोग केल्याने आर्थिक संकट ओढवू शकते