व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपासनेचे स्वातंत्र्य रशियन लोकांसाठी बहुमोल

उपासनेचे स्वातंत्र्य रशियन लोकांसाठी बहुमोल

उपासनेचे स्वातंत्र्य रशियन लोकांसाठी बहुमोल

सोव्हिएत युनियन १९९१ साली विसर्जित केल्यानंतर तेथील लोकांना उपासनेचे अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे. दुसऱ्‍या देशात स्थलांतर केलेल्या लोकांनाही असे स्वातंत्र्य लाभले.

भूतपूर्व सोव्हिएत युनियनमध्ये राहणाऱ्‍या अनेकांना एकत्र येऊन देवाची उपासना करण्याचे स्वातंत्र मिळाले तेव्हा त्यांना झालेल्या आनंदाची कल्पना करता येणार नाही, कारण कित्येक दशकांपासून ते यासाठी थांबून राहिले होते.

सन १९१७ मध्ये झालेल्या बोल्शेव्हिक क्रांतीनंतर रशियामध्ये बायबल वाचणे धोक्याचे बनले होते; फारच कमी लोक अशी जोखीम पत्करून बायबल वाचायचे. यहोवाचे साक्षीदार मात्र याला अपवाद होते. न्यूझवीक पत्रिकेने एप्रिल १६, १९५६ च्या अंकात (जवळजवळ ४४ वर्षांआधी) पूर्व जर्मनीतल्या एका युवकाचे शब्द उद्धृत केले होते; त्याने असे म्हटले की, “यहोवाच्या साक्षीदारांशिवाय दुसरे कोणीही बायबल वाचत नाही.” साक्षीदार बायबलवर आधारित अभ्यासाच्या सभा भरवत होते आणि बायबलच्या संदेशाचा प्रचार करत होते म्हणून त्यांना तुरुंगांमध्ये आणि मजुरीच्या छावण्यांमध्ये पाठवले जायचे. ते कोठेही गेले तरी बायबलमध्ये दिलेली आशा हेच त्यांच्या बोलण्याचे केंद्रस्थान होते; शेजारच्या पेटीत हेच दाखवले आहे.

सोव्हिएत युनियन १९९१ मध्ये विसर्जित होऊ लागले तेव्हा तेथील साक्षीदारांनी बायबल आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम सादर करणारी सात अधिवेशने भरवली. एकंदर ७४,२५२ लोक या अधिवेशनांसाठी उपस्थित राहिले होते. १९९३ साली म्हणजे दोनच वर्षांनंतर, सोव्हिएत युनियनच्या १५ पैकी ४ भूतपूर्व प्रजासत्ताक राज्यांमध्ये भरवलेल्या अशाच आठ अधिवेशनांसाठी १,१२,३२६ लोक उपस्थित राहिले होते. * यांपैकी अनेकांनी कित्येक वर्षे सोव्हिएतच्या तुरुंगांमध्ये आणि मजुरीच्या छावण्यांमध्ये काढली होती. या विश्‍वासू ख्रिश्‍चनांना आता देवाची उपासना करण्यामध्ये कोणताही अडथळा नव्हता, त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल ते कृतज्ञ होते.

सन १९९३ पासून, भूतपूर्व सोव्हिएत प्रजासत्ताक राज्यांमधील लोक आपापल्या मायदेशांमध्ये मोकळेपणाने ख्रिस्ती सभा भरवू शकत असल्यामुळे त्यांना अत्यानंद झाला आहे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी भूतपूर्व सोव्हिएत प्रजासत्ताकच्या राज्यांमध्ये एकूण ८० “देवाचे भविष्यसूचक वचन” प्रांतीय अधिवेशने भरवण्यात आली होती; तेथे एकूण २,८२,३३३ यहोवाचे साक्षीदार आणि त्यांची मित्रमंडळी उपासना करण्यासाठी एकत्र जमली होती. आणि १३,४५२ जणांनी बाप्तिस्मा घेतला.

गेल्या वर्षी जगातील इतर देशांमध्ये देखील रशियन भाषेतली अधिवेशने भरवली होती, हे खरोखरच आश्‍चर्याचे आहे. भूतपूर्व सोव्हिएत युनियनच्या बाहेरच्या देशांमध्ये भरवण्यात आलेल्या अशा चार अधिवेशनांकरता एकूण ६,३३६ लोक उपस्थित होते. ही अधिवेशने कोठे भरवण्यात आली होती? शिवाय, रशियन भाषा बोलणाऱ्‍या इतक्या लोकांना बायबलबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता का आहे? पहिल्यांदा आपण हे पाहू या की त्यांना इतकी उत्सुकता का आहे.

आध्यात्मिक गरजेची जाणीव

रशियाचा धार्मिक इतिहास समृद्ध आहे. कित्येक शतकांआधी बांधलेले तिथले दिमाखदार चर्च ख्रिस्ती धर्मजगतातल्या सर्वात सुप्रसिद्ध चर्चपैकी आहेत. तरीही, रोमन कॅथलिक चर्चप्रमाणेच रशियन ऑर्थोडॉक्स चर्चने देखील बायबलसंबंधी लोकांना अज्ञानातच ठेवले आहे.

द रशियन ट्रॅजेडी—द बर्डन ऑफ हिस्ट्री हे अलीकडील पुस्तक म्हणते, “रशियन कर्मठवादी ख्रिस्ती धर्मात बायबलला प्रमुख स्थान कधीच देण्यात आले नव्हते.” धार्मिक विषयावरील रशियन विद्वान, सिरग्ये इव्हानयेन्क यांच्या मते, “कर्मठवादी धर्माच्या अनुयायांना बायबलबद्दल फारसे ज्ञान नसल्यामुळे बाहेरच्या लोकांपेक्षा पुष्कळ चर्चचे सदस्यच अंधविश्‍वास, गूढवाद आणि जादूटोणा यांच्या सहजगत्या प्रभावात येतात.”

सुप्रसिद्ध रशियन लेखक टॉलस्टॉय यानेही असेच निरीक्षण केले होते. त्याने लिहिले: “[रशियन कर्मठवादी] चर्चची शिकवण म्हणजे सिद्धान्तात एक चलाख व हानीकारक फसवणूक होती आणि व्यवहारात सर्वात गंभीर अंधविश्‍वास आणि जादूगिरीचा संग्रह होता; तिने ख्रिस्ती शिकवणुकीचा संपूर्ण अर्थच कोणाला समजू दिला नाही.”

हीच परिस्थिती, नास्तिकवादाचा प्रसार आणि “धर्म लोकांसाठी अफू आहे” हे सुप्रसिद्ध घोषवाक्य असलेल्या सोव्हिएत कम्युनिस्टवादाच्या उदयाला सुपीक जमीन ठरली. तथापि, कम्युनिस्टवाद स्वतःच एक धर्म बनला; सहसा त्याला लाल धर्म असे संबोधले जात होते. परंतु, हा लाल धर्म फार काळ टिकला नाही. १९९१ साली सोव्हिएत राज्य कोसळले तेव्हा लोक गडबडून गेले; त्यांना काय करावे हे कळत नव्हते. यहोवाच्या साक्षीदारांनी उत्तेजन दिल्यामुळे, हजारो रशियन लोक मग बायबलमध्ये शोध घेऊ लागले.

रशियाची शिक्षण व्यवस्था फारच उत्तम असल्यामुळे तिथले लोक जगातले सर्वात सुशिक्षित लोक होते. त्यामुळे पुष्कळांनी बायबल वाचायला सुरूवात केली आणि त्यांना त्यातल्या शिकवणुकीही आवडू लागल्या. त्याच वेळी, खासकरून १९९० च्या दशकात, भूतपूर्व सोव्हिएत युनियनमधले कोट्यवधी लोक जर्मनी, ग्रीस आणि संयुक्‍त संस्थाने यांसारख्या इतर देशांमध्ये राहायला गेले. त्याचा काय परिणाम झाला?

जर्मनीत उपासनेचे स्वातंत्र्य

अनेक जर्मन लोकांनी १८ व्या आणि १९ व्या शतकात रशियात स्थलांतर केले होते. १५ वर्षांच्या सोफीची एक प्रसिद्ध कहाणी आहे; १७६२ साली ती तिच्या पतीनंतर रशियाची शासक बनली. सोफीचे (नंतर तिला थोर कॅथरीन असे नाव पडले) शासन अनेक वर्षांपर्यंत टिकले; त्या दरम्यान तिने जर्मन शेतकऱ्‍यांना रशियामध्ये राहायला आमंत्रण दिले. त्यानंतर, दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर हल्ला चढवला तेव्हा सर्व जर्मन लोकांना सायबेरियात त्याचप्रमाणे कझाकस्तान, किरगीझस्तान आणि उझबेकिस्तान या सोव्हिएत प्रजासत्ताक राज्यांमध्ये पाठवण्यात आले. अलीकडेच, रशियन बोलणारे अनेक जर्मन त्याचप्रमाणे भूतपूर्व सोव्हिएत युनियनमधील इतरजण आपली आर्थिक उन्‍नती करण्यासाठी जर्मनीत स्थलांतरित झाले.

डिसेंबर १९९२ मध्ये जर्मनीत बर्लिन येथे सर्वात पहिली रशियन भाषेची मंडळी स्थापन झाली. गेल्या वर्षापर्यंत, जर्मनीत तीन रशियन भाषेचे विभाग तयार झाले होते; त्यात एकूण ५२ मंडळ्या आणि ४३ लहान गट होते. कलोन येथे जुलै ३० पासून ऑगस्ट १ पर्यंत भरवलेल्या रशियन भाषेतल्या “देवाचे भविष्यसूचक वचन” प्रांतीय अधिवेशनात ४,९२० लोकांची सर्वाधिक उपस्थिती होती; त्यात १६४ जणांनी यहोवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला. त्याआधी, एप्रिल १ रोजी जर्मनीतल्या रशियन भाषिक मंडळ्यांमध्ये येशूच्या मृत्यूचे स्मारक पाळण्यासाठी ६,१७५ लोक उपस्थित होते.

संयुक्‍त संस्थानांतील रशियन

भूतपूर्व सोव्हिएत युनियनमधून रशियन बोलणारे लोक संयुक्‍त संस्थानांमध्येही आले. न्यूयॉर्क टाईम्समध्ये असे वृत्त होते: “१९९१ आणि १९९६ सालांदरम्यान ब्रुकलिनमध्ये रशियनांचीच जास्तीत जास्त भरती होत होती. त्याच कालावधीत, इमिग्रेशन ॲण्ड नॅचरलायझेशन सर्व्हिसने भूतपूर्व सोव्हिएत युनियनमधून आलेल्या ३,३९,००० लोकांना संयुक्‍त संस्थानांत थारा दिला.”

नंतर, जानेवारी १९९९ च्या टाईम्स यात असे म्हटले होते की, त्या आधीच्या दशकात भूतपूर्व सोव्हिएत युनियनमधील सुमारे ४,००,००० यहुदी लोकांनी न्यूयॉर्क शहरात आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रात स्थलांतर केले. शिवाय, हल्लीच्याच वर्षांमध्ये कोट्यवधी रशियन लोकही संयुक्‍त संस्थानांतील इतर भागांमध्ये स्थलांतरित झाले होते. भूतपूर्व सोव्हिएत युनियनमधील लोकांनी संयुक्‍त संस्थानांतील ज्या शहरांमध्ये स्थलांतरण केले त्यांमध्ये न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलीझनंतर कॅलिफोर्नियाचा तिसरा क्रमांक लागतो. येथे जवळजवळ ३५,००० नवीन रशियन लोकांनी स्थलांतर केले आहे; येथील रशियन भाषा बोलणारे लोक बायबलचा अभ्यास करायला तयार झाले आहेत आणि त्यांच्यापैकी शेकडो लोक खऱ्‍या देवाचे अर्थात यहोवाचे उपासक बनले आहेत.

अलीकडील काळात, संयुक्‍त संस्थानांमध्ये ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे एप्रिल १, १९९४ रोजी, यहोवाच्या साक्षीदारांची रशियन भाषेतली पहिली मंडळी स्थापण्यात आली. त्यानंतर, पेन्सिल्व्हानिया, कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन या ठिकाणी देखील रशियन भाषेतल्या मंडळ्या स्थापन झाल्या. शिवाय, इतर अनेक भागांमध्ये रशियन भाषेतले अभ्यासाचे गट देखील तयार झाले.

संयुक्‍त संस्थानांतले पहिले अधिवेशन

मागच्या वर्षी, ऑगस्ट २० पासून २२ पर्यंत न्यूयॉर्क शहरात रशियन भाषेतले पहिलेच अधिवेशन भरवण्यात आले; त्यासाठी संयुक्‍त संस्थाने आणि कॅनडा येथून एकूण ६७० लोक उपस्थित होते. सगळी भाषणे रशियन भाषेत सादर करण्यात आली, त्याचप्रमाणे कॅलिफोर्निया, लॉस एंजेलीझ येथील रशियन मंडळीने याकोब आणि एसाव यांच्या बायबलमधील अहवालावर आधारित असलेले एक नाटकसुद्धा सादर केले. हे नाटक अधिवेशनातला सर्वात उल्लेखनीय भाग होता.

त्या अधिवेशनातली आणखी एक उल्लेखनीय गोष्ट होती १४ लोकांचा बाप्तिस्मा. या सर्वांचा फोटो बाजूला दिला आहे. न्यूयॉर्क शहरातल्या या अधिवेशनात बाप्तिस्मा घेण्यासाठी पुष्कळजण पोर्टलंड, ओरेगॉन, लॉस एंजेलीझ, सॅन फ्रॅन्सिस्को, कॅलिफोर्निया अशा ठिकाणांहून सुमारे ४,००० किलोमीटरचा प्रवास करून आले होते. हे १४ लोक आधी आर्मीनिया, आजरबाइजान, बेलारूस, मॉल्डोवा, रशिया आणि युक्रेन या भूतपूर्व सोव्हिएत प्रजासत्ताक राज्यांमध्ये राहत होते. त्यांच्या अनुभवांवरून त्यांना देवाच्या ज्ञानाचे आणि त्याची उपासना करायला मिळालेल्या स्वातंत्र्याचे किती मोल वाटते हे स्पष्ट होते.

स्वेटलाना (पहिली रांग, डावीकडून तिसरी) मॉस्कोत लहानाची मोठी झाली. १७ वर्षांची असताना तिचा विवाह तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा असलेल्या एका प्रसिद्ध गायकाबरोबर झाला. १९८९ मध्ये ते आपल्या लहान बाळाला घेऊन संयुक्‍त संस्थानांत आले. तिचा पती सतत फिरतीवर असायचा; पाच वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला.

स्वेटलानाची भेट तिच्यासोबत काम करणाऱ्‍या एका साक्षीदार बहिणीशी झाली, तेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला त्या बहिणीपासून जपून राहण्यास सांगितले. ती साक्षीदार बहीण “एका पंथाची सदस्य आहे आणि तो पंथ [तिला] आपल्या मुठीत ठेवेल आणि [तिचा] सगळा पैसा हडप करेल” असे त्या तिला म्हणाल्या. परंतु, स्वेटलानाला मात्र बायबल शिकायची फार उत्सुकता होती. बायबलमधून तिला देवाचे नाव दाखवल्यावर ती म्हणाली: ‘फक्‍त यहोवाचे साक्षीदारच देवाचे नाव लोकांना सांगतात हे पाहून मी फारच प्रभावित झाले.’

ॲन्ड्रे (शेवटली रांग, डावीकडून तिसरा) या तरुणाला ॲथलीट बनण्यासाठी प्रशिक्षण घ्यायचे होते. म्हणून तो सायबेरियाहून सध्याच्या सेंट पीटर्झबर्ग या ठिकाणी आला. त्यानंतर लगेचच सोव्हिएत युनियन विसर्जित झाले. मग १९९३ मध्ये ॲन्ड्रे संयुक्‍त संस्थानांत आला. त्या वेळी तो २२ वर्षांचा होता. तो म्हणतो: “मी देवाबद्दल विचार करू लागलो आणि रशियन ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये जाऊ लागलो. एकदा, रशियन ईस्टरचा सण असताना मी रात्रभर चर्चमध्येच राहिलो; देवाच्या निकट जायचा मी प्रयत्न करत होतो.”

या दरम्यान स्वेटलाना आणि ॲन्ड्रे यांची भेट झाली; स्वेटलानाने त्याला तिच्या बायबल अभ्यासाबद्दल सांगितले. तो तिच्यासोबत यहोवाच्या साक्षीदारांच्या एका सभेला यायला तयार झाला आणि त्यानंतर त्यानेसुद्धा बायबलचा अभ्यास सुरू केला. जानेवारी १९९९ मध्ये त्यांचे लग्न झाले. अधिवेशनात त्या दोघांचाही बाप्तिस्मा झाल्यावर ते फारच खूश दिसत होते.

पावईल (शेवटची रांग, डावीकडून चवथा) याचा जन्म कझाकस्तान येथील कारागांदा येथे झाला पण नंतर तो रशियात नालचिक येथे राहायला गेला. हे मोठे शहर चेचन्या आणि डागेस्तान या युद्धग्रस्त ठिकाणांपासून फार जवळ आहे. येथे पावईलला सर्वप्रथम ऑगस्ट १९९६ मध्ये यहोवाचे साक्षीदार भेटले. पण नंतरच्याच महिन्यात तो सॅन फ्रॅन्सिस्कोला राहायला गेला. तो मादक पदार्थांचे सेवन करायचा आणि त्याच्या प्रेयसीकडून त्याला एक मुलगीसुद्धा होती; पण त्या दोघी अद्याप रशियातच राहत होत्या.

संयुक्‍त संस्थानांत आल्या आल्या पावईलने यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधला आणि बायबलचा अभ्यास सुरू केला. त्याने सगळ्या वाईट सवयी सोडून दिल्या आणि आपल्या प्रेयसीला आपल्या नवीन विश्‍वासाबद्दल कळवले. ती सध्या साक्षीदारांशी अभ्यास करत आहे. दोघांनी लग्न करून आपल्या मुलीसोबत यहोवाची सेवा करावी या उद्देशाने तीसुद्धा संयुक्‍त संस्थानांत येण्याचा विचार करत आहे.

जॉर्ज (शेवटची रांग, डावीकडून दुसरा) याचा जन्म मॉस्कोत झाला आणि तेथेच त्याचे बालपण गेले. १९९६ साली तो संयुक्‍त संस्थानांत आला आणि त्यानंतरच्या वर्षी त्याने फ्लोराशी लग्न केले; ती मूळची आझरबाइजानची होती. जॉर्ज, रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचा सदस्य होता; परंतु टेहळणी बुरूजची एक प्रत वाचल्यावर त्रैक्यासंबंधित बरेच प्रश्‍न त्याच्या मनात आले. त्याने वॉच टावर संस्थेला पत्र लिहिले; त्यावर वॉच टावर संस्थेने त्याला तुम्ही त्रैक्य मानावे का? हे माहितीपत्रक पाठवले. १९९८ मध्ये ते दोघेही बायबलचा अभ्यास करू लागले. आता फ्लोरासुद्धा बाप्तिस्मा घेऊ इच्छित आहे.

मॉस्कोतल्या अधिवेशनातून मिळालेल्या शुभेच्छा ही आणखी एक उल्लेखनीय गोष्ट होती. मॉस्कोत त्याच सप्ताहांती १५,१०८ लोक उपस्थित होते. तेथे ६०० जणांचा बाप्तिस्मा झाला ही घोषणा न्यूयॉर्क शहरातल्या अधिवेशनात केली तेव्हा तिथल्या लोकांना केवढा आनंद झाला! विशेषतः, मॉस्कोतल्या अधिवेशनाच्या ऐन आठवड्यातच संयुक्‍त संस्थानांमध्ये आणि दुसरीकडे वृत्तपत्रे व टीव्हीच्या बातम्यांमधून नकारात्मक बातम्या पसरू लागल्या होत्या; त्यामुळे या सकारात्मक घोषणेने लोकांमध्ये आनंदाची लहर उठली.

मॉस्कोतली स्थिती

जुलै २१, १९९९ रोजी साक्षीदारांनी मॉस्कोच्या अगदी मध्यावर वसलेल्या ऑलिम्पिक स्टेडियमसाठी तिथल्या अधिकाऱ्‍यांशी बोलणी केली; हे स्टेडियम एका रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला लागूनच होते. अधिवेशनाच्या आदल्या आठवड्यातच विरोध होण्याची लक्षणे स्पष्ट दिसत होती. स्टेडियमच्या भाड्याचे पैसे देऊनही बुधवार, ऑगस्ट १८ पर्यंत स्टेडियम वापरण्यासाठी परवानगी मिळालेली नव्हती. मग, पृष्ठ २८ वरील पेटीत सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्‍यांना पुन्हा पुन्हा हे सांगावे लागले की, यहोवाच्या साक्षीदारांची धार्मिक संघटना रशियात कायदेशीररित्या मान्यताप्राप्त आहे.

शुक्रवारी सकाळी सुमारे १५,००० लोक अधिवेशनाला येणार असल्यामुळे बांधव काळजीत पडले होते. काही लोक तर दूरदूरच्या शहरांमधून आणि गावांमधून मॉस्कोला येणार होते. शेवटी, गुरुवारी, ऑगस्ट १९ रोजी सकाळी ८.०० वाजता स्टेडियमच्या व्यवस्थापन मंडळाने साक्षीदारांच्या प्रतिनिधींना ही आनंदाची बातमी दिली की अधिवेशन भरवले जाऊ शकते. शहराच्या अधिकाऱ्‍यांनीही यास संमती दिली होती.

दुसऱ्‍या दिवशी सकाळी स्टेडियम लोकांनी खच्चाखच्च भरलेले. ही सगळी तयारी करण्यासाठी साक्षीदार स्वयंसेवकांनी रात्रभर काम केले होते. पहिल्या दिवशी सकाळी पत्रकारसुद्धा आले; या अधिवेशनाला विरोध असल्याचे त्यांना आधीच कळाले होते. एकाने म्हटले, “अभिनंदन! तुमचे अधिवेशन कोणीही रोखू शकले नाही म्हणून आम्हाला फार आनंद होतोय.”

सुव्यवस्थेचे उदाहरण

सुरक्षा व्यवस्था ठेवलेली बरी असे स्टेडियमच्या व्यवस्थापन मंडळाला वाटले. म्हणून, विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ठेवतात तसे मेटल डिटेक्शन यंत्र स्टेडियमच्या प्रत्येक प्रवेशद्वारांवर ठेवण्यात आले. स्टेडियमच्या आतसुद्धा पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. धोका असूनही अधिवेशन मात्र सुरळीत पार पडले.

शनिवारी दुपारी एक फोन आला; फोनवरून असे सांगण्यात आले की स्टेडियममध्ये एक बॉम्ब ठेवला आहे. एक भाषण अगदी संपायला आले होते तेव्हा ही धमकी मिळाली होती; या भाषणानंतर आणखी एक भाषण व्हायचे होते. पण स्टेडियमच्या व्यवस्थापनाने विनंती केल्यामुळे स्टेडियम होता होईल तितक्या लवकर रिकामे करण्याची एक संक्षिप्त घोषणा करण्यात आली. स्टेडियम रिकामे करताना कसल्याच प्रकारचा गोंधळ झाला नाही; सर्वजण शांतपणे बाहेर निघून गेले. ही सुव्यवस्था पाहून स्टेडियमच्या व्यवस्थापन मंडळाला आणि पोलिसांना आश्‍चर्य वाटले. अशी सुव्यवस्था त्यांनी कधीच पाहिली नव्हती! “तुम्ही सगळ्यांनी आधी याचा सराव केला होता की काय” असे ते म्हणाले.

स्टेडियममध्ये मात्र बॉम्ब कुठेही सापडला नाही. मग, आदल्या दिवशीचा राहिलेला कार्यक्रम दुसऱ्‍या दिवशी पूर्ण करण्यात आला. स्टेडियममध्ये अधिवेशन भरवले म्हणून तिथल्या व्यवस्थापन मंडळाला फार आनंद झाला.

ग्रीस आणि इतर ठिकाणी

ऑगस्टच्या शेवटल्या सप्ताहांती आणि सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहांती रशियन भाषेतली अधिवेशने ग्रीसमध्ये—प्रथम एथेन्स येथे आणि नंतर थेस्सलनायका येथेही भरवण्यात आली. त्यासाठी एकूण ७४६ लोक उपस्थित होते आणि ३४ जणांचा बाप्तिस्मा झाला. ग्रीसमध्ये ८ रशियन भाषेच्या मंडळ्या आहेत आणि सोव्हिएत युनियनच्या भूतपूर्व दक्षिण प्रजासत्ताक राज्यांमधून तेथे राहायला आलेल्या लोकांचे १७ लहान गट आहेत. यांच्या सभा रशियन भाषेत आणि स्थलांतर केलेल्यांच्या इतर भाषांमध्ये चालवल्या जातात.

एथेन्समध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या एकाचे नाव होते व्हिक्टर. तो नास्तिक होता; पण ऑगस्ट १९९८ मध्ये एथेन्स येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला तो उपस्थित राहिला होता. तेथे त्याच्या बायकोचा बाप्तिस्मा झाला. तिथल्या लोकांच्या प्रेमाने प्रभावित होऊन तो बायबलचा अभ्यास करायला प्रेरित झाला होता असे तो म्हणाला.

इगर नावाच्या एका इसमाला तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक मिळाले. ते वाचल्यावर त्याने आपल्याजवळच्या सगळ्या मूर्ती फेकून दिल्या. तो स्वतःला यहोवाचा साक्षीदारही म्हणवू लागला. त्याने एथेन्स येथील शाखा दफ्तराला पत्र लिहिले आणि साक्षीदारांनी त्याला नोव्हेंबर १९९८ मध्ये भेट दिली. तेव्हापासून तो लागलीच सभांना जाऊ लागला आणि आतापर्यंत त्याने एकही सभा चुकवलेली नाही. आता तो एक बाप्तिस्माप्राप्त बांधव आहे आणि पुढे त्याला पूर्ण-वेळेचा सेवक बनायचे आहे.

रशियन भाषा बोलणाऱ्‍या लोकांनी इतर अनेक राष्ट्रांमध्ये स्थलांतर केले आहे; प्रत्येक राष्ट्राचा उल्लेख आम्ही येथे केलेला नाही. यातील अनेकांना बायबलचा अभ्यास करण्याचे आणि देवाच्या उपासनेसाठी एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे फार आनंद होतो. त्यांच्यासाठी हा एक बहुमूल्य विशेष हक्क आहे!

[तळटीपा]

^ ही १५ प्रजासत्ताक राज्ये पुढीलप्रमाणे आहेत; सध्या ती स्वतंत्र्य राष्ट्रे आहेत: आर्मीनिया, आझरबाइजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकस्तान, किरगीझस्तान, लॅटव्हिया, लिथुएनिया, मॉल्डोवा, रशिया, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तान.

[२२ पानांवरील चौकट]

बायबल-प्रेमी रशियन

एक आदरणीय रशियन धार्मिक विद्वान, प्राध्यापक सर्जी इव्हानेन्को यांनी यहोवाच्या साक्षीदारांचे वर्णन, पूर्ण मन लावून बायबलचा अभ्यास करणारे लोक असे केले. ओ ल्युड्याख, निकोगडा न्ये रस्टायुशचिकस्या एस बिब्लीए (सतत बायबल जवळ बाळगणारे लोक) या आपल्या रशियन भाषेतल्या अलीकडच्या पुस्तकात त्यांनी सोव्हिएत युनियनमधील साक्षीदारांच्या प्रारंभिक इतिहासाविषयी लिहिले: “आपल्या विश्‍वासासाठी तुरुंगात असतानाही यहोवाच्या साक्षीदारांनी बायबल सोडले नाही; बायबलचा उपयोग करण्यासाठी ते कोणता न कोणता मार्ग शोधून काढायचेच.” या संदर्भात त्यांनी पुढील अनुभव सांगितला.

“कैद्यांना बायबल जवळ बाळगण्याची मनाई होती. तपासणीच्या वेळी बायबल सापडले तर ते ताब्यात घेतले जायचे. उत्तरेकडील एका छावणीत यहोवाचा एक साक्षीदार इलेक्ट्रिशियन होता. तो ट्रान्सफॉर्मर युनिटमध्ये बायबलची पुस्तके ठेवत असे; त्या युनिटचा फार हाय व्होल्टेज होता. बायबलचा प्रत्येक भाग एका दोरीला बांधून ती दोरी एका वायरला बांधलेली असायची; त्यामुळे शॉक न बसता एखादे पुस्तक, जसे की, मत्तय शुभवर्तमानाचे पुस्तक काढायचे असेल तर नेमकी कोणती दोरी ओढायची हे फक्‍त त्यालाच ठाऊक होते. शिपायांनी पुष्कळ शोध केला तरी हे अनोखे बायबल त्यांच्या हाती काही लागले नाही.”

[२८ पानांवरील चौकट]

यहोवाच्या साक्षीदारांची रशियात पुन्हा कायदेशीर नोंदणी

यहोवाचे साक्षीदार एका शतकाहून अधिक काळ रशियात देवाच्या राज्याची सक्रियतेने घोषणा करत आहेत. परंतु काही सरकारी बंधनांमुळे मार्च २७, १९९१ सालापर्यंत त्यांना मान्यता मिळालेली नव्हती. मात्र मार्च २७, १९९१ साली समाजवादी प्रजासत्ताक सोव्हिएत संघराज्यांतील यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक संघटनांचे व्यवस्थापन केंद्र या नावाखाली त्यांची नोंदणी करण्यात आली.

सप्टेंबर २६, १९९७ रोजी, “विवेक आणि धार्मिक संघटनेचे स्वातंत्र्य” हा कायदा काढण्यात आला. वृत्तमाध्यमांतून या नवीन कायद्याला जगभरात बरीच प्रसिद्धी मिळाली. कारण अनेकांना वाटले की, हा कायदा रशियातल्या अल्पसंख्यांक धर्मांच्या कार्यहालचालींवर बंदी आणण्याचा एक प्रयत्न आहे.

यास्तव, यहोवाच्या साक्षीदारांनी १९९१ मध्ये मोठ्या मुश्‍किलीने कायदेशीर नोंदणी करूनही काही फायदा झाला नाही; कारण विवेकाचे स्वातंत्र्य या रशियातल्या नवीन कायद्यानुसार त्यांना त्याचप्रमाणे इतर धार्मिक संघटनांना पुन्हा एकदा नोंदणी करणे भाग होते. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले. रशियन अधिकारी पुन्हा एकदा यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करायला सुरवात करणार होते की काय? की, रशियन संघराज्याच्या संविधानामध्ये हमी दिल्यानुसार धार्मिक सहिष्णुता आणि उपासनेच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला जाणार होता?

सरतेशेवटी उत्तर मिळाले. एप्रिल २९, १९९९ रोजी, “रशियातील यहोवाच्या साक्षीदारांचे व्यवस्थापन केंद्र” याच्या नोंदणीचे प्रमाणपत्र रशियातल्या न्याय मंत्रालयाकडून मिळाल्यावर यहोवाच्या साक्षीदारांना पुन्हा एकदा कायदेशीर मान्यता मिळणार असे कळाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही!

[२३ पानांवरील चित्र]

संयुक्‍त संस्थानांतील पहिले रशियन भाषेतले प्रांतीय अधिवेशन

[२४ पानांवरील चित्र]

न्यूयॉर्कमध्ये लॉस एंजेलीझच्या रशियन मंडळीने सादर केलेले बायबल आधारित नाटक

[२५ पानांवरील चित्र]

न्यूयॉर्कमध्ये बाप्तिस्मा घेतलेले हे १४ जण सोव्हिएत युनियनच्या सहा भूतपूर्व प्रजासत्ताक राज्यांमधील आहेत

[२६, २७ पानांवरील चित्र]

मॉस्कोच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये १५,००० हून अधिक लोक जमले होते