व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

काही खास परिस्थितीत खोटे बोलणे—चालण्यासारखे आहे का?

काही खास परिस्थितीत खोटे बोलणे—चालण्यासारखे आहे का?

बायबलचा दृष्टिकोन

काही खास परिस्थितीत खोटे बोलणे—चालण्यासारखे आहे का?

“काहीवेळा जराशा असत्याने लांबलचक स्पष्टीकरण देण्याचा ताप वाचतो.”

या वाक्यावरून अनेकांचा खोटे बोलण्याच्या बाबतीत असलेला दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांचे म्हणणे असे आहे की, लबाडी केल्याने कोणाचे काही वाईट होत नसेल तर लबाडी करायला काही हरकत नाही. अशा या युक्‍तिवादाला शास्त्रोक्‍त नावसुद्धा आहे; त्याला परिस्थिती नीतिशास्त्र (सिच्युएशन एथिक्स) म्हणतात. या शास्त्रानुसार एकाच नियमाचे पालन करण्याची गरज आहे आणि तो म्हणजे प्रेमाचा नियम. दुसऱ्‍या शब्दांत, लेखिका डाएन कॉम्प यांच्या मते, “योग्य हेतूसाठी आणि मनात काही कपट न राखता आपण खोटे बोललो तर . . . त्याने काही फरक पडत नाही.”

आजकाल असा हा दृष्टिकोन अगदी सर्रास पाहायला मिळतो. नामवंत राजकीय नेत्यांनी आणि इतर पुढाऱ्‍यांनी खोटे बोलून घोटाळे केल्याची कितीतरी उदाहरणे आहेत; या घटना समाजात खळबळ माजवतात आणि अशा वातावरणात सामान्य माणसालाही खरे बोलणे तितकेसे महत्त्वाचे वाटत नाही. काही क्षेत्रांमध्ये तर खोटे बोलणे हे अधिकारी वर्गाचे धोरणच बनले आहे. “मला लबाड बोलण्याचेच तर पैसे मिळतात. विक्री क्षेत्रात प्रगती होण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी मला खोटे बोलणे भाग आहे. . . . विक्रीतंत्राच्या प्रशिक्षणाचा हाच मूलभूत नियम आहे असे कधीकधी वाटते,” अशी एक सेल्सक्लर्क तक्रारीच्या सुरात म्हणते. ज्यामुळे कोणाचे नुकसान होत नाही अशी लबाडी करण्यात काहीच हरकत नाही असे अनेकांचे मत आहे. हे खरे आहे का? ख्रिश्‍चनांनी देखील काही विशिष्ट परिस्थितीत खोटे बोलले तर चालण्यासारखे आहे का?

बायबलचा उच्च दर्जा

बायबलमध्ये सर्व प्रकारच्या लबाडीची सरळ सरळ निंदा केली आहे. “असत्य भाषण करणाऱ्‍याचा [देव] नाश” करील असे स्तोत्रकर्त्याने म्हटले. (स्तोत्र ५:६; पाहा प्रकटीकरण २२:१५.) बायबलमध्ये नीतिसूत्रे ६:१६-१९ येथे सात गोष्टी दिल्या आहेत ज्यांचा यहोवाला वीट आहे. आणि त्यामध्ये “लबाड बोलणारी जिव्हा” आणि “लबाड बोलणारा खोटा साक्षी,” या गोष्टींचाही समावेश आहे. यहोवाला लबाडीचा इतका तिरस्कार का? कारण खोटे बोलल्याने पोचणाऱ्‍या नुकसानाची यहोवाला जाणीव आहे. सैतानाने लबाडी केली म्हणूनच मानवजातीवर असंख्य कष्ट आणि मृत्यू ओढवला. यासाठीच येशूने सैतानाला लबाड आणि मनुष्यघातक असे म्हटले.—उत्पत्ति ३:४, ५; योहान ८:४४; रोमकर ५:१२.

हनन्या आणि सप्पीरा यांचे उदाहरण पाहिल्यास यहोवाचा खोटे बोलण्याबद्दल केवढा गंभीर दृष्टिकोन आहे हे स्पष्ट होते. या दोघांनी आपण फार मोठ्या मनाचे आहोत असे भासवण्याकरता जाणूनबुजून प्रेषितांना खोटे सांगितले. त्यांनी ठरवून आणि मुद्दामहून खोटेपणा केला. म्हणून प्रेषित पेत्राने म्हटले: “तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” ही लबाडी केल्यामुळे देवाने त्या दोघांनाही जिवे मारले.—प्रेषितांची कृत्ये ५:१-१०.

बऱ्‍याच वर्षांनंतर प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “एकमेकांशी लबाडी करू नका.” (कलस्सैकर ३:९) ख्रिस्ती मंडळीत हा सल्ला विशेषकरून महत्त्वाचा आहे. येशूने म्हटले होते की, तत्त्वांवर आधारित असलेले प्रेम त्याच्या खऱ्‍या अनुयायांचे ओळखचिन्ह असेल. (योहान १३:३४, ३५) अशाप्रकारचे निःस्वार्थ प्रेम केवळ प्रामाणिकतेच्या आणि भरवशाच्या वातावरणातच वाढू शकते किंवा बहरू शकते. एखादी व्यक्‍ती बोलते ते सगळे काही सत्य असेलच अशी आपल्याला खात्री नसली तर तशा व्यक्‍तीवर प्रेम करणे कठीण आहे.

कोणत्याही प्रकारची लबाडी निंद्यच असते; परंतु काही प्रकारच्या लबाड्या इतरांपेक्षा गंभीर स्वरूपाच्या असतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती लाज वाटत असल्यामुळे किंवा भीतीपोटी खोटे बोलत असेल. पण दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला कदाचित कोणाचे नुकसान व्हावे किंवा कोणाचे वाईट व्हावे अशा दुष्ट हेतूने नेहमीच खोटे बोलण्याची सवय असेल. आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी मुद्दामहून खोटे बोलणाऱ्‍या या व्यक्‍तीचा इतरांना धोका असतो आणि तिने पश्‍चात्ताप दाखवला नाही तर तिला मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते. परंतु, प्रत्येक वेळी दुष्ट हेतूने लबाडी केली जात नाही; म्हणून खोटे बोलणाऱ्‍या एखाद्याला त्याच्या चुकीची शिक्षा देण्याआधी संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेण्याची खबरदारी घेतली पाहिजे. लबाड बोलण्यामागचा उद्देश त्याचप्रमाणे सूट देणाऱ्‍या परिस्थिती या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.—याकोब २:१३.

सापांसारखे चतुर

अर्थात, खरे बोलण्याचा अर्थ आपल्याला कोणीही काहीही विचारले तर आपल्याला माहीत असलेले सगळे त्यांना सांगून टाकणे असा होत नाही. “जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती . . . उलटून तुम्हास फाडितील,” असा येशूने मत्तय ७:६ येथे इशारा दिला होता. उदाहरणार्थ, दुष्ट हेतू बाळगणाऱ्‍या लोकांना काही विशिष्ट गोष्टी जाणण्याचा कदाचित काहीही अधिकार नसेल. ख्रिश्‍चनांनी हे समजून घेतले पाहिजे की ते दुष्ट जगात राहत आहेत. यास्तव, येशूने आपल्या शिष्यांना सल्ला दिला की, “कबुतरासारखे निरुपद्रवी” असूनही “सापांसारखे चतुर” व्हा. (मत्तय १०:१६; योहान १५:१९) येशूने देखील स्वतःला व त्याच्या शिष्यांना धोका असताना अनावश्‍यकपणे सगळी सत्य वस्तुस्थिती प्रकट केली नाही. पण तो खोटे बोलला नाही. त्याउलट, एकतर तो शांत राहिला किंवा त्याने विषय बदलला.—मत्तय १५:१-६; २१:२३-२७; योहान ७:३-१०.

आब्राहाम, इसहाक, राहाब आणि दावीद यांसारखे बायबलमध्ये उल्लेख केलेले स्त्री-पुरुष देखील शत्रूंशी वागताना चाणाक्ष आणि चतुर होते. (उत्पत्ति २०:११-१३; २६:९; यहोशवा २:१-६; १ शमुवेल २१:१०-१४) अशा स्त्री-पुरुषांना बायबलमध्ये विश्‍वासू उपासक म्हटले गेले आहे; ते सगळे देवाला आज्ञाधारक होते. त्यामुळे आपल्यापुढे ते चांगले आदर्श आहेत.—रोमकर १५:४; इब्री लोकांस ११:८-१०, २०, ३१, ३२-३९.

काही वेळा खोटे बोलणे कदाचित तुम्हाला सोयीस्कर वाटेल. पण, ख्रिश्‍चनांनी येशूचे अनुकरण केले पाहिजे आणि कठीण परिस्थितींमध्ये असताना आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचे ऐकले पाहिजे.—इब्री लोकांस ५:१४.

आपण सत्य बोलणारे आणि प्रामाणिक असावे असे उत्तेजन बायबल आपल्याला देते. लबाडी करणे चुकीची गोष्ट आहे आणि आपण बायबलचा हा सल्ला अनुसरला पाहिजे: “तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला.” (इफिसकर ४:२५) असे केल्याने आपला विवेक शुद्ध राहील, मंडळीत शांती आणि प्रेमाचे वातावरण असेल, शिवाय ‘सत्यस्वरूप देवाचा’ आपण सन्मान करणारे असू.—स्तोत्र ३१:५; इब्री लोकांस १३:१८.

[२० पानांवरील चित्र]

हनन्या आणि सप्पीरा यांनी खोटे बोलून आपले प्राण गमावले