व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझ्या मैत्रिणीनं माझं मन का दुखावलं?

माझ्या मैत्रिणीनं माझं मन का दुखावलं?

तरुण लोक विचारतात . . .

माझ्या मैत्रिणीनं माझं मन का दुखावलं?

“मला एकदोन नव्हे बऱ्‍याच मैत्रिणी होत्या . . . मग, त्यांची दुसऱ्‍या एका मुलीशी मैत्री झाली. त्या आपसात बोलायच्या आणि मी जर त्यांच्यात गेले तर त्या लगेच आपलं बोलणं थांबवायच्या. . . . हळूहळू त्या मला एकटं पाडू लागल्या. त्यांचं हे वागणं माझ्या मनाला फार लागायचं.”—कॅरेन. *

अक्षरशः कुणाच्याही बाबतीत, अगदी एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्‍या मित्रांच्या बाबतीतही असे होऊ शकते. त्यांच्या आयुष्यात अशी एक वेळ असते जेव्हा ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही तर दुसऱ्‍या वेळी ते एकमेकांकडे पाहतसुद्धा नाहीत. सतरा वर्षांची नोरा म्हणते: “मित्र-मैत्रिणी अशा असाव्यात ज्यांच्यावर तुम्ही भरवसा ठेवू शकता, विश्‍वास ठेवू शकता; ज्यांच्याकडे कोणत्याही प्रसंगी तुम्ही मदतीसाठी धाव घेऊ शकता.” पण, कधी कधी सगळ्यात चांगला मित्रही हाडाचा वैरी बनू शकतो.

मैत्रीत कडवटपणाचा शिरकाव

पण, मैत्रीच्या या मधूर, गोड नातेसंबंधात कशामुळे कडवटपणा येतो? मॅगनने सँड्राचा एक आवडता टॉप घेतला आणि त्या दोघींमध्ये कडवटपणा निर्माण झाला. सँड्रा म्हणते, “तिनं माझा टॉप परत केला तेव्हा तो मळकाच होता; ते तर सोडा, पण टॉपची एक बाही देखील जरा फाटलेली होती. विशेष म्हणजे याविषयी ती एका शब्दानंसुद्धा माझ्याकडे बोलली नाही; जणू काय ते माझ्या लक्षातच येणार नाही असं तिला वाटलं होतं.” आपल्या भावनांची, आपल्या विचारांची पर्वा न करणाऱ्‍या मॅगनविषयी सँड्राला कसे वाटले? सँड्रा म्हणते: “तिला माझ्या वस्तूंची, माझ्या भावनांची काहीच कदर नाही याचा मला खूप राग आहे.”

आपला अगदी जवळचा मित्र किंवा मैत्रीण चार लोकांत आपला अपमान करते तेव्हा देखील ते जिव्हारी लागते. सिंडीच्या बाबतीत असेच घडले. एकदा शाळेत बुक रिपोर्ट (अहवाल) लिहिण्याकरता सगळ्यांना वाचायला सांगितलेले एक पुस्तक तिने अद्याप वाचले नव्हते असे तिने मित्रमैत्रिणींना सांगितले तेव्हा केट नावाची तिची एक मैत्रीण सगळ्यांदेखत तिचा पाणउतारा करू लागली. “इतक्या सगळ्या मित्र-मैत्रिणींसमोर तिनं माझा अपमान केल्यामुळे मी तिच्यावर भयंकर चिडले. त्या प्रसंगानंतर हळूहळू सर्वकाही बदलू लागलं.”

कधी कधी आपला सगळ्यात जवळचा मित्र किंवा मैत्रीण इतर मित्रमैत्रिणींसोबत जास्त वेळ घालवू लागते तेव्हासुद्धा मैत्रीत अंतर पडते. तेरा वर्षांची बॉनी म्हणते: “माझी एक खूप चांगली मैत्रीण होती. पण, नंतर ती दुसऱ्‍या मुलींच्या एका ग्रूपमध्ये वेळ घालवू लागली आणि मग व्हायचं तेच झालं. आता ती माझ्याकडे पाहातसुद्धा नाही.” मुलेमुली तुमच्याशी मैत्री करतील; पण त्यामागे दुष्ट, स्वार्थी हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तुम्हाला कदाचित याचा अनुभवही आला असेल. आपल्या अशाच एका अनुभवाविषयी १३ वर्षांचा जो म्हणतो: “मी आणि बॉबी फार चांगले दोस्त होतो. सुरवाती-सुरवातीला मला वाटलं की त्याला माझा स्वभाव आवडतो म्हणून त्याने माझ्याशी मैत्री केली असावी. पण नंतर माझ्या लक्षात आलं, की त्यानं फक्‍त स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्याशी मैत्री केली होती. माझ्या वडिलांचा जाहिरातीचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या खेळाची आणि संगीत मैफीलीची तिकिटं मिळायची हे बॉबीला माहीत होतं आणि त्यासाठी खरं तर त्यानं माझ्याशी मैत्री केली होती.” ही गोष्ट लक्षात आल्यावर जोला कसे वाटले? जो म्हणतो: “बॉबीवर आता माझा मुळीच विश्‍वास राहिला नाही.”

गुप्त ठेवायला हवी अशी एखादी गोष्ट तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण इतरांना सांगते तेव्हा देखील मैत्रीच्या मधूर नातेसंबंधात कडवटपणा येऊ शकतो. ॲलसनचेच उदाहरण विचारात घ्या. ॲलसनने एकदा आपली मैत्रीण सेरा हिला आपल्यासोबत काम करणाऱ्‍या एका व्यक्‍तीची एक अतिशय खाजगी गोष्ट सांगितली होती. दुसऱ्‍या दिवशी सेराने त्या व्यक्‍तीसमोरच त्या गोष्टीचा उल्लेख केला. “मी अक्षरशः संतापले कारण ती इतकी वाचाळ असेल असा स्वप्नातही मी कधी विचार केला नव्हता,” असे ॲलसन म्हणते. सोळा वर्षांच्या रेचललाही असाच अनुभव आला. रेचलने आणि तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने काही खाजगी गोष्टी केल्या होत्या. पण, तिच्या मैत्रिणीने या गोष्टींची जाहीर वाच्यता केली. रेचल म्हणते: “मी पेचातच पडले. तिने माझा विश्‍वासघात केला असं मला वाटलं. पुन्हा कधी मी तिच्यापाशी मनातलं बोलेल की नाही ठाऊक नाही.”

मित्र-मैत्रिणी एकमेकांना जीव लावतात, एकमेकांचा आदर करतात आणि एकमेकांवर पूर्ण भरवसा करतात तेव्हा मैत्रीच्या त्या बंधनात भावनिक आधार मिळतो. पण, कधी कधी सगळ्यात जवळच्या मित्रांनाही तणावातून जावे लागते. म्हणूनच बायबल उचितपणे म्हणते: “जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षांहि आपणास धरून राहतो.” (नीतिसूत्रे १८:२४) आपल्या जिवलग मित्राने आपला विश्‍वासघात केला आहे हे समजल्यावर भावनिकरित्या एखादा उद्धवस्त होऊ शकतो. पण असे का होते?

मैत्रीत अंतर

कोणताही मधूर नातेसंबंध मग तो तरुणांमधला असो किंवा प्रौढांमधला असो तो नेहमीच मधूर असेल अशी अपेक्षा करता येणार नाही. त्यात काही ना काही समस्या येणारच. याकोब या येशूच्या शिष्याने लिहिले: “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरहि कह्‍यात ठेवण्यास समर्थ आहे.” (याकोब ३:२; १ योहान १:८) याकोबाने म्हटले त्याप्रमाणे सगळ्यांकडून चुका होतात. त्यामुळे कधी ना कधी एखाद्या मित्राने मनाला झोंबेल असे काही तरी बोलले किंवा केले तर नवल वाटायला नको. तुम्ही स्वतः देखील पूर्वी कधी कुणाचे मन दुखावले असेल हे विसरू नका. (उपदेशक ७:२२) मैत्रीविषयी बोलताना २० वर्षांची लीसा म्हणते: “आपण सगळेच पदोपदी चुकतो. त्यामुळे केव्हा ना केव्हा तरी आपल्याकडूनही कुणाच्या भावना दुखावल्या जातील.”

मानवी कमतरतांशिवाय इतर कारणांमुळे देखील मैत्रीत अंतर पडू शकते. तुम्ही जसजसे मोठे होता, प्रौढ होता तसतशा तुमच्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या आवडीनिवडी बदलतील. त्यामुळे, एकेकाळी एकसारख्या असलेल्या आवडीनिवडी, एकसारखे असलेले विचार आता हळूहळू बदलत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आपल्या एका जिवलग मैत्रिणीबद्दल एक तरुणी अत्यंत दुःखाने म्हणते: “आधीसारखं आम्ही एकमेकींना जास्त फोन करत नाही. आणि केलाच कधी फोन तरी कोणत्याही बाबतीत आमचे आता एकमत होत नाही.”

अर्थात, आवडीनिवडी आणि विचार एकसारखे न राहिल्यामुळे मैत्रीत अंतर येणे स्वाभाविक आहे. पण, काही लोक इतरांचे मन का दुखावतात? सहसा हेव्यामुळे असे घडते. उदाहरणार्थ, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला तुमच्या अंगच्या कलांची किंवा तुमच्या यशाची चीड येत असेल. (पडताळा उत्पत्ति ३७:४; १ शमुवेल १८:७-९.) बायबल म्हणते त्याप्रमाणे: “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.” (नीतिसूत्रे १४:३०) त्यातून ईर्षेचा आणि भांडणाचा जन्म होतो. अर्थात, कारण कोणतेही असो. एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमचे मन दुखावल्यास तुम्ही काय करू शकता?

घायाळ मनांवर फुंकर

अशी एखादी परिस्थिती उद्‌भवल्यास आपण ती कशी हाताळणार याविषयी रेचल म्हणते: “पहिल्यांदा त्या व्यक्‍तीचं मी निरीक्षण करणार आणि तिनं मला जाणूनबुजून तर दुखवलं नाही ना हे पाहणार.” तुमचा अपमान होईल असे कोणी काही बोलल्यास किंवा केल्यास भावनांच्या आहारी जाऊन तडकाफडकी काही करू नका. धीर धरा आणि त्या गोष्टीचा शांतपणे विचार करा. (नीतिसूत्रे १४:२९) अपमान झाल्यामुळे रागाने लाल होऊन तडकाफडकी प्रतिक्रिया दाखवल्यास ती समस्या खरेच सुटेल का? झाल्या गोष्टीचा शांत बसून पूर्णपणे विचार केल्यानंतर स्तोत्र ४:४ मध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन करा. तिथे असे म्हटले आहे: “पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा.” त्यानंतर मग, ‘पापांची रास झाकून टाकण्यासाठी प्रीती करा.’—१ पेत्र ४:८.

पण, ती गोष्ट काही केल्या मनातून जात नाही तेव्हा काय करता येण्यासारखे आहे? अशा वेळी त्या व्यक्‍तीशी प्रत्यक्ष बोलणेच सर्वांत चांगले राहील. तेरा वर्षांचा फ्रँक म्हणतो: “दोघांनीही समोरासमोर बसून त्या गोष्टीचा छडा लावण्यास हवा. नाही तर त्या मित्राविषयी किंवा मैत्रिणीविषयी मनात कायमची अढी राहील.” असाच एक अनुभव १६ वर्षांच्या सूसनलाही आला. ती म्हणते: “‘माझा तुझ्यावर किती विश्‍वास होता, मग तू अशी का वागलीस?’ असं आपलं मन दुखवलेल्या व्यक्‍तीला सांगणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे.” जॅकलीनचेही हेच म्हणणे आहे, की अशी समस्या सोडवण्यासाठी त्या व्यक्‍तीशी प्रत्यक्ष बोलणे केव्हाही चांगले. ती म्हणते: “त्या समस्येविषयी मी अगदी उघड-उघड बोलण्याचा प्रयत्न करते. आणि मला असं आढळून आलं आहे, की ती व्यक्‍ती सहसा मनमोकळेपणाने बोलते त्यामुळे तिथल्या तिथं समस्या सोडवणं शक्य होतं.”

अर्थात, आपल्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी रागाच्या भरात कधीही बोलू नका. बायबल म्हणते: “तापट मनुष्य तंटा उपस्थित करितो; मंदक्रोध झगडा शमवितो.” (नीतिसूत्रे १५:१८) त्यामुळे डोके शांत होईपर्यंत थांबा आणि मगच पुढचे पाऊल उचला. “सुरवातीला तुम्ही रागाने वेडेपिसे व्हाल हे मान्य; तरीही शांत राहा. व्यक्‍तीवरील तुमचा राग शमेपर्यंत थांबा. मग, त्या व्यक्‍तीशी प्रत्यक्ष बोलण्यासाठी पुढाकार घ्या आणि झाल्या गोष्टीची शांतीने चर्चा करा,” असे लिसा म्हणते.

या वाक्यातला “शांतीने” हा शब्द फार महत्त्वपूर्ण आहे. लक्षात ठेवा, तुमच्या मित्रावर शाब्दिक हल्ला करण्याचा तुमचा हेतू नाही. तर शांतीने समस्या सोडवणे आणि शक्य असल्यास पुन्हा एकवार मैत्री करणे हा तुमचा हेतू आहे. (स्तोत्र ३४:१४) तेव्हा, मनापासून बोला. “तुम्ही म्हणू शकता, ‘मी तुझी मैत्रीण आहे आणि तूही माझी मैत्रीण आहेस; पण, नक्की काय झालं हे मला जाणून घ्यायचंय,’” असे लीसा सुचवते. “आणि त्या व्यक्‍तीने तुमच्याविषयी जे काही बोललं किंवा केलं त्याचं कारण समजल्यानंतर समस्या सोडवणं सोपं होऊन जातं.”

त्या व्यक्‍तीबद्दल इथे तिथे चहाडी करून किंवा इतरांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करून सूड उगवणे साफ चुकीचे ठरेल. रोमच्या ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पौलाने लिहिले: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका.” (रोमकर १२:१७) मनाला कितीही मोठी जखम झाली असली तरी बदला घेतल्याने उलट परिस्थिती आणखीनच चिघळेल. नोरा म्हणते: “बदला घेतल्याने काहीच साध्य होत नाही. उलट मैत्री कायमची तुटते.” पण, त्याच्या अगदी उलट बिघडलेला नातेसंबंध सुधारण्याचा शक्य तितका प्रयत्न केल्याने “तुम्ही प्रौढासारखे वागलात याचे समाधान तुम्हाला मिळेल,” असे ती पुढे म्हणते

पण, समेट करून पुन्हा मैत्री करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण अगदी थंड प्रतिक्रिया दाखवत असल्यास काय? अशा वेळी, लक्षात ठेवा. सर्वांबरोबर सारखीच मैत्री करणे शक्य नसते. जुडिथ मॅक्लीस या कुटुंब सल्लागाराच्या म्हणण्यानुसार, “प्रत्येक मित्र तुमचा जिवलग मित्र बनू शकत नाही. प्रत्येकासोबत तुमचे निरनिराळे नातेसंबंध असू शकतात याची जाणीव राखा.” तरीसुद्धा, शांती किंवा समेट करण्यासाठी तुम्ही आपल्या परीने प्रयत्न केला आहे याचे समाधान तुम्हाला लाभेल. प्रेषित पौलाने लिहिले: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” (तिरपे वळण आमचे.)—रोमकर १२:१८.

अर्थात, सगळ्यात अतूट मैत्रीत देखील वादळ उठू शकते. इतरांविषयी असलेला तुमचा दृष्टिकोन न बदलता आणि तुमच्या आत्म-सन्मानाला कोणतीही ठेच न पोहंचवता तुम्हाला हे वादळ शमविता आल्यास तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल, की तुम्ही प्रौढ होत आहात. काही मित्र एकमेकांच्या ‘नाशावर’ टपलेले असले तरी बायबल आपल्याला आश्‍वासन देते, की “एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षांहि आपणास धरून राहतो.”—नीतिसूत्रे १८:२४.

[तळटीप]

^ लेखातील काही नावे बदललेली आहेत.

[१५ पानांवरील चित्रे]

जे काही घडले त्याविषयी प्रत्यक्ष बोलल्याने तुम्ही पुन्हा मैत्री करू शकता