व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन जगण्याची उर्मी मिळते

जीवन जगण्याची उर्मी मिळते

जीवन जगण्याची उर्मी मिळते

मेरीला तीव्र नैराश्‍याचा आजार तर होताच होता; शिवाय इतरही आरोग्य समस्या होत्या. त्यामुळे तिला जीवन अगदी नकोसे झाले होते. पण, घरच्यांचा भावनिक ओलावा तिला मिळत नव्हता असे नाही. शिवाय, आपल्या समस्यांपासून पळ काढण्यासाठी ती दारूच्या किंवा ड्रग्जच्या आहारीही गेली नव्हती. मेरीच्या अनुभवावरून एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीमध्ये आत्महत्येची सर्व कारणे किंवा लक्षणे असलीच पाहिजेत असे नाही. त्यासाठी केवळ एक कारणही पुष्कळसे आहे.

मेरी हॉस्पिटलमध्ये असताना क्षणभर असे वाटले, की स्वतःच्या जीवनाचा अंत घडवून आणणाऱ्‍या असंख्य वयस्कर लोकांमध्ये आता मेरी देखील सामील होणार. हॉस्पिटलच्या अति-दक्षता विभागात कित्येक दिवस ती कोमामध्ये होती, अक्षरशः काहीच प्रतिसाद देत नव्हती. तिची जीवनज्योत केव्हा मालवेल काही सांगता येत नव्हते. या विचाराने उद्धवस्त झालेला तिचा पती एक क्षणही तिला सोडून कुठे गेला नाही. आता काहीच आशा नाही किंवा मग मेरी कशीबशी या अपघातातून सावरली तरी तिच्या डोक्यावर कायमचा परिणाम होण्याची शक्यता आहे असे डॉक्टरांनी जॉनला आणि त्याच्या घरच्यांना सांगून टाकले.

हॉस्पिटलमध्ये असताना सॅली नावाची एक स्त्री दररोज मेरीला भेटायला यायची. जॉन आणि मेरी यांच्या शेजारी राहणारी सॅली ही एक यहोवाची साक्षीदार आहे. त्या कटू प्रसंगाविषयी बोलताना सॅली म्हणते: “मी त्यांना वेळोवेळी आवर्जून सांगायचे, आशा सोडू नका. धीर धरा. दोनएक वर्षांपूर्वी माझी आई देखील कित्येक आठवडे मधुमेहामुळे कोमात गेली होती. आणि तेव्हा देखील डॉक्टरांनी काहीच आशा नाही असं सांगितलं होतं. पण, मी आईचा हात हातात घेऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ती प्रतिसाद देऊ लागली. मेरीच्या बाबतीतही मी असंच केलं. तिचा हात हातात घेऊन मी तिच्याशी बोलू लागले तेव्हा ती किंचित प्रतिसाद देत असल्याचं मला जाणवलं. तिसऱ्‍या दिवशी तर तिला पुष्कळ बरं वाटू लागलं. तिला बोलता येत नसलं तरी ती आता लोकांना ओळखायला लागली होती.”

‘मला हा प्रसंग टाळता आला असता का?’

सॅली म्हणते: “या प्रसंगामुळे जॉनला फार अपराध्यासारखं वाटत होतं. त्याला असं वाटत होतं, की त्याच्यामुळेच हे सर्व घडलं.” एखादी जवळची व्यक्‍ती आत्महत्या करते किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते तेव्हा लोकांना सहसा असेच वाटते. “पण, मग मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, की तीव्र निराशेच्या आजारासाठी मेरीवर औषधोपचार चालू होते. त्याशिवाय, मेरीला इतरही त्रास होता. आणि ज्याप्रमाणे त्याच्या आजारासाठी दुसरे कोणीही जबाबदार नव्हते त्याचप्रमाणे मेरीच्या आजारासाठी देखील कोणीही जबाबदार नव्हते—तोसुद्धा.”

एखाद्या जवळच्या, प्रिय व्यक्‍तीने आत्महत्या केल्यास ‘मला हा प्रसंग टाळता आला असता का?’ हा प्रश्‍न अनेकांना सतत भेडसावत राहतो. अर्थात, आत्महत्येची लक्षणे आणि कारणे यांकडे लक्ष दिल्यास एखाद्याला आत्महत्या करण्यापासून रोखणे शक्य आहे. पण, समजा त्या व्यक्‍तीने आत्महत्या केलीच तर एक लक्षात ठेवा: कोणा दुसऱ्‍याने केलेल्या आत्मघातकी कृत्यासाठी तुम्ही जबाबदार नाही. (गलती. ६:५) खासकरून, इतरांना दोषी ठरवण्याच्या प्रयत्नात एखादी व्यक्‍ती आत्महत्या करते तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवण्यास हवी. आधी उल्लेखिलेले डॉ. हेन्डिन म्हणतात: “नेहमी लक्षात ठेवा, आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी ठरवणाऱ्‍यांपैकी बहुतेकांना आपल्या जाण्यामुळे इतरांच्या जीवनावर, त्यांच्या भावनांवर काहीतरी प्रभाव पाडायचा असतो; आपले हे प्रयत्न सफल झाले की नाही हे पाहायला आपण नसू याची त्यांना पर्वा नसते.”

डॉ. हेन्डिन पुढे म्हणतात: “आत्महत्येचा विचार करणाऱ्‍या वयस्करांच्या बाबतीत पाहू जाता ते सहसा आपल्या मुलांना, भावंडांना किंवा वैवाहिक सोबत्यांना प्रभावित करू इच्छितात, त्यांना नियंत्रणात ठेवू इच्छितात किंवा त्यांनी आपली अधिक काळजी घ्यावी अशी अपेक्षा करत असतात. पण, त्यांच्या या अपेक्षा पूर्ण करणे नेहमीच शक्य नसते आणि त्यातल्या त्यात रुग्ण व्यक्‍तीही तडजोड करायला तयार नसते. शेवटी व्हायचे तेच होते. आत्महत्येचा किरकोळ प्रयत्न शेवटी एक उग्र रूप धारण करतो.”

अशा परिस्थितीत सापडलेल्या कौटुंबिक सदस्यांना सहनशक्‍तीचा अंत पाहणाऱ्‍या भयंकर दबावाखाली असल्याचे वाटू शकते. पण, यहोवा परमेश्‍वर मृत लोकांना पुन्हा जीवदान देणार आहे आणि या लोकांमध्ये औदासिन्यामुळे, मनोविकारांमुळे किंवा निराशेमुळे स्वतःच्या जीवनाचा अंत करणारे आपले प्रियजनही बहुधा असतील हे आठवणीत ठेवा.—“बायबलचा दृष्टिकोन: आत्महत्या करणाऱ्‍यांना पुनरुत्थानाची आशा आहे का?” हा सप्टेंबर ८, १९९० च्या सावध राहा! (इंग्रजी) अंकातील लेख पाहा.

आत्महत्या उचित आहे असे म्हणणे चुकीचे असले तरी आत्महत्या केलेल्या आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या सर्व भावी आशा आता परमेश्‍वराच्या हातात आहेत ही विलक्षण दिलासा देणारी गोष्ट आहे. कारण आत्महत्येसारखे भीषण कृत्य करण्यास एखाद्याला कोणत्या दुर्बलतेने प्रवृत्त केले असेल याची पूर्ण समज परमेश्‍वराशिवाय आणखी कोणाला असू शकते? यहोवा परमेश्‍वराविषयी बायबल म्हणते: “जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्‍यांवर विपुल आहे. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.”—स्तोत्र १०३:११-१४.

आनंदी शेवट

संपूर्ण दोन दिवस मेरी जीवन-मृत्यूच्या रेषेवर रेंगाळत होती. हळूहळू ती शुद्धीवर आली आणि जॉनला तिला घरी नेता आले. यावेळी मात्र, घरातली सर्व औषधे त्याने कपाटात लॉक करून ठेवली होती. मेरी सध्या मानसिक-आरोग्य समाज सेवकांना उपचारासंदर्भात वेळोवेळी जाऊन भेटते. त्या जीवघेण्या प्रसंगाविषयी काही बोलणे तर सोडाच; पण ते भयंकर कृत्य करण्यास कोणत्या गोष्टीने तिला उद्युक्‍त केले होते हेसुद्धा तिला समजत नाही किंवा नीटसे आठवत नाही असे ती म्हणते.

सध्या जॉन आणि मेरीची शेजारीण त्या दोघांबरोबर दर आठवडी बायबलचा अभ्यास करते. बायबलमधून त्यांना समजले आहे, की ज्या समस्यांवर काही म्हणजे काहीच उपाय नाही असे (खासकरून वयस्करांना) वाटते अशा सर्व समस्या परमेश्‍वर लवकरच सोडवणार आहे. पण, सॅली म्हणते की, “त्यासाठी केवळ बायबलचा अभ्यास पुरेसा नाही, तर बायबलमधून प्रथम आपल्याला याची पक्की खात्री झाली पाहिजे, की बायबलमध्ये सांगितलेल्या सर्व आशा-आकांक्षा वास्तविक आहेत आणि मग शिकलेल्या गोष्टींचा आपण रोजच्या जीवनात अवलंब केला पाहिजे. जॉन आणि मेरीच्या बाबतीत मला असं वाटतं, की त्यांना जीवनात एक खरीखुरी आणि शाश्‍वत आशा गवसली आहे.”

तुमच्या बाबतीत काय? तुम्हाला तुमचे भविष्य अगदीच अंधकारमय, अर्थहीन वाटते का? तुम्हाला एक खरीखुरी, शाश्‍वत आशा हवी आहे का? असल्यास तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधू शकता. जसे जॉन आणि मेरी यांना पटवून देण्यात आले, की परमेश्‍वर सोडवू शकत नाही आणि जवळच्या भविष्यात सोडवणार नाही अशी एकही समस्या नाही तसे ते तुम्हालाही पटवून देतील. सध्या परिस्थिती कितीही निराशाजनक दिसत असली तरी त्यावर उपाय आहे हे नेहमी लक्षात ठेवा. जगण्याची नवीन उमेद देणाऱ्‍या एका शाश्‍वत आशेविषयी पुढील लेखात वाचा.

[६ पानांवरील चौकट]

आत्महत्येची संभाव्य कारणे आणि लक्षणे

“वयोवृद्ध लोकांमधील आणि तरुणांमधील आत्महत्येची संभाव्य कारणे एकसारखीच असतात असे नाही,” असे द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन या नियतकालिकेने म्हटले. “दारूचे व्यसन, दीर्घ काळापर्यंत रेंगाळणारे औदासिन्य, आत्मदहन करण्याकरता अतिशय जहाल पद्धतींचा अवलंब आणि सामाजिक एकलकोंडेपणा,” अशा सर्व गोष्टी आत्महत्येच्या संभाव्य कारणांमध्ये मोडतात. “या शिवाय, तरुणांच्या तुलनेत वयस्करांना . . . अधिक आरोग्य समस्या आणि भावनिक आजार असतात.” स्टीफन फ्लँडर्स यांनी स्यूइसाइड या आपल्या पुस्तकात सांगितलेली आत्महत्येची काही संभाव्य कारणे खाली दिलेली आहेत. या प्रत्येक कारणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्यास हवे.

तीव्र औदासिन्य:

“संशोधकांचे म्हणणे आहे, की तीव्र औदासिन्याचे बळी असलेले ५०% किंवा त्याहून अधिक लोक जीव देतात.”

निराशा:

काही अभ्यासांतून दिसून आले, की औदासिन्याचे बळी नसलेले लोकही आत्महत्येचा मार्ग पत्करतात कारण भविष्यात आशेचा एकही किरण त्यांना दिसत नाही.

मद्य आणि ड्रग्जचे व्यसन:

“असे म्हटले जाते, की सर्वसामान्य लोकांपैकी केवळ १% लोक आत्महत्या करतात; तर मद्याच्या आहारी जाऊन ७% ते २१% [मद्यपी] आपल्या जीवनाचा अंत करतात.”

कुटुंबाचा प्रभाव:

“अभ्यासांवरून हेही निष्पन्‍न होते, की ज्या कुटुंबात पूर्वी कधी आत्महत्येची घटना घडली असेल त्या कुटुंबात पुन्हा अशी घटना घडण्याची दाट शक्यता असते.”

आजारपण:

“शारीरिकरित्या दिवसेंदिवस कमजोर होऊन शेवटी वृद्धाश्रमात खितपत पडण्याची वेळ येण्याआधी जीवन संपून टाकणे बरे असेही काही वृद्धांना वाटू शकते.”

काहीतरी गमावल्यामुळे:

“आपल्या डोळ्यासमोर विवाहसोबत्याचा किंवा जवळच्या मित्राचा मृत्यू होणे, नोकरी गमावणे किंवा प्रकृती बिघडणे अशा कारणांमुळे एखाद्या व्यक्‍तीच्या मनात आत्महत्येचा विचार डोकावू शकतो. पण, आत्म-सन्मान, प्रतिष्ठा किंवा सुरक्षिततेची भावना अशा डोळ्यांना न दिसणाऱ्‍या गोष्टी गमावल्यामुळे देखील एखादा आत्महत्या करण्यास उद्युक्‍त होऊ शकतो.”

आत्महत्येच्या या कारणांशिवाय फ्लँडर्स यांच्या पुस्तकात पुढील आत्महत्येची लक्षणे नमूद केलेली आहेत त्यांकडेही विशेष लक्ष देण्यास हवे.

आधी केलेला आत्महत्येचा प्रयत्न:

“एकदा आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर सहसा पुन्हा प्रयत्न केला जातो.”

आत्महत्येची भाषा:

“‘त्यांना जास्त दिवस माझा त्रास सहन करावा लागणार नाही,’ किंवा ‘मी मेलो तर तुमचं जीवन सुखी होईल’ असले बोलणे संभाव्य आत्महत्येची पूर्वसूचना असू शकते.”

अंतीम योजना:

“यामध्ये मृत्युपत्र तयार करणे, जिवापाड जपलेल्या मालमत्तेची वाटणी करणे आणि आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची व्यवस्था करणे या सर्व गोष्टी सामील होतात.”

व्यक्‍तिमत्त्वात किंवा वर्तनात बदल:

एखाद्या व्यक्‍तीच्या बोलण्यातून “निराशेचा, व्यक्‍तिमत्त्वभंगाचा, स्वतःची किंमत न उरल्याचा सूर ऐकायला मिळतो तेव्हा तीव्र औदासिन्याचे ते लक्षण असू शकते ज्यामुळे व्यक्‍ती आत्मघातकी कृत्य करण्यास प्रवृत्त होते.”

[७ पानांवरील चित्र]

आत्महत्या करणाऱ्‍यांच्या विवाह सोबत्यांना या कठोर वास्तवाचा सामना करण्यासाठी धीराची आणि भावनिक आधाराची अत्यंत गरज असते