व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विदेशी भाषा तुम्हाला शिकायची आहे का?

विदेशी भाषा तुम्हाला शिकायची आहे का?

विदेशी भाषा तुम्हाला शिकायची आहे का?

ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

“बोलणं सोपं आहे पण करणं महाकठीण!” विदेशी भाषा शिकण्याविषयी पुष्कळजणांना असेच वाटते; खासकरून त्यांनी विदेशी भाषा शिकायचा प्रयत्न केला असेल तर. विदेशी भाषा शिकणे म्हणजे एक आव्हान आहे. पण, ज्यांना यश मिळाले आहे त्यांच्या मते त्यांच्या प्रयत्नांचे चीज होते.

नवीन भाषा शिकण्याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, ॲन्ड्रूला फ्रान्समध्ये सुटी घालवायची होती आणि तिथल्या लोकांशी त्याला त्यांच्याच भाषेत संभाषण साधायचे होते. ग्वीडो तसा इटालियन आहे पण त्याचा जन्म मात्र इंग्लंडमध्ये झाला. तो म्हणतो, “मला फक्‍त इटालियन बोलीभाषा ठाऊक होती म्हणून मला शुद्ध इटालियन नेमकी कशी बोलतात ते शिकून घ्यायचं होतं.” जॉनथनचा भाऊ अलीकडेच एका दुसऱ्‍या देशी राहायला गेला आणि तिथं त्याचं एका स्पॅनिश मुलीशी लग्न झालं. जॉनथन म्हणतो की, “माझ्या भावाच्या घरी गेल्यावर मला माझ्या नवीन नातेवाईकांबरोबर त्यांच्याच भाषेत बोलायचं होतं.”

पण एवढेच फायदे नाहीत; विदेशी भाषा शिकण्याचे इतरही फायदे असू शकतात. ल्वीझ म्हणते, “त्यामुळे मी सहानुभूती दाखवायला शिकले. आता मला कळतं की, विदेशी लोक जेव्हा परक्या देशामध्ये जातात तेव्हा त्यांची काय अवस्था होते.” नवीन भाषा शिकल्यामुळे पमेलाला व्यक्‍तिगत फायदा झाला. इंग्लंडमध्ये लहानाची मोठी झाल्यामुळे तिला तिची मातृभाषा अर्थात चीनी भाषा नीट ठाऊक नव्हती. त्यामुळे पमेला आणि तिच्या आईमध्ये एकप्रकारचा दुरावा निर्माण झाला. पमेला म्हणते, “आम्ही एकमेकींशी जास्त बोलत नव्हतो. पण आता मला चीनी भाषा बोलता येत असल्यामुळं आमच्यामधला दुरावा नाहीसा होऊन आम्ही एकमेकींच्या जवळ आलो आहोत.”

यशस्वी होण्यासाठी

विदेशी भाषा पूर्णतः शिकून घेण्यास कशाची गरज आहे? ज्यांनी यात यश मिळवले आहे त्यांच्या काही टिप्पणी येथे दिल्या आहेत:

प्रेरणा. शिकण्यामागे एक प्रेरणा किंवा कारण असणे फार महत्त्वाचे आहे. जे फार उत्साही असतात ते सहसा लवकर शिकतात.

नम्रता. स्वतःकडून जास्त अपेक्षा करू नका—सुरवातीला चुका तर होणारच. एल्सन म्हणते, “लोक तुमच्यावर हसणार आहेत हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हीही त्यांच्यासोबत हसा!” वॅलरीसुद्धा म्हणते की, “आपली स्थिती, चालायला शिकणाऱ्‍या लहान बाळासारखीच असते. पुष्कळदा आपण खाली पडतो, पण म्हणून हार मानायची नसते; उठायचं आणि पुन्हा प्रयत्न करायचा.”

धीर धरा. “पहिली दोन वर्षं मला फार कठीण गेलं; वाटलं की, हे काही जमण्यासारखं नाही तेव्हा उगाच प्रयत्न कशाला करावा,” असे डेव्हिड कबूल करतो. पण तो पुढे म्हणतो, “हळूहळू जमतं!” जिललाही असेच वाटते. ती म्हणते, “मागं वळून पाहिल्याशिवाय आपण किती पुढे गेलोय ते लक्षात येतच नाही.”

सराव. नियमित सराव केला तर अस्खलितपणे बोलता येते. काही मिनिटे का होईना पण दररोज सराव करायचा प्रयत्न करा. एका पाठ्यपुस्तकात म्हटले आहे की, “‘खूप परंतु क्वचितच’ सराव करण्याऐवजी ‘थोडासाच परंतु नियमित’ सराव केलेला बरा.”

सहायक साधने

तर मग, विदेशी भाषा शिकायचे आव्हान तुम्ही स्वीकारायला तयार आहात का? असल्यास, पुढील गोष्टी तुम्हाला प्रगती करण्यास सहायक ठरू शकतील.

शब्दांचे कार्ड. या कार्डांवर समोरच्या बाजूला शब्द किंवा वाक्यांश असतो आणि मागच्या बाजूला त्याचा अनुवाद. तुमच्या ठिकाणी असे तयार कार्ड मिळत नसतील तर फाईलचा पुठ्ठा वापरून तुम्ही स्वतः असे कार्ड बनवू शकता.

ऑडिओ किंवा व्हिडिओ कॅसेट. या कॅसेट्‌सच्या साहाय्याने तुम्हाला एखाद्या भाषेमधला योग्य उच्चार, व्याकरण हे सर्व कळेल. उदाहरणार्थ, डेव्हिड आपल्या कारमध्ये पर्यटकांसाठी असलेल्या शब्दावली पुस्तकाची कॅसेट वारंवार ऐकून जपानी भाषेच्या मूलभूत गोष्टी शिकला.

इंटरॲक्टिव्ह कम्प्युटर प्रोग्राम. अशा काही प्रोग्राम्समध्ये तुम्ही स्वतःचा आवाज रेकॉर्ड करू शकता आणि ती भाषा ज्यांची मातृभाषा आहे त्यांच्या उच्चाराशी त्याची तुलना करू शकता.

रेडिओ आणि टीव्ही. तुम्ही शिकत असलेल्या भाषेसंबंधी काही कार्यक्रम तुमच्या भागातल्या रेडिओ किंवा टीव्हीवर प्रसारित केले जात असल्यास ते कार्यक्रम ऐकून तुम्हाला किती कळते ते पाहात जा.

पत्रिका आणि पुस्तके. नवीन भाषेमधील साहित्य वाचायचा प्रयत्न करा आणि असे साहित्य निवडा जे जास्त कठीणही नाही किंवा एकदमच सोपेही नाही. *

भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी

अर्थात, शिकत असलेल्या नवीन भाषेत पुढे तुम्हाला इतरांशी बोलावे लागेलच. यासाठी तुम्हाला दुसऱ्‍या एखाद्या देशात जाण्याची गरज नाही. त्याऐवजी, तुमच्या स्वतःच्या देशातल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या विदेशी भाषेतल्या मंडळीला तुम्ही उपस्थित राहू शकता.

नवीन भाषा बोलताना तुमच्या मातृभाषेतले शब्द आणि वाक्यांश केवळ अनुवादित करून बोलू नका तर नवीन भाषेमध्ये विचार करायचा प्रयत्न करा. शिकत असलेल्या भाषेच्या लोकांच्या परंपरा आणि आचारविचार जाणून घेतल्यानेही तुम्हाला फायदा होऊ शकतो. “एखादी भाषा खरोखर शिकून घ्यायची असेल तर ती भाषा ज्या संस्कृतीमधली आहे त्या संस्कृतीचे रीतीरिवाज आणि मूल्ये जाणून घेणे फार आवश्‍यक आहे,” असे भाषा तज्ज्ञ रॉबर्ट लेडो म्हणतात.

शेवटचा एक सल्ला: तुम्हाला नवीन भाषा शिकायला फार वेळ लागत असल्यास निराश होऊ नका. कारण भाषा शिकण्याची क्रिया कधीच संपत नसते. २० वर्षांआधी मूकबधिरांची भाषा शिकलेली जिल म्हणते की, “मी आजही शिकत आहे, कारण भाषा प्रवाही असते. प्रत्येक वेळी भाषेमध्ये कितीतरी बदल होत राहतात.”

मग तुम्हालाही विदेशी भाषा शिकायची आहे का? असल्यास, एक मोठे आव्हान स्वीकारायला तयार व्हा; पण तुमचा हा प्रयत्न फार प्रतिफळदायी ठरेल हेही तितकेच खरे.

[तळटीपा]

^ सावध राहा! ही पत्रिका सध्या ८३ भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्या सोबतचे टेहळणी बुरूज नियतकालिक १३२ भाषांमध्ये छापले जाते. अनेकांना एखादी नवीन भाषा शिकताना या पत्रिकांमधली स्पष्ट लेखनपद्धती उपयोगी पडली आहे.

[१२, १३ पानांवरील चित्रे]

तुमचा शब्दसंग्रह वाढवायचा असल्यास . . .

. . . तुमची मातृभाषा आणि तुम्ही शिकत असलेली भाषा यांच्यात तुलना करा