व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लोकप्रिय प्रथांबद्दल माफक दृष्टिकोन

लोकप्रिय प्रथांबद्दल माफक दृष्टिकोन

बायबलचा दृष्टिकोन

लोकप्रिय प्रथांबद्दल माफक दृष्टिकोन

“प्रत्येक मानव-वर्तनाचा कधी ना कधी, कुठे ना कुठे विरोध करण्यात आला तर तेच वर्तन कधी ना कधी, कुठे ना कुठे मनुष्य-कर्तव्य म्हणून बंधनकारक ठरले.”

हे आहेत आयरिश इतिहासतज्ज्ञ विलियम लेकी यांचे विधान. मानवी मन किती चंचल असते हेच त्यांनी लोकांच्या लक्षात आणून दिले. त्यांचे हे विधान, पिढ्या न्‌ पिढ्या चालत आलेल्या रूढी-परंपरा किंवा रीतीभाती यांच्या बाबतीतही लागू होऊ शकते. अर्थात, ज्या प्रथांना एकेकाळी जीवनाचे एक अत्यावश्‍यक अंग मानले जायचे त्याच प्रथांची लोकांनी नंतर टीका केली. पण, या गोष्टीचे आपल्याला नवल वाटायला नको. कारण, “जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे,” असे ख्रिस्ती प्रेषित पौलाने आधीच म्हटले होते.—१ करिंथकर ७:३१.

होय, बदल हा मानवी समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. ही गोष्ट सहसा मनुष्याचे आचारविचार आणि सामाजिक शिष्टाचार यांत आजवर झालेल्या लक्षणीय बदलांमधून दिसून येते. ख्रिश्‍चनांनी ‘जगाचे भाग असू नये’ अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. याचा अर्थ, देवाकडे पाठ फिरवणाऱ्‍या मानव समाजापासून ते स्वतःला अलिप्त ठेवतात. पण, ख्रिस्ती लोक “जगात आहेत” असेही बायबल म्हणते. तसेच, ख्रिश्‍चनांनी अलिप्तवादी असावे किंवा वैराग्यांसारखे जीवन जगावे असे बायबल म्हणत नाही. त्यामुळे, लोकप्रिय प्रथांविषयी एक माफक दृष्टिकोन बाळगणे अत्यंत जरूरीचे आहे.—योहान १७:११, १४-१६; २ करिंथकर ६:१४-१७; इफिसकर ४:१७-१९; २ पेत्र २:२०.

प्रथा म्हणजे नेमके काय?

मानवी जीवनाशी निगडित असलेल्या आणि ठराविक ठिकाणी किंवा समाजाच्या विशिष्ट वर्गात सर्रासपणे पाळल्या जाणाऱ्‍या चालीरिती म्हणजेच प्रथा. भोजनासंबंधित आचारनियम व शिष्टाचार यांसारख्या काही प्रथांचा उदय, चारचौघांमध्ये असताना एकमेकांसोबत सभ्यतेने आणि आदरभावाने वागता यावे म्हणून कसे बोलावे, कसे वागावे या उद्देशाने झाला असावा. अशा प्रसंगी, सामाजिक शिष्टाचारांची तुलना गाडीच्या चाकांना वंगन करणाऱ्‍या ऑइलसोबत केली जाते ज्यामुळे मानवी नात्यांची चाके कोणत्याही आवाजाविना अगदी सुरळीतपणे फिरू शकतात.

प्रथांवर नेहमीच धर्माचा जबरदस्त पगडा असल्याचे दिसते. किंबहुना, आजच्या अनेकानेक प्रथांचा जन्म अंधश्रद्धेतून आणि बायबलवर आधारित नसलेल्या धार्मिक कल्पनांतून झाला आहे. उदाहरणार्थ, मृत्यूमुळे शोकाकूल झालेल्या व्यक्‍तीला फुले देण्याच्या प्रथेची मुळे धार्मिक अंधश्रद्धेत सापडतात. * याशिवाय, निळा रंग (ज्याचा संबंध सहसा लहान मुलांशी लावला जातो) पिशाच्च्यांना पळवून लावतो असे मानले जायचे. त्याचप्रमाणे, कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मस्कारा लावला जायचा; तर पिशाच्च्यांनी तोंडावाटे प्रवेश करून आपल्याला झपाटू नये म्हणून स्त्रिया लिपस्टिकचा वापर करू लागल्या. इतकेच काय, जांभई देताना तोंडावर हात ठेवण्याच्या अबाधक प्रथेचा उगम देखील एखाद्याचा आत्मा उघडलेल्या तोंडातून बाहेर पडतो या कल्पनेतून झाला असावा. कालांतराने मात्र अशा प्रथांच्या धार्मिक गर्भितार्थाचा लोप होऊन आज त्यांना कोणतेही धार्मिक महत्त्व राहिलेले नाही.

या बाबतीत ख्रिश्‍चनांनी काय लक्षात ठेवावे?

एखादी प्रथा पाळावी की नाही हे ठरवताना खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी आधी सदर बाबीविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे हे बायबलमधून पडताळून पाहावे. प्राचीन काळी, समाजाच्या काही थरांमधून सर्रास पाळल्या जाणाऱ्‍या विशिष्ट प्रथांसंबंधी देवाने नापसंती दर्शवली होती. उदाहरणार्थ, बालकांचे अर्पण, रक्‍ताचा गैरवापर आणि इतर अनेक लैंगिक प्रघात यहोवाने तुच्छ मानले होते. (लेवीय १७:१३, १४; १८:१-३०; अनुवाद १८:१०) आजही अशा काही प्रथा सर्रासपणे पाळल्या जातात ज्या बायबल सिद्धान्ताच्या एकवाक्यतेत नाहीत. यात बायबलवर आधारित नसलेल्या रूढी-परंपरांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, ख्रिसमस आणि इस्टरसारख्या धार्मिक सुट्ट्यांशी संबंध असलेल्या प्रथा तसेच भूतविद्येशी संबंध असलेल्या अंधश्रद्धा.

पण, एकेकाळी आक्षेपार्ह असणाऱ्‍या चालीरितींशी संबंधित असलेल्या परंतु सध्या सामाजिक शिष्टाचारात जमा झालेल्या प्रथांविषयी काय? उदाहरणार्थ, विवाहाच्या वेळी एकमेकांना अंगठ्या घालणे आणि केक कापणे अशा अनेक प्रथांचा उदय कदाचित मूर्तिपूजक धर्मांतून झाला असावा. मग, ख्रिश्‍चनांनी या प्रथा पाळणे चुकीचे आहे का? तसेच, समाजातल्या हरएक प्रथेची मुळे अशास्त्रीय तर नाहीत ना याचे ख्रिश्‍चनांनी काटेकोर परीक्षण करून पाहावे का?

पौल म्हणतो: “जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.” (२ करिंथकर ३:१७; याकोब १:२५) परमेश्‍वराची अशी इच्छा आहे, की आपण या मोकळेपणाचा किंवा स्वातंत्र्याचा उपयोग आपल्या स्वार्थी अभिलाषा तृप्त करण्यासाठी नव्हे तर बऱ्‍यावाईटातील फरक करता यावा म्हणून आपल्या समजबुद्धीला प्रशिक्षित करण्यासाठी करावा. (गलतीकर ५:१३; इब्री लोकांस ५:१४; १ पेत्र २:१६) यास्तव, एखादी प्रथा पाळल्यामुळे बायबलच्या सिद्धान्तांचे उल्लंघन होत नसल्यास याबाबतीत यहोवाचे साक्षीदार कोणतेही कडक किंवा बंधनकारक नियम बनवत नाहीत. चालू परिस्थितीचा आढावा घेऊन ज्याने त्याने आपला निर्णय घ्यावा.

इतरांचे हित पाहावे

याचा अर्थ, एखादी प्रथा पाळल्यामुळे बायबलच्या शिकवणुकींचे अथवा बायबलच्या सिद्धान्तांचे प्रत्यक्षपणे उल्लंघन होत नसेल तर ती प्रथा पाळणे नेहमीच योग्य असेल का? नाही. (गलतीकर ५:१३) कारण ख्रिश्‍चनांनी केवळ स्वतःचे नव्हे तर “पुष्कळ जणांचे हित” पाहावे असे पौल म्हणतो. ख्रिश्‍चनांनी ‘सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करावे’ आणि कोणासाठीही अडखळण होऊ नये. (१ करिंथकर १०:३१-३३) तेव्हा, एखाद्या व्यक्‍तीला देवाची कृपापसंती हवी असल्यास तिने स्वतःला असे विचारावे: ‘या प्रथेसंबंधी इतर लोकांचे मत काय आहे? समाजाच्या दृष्टीने ही प्रथा आक्षेपार्ह आहे का? आणि मी जर ही प्रथा पाळली तर त्यामुळे मी देवाला नाखूष करणाऱ्‍या कृत्यांच्या किंवा कल्पनांच्या एकमतात आहे असे इतरांना वाटेल का?’—१ करिंथकर ९:१९, २३; १०:२३, २४.

काही प्रथा वरवर अनापायकारक वाटत असल्या तरी काही ठिकाणी त्यांचे पालन अशा पद्धतीने केले जाते ज्यामुळे बायबल सिद्धान्तांचा विरोध होतो. उदाहरणार्थ, विशिष्ट प्रसंगी फुले देण्याचा बायबलच्या शिकवणुकींच्या विरोधात असलेला काही गर्भितार्थ असेल. मग, ख्रिश्‍चनांनी कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी? एखाद्या विशिष्ट प्रथेचा मूळ उगम काय हे जाणून घेणे उचित असले तरी काही वेळा आपण सध्या जिथे राहतो तिथल्या लोकांसाठी या प्रथेचा विशिष्ट प्रसंगी काय अर्थ होतो हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. एखाद्या प्रथेचा वर्षाच्या विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट परिस्थितींत नकारात्मक किंवा अशास्त्रीय अर्थ होत असेल तर ख्रिश्‍चनांनी ती प्रथा न पाळणे सगळ्यात उत्तम.

पौलाने प्रार्थना केली, की ख्रिश्‍चनांची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोतर वाढावी. लोकप्रिय प्रथांसंबंधी एक माफक दृष्टिकोन राखल्यास ख्रिस्ती लोक ‘जे श्रेष्ठ [महत्त्वाचे] ते पसंत करतात जेणेकरून ख्रिस्ताच्या दिवसासाठी ते निर्मळ व निर्दोष राहतील.’ (फिलिप्पैकर १:९, १०) आणि त्याचवेळी ‘त्यांचा समजूतदारपणा प्रत्येकाला दिसून येईल.’—फिलिप्पैकर ४:५; सुबोध भाषांतर.

[तळटीपा]

^ काही मानववंशशास्त्रज्ञांच्या मते एकेकाळी, मेलेल्या व्यक्‍तीच्या आत्म्याने कोणाला झपाटू नये म्हणून त्या मृत व्यक्‍तीला फुले वाहिली जात असत.

[२६ पानांवरील चित्रे]

जांभई देताना तोंडावर हात ठेवणे किंवा शोकाकुल व्यक्‍तीला फुले देणे यांचा मूळ गर्भितार्थ आता नाहीसा झाला आहे