व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनातील अद्‌भुत रचनांची नक्कल

जीवनातील अद्‌भुत रचनांची नक्कल

जीवनातील अद्‌भुत रचनांची नक्कल

नुकतीच चालायला शिकलेली मुले चालता चालता पडतात आणि डोक्याला मार लावून घेतात. त्यांच्यापेक्षा जरा मोठी मुले झाडावरून किंवा सायकलीवरून पडतात. खेळाडू खेळत असताना एकमेकांना धडकतात. वाहन चालकांचे रस्त्यावर असंख्य अपघात होतात. आपण कितीदा तरी पडतो, कोसळतो, आदळतो तरीपण सहसा आपल्याला काही गंभीर इजा होत नाही. आपल्या शरीराची घडण मजबूत व लवचीक आहे याचा आपण सहसा विचार करत नाही. पण, शास्त्रज्ञांना आता हे कळू लागले आहे की, आपले शरीर खरे म्हणजे एक अद्‌भुत रचना आहे—अगदी हाडांपासून त्वचेपर्यंत.

श क्‍ती, मजबुती शिवाय हलकेपणा हे गुणधर्म निसर्गातल्या प्रत्येक निर्मितीत आढळून येतात. कोवळी रोपटी काँक्रीट आणि दगडांमधील भेगांना छेदून मोठी दिमाखदार वृक्षे बनतात. हेच वृक्ष, विजेच्या खांबांना आणि घरांना उद्‌ध्वस्त करून टाकणाऱ्‍या वादळी वाऱ्‍यांमध्येही टिकाव धरतात. झाडांच्या बुंध्यांमध्ये भोक पाडताना सुतार पक्ष्याच्या डोक्यावर जितका ताण पडतो त्याने सर्वसाधारण मेंदूचा लगदा बनला असता. मगरी, सुसरी यांच्या चमड्यांना भाले, बाण आणि बंदुकीच्या गोळ्यासुद्धा छेदू शकत नाहीत. (पडताळा ईयोब ४१:१, २६.) या सर्व गोष्टींमुळे हजारो वर्षांपासून मानव बुचकळ्यात पडला आहे.

गेल्या ४० वर्षांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात बरीच प्रगती झाल्यामुळे या रचनांमागील रहस्यांचा (जी बहुतेककरून जिवंत पेशीत खोलवर दडलेली आहेत) अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना नवनवीन उपकरणे उपलब्ध झाली आहेत. या सूक्ष्म पातळीवरची रचनाही चाट पाडणारी आणि अत्यंत जटिल आहे. निसर्गातल्या विलक्षण निर्मितीतली रहस्ये जाणून घेणे हाच केवळ विज्ञानाचा हेतू नाही, तर त्या रचनांची नक्कल करणे, निदान त्यांच्यामागचा एकंदर वैज्ञानिक नियम समजून घेणे हा हेतू आहे. या अभ्यास क्षेत्राने बरीच आशा वाढवली आहे; त्याने बायोमिमेटिक्स (ग्रीक शब्द बायोस, अर्थात “जीवन” आणि मिमेसिस, अर्थात “नक्कल” यातून हा शब्द आला आहे) या नावाचे नवीन विज्ञान क्षेत्र निर्माण केले आहे.

बायोमिमेटिक्सकडून सुधारित जगाची आशा

बायोमिमेटिक्स: डिझाईन ॲण्ड प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स या पुस्तकात म्हटले आहे: “बायोमिमेटिक्स म्हणजे जैविक रचनांचा [आणि] त्यांच्या कार्यांचा अभ्यास.” त्यात पुढे असे म्हटले आहे की, ‘नवीन कल्पनांसाठी प्रेरणा देणे आणि त्या कल्पनांच्या आधारे जैविक रचनांमध्ये आढळतात तशाच कृत्रिम रचना निर्माण करणे’ हे त्या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे.

शास्त्रज्ञ स्टीफन वेनराईट म्हणतात, “बायोमिमेटिक्स, रेणवीय जीवविज्ञानाला मागे सारून २१ व्या शतकातले सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वपूर्ण जीवशास्त्र म्हणून त्याची जागा घेईल.” प्राध्यापक मेमेट सरीकाया असा दावा करतात: “लवकरच लोह युग आणि औद्योगिक क्रांतीसारखीच क्रांती पदार्थांमध्येही घडेल. आपण पदार्थांच्या नवीन युगात प्रवेश करत आहोत. मला वाटते, पुढच्या शतकामध्ये बायोमिमेटिक्समुळे आपल्या राहणीमानात फार मोठे फेरफार होतील.”

खरे तर, हे फेरफार आधीच घडू लागले आहेत; त्याविषयी आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी, आतापर्यंत न उमगलेल्या ज्या गोष्टींचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत त्यांच्याविषयी आपण थोडक्यात पाहू. “रचना” या शब्दामध्ये कोणता गहन अर्थ दडलेला आहे आणि त्यामुळे आपल्या भोवतालच्या विलक्षण जगाला कसा अर्थ लाभला आहे त्याचेही आपण परीक्षण करून पाहू या.