व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

युद्धबळींचे बदलते चेहरे

युद्धबळींचे बदलते चेहरे

युद्धबळींचे बदलते चेहरे

“पूर्वीची युद्धे आणि आजकालची युद्धे यांत जमीन आस्मानाचा फरक आहे. . . . पूर्वी युद्धांमध्ये सैनिकांचे बळी पडायचे. आज मात्र युद्धांमध्ये वाढत्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत,” असे युएन रेडिओने प्रसारित केलेल्या “पर्सपेक्टीव्ह” या कार्यक्रमात सांगण्यात आले. उदाहरणार्थ, पहिल्या विश्‍व युद्धात बळी पडलेल्या एकूण लोकांपैकी केवळ ५ टक्के नागरिक होते. पण, दुसऱ्‍या विश्‍व युद्धात बळी पडलेल्या नागरिकांची संख्या एकाएकी ४८ टक्क्यांवर गेली. आणि आज “लढायांमध्ये बळी पडणारे जवळजवळ सर्वच किंवा ९० टक्के लोक सैनिक नव्हे तर सर्वसामान्य नागरिक असतात आणि विशेष म्हणजे यात स्त्रिया, बालके आणि असहाय वृद्ध लोक असतात,” असे युएन रेडिओने म्हटले.

बालके आणि सशस्त्र संघर्ष या संस्थेच्या युएन सेक्रेटरी जनरलचे खास प्रतिनिधी, ओलारा ओट्यून्यू यांच्या मते, “१९८७ सालापासून अंदाजे २० लाख बालके कुठल्या ना कुठल्या सशस्त्र संघर्षात मरण पावली आहेत.” याचा अर्थ, गेल्या १२ वर्षांच्या काळात युद्धांमध्ये दररोज सरासरी ४५० हून अधिक मुले बळी पडली! याशिवाय, त्याच काळादरम्यान ६० लाखांहून अधिक मुलांना एकतर गंभीर दुखापत झाली किंवा मग त्यांना कायमचे अपंगत्व आले.

युद्धांत बळी पडणाऱ्‍या मुलांच्या वाढत्या संख्येला खीळ घालण्यासाठी युएनने शांती क्षेत्रे तयार करावीत अशी उपाययोजना श्री. ओट्यून्यू यांनी सुचवली आहे. “जिथे मोठ्या संख्येने मुले असतात अशी ठिकाणे अण्वस्त्रमुक्‍त क्षेत्रे समजली जावीत; जसे की शाळा, रुग्णालये आणि खेळांची पटांगणे.” पण, “संघर्षाची ठिणगीच पडू नये अशी दक्षता घेणे” हा सगळ्यात परिणामकारक उपाय आहे. युएनने ही काळजी घेतल्यास युद्धसंघर्षात सर्वसामान्य नागरिकांचे बळी पडणार नाहीत असा युएन रेडिओचा सल्ला आहे. पण, कुणाचाही बळी जाऊ नये, मग तो सैनिक असो किंवा नागरिक याची खात्री करण्यासाठी युद्धाला कायमचाच पूर्णविराम मिळाला पाहिजे. हे शक्य आहे का?

अर्थात, युद्ध-संघर्ष करण्यात मानवाने इतिहासच घडवला आहे. त्यामुळे सबंध पृथ्वीवर मानव कधीच शांती आणू शकणार नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. आणि त्यांच्या या म्हणण्यात तथ्य आहे. पण, देवाचे वचन बायबल आपल्याला अभिवचन देते, की युद्धाचा अंत करून विश्‍वभरात शांती-सुरक्षा आणण्यास यहोवा परमेश्‍वर समर्थ आहे. बायबल म्हणते: “तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो.” (स्तोत्र ४६:९) मग, प्रश्‍न आहे की युद्धाचा हा अंत केव्हा होईल? आणि विश्‍वभरात शांती-सुरक्षा आणण्याचे देवाचे वचन निश्‍चित पूर्ण होईल असे कोणत्या आधारावर म्हणता येईल? अशा सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला हवी असल्यास कृपया या नियतकालिकाच्या प्रकाशकांना पृष्ठ ५ वर दिलेल्या सगळ्यात जवळच्या पत्त्यावर लिहा किंवा मग तुमच्या घराजवळ असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाशी संपर्क साधा. तुमच्या सर्व प्रश्‍नांची अगदी स्पष्ट उत्तरे दिली जातील. यासाठी तुमच्याकडून पैशाची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केली जात नाही.

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

UN PHOTO १५६४५०/J. Isaac