लवकर की उशिरा?
लवकर की उशिरा?
सध्या, २१ व्या शतकाविषयी आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या तिसऱ्या सहस्त्रकाविषयी लोकांमध्ये पुष्कळ चर्चा चालली आहे. न्यूझवीक या पत्रिकेने म्हटले की, “२० वे शतक युद्धाचे शतक म्हणून सुरू झाले, नंतर आण्विक युग बनले आणि आता मनोरंजनाचे युग म्हणून समाप्त होत आहे.” त्या पत्रिकेच्या जानेवारी २२, १९९७ च्या अंकात असा अहवाल दिला होता: नूतन वर्षाच्या आदल्या रात्रीसाठी अर्थात डिसेंबर ३१, १९९९ साठी “जगभरातली हॉटेल्स आताच बुक करून झाली आहेत.”
परंतु, काहींच्या मते नूतन वर्षाचा सोहळा फार लवकर साजरा केला गेला. त्यांचे म्हणणे आहे की, नूतन वर्षाबाबत पुष्कळांचा गैरसमज झाला आहे आणि २१ वे शतक व नवीन सहस्त्रक जानेवारी १, २००० ला नव्हे तर जानेवारी १, २००१ ला सुरू होते. शून्य वर्ष नसल्यामुळे पहिले शतक पहिल्या वर्षी सुरू होऊन शंभराव्या वर्षी समाप्त झाले; दुसरे शतक १०१ पासून २०० पर्यंत होते आणि पुढे असेच होत गेले. म्हणून असा युक्तिवाद केला जातो की, जानेवारी १, १९०१ साली सुरू झालेले २० वे शतक आणि जानेवारी १, १००१ साली सुरू झालेले दुसरे सहस्त्रक २००० सालाच्या डिसेंबर ३१ लाच समाप्त होईल.
आणखी एक गोष्ट म्हणजे, आपल्या दिनदर्शिकेमध्ये एखादी घटना ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी घडली की नंतर घडली त्या आधारे मोजणी केली जाते. विद्वानांना आता हे कळून चुकले आहे की येशूचा जन्म पूर्वी समजले जात होते त्याआधी झाला होता; यामुळे दिनदर्शिकेतली महत्त्वाची तारीख चुकीची ठरते. येशूचा जन्म केव्हा झाला याविषयी लोकांची विभिन्न मते आहेत; परंतु बायबलमधील कालगणनेनुसार हा जन्म सा.यु.पू. २ मध्ये झाला होता असे दिसून येते. या तारखेनुसार मोजणी केली तर ख्रिस्ताच्या जन्मानंतरचे तिसरे सहस्त्रक खरे तर गेल्या वर्षाच्या शरद ऋतूत केव्हाच सुरू झाले! याविषयी आणखी माहिती सावध राहा! (इंग्रजी) पत्रिकेच्या मे २२, १९९७, पृष्ठ २८ वर आणि डिसेंबर २२, १९७५, पृष्ठ २७ वर वाचायला मिळेल. *
शेवटी काय, तर २१ वे शतक आणि नवीन सहस्त्रक जानेवारी १, २००० ला सुरू झाले असे ठाम मत न बाळगणेच उत्तम. तथापि, बहुतेक लोकांमध्ये याबद्दल चर्चा होत असल्यामुळे सावध राहा! पत्रिकेला या वेळी “उलथापालथीचा काळ—२० वे शतक” या विषयाची चर्चा करणे उचित वाटले.
[तळटीप]
^ नोव्हेंबर १, १९९९ चा टेहळणी बुरूज अंक देखील पाहा.