व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आत्महत्या—साथीचा अदृश्‍य रोग

आत्महत्या—साथीचा अदृश्‍य रोग

आत्महत्यासाथीचा अदृश्‍य रोग

जॉन आणि मेरी. * पन्‍नाशीच्या घरात असलेले हे जोडपे. संयुक्‍त संस्थानांतील एका गावात, आपल्या लहानशा घरात कसेबसे दिवस कंठत आहेत. जॉनला एम्फायसीम्याचा (फुप्फुसांचा) आणि हृदय विकाराचा असाध्य रोग जडल्यामुळे त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आपला पती जॉन याच्या शिवाय जीवन जगण्याची कल्पनाच मेरी करू शकत नाही. एक एक श्‍वास घेण्याच्या प्रयत्नात जॉनची होणारी जर्जर अवस्था तिला आता पाहवत नाही. पण, मेरी स्वतः ठणठणीत आहे असेही नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून ती सुद्धा मानसिक औदासिन्याच्या आजाराने त्रस्त आहे. आणि अलीकडे ती बरेचदा आत्महत्येविषयी बोलत आहे. त्यामुळे जॉनला तिची फार काळजी वाटू लागली आहे. औदासिन्यामुळे आणि सतराशेसाठ औषधोपचारांमुळे तिचे मानसिक स्वास्थ्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. ती म्हणते: “जॉनशिवाय जगण्याची कल्पनाच मला करवत नाही.”

जॉन आणि मेरीच्या घरात पाहावे तिथे औषधेच औषधे. कुठे हृदय विकारावरच्या गोळ्या तर कुठे अन्टिडिप्रेझन्ट, ट्रँक्विलायझर अशी असंख्य गोळ्या-औषधे घरभर पसरलेली दिसतात. एकदा मेरी पहाटेच उठून किचनमध्ये जाते आणि एका पाठोपाठ एक, भराभर गोळ्या खाऊ लागते. तेवढ्यात जॉन तेथे पोहंचतो आणि तिच्याकडच्या गोळ्या हिसकावून घेतो. पण, तोपर्यंत मेरीने बऱ्‍याच गोळ्या खाललेल्या असतात. तिला काही मदत करेपर्यंत ती कोमात गेलेली असते. मेरीचे काही बरेवाईट होऊ नये अशी मनोमन जॉन प्रार्थना करत असतो.

आकडेवारी काय सांगते

अलीकडच्या काळात, तरुणांमधील आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणावर प्रसार माध्यमांनी पुष्कळ माहिती प्रसारित केली आहे. आणि त्यात वावगे असे काहीच नाही. उसळत्या रक्‍ताच्या वयातील होतकरू तरुणांचा अशाप्रकारे अकालिक मृत्यू होणे यापेक्षा मोठी शोकान्तिका आणखी कोणती असू शकते? पण, त्याच वेळी अनेक देशांत वृद्धांमधील आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. अशी बातमी वृत्तपत्रांत कोपऱ्‍यात कुठेतरी छापून येते. सर्वत्र हेच चित्र आज पाहायला मिळते. मग एखाद्या देशातले आत्महत्येचे एकंदर प्रमाण जास्त असो अगर कमी असो. (आधीच्या पानावर दिलेली चौकट पाहा.) साथीच्या या अदृश्‍य रोगाने विश्‍व पातळीवर कोणते रूप धारण केले आहे हे देखील चौकटीत दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.

सन १९९६ मध्ये यु.एस. सेंटर्स फॉर डिसीज कन्ट्रोल या संघटनेने दिलेल्या अहवालानुसार १९८० सालापासून, वयाची पासष्टी ओलांडलेल्या अमेरिकन लोकांमधील आत्महत्येचे प्रमाण एकाएकी ३६ टक्क्यांवर गेले आहे. काही अंशी, अमेरिकेत वृद्धांच्या संख्येत झालेली वाढ यास कारणीभूत असावी. वयाची पासष्टी ओलांडलेल्या लोकांमधील आत्महत्येचे प्रमाण ४० वर्षांच्या काळात पहिल्यांदाच १९९६ साली ९ टक्क्यांनी वाढले. अमेरिकेच्या बऱ्‍याच वृद्धांचा खाली पडल्यामुळे आणि मोटारगाड्यांच्या अपघातांमुळे सर्वाधिक प्रमाणात मृत्यू होत असला तरी वास्तवात हे धक्कादायक प्रमाणही काहीच नाही असे वाटते. अ हॅन्डबुक फॉर द स्टडी ऑफ सुइसाइड यात म्हटल्याप्रमाणे, “बरेचदा व्यक्‍तीने आत्महत्या केली असली तरी मृत्युपत्रात मात्र मृत्यूचे वेगळेच कारण दाखवलेले असते. त्यामुळे मृत्युपत्रांवरून संकलित केलेली आत्महत्येची आकडेवारी दिशाभूल करणारी असते.” काहींच्या मते, आत्महत्येचे खरे प्रमाण, दिलेल्या आकडेवारीच्या दुप्पट असू शकते असेही सदर पुस्तिकेने म्हटले.

याचा परिणाम व्हायचा तोच झाला आहे. इतर अनेक देशांप्रमाणेच आज अमेरिकासुद्धा वृद्धांमधील आत्महत्येच्या अदृश्‍य रोगाने ग्रासली आहे. सदर विषयावरील एक तज्ज्ञ डॉ. हर्बर्ट हेन्डिन म्हणतात: “अमेरिकेत खासकरून वयोमानानुसार आत्महत्येचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत असले तरी वृद्धांच्या आत्महत्येसंबंधी हवी तितकी जनजागृती झालेली दिसून येत नाही.” याचे कारण वृद्धांमधील आत्महत्येचे प्रमाण काही कालपरवा वाढलेले नाही; आधीपासूनच अनेक वृद्ध मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत होते. त्यामुळे “युवकांमधील आत्महत्येच्या आकस्मिक वाढीमुळे लोकांमध्ये खळबळ माजली तशी वृद्धांमधील आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणामुळे माजत नाही,” असे डॉ. हर्बर्ट हेन्डिन यांचे म्हणणे आहे.

कमालीची दक्षता

वृद्धांमधील आत्महत्येची ही आकडेवारी धक्केदायक असली तरी त्या संख्यांआड लपलेल्या भावभावना लोकांच्या लक्षात येत नाहीत. उदाहरणार्थ, प्रिय विवाह सोबत्याविना जीवनात येणारा भकासपणा, परावलंबी जीवनाच्या कल्पनेने येणारे वैफल्य, लवकर बरे न होणारे दुखणे, तीव्र औदासिन्यामुळे येणारे रितेपण, एखादा जिवघेणा रोग जडल्यामुळे होणारी वैफल्यग्रस्त अवस्था या सर्व गोष्टी आत्महत्येच्या आकडेवारीतून दिसत नाहीत. दुसरे म्हणजे, तरुण लोक आपल्या क्षणभंगुर समस्यांपासून पळ काढण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता तडकाफडकी आत्महत्येचा मार्ग पत्करतात; तर वयोवृद्ध लोक सहनशक्‍तीचा अंत पाहणाऱ्‍या आणि त्यांच्या मते कधीही न सुटणाऱ्‍या समस्यांना विटून शेवटला पर्याय म्हणून आत्महत्येचा मार्ग पत्करतात ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. तरुणांपेक्षा वृद्ध लोक अधिक विचारपूर्वक, निश्‍चयपूर्वक आणि विलक्षण दक्षता बाळगून आत्महत्या करण्याकडे वळत असल्यामुळे सहसा त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न फसत नाही.

सूइसाइड इन अमेरिका या आपल्या पुस्तकात डॉ. हेन्डिन यांनी म्हटले: “तरुणांच्या तुलनेत वृद्धांमधील आत्महत्येचे प्रमाण जास्त तर आहेच; पण, या आत्मघातकी कृत्यावरून तरुण आणि वृद्ध यांच्यातील काही उल्लेखनीय फरकही प्रकाशात येतो. उदाहरणार्थ, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्‍यांच्या तुलनेत आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी ठरणाऱ्‍यांचे प्रमाण वृद्धांमध्ये विशेष आढळून येते. एकंदर लोकसंख्येतील दर दहा आत्महत्येच्या प्रयत्नांपैकी फक्‍त एक यशस्वी ठरतो; १५ ते २४ वयोगटांतल्या तरुणांमध्ये आत्महत्येच्या १०० प्रयत्नांपैकी एक प्रयत्न यशस्वी ठरतो; तर वयाची ५५ वर्षे ओलांडलेल्या व्यक्‍तींमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्‍यांचा जवळजवळ प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरतो.”

ही आकडेवारी खरोखरच विचार करायला लावणारी आहे. वृद्ध होणे, कमजोर होणे, थकून जाणे आणि आजारपण वाट्याला येणे या सर्व गोष्टी किती निराशाजनक आहेत! लोक काही उगाच आत्महत्येचा मार्ग पत्करत नाहीत. पण, आयुष्यातील वाईटातल्या वाईट परिस्थितीतही आपल्या मौल्यवान जीवनाचे आपल्याला चीज करता येणार नाही का? सदर लेखाच्या सुरवातीला उल्लेखिलेल्या मेरीचे नंतर काय झाले याविषयी पुढील लेखात वाचा.

[तळटीपा]

^ नावे बदललेली आहेत.

[३ पानांवरील तक्‍ता]

प्रतिलक्ष लोकसंख्या, वय आणि लिंग यांनुसार आत्महत्येचे प्रमाण

१५ ते २४ वयोगटातील ७५ आणि अधिक वर्षे वयोगटातील

पुरुष/स्त्रिया देश पुरुष/स्त्रिया

८.०/२.५ अर्जेन्टिना ५५.४/८.३

४.०/०.८ ग्रीस १७.४ /१.६

१९.२/३.८ हंगेरी १६८.९/६०.०

१०.१/४.४ जपान ५१.८/३७.०

७.६/२.० मेक्सिको १८.८ /१.०

५३.७/९.८ रशिया ९३.९/३४.८

२३.४/३.७ संयुक्‍त संस्थाने ५०.७/५.६