व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इंटरनेटवरील धोके मला कसे टाळता येतील?

इंटरनेटवरील धोके मला कसे टाळता येतील?

तरुण लोक विचारतात . . .

इंटरनेटवरील धोके मला कसे टाळता येतील?

कल्पना करा की, तुम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पुस्तकालयात आहात. तुमच्या भोवती सर्व प्रकारची आणि जवळजवळ सर्व विषयांची पुस्तके, बातमीपत्रे, वर्णनासहित यादींची पुस्तके, फोटोग्राफ, रेकॉर्डिंग हे सगळे आहे. सर्वात आधुनिक माहिती त्याचप्रमाणे गेल्या शतकातले साहित्यसुद्धा तुम्हाला चुटकीसरशी मिळवता येते.

इंटरनेटद्वारे असा हा माहितीचा भांडार तुम्हाला क्षणार्धात प्राप्त करता येतो. इंटरनेटमुळे एका व्यक्‍तीला स्वतःच्या संगणकासमोर बसून जगात कोणत्याही भागातल्या संगणक वापरणाऱ्‍या व्यक्‍तींबरोबर माहितीची देवाणघेवाण करता येते. * त्याच्याद्वारे लोकांना वस्तू विकता येतात, खरेदी करता येतात, एकमेकांशी संभाषण करता येते, नवनवीन संगीताच्या रेकॉर्डिंग्स ऐकता येतात—आणि हे सगळे अगदी घरी बसल्या बसल्या.

म्हणूनच काही तज्ज्ञ मंडळी म्हणते की, या वर्षाच्या अखेरीस इंटरनेटच्या ग्राहकांची संख्या ३२ कोटींच्या घरात जाईल. जगाच्या अनेक भागांमध्ये इंटरनेट आता घराघरात पोहंचू लागले आहे. शाळा आणि ग्रंथालयांमध्ये इंटरनेटचा वापर करायला उत्तेजन दिले जात असल्यामुळे कोट्यवधी तरुणांना आज इंटरनेट सहज उपलब्ध आहे. अमेरिकेत तर १२ आणि १९ या वयोगटातल्या सुमारे ६५ टक्के तरुणांनी इंटरनेट वापरले आहे किंवा इंटरनेटवरून दिल्या जाणाऱ्‍या सेवांची वर्गणी केली आहे.

इंटरनेटचा योग्य वापर केला तर, आपल्याला हवामान, प्रवास आणि इतर विषयांवरील उपयुक्‍त माहिती मिळू शकते. त्याच्याद्वारे पुस्तके, कारचे विशिष्ट पार्ट आणि इतर वस्तू खरेदी करता येतात. पुष्कळजण शाळेच्या गृहपाठासाठीही इंटरनेटचा उपयोग करतात.

इंटरनेट फार उपयोगी असले, तरी ते अशा एका पुस्तकालयासारखे आहे ज्यात ग्रंथपाल किंवा इतर कोणीच लोक नसतात. त्यामुळे आपल्याला कोणी पाहत नाही असा विचार करून इंटरनेटचा वापर होऊ शकतो. आणि हाच इंटरनेटचा सर्वात मोठा धोका आहे. का? कारण पुष्कळशा वेबसाईट्‌सवरची माहिती नैतिकरित्या भ्रष्ट करणारी आणि आध्यात्मिकरित्या हानीकारक असते. यास्तव, इंटरनेटद्वारे ख्रिस्ती तरुणांना मोहपाशात अडकण्याचा धोका असू शकतो. शेवटी, मानवजात ही मुळात जिज्ञासू आहे आणि याचाच दियाबल सैतानाने अनेक वर्षांपासून फायदा उचलला आहे. सैतानाने हव्वेच्या जिज्ञासुपणाचा फायदा घेऊन ‘कपटाने तिला ठकविले.’—२ करिंथकर ११:३.

अशाचतऱ्‍हेने, एखाद्या तरुण ख्रिश्‍चनाने जर आपली आध्यात्मिकता जपून ठेवण्याचा दृढनिश्‍चय केला नाही तर सहजासहजी तो हानीकारक माहितीच्या पाशात अडकू शकतो. बेटर होम्स ॲण्ड गार्डन्स पुस्तकातल्या एका लेखात म्हटले होते: “इंटरनेटवर नवनवीन लोक आपली माहिती प्रसारित करतात; पण तेथेच बाल अत्याचारी, भामटे, हटवादी आणि इतर हानीकारक लोकांचेही वेबसाईट्‌स आहेत.”

हाव्येर * नावाचा एक तरुण म्हणतो: “काही वेबसाईट्‌स पाहून तर धक्काच बसतो. अचानकच त्या स्क्रीनवर अवतरतात.” तो पुढे म्हणतो: “हे सगळे लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला भुरळ पाडायला ते पाहत असतात—त्यांना तुमचा पैसा हवा असतो.” जॉन नावाचा एक तरुण ख्रिस्ती म्हणतो: “एकदा आपण अनुचित गोष्टींकडे पाहत राहू लागलो तर त्यापासून दुसरीकडे नजर फिरवणं फार कठीण असतं इतकं ते आपल्याला जखडून ठेवतं.” काही ख्रिस्ती तरुणांनी वारंवार असले हानीकारक वेबसाईट्‌स उघडले आहेत आणि गंभीर समस्येत पडले आहेत. काहींनी तर यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंधसुद्धा बिघडवला आहे. हे सगळे कसे टाळता येऊ शकते?

‘निरर्थक गोष्टी पाहणे’

काहीवेळा वेबसाईटच्या नावावरून हे ओळखता येऊ शकते की त्यात आक्षेपार्ह माहिती आहे. * नीतिसूत्रे २२:३ असा इशारा देते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.”

परंतु, पुष्कळदा असे होऊ शकते की, ठाऊक नसताना अगदी नकळत एखादी आक्षेपार्ह साईट उघडली जाते. त्या साईटवरील वेगवेगळी माहिती दर्शवणाऱ्‍या पानावर खास तुम्हाला त्यातली माहिती पाहण्यासाठी—आणि वारंवार तिकडे परतण्यासाठी—मोहात पाडणारी धक्केदायक चित्रे अत्यंत हुशारीने मांडलेली असू शकतात! *

केव्हन त्याच्या एका मित्राची गोष्ट सांगतो: “त्याच्याकडे भरपूर वेळ होता आणि तो फार जिज्ञासुसुद्धा होता. मग त्याला अश्‍लील चित्रं पाहण्याची सवयच लागली.” पण सुदैवाने, या तरुणाने ख्रिस्ती मंडळीतल्या एका वडिलांची मदत घेतली.

अशीच एखादी साईट तुम्ही नकळत उघडली तर काय कराल हे तुम्ही ठरवून ठेवले आहे का? एखाद्या ख्रिश्‍चनाने काय केले पाहिजे हे स्पष्टच आहे: लगेच ती साईट बंद करावी—किंवा गरज पडल्यास इंटरनेटवरील वेगवेगळ्या साईट्‌स पाहण्याच्या त्या कार्यक्रमातून बाहेर पडावे! तुम्हीसुद्धा स्तोत्रकर्त्यासारखे व्हा; त्याने अशी प्रार्थना केली: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव.” (स्तोत्र ११९:३७; पडताळा ईयोब ३१:१.) हे लक्षात ठेवा की, दुसरे कोणी आपल्याला पाहत नसले तरी आपल्यावर एकाची नजर आहे. बायबल आपल्याला आठवण करून देते की, “ज्याच्याजवळ आपल्याला हिशोब द्यायचा आहे त्याच्या दृष्टीस सर्व काही नग्न व उघडे आहे.”—इब्री लोकांस ४:१३, पं.र.भा.

याविषयी तुमच्या पालकांशी किंवा इतर प्रौढ ख्रिश्‍चनांशी बोलल्याने पुन्हा अशा अनुचित साईटवर न जाण्याचा तुमचा निश्‍चय अधिक बळकट होईल. समजा तुम्ही दलदलीत पडलात तर मानेपर्यंत आत रुतत जाईस्तोवर तुम्ही कोणाला हाक न मारता एकटेच प्रयत्न करत राहाल का?

इंटरनेटवरून मैत्री करण्याविषयी काय?

चॅट नावाच्या सुविधेमुळे सबंध जगभरातल्या इंटरनेट वापरणाऱ्‍यांना एकमेकांशी क्षणार्धात दळणवळण करता येते. व्यापारी चर्चासत्रे घेण्यासाठी आणि ग्राहकांना सेवा देण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. काही चॅट रूम्समध्ये ऑटो रिपेअर किंवा कम्प्युटर प्रोग्रामिंगसारख्या तांत्रिक विषयांवरील माहितीची देवाणघेवाण करण्याची सोय असते. तर काही चॅट सुविधांमध्ये मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातले सदस्य एकमेकांशी खासगीत गप्पागोष्टी करू शकतात; तेवढाच त्यांचा फोनचा खर्च वाचतो. या सुविधेचे काही फायदे आहेत खरे, पण धोकेही आहेत का?

पब्लिक चॅट रूम्सच्या (सामान्य चॅट रूम्स) बाबतीत जरा जपून असावे कारण यात काही धोके असू शकतात. लेखिका लीआ रोझन म्हणतात: “तांत्रिक ज्ञान असलेले किशोरवयीन देशभरातल्या आणि जगभरातल्या अनामिक, अनोळखी व्यक्‍तींबरोबर तासन्‌तास इंटरनेटवर गप्पा मारत राहतात. पण, काही वेळा हेच अनोळखी लोक विकृत मनाचे प्रौढ असू शकतात ज्यांना या तरुणांशी लैंगिक कारणांसाठी भेटीगाठी करायच्या असतील.” पॉप्युलर मेकॅनिक्स याच्यातील एका लेखात असा इशारा दिला होता की, पब्लिक चॅट रूम्सचा उपयोग करताना “फार सावधगिरी बाळगण्याची आवश्‍यकता आहे.” कोणा अनोळखी व्यक्‍तीला आपले नाव आणि पत्ता देणे म्हणजे गंभीर समस्येला आमंत्रण देण्यासारखे आहे! स्वतःवर असा धोका का ओढवून घ्यावा?

पण, यात आणखी एक धोका आहे जो पटकन लक्षात येत नाही आणि तो म्हणजे बायबल तत्त्वांबद्दल आदर नसलेल्या अनोळखी व्यक्‍तींबरोबर अनुचित मैत्री ठेवणे. * संशोधकांचे म्हणणे आहे की, चॅट रूम्समध्ये किशोरवयीन लैंगिक विषयांवरच जास्त बोलत असतात. यास्तव, १ करिंथकर १५:३३ मध्ये दिलेला बायबलचा सल्ला उचित आहे: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” संगणकाद्वारे कुसंगती करणे धोक्याचे आहे. तेव्हा देवाला भिऊन वागणाऱ्‍या तरुणाने किंवा तरुणीने कशाचीही पर्वा न करता असे धोके पत्करावेत का?

संरक्षक उपाय

इंटरनेटचे धोके लक्षात घेता, त्याचा सावधगिरीने वापर करायला हवा. उदाहरणार्थ, काही कुटुंबांनी आपला संगणक अशा ठिकाणी ठेवला आहे जेथे सतत कोणी न कोणी ये-जा करत असते जसे की, हॉलमध्ये. किंवा कुटुंबात असाही नियम केला जाऊ शकतो की, इंटरनेटचा वापर फक्‍त घरात इतर कोणी असतानाच करावा. तुमच्या आईवडिलांनी असे काही नियम बनवले असल्यास त्यांना सहकार्य द्या. (नीतिसूत्रे १:८) त्यांचे हे स्पष्ट नियम त्यांच्या प्रेमाचा पुरावा आहे.

शाळेच्या कामानिमित्ताने तुम्हाला इंटरनेट वापरावा लागत असल्यास, तुम्ही त्यावर किती वेळ घालवता यावर लक्ष ठेवणे चांगले राहील, नाही का? तुम्ही किती वेळ खर्च करणार हे आधीच ठरवा आणि तुम्हाला आठवण करून देण्यासाठी घड्याळाचा गजर लावून ठेवा. टॉम सुचवतो: “आधीच विचार करा, काय शोधणार आहात तेसुद्धा ठरवून ठेवा आणि तेच पाहा—दुसऱ्‍या गोष्टी कितीही आकर्षक वाटत असल्या तरीही त्या पाहू नका.”

ई-मेल वापरतानाही सावधगिरी बाळगली पाहिजे. ख्रिस्ती युवकांनी उगाच आपला वेळ वायफळ ई-मेल वाचण्यात घालवू नये. ई-मेलचा आवश्‍यकतेपेक्षा जास्त वापर केल्याने शाळेच्या गृहपाठासाठी आणि आध्यात्मिक कार्यहालचालींसाठी लागणारा मूल्यवान वेळ वाया जाऊ शकतो.

राजा शलमोन म्हणाला: “ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणविते.” (उपदेशक १२:१२) ते शब्द इंटरनेटलाही लागू होतात. संशोधन करण्यात इतके दंग होऊ नका की व्यक्‍तिगत बायबलचा अभ्यास आणि ख्रिस्ती सेवेतला सहभाग यांच्याकडे दुर्लक्ष होईल. (मत्तय २४:१४; योहान १७:३; इफिसकर ५:१५, १६) संगणकाद्वारे दळणवळण करण्याला महत्त्व असले तरीही सहख्रिश्‍चनांसोबत समोरासमोर बोलण्याला दुसरा कोणताही पर्याय नाही एवढे विसरू नका. म्हणून तुम्हाला इंटरनेट वापरण्याची गरज असलीच तर मग त्याचा विचारपूर्वक वापर करण्याचा निश्‍चय करा. हानीकारक वेबसाईट्‌स टाळा आणि इंटरनेटवर जास्त वेळ घालवू नका. “आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण” करा आणि इंटरनेटचे गुलाम बनू नका.—नीतिसूत्रे ४:२३.

[तळटीपा]

^ ऑगस्ट ८, १९९७ च्या सावध राहा! अंकातली “इंटरनेट तुमच्यासाठी आहे का?” ही लेखमाला पाहा.

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ वेबसाईटचे नाव म्हणजे ती विशिष्ट वेबसाईट उघडण्यासाठी असलेली अक्षरे असतात. काहीवेळा याच नावांमध्ये त्या साईटचा उद्देश सांगणारे शब्द असतात.

^ एखाद्या साईटवरील वेगवेगळी माहिती दर्शवणारे पान म्हणजे दुकानातल्या वस्तू दर्शवणाऱ्‍या खिडकीसारखे असते; पण ते इलेक्ट्रॉनिक असते. त्यामध्ये त्या साईटवर काय काय आहे, ती साईट कोणी निर्माण केली आहे वगैरे माहिती असते.

^ असले धोके ख्रिश्‍चनांनीच बनवलेल्या पब्लिक चॅट रूम्समध्येही असू शकतात; हे चॅट रूम्स त्यांनी चांगल्या हेतूने अर्थात आध्यात्मिक विषयांची चर्चा करण्याच्या हेतूने बनवल्या असतील. परंतु काही वेळा, अप्रामाणिक लोकांनी आणि धर्मत्यागींनी अशा चर्चांमध्ये सामील होऊन इतरांवर आपल्या अशास्त्रवचनीय कल्पना लादण्याचा फार चतुराईने प्रयत्न केला आहे.

[२० पानांवरील संक्षिप्त आशय]

“काही वेबसाईट्‌स पाहून तर धक्काच बसतो. अचानकच त्या स्क्रीनवर अवतरतात”

[२१ पानांवरील चित्र]

काही कुटुंबांनी घरातला संगणक अशा ठिकाणी ठेवला आहे जेथे सतत लोकांची ये-जा होत असते