व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रेझरचा रोचक इतिहास

रेझरचा रोचक इतिहास

रेझरचा रोचक इतिहास

ऑस्ट्रेलियातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

एखादा पुरुष शेव्हिंग करण्यासाठी दररोज ५ मिनिटे खर्च करत असेल तर ५० वर्षांच्या काळात त्याने चक्क ६३ हून अधिक दिवस फक्‍त दाढी करण्यातच घालवलेले असतील! पण, रोज सकाळी उठून दाढी करण्याबद्दल काही पुरुषांना काय वाटते हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकू या.

“अक्षरशः जिवावर येतं.” “अगदी नकोसं वाटतं.” “दाढी करणं म्हणजे रोजचं मरण.” “शक्य तितकं मी ते टाळतो,” असे अलीकडेच घेतलेल्या एका सर्व्हेत काही पुरुषांनी म्हटले. दाढी करण्याचा काहींना इतका कंटाळा, इतका वीट येतो, तर मग ते दाढी करतातच का? शेव्हिंगच्या दुनियेत फेरफटका मारल्यानंतर कदाचित या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला मिळेल.

शिंपल्यापासून रेझरपर्यंत

दररोज सकाळी उठून शिंपला किंवा शार्क माशाचा दात अथवा धारदार गारगोटीचा तुकडा यांनी दाढी करण्याची कल्पना तुम्हाला करवते का? अर्थात, सबंध इतिहासात मानवाने दाढी करण्याकरता निवडलेल्या विविध वस्तूंवरून त्याच्या विलक्षण शोधकबुद्धीची कल्पना येते! उदाहरणार्थ, प्राचीन काळी ईजिप्तमध्ये दाढी करण्यासाठी पुरुषमंडळी तांब्याच्या वस्तऱ्‍याचा उपयोग करायची. हा वस्तरा एखाद्या लहानशा कुऱ्‍हाडीच्या पात्यासारखा दिसायचा. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे १८ व्या, १९ व्या शतकांत इंग्लंडच्या शेफील्ड शहरात पहिल्यांदाच कटथ्रोट (गळा कापणारा वस्तरा) म्हटलेले एक पाते दाढी करण्यासाठी तयार करण्यात आले. नाजूक कलाकुसर आणि नक्षीकाम केलेल्या या वस्तऱ्‍याचे धारदार पोलादी पाते अंतर्गोलाकार असायचे. पाते वापरायचे नसेल तेव्हा ते मुठीमध्ये (दोन पट्ट्यांच्या मध्ये) घालून सुरक्षित ठेवता येत होते. दाढीच्या या प्राचीन हत्यारांचा वापर अतिशय सावधगिरीने, अतिशय जपून केला जायचा. ही हत्यारे वापरण्याचे शिकता-शिकता चेहऱ्‍याला कोणतीही इजा झाली नाही असे कधीच व्हायचे नाही. त्यामुळे नवशिक्यांना दाढी करताना काय अनुभव आला असेल याची आपण कल्पना करू शकतो. पण, या बाबतीत २० वे शतक नवीन आशा घेऊन आले.

उदाहरणार्थ, १९०१ साली किंग कॅम्प जिलेट या अमेरिकन व्यक्‍तीने अशा सुरक्षित वस्तऱ्‍याचे पेटंट (एकस्व) विकत घेतले ज्याचे ब्लेड वापरून झाल्यानंतर टाकून द्यायचे होते. त्यांची ही अफलातून कल्पना तुफान वेगाने जगभर पसरली आणि सोन्याचा किंवा चांदीचा मुलामा दिलेल्या हॅन्डल्ससोबतच इतर निरनिराळ्या डिझाइनचे रेझर बाजारात आले. आधुनिक विकासामुळे वापरून झाल्यावर फेकून द्यायचे रेझर, दोन किंवा तीन ब्लेड असलेले रेझर तसेच लवचीक आणि सहज फिरतील असे रेझर हल्ली उपलब्ध झाले आहेत.

पण, रेझरविषयी इतके सगळे बोलताना इलेक्ट्रिकल रेझरला विसरून कसे चालेल? इलेक्ट्रिकल रेझर १९३१ साली प्रथम बाजारात आले. एक उत्तम रेझर म्हणून त्याची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढत गेली. तरीसुद्धा, अगदी त्वचेजवळ केस कापण्यासाठी आजही बऱ्‍याच जणांना धारदार ब्लेडचाच उपयोग करायला आवडतो.

दाढीच्या बदलत्या स्टाइल्स

दाढीसंबंधी सुरवातीपासून मनुष्याच्या आवडीनिवडी बदलत राहिल्या आहेत. एव्हरीडे लाइफ इन एन्शियंट ईजिप्ट या पुस्तकानुसार, प्राचीन ईजिप्शियन समाजातील पुरुषवर्ग “दाढी-मिशा राखत नसे. किंबहुना, आपल्या गुळगुळीत, चकाचक चेहऱ्‍याची ते प्रौढी मिरवायचे. घोटून दाढी करण्यासाठी ते चांगल्यातल्या चांगल्या वस्तऱ्‍यांचा उपयोग करत आणि वस्तरे वापरून झाल्यावर चमड्याच्या आवरणात जपून ठेवत.” कदाचित याच प्रथेमुळे, योसेफ नामक हिब्रू कैदी फारोसमोर जाण्याआधी दाढी करून गेला असावा.—उत्पत्ति ४१:१४.

ॲसिरियन लोकांविषयी काय? या समाजातले पुरुष मात्र आपल्या शोभिवंत दाढीसाठी प्रसिद्ध होते. त्यांना आपल्या दाढीचे इतके भूषण होते, की त्याच्या निगेसाठी ते काय नव्हते करत. दाढीचे लांब केस कुरळे करणे, दाढीच्या केसांची वेणी घालणे आणि ते व्यवस्थित बांधून ठेवणे असे विविध प्रकार ते करत.

प्राचीन काळातल्या इस्राएली पुरुषांची दाढी मात्र फार लांबलचक नसायची आणि दाढी व्यवस्थित कातरण्यासाठी ते विशिष्ट प्रकारचा वस्तरा वापरायचे. पण मग, परमेश्‍वराने प्राचीन इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात पुरुषांनी ‘आपल्या डोक्याला घेरा राखू नये’ किंवा ‘आपल्या दाढीचे कोपरे छाटून ती विद्रूप करू नये’ असे म्हटले त्याचा काय अर्थ होता? अर्थात, त्यांनी आपले केस कापू नयेत किंवा दाढी करू नये असा त्या आज्ञेचा अर्थ नव्हता. तर इस्राएली पुरुषांनी सभोवतालच्या मूर्तिपूजक राष्ट्रांच्या अतिरेकी धार्मिक प्रथा अनुसरू नयेत असा त्याचा अर्थ होता. *लेवीय १९:२७; यिर्मया ९:२५, २६; २५:२३; ४९:३२.

प्राचीन ग्रीक समाजात, अमीर उमरावांना सोडून जवळपास सर्वच पुरुष दाढी ठेवायचे. रोममध्ये दाढी करण्याची चाल सामान्य युग पूर्व दुसऱ्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाल्याचे समजते. तेव्हापासून अनेक शतकांपर्यंत दररोज दाढी करणे ही एक प्रथाच बनली होती.

रोमचे साम्राज्य कोसळल्यानंतर मात्र पुन्हा एकदा दाढी राखण्याची स्टाइल आली. ही स्टाइल १,००० वर्षे म्हणजे १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात दाढी करण्याच्या चालीने पुन्हा डोके वर काढले तेव्हापर्यंत अस्तित्वात राहिली. दाढी करण्याची ही फॅशन १८ व्या शतकापर्यंत होती. पण, मग १९ व्या शतकाच्या मध्यापासून शेवटापर्यंत दाढी करण्याची फॅशन जाऊन दाढी ठेवण्याची स्टाइल आली. म्हणूनच, वॉच टावर संस्थेचे पहिले अध्यक्ष सी.टी. रस्सल आणि डब्ल्यू. ई. व्हान ॲम्बर्ग या सहख्रिश्‍चनाने उत्तम कातरलेली, स्टाइलिश दाढी ठेवल्याचे त्यांच्या चित्रांवरून दिसून येते. त्या काळात दाढी ठेवण्याची ही पद्धत प्रतिष्ठित आणि समयोचित होती. पुढे, २० व्या शतकाच्या सुरवातीला मात्र शेव्हिंग किंवा दाढी करण्याची चाल पुन्हा एकदा अनेक देशांत लोकप्रिय झाली.

असंख्य पुरुष दररोज रेझरने दाढी करतात आणि कदाचित तुम्ही देखील प्रत्येक दिवशी दाढी करत असाल. पण, कोणतीही इजा न पोहंचता अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला शेव्हिंग कशी करता येईल? त्याकरता, “उत्तम शेव्हसाठी” या चौकटीत दिलेले सल्ले तुम्ही अनुसरू शकता. कदाचित, त्यात सुचवलेल्या काही गोष्टी तुम्ही आधीपासून करत असाल. तरीसुद्धा, चौकटीत दिलेले इतर सल्ले देखील पाळल्यास तुम्हाला उत्तम शेव्हिंग करणे सहजशक्य होईल. शिवाय, शेव्हिंग करणे कधीही कंटाळवाणे वाटणार नाही!

[तळटीपा]

^ वॉचटावर संस्थेने प्रकाशित केलेल्या इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स, खंड १, पृष्ठे २६६ आणि १०२१ पाहा.

[२३ पानांवरील चौकट/चित्रे]

उत्तम शेव्हसाठी

ब्लेडच्या साह्‍याने उत्तम शेव्हिंग करण्यासाठी मेन्स हेअर या पुस्तकात पुढील गोष्टी सुचवलेल्या आहेत. *

१. केस मऊ करणे: चेहऱ्‍यावरचे केस चांगल्या प्रकारे मऊ करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे भरपूर गरम पाण्याने तोंड स्वच्छ धुणे. शक्यतो, अंघोळ झाल्यानंतर शेव्हिंग करावी. यामुळे केस मऊ होण्यासाठी बराच वेळ मिळतो.

२. शेव्हिंग करण्याआधी प्रसाधने वापरणे: निरनिराळे साबण, फोअम, क्रिम्स आणि जेल्स वापरल्याने तीन प्रमुख फायदे होतात: (१) केसांमध्ये ओलावा राहतो, (२) केस ताठ उभे राहतात आणि (३) त्वचा मऊ पडते. त्यामुळे मग रेझर अधिक सहजपणे त्वचेवरून सरकतो. तेव्हा, दाढी करण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्‍याला उत्तम असेल असे एखादे प्रसाधन वापरा. आणि हो! तुम्ही हेअर कंडिशनरचाही उपयोग करून पाहिलाय का? त्याने देखील केस मऊ होतात.

३. योग्य रेझरचा योग्य प्रकारे उपयोग करणे: शेव्हिंग करण्यासाठी धारदार रेझर केव्हाही चांगले. बोथट रेझरमुळे त्वचेला इजा पोहंचू शकते. ज्या दिशेने केस वाढतात त्या दिशेने रेझर वापरा. अर्थात, उलट दिशेने रेझर वापरल्यास अगदी त्वचेजवळ केस कापले जाऊ शकतात. पण, त्यात एक धोका आहे. रेझर विरुद्ध दिशेने वापरल्याने केस त्वचेच्या खालपर्यंत कापले जाऊ शकतात आणि त्यामुळे त्वचेवरील लहान छिद्रांतून केस वाढण्याऐवजी ते जवळपासच्या ऊतीमध्ये वाढू लागतील. काही माहितीसूत्रांनुसार, निष्काळजीपणे शेव्हिंग केल्याने विषाणूची बाधा होऊन शेवटी चामखीळ होऊ शकते.

४. शेव्हिंगनंतर त्वचेची काळजी घेणे: ज्या-ज्या वेळी तुम्ही शेव्हिंग करता त्या-त्या वेळी चेहऱ्‍यावरची अतिशय सूक्ष्म त्वचा काढली जाते. त्यामुळे चेहऱ्‍याला हानी होण्याची दाट शक्यता असते. तेव्हा, स्वच्छ पाण्याने चेहरा चांगला धुवा. प्रथम, गरम पाण्याने आणि मग त्वचेवरील छिद्र बंद होण्यासाठी तसेच त्वचेत ओलावा राखण्यासाठी थंड पाण्यानं. हवं असेल, तर त्वचा सुरक्षित आणि चकचकीत ठेवण्यासाठी मॉईस्चराइजिंग आफ्टर-शेव्ह लोशनचा वापर करा.

[तळटीप]

^ हा लेख खासकरून पुरुषांसाठी लिहिलेला आहे. पण, अनेक देशांत स्त्रिया देखील आपल्या शरीराच्या काही भागांची शेव्हिंग करतात. त्यामुळे पुढील काही मुद्दे त्यांना देखील लाभदायक ठरतील.

[२४ पानांवरील चौकट/चित्र]

चेहऱ्‍यावरील केसांविषयी

चेहऱ्‍यावरचे केस केरॅटिन आणि इतर संबंधित प्रथिनांनी बनलेले असतात. मानव व प्राणी यांच्या शरीरात तयार होणारे हे सल्फरयुक्‍त, तंतूमय प्रथिन मुळात केस, नखे, पिसे, खुरे आणि शिंगे यांच्या निर्मितीस कारणीभूत असतात. मनुष्याच्या शरीरावरील केसांपैकी चेहऱ्‍यावरचे केस सर्वात राठ आणि लवचीक असून तितक्याच आकाराच्या तांब्याच्या तारेएवढे ते कठीण असतात. पुरुषाच्या चेहऱ्‍यावर सर्वसाधारणपणे २५,००० केस असतात आणि त्यांची दर २४ तासाला अर्ध्या मिलीमीटरने वाढ होते.

[चित्राचे श्रेय]

Men: A Pictorial Archive from Nineteenth-Century Sources/Dover Publications, Inc.

[२४ पानांवरील चित्रे]

दाढीच्या बदलत्या स्टाईल्स

ॲसिरियन

इजिप्शियन

रोमन

[चित्राचे श्रेय]

Museo Egizio di Torino

Photographs taken by courtesy of the British Museum