व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोठ्या पांढऱ्‍या शार्कचे—अस्तित्व धोक्यात

मोठ्या पांढऱ्‍या शार्कचे—अस्तित्व धोक्यात

मोठ्या पांढऱ्‍या शार्कचे—अस्तित्व धोक्यात

मोठा पांढरा शार्क—मत्स्य जगतातला सर्वात मोठा मांसाहारी मासा. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा मनुष्याला या माशाची सगळ्यात जास्त भीती वाटते. तरीसुद्धा, जवळजवळ सर्व महासागरांत किंवा ऑस्ट्रेलिया, ब्राझील, नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्‍त संस्थानेच्या काही महासागरांत; इतकेच नाही तर भूमध्य सागरातही माशाच्या या जातीचे संरक्षण केले जाते. आणि आता तर इतर देश आणि राज्ये देखील माशाच्या या जातीचे संरक्षण करण्याच्या हेतूने ठोस पावले उचलत आहेत. पण, मनुष्यावर हल्ला करणारा हिंस्र प्राणी अशी ख्याती असलेल्या या माशाचे संरक्षण करण्यासाठी इतकी खटपट का? अर्थात, हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाही. शिवाय, पांढऱ्‍या शार्कविषयी लोकांची जी काही मते आहेत तीसुद्धा वस्तुस्थितीला धरून नाहीत.

हिंसक देवमासा आणि स्पर्म व्हेल यांच्याप्रमाणेच मोठा पांढरा शार्क * देखील सर्वात प्रमुख शिकारी मासा आहे. त्यामुळेच शार्क विश्‍वाच्या या राजाला सुपरशार्क देखील म्हटले जाते. मासे, डॉल्फीन्स, इतर जातीचे शार्क असे काहीही हा पांढरा शार्क फस्त करतो. पण, जसजसे त्याचे वय होते, तसतसा तो स्थूल होतो आणि त्याची चपळाई कमी होते. त्यामुळे मग सील, पेंग्विन आणि मृत प्राणी (खासकरून मृत व्हेल) यांवर त्याला भागवावे लागते.

बरेच शार्क मासे अन्‍न शोधण्यासाठी आपल्या संवेदनांचा आणि उत्तम दृष्टीचा उपयोग करतात. त्यांच्या तीव्र गंधज्ञानाविषयी बोलायचे तर ‘पाण्यात पोहणारं नाक’ हे रुपक त्यांना अगदी चपखल बसण्यासारखे आहे! पण, गंधज्ञानासोबतच त्यांची श्रवणशक्‍तीही इतकी तीक्ष्ण असते की ‘पाण्यात पोहणारे कान’ असे त्यांना म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरणार नाही.

याचे कारण, शरीराच्या बाजूंवर असलेल्या त्याच्या कानांना दाब-संवेदक पेशी असतात. त्यामुळे पाण्यातल्या किंचितशा हालचालीमुळे देखील (उदाहरणार्थ, भाल्याच्या टोकापाशी तडफडणाऱ्‍या माशाच्या हालचालीमुळे) पाण्यात निर्माण होणारे हरएक कंपन त्याला टिपता येते. आणि मग तो झटक्यात आपल्या भक्ष्यावर तुटून पडतो. म्हणूनच, भाल्याच्या साह्‍याने मासे पकडणाऱ्‍या कोळ्यांना एखादा जखमी, भळभळता मासा शक्य तितक्या लवकर पाण्यातून बाहेर काढणे शहाणपणाचे वाटते.

शार्क माशांमध्ये याशिवाय आणखीन एक ज्ञानेंद्रिय असते. त्याला ॲम्पूले ऑफ लॉरेन्सीनी म्हणतात. नाकावर सर्वत्र विखुरलेल्या या सूक्ष्म नलिका हृदयाच्या ठोक्यांतून, कल्ल्यांच्या हालचालींवरून किंवा पोहणाऱ्‍या संभाव्य भक्ष्याच्या स्नायूंतून उत्पन्‍न होणारे मंद विद्युत क्षेत्र ओळखू शकतात. किंबहुना, शार्क माशाचे हे सहावे ज्ञानेंद्रिय इतके संवेदनशील असते, की पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि महासागर यांच्यातील आंतरक्रिया देखील ते अचूकपणे टिपू शकते. आणि यावरूनच उत्तर दिशा अथवा दक्षिण दिशा कोणती हे देखील शार्क माशांना समजत असावे.

पांढऱ्‍या शार्कला कसे ओळखाल

या माशाला सर्वसामान्यपणे मोठा पांढरा मासा म्हणत असले तरी वास्तवात फक्‍त त्याचे पोट पांढरे अथवा फिकट पांढरे असते. पाठ सहसा राखाडी रंगाची असते. माशाच्या दोन्ही बाजूंवर जिथे हे दोन रंग एकात एक मिसळतात त्या ठिकाणी एक अनियमित अशी किनार तयार होते. प्रत्येक शार्क माशाच्या अंगावरील ही किनार एकसारखीच असते असे नाही. यामुळे त्यांना लपणे शक्य तर होतेच; शिवाय, वैज्ञानिकांना निरनिराळ्या शार्कची ओळखही पटते.

शार्क मासा किती मोठा असतो? ग्रेट व्हाईट शार्क या पुस्तकानुसार, “सर्वात मोठे पांढरे शार्क १९ ते २१ फूट मोठे असतात.” एवढ्या मोठ्या माशांचे वजन २,००० किलोंहून अधिक असू शकते. पाणबुडीसारख्या वाटणाऱ्‍या त्याच्या शरीराच्या पुढच्या भागावरील त्रिकोणी पर किंचित मागे वळणारे असतात. त्यामुळे शार्क मासे अतिशय जड असूनही मिसाइलसारखे अगदी वेगाने पोहू शकतात. जवळजवळ सममित असलेली त्यांची सशक्‍त शेपटी देखील शार्क जगतात आढळणारी एक विरळ गोष्ट आहे. कारण शार्कच्या बहुतेक जातींच्या शेपट्या असममित असतात.

पांढऱ्‍या शार्कची प्रमुख आणि भयंकर अशी आणखी काही वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे अवाढव्य निमुळते डोके, त्याचे भावनाशून्य डोळे आणि रेझरसारख्या धारदार, दंतूर, त्रिकोणी दातांचा जबडा. दुधारी तलवारीसारखा धारदार असलेला त्याचा एखादा दात तुटला किंवा गळून पडला तर मागचा दात त्याची जागा घेतो.

उष्ण रक्‍तामुळे ताकदवान

लॅमनीडे जातीच्या शार्कची अभिसरण संस्था इतर बहुतेक शार्क माशांपेक्षा फार वेगळी असते. मॅको, पोबीगल आणि पांढरा शार्क हे या जातीचे काही शार्क मासे आहेत. त्यांचे रक्‍त तापमान ५ ते १० डिग्री फॅरनहाइट म्हणजे जल तापमानापेक्षा अधिक असते. उष्ण रक्‍तामुळे अन्‍नपचन लवकर होते; शिवाय, त्यामुळे त्यांना ताकद मिळते व त्यांची सहनशक्‍तीही वाढते. ट्यूनासारख्या महासागरातील चपळ माशांवर जगणारा मॅको हा ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने पोहू शकतो.

शार्क मासे पोहतात तेव्हा छातीवरील दोन पर्वांमुळे ते हलकेच उचल खातात. ते अतिशय मंद गतीने पोहू लागले तर (त्यांच्या यकृतामध्ये उद्धरण-प्रवर्तक तेलाचा साठा असताही) ते डळमळतात आणि एखाद्या जहाजासारखे शेवटी पाण्यात बुडतात. त्यांच्या यकृतामध्ये असलेला तेलाचा हा साठा इतका मोठा असतो, की शार्कच्या एकूण वजनाच्या तुलनेत एकतृतिअंश तेल असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शार्कच्या अनेक जातींना पोहताना तोंडावाटे व कल्ल्यांतून ऑक्सीजनयुक्‍त पाण्याचा पुरवठा होतो. तेव्हा त्यांना सतत पोहत राहावे लागते. आणि यामुळेच त्यांचे भयानक तोंड नेहमी उघडे असते.

नरभक्षक?

सध्या ज्ञात असलेल्या शार्कच्या ३६८ जातींपैकी केवळ २० जाती खरं घातक आहेत. यांपैकी देखील केवळ चार जाती जगभरात दरवर्षी मानवांवर होणाऱ्‍या काही १०० हल्ल्यांसाठी सर्वाधिक जबाबदार आहेत. या हल्ल्यांपैकी सुमारे ३० हल्ले जीवघेणे होते. मनुष्यावर हल्ला करणाऱ्‍या त्या चार जाती म्हणजे बुल शार्क (दुसऱ्‍या कोणत्याही शार्कपेक्षा या माशाने सर्वात जास्त प्रमाणात माणसांचा बळी घेतला आहे), टायगर शार्क, समुद्रातला व्हाईटटीप शार्क आणि पांढरा शार्क.

आश्‍चर्य म्हणजे शार्क माशांच्या हल्ल्याला बळी पडलेले कमीतकमी ५५ टक्के आणि काही भागांत तर सुमारे ८० टक्के लोक त्यांच्यावर आलेला बाका प्रसंग सांगण्यासाठी अद्याप जिवंत आहेत. पण, या प्राणघातक हिंस्त्र प्राण्याच्या तावडीतून हे लोक सहीसलामत सुटले कसे?

शार्कची हल्ला करण्याची पद्धत

असे म्हटले जाते, की पांढरा शार्क आपल्या भक्ष्याचा किंवा मनुष्याचा सर्व जिवानिशी, जबरदस्त चावा घेतो आणि मग भक्ष्याला सोडून देतो. मग, जखमी झालेल्या व्यक्‍तीचा फडशा पाडण्यासाठी व्यक्‍ती मरेपर्यंत तो थांबून राहतो. यामुळे एखाद्या व्यक्‍तीला आपला जीव वाचवण्याची संधी मिळते. काही धाडसी साथीदारांनी काही वेळा नेमके हेच केले आहे. यावरून, पोहताना नेहमी सोबतीला कोणी असणे किती सुरक्षित असते हे सिद्ध होत नाही का?

पण, पांढऱ्‍या शार्कचा आणखीन एक स्वभावधर्म आहे. हा गुणधर्म नसता तर जीव वाचवण्याचे एखाद्याचे सर्व प्रयत्न वाळूत पाणी ओतल्यासारखे निष्फळ ठरले असते. तो स्वभावधर्म म्हणजे रक्‍ताच्या वासाने इतर शार्क जसे रक्‍तपिपासू बनतात तसे पांढऱ्‍या शार्कच्या बाबतीत घडत नाही. पण, आधी चावा घ्यायचा मग भक्ष्याला सोडून द्यायचे ही पद्धत पांढरा शार्क का अवलंबितो?

वैज्ञानिकांच्या मते, खासकरून आपल्या डोळ्यांसाठी शार्क या पद्धतीचा अवलंब करतो. इतर शार्क माशांना असते तसे पांढऱ्‍या शार्कच्या डोळ्यांना पापणीसारखे कोणतेही संरक्षक आवरण नसते. तेव्हा कोणत्याही गोष्टीशी अथवा वस्तूशी त्याची टक्कर होण्याच्या बेतात असते तेव्हा त्याचे डोळे खाचेत गरगर फिरू लागतात. आणि टक्कर होते तेव्हा सीलसारख्या प्राण्यांना पंजांनी शार्कचे डोळे ओरबाडणे सहजशक्य होते. या कारणास्तव, पांढरा शार्क आधी पटकन एक जबरदस्त चावा घेतो आणि मग आपल्या भक्ष्याला सोडून देतो.

हेही लक्षात असू द्या, की पांढरे शार्क भक्ष्याची प्रथम पारख करण्यासाठी लहान मुलांप्रमाणे कोणतीही गोष्ट पटकन तोंडात घालतात. “पण, दुःखाची गोष्ट म्हणजे [पारख करण्यासाठी] भक्ष्याचा जबरदस्त चावा घेतला जातो तेव्हा हा प्रसंग जिवावर बेतण्याची शक्यता असते,” असे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी भागाचे समुद्र-जीवन शास्त्रज्ञ जॉन वेस्ट यांनी सांगितले.

पांढरा शार्क अत्यंत हिंस्त्र आणि घातक जलचर प्राणी असला तरी मनुष्याच्या मांसासाठी वखवखणारा राक्षस नाही. पाण्यात ६,००० तास घालवलेल्या एका समुद्री-शंख (एबोलोन) पाणबुड्याने फक्‍त दोन पांढरे शार्क पाहिले. पण, त्यांतल्या एकानेही त्याच्यावर हल्ला चढवला नाही. उलट, पांढरा शार्कच मनुष्यापासून पळ काढत असल्याचे बरेचदा दिसून आले आहे.

केप व्हर्ड बेटांपासून दूर एका समुद्रात संशोधन करताना झॅकी-व कॉस्ट्यू आणि त्याच्या एका सोबत्याची अचानक एका अक्राळविक्राळ पांढऱ्‍या शार्कशी गाठ पडली. कॉस्ट्यू म्हणतात: “आम्ही स्वप्नातसुद्धा अपेक्षा केली नव्हती अशी प्रतिक्रिया त्यानं दाखवली. आम्हाला पाहून तर तो राक्षस अक्षरशः ढीगच्या ढीग मलउत्सर्जित करून आणि जीव मुठीत घेऊन आमच्यापासून कितीतरी दूर अतिशय वेगाने निघून गेला.” कॉस्ट्यूने शेवटी म्हटले: “पांढऱ्‍या शार्कसंबंधी आम्हाला आलेल्या अनुभवाचा पुन्हा विचार करताना लोकांच्या मनातला पांढरा शार्क आणि आम्ही प्रत्यक्षात पाहिलेला पांढरा शार्क यांच्यात किती मोठा फरक आहे या विचाराने आम्ही अक्षरशः स्तिमित झालो.”

भक्षक खुद्द भक्ष्य बनतो तेव्हा

सत्तरीच्या दशकात प्रकाशित केलेल्या जॉस नामक कादंबरीमध्ये (या कादंबरीवर नंतर एक लोकप्रिय चित्रपटही निघाला) या माशाचे अगदी मीठमसाला लावून वर्णन केले होते आणि या जलचर प्राण्याविषयी लोकांच्या मनात दहशतीचे चित्र उमटले. त्यानंतर रातोरात पांढरा शार्क एक दुष्ट, हिंस्त्र प्राणी बनला आणि “या नरभक्षकाची शिकार करून बक्षिसे मिळवण्यासाठी आणि सजावटीची वस्तू म्हणून त्याचे धड अथवा जबडा आपल्या घरात भिंतींवर लावण्याच्या हेतूने शिकाऱ्‍यांमध्ये जिवघेणी चढाओढ सुरू झाली,” असे ग्रेट व्हाईट शार्क पुस्तक म्हणते. काही काळानंतर, आस्ट्रेलियामध्ये पांढऱ्‍या शार्कच्या एका दातामागे १,००० डॉलर मिळू लागले तर त्याच्या जबड्यामागे २०,००० डॉलर.

पण, बहुतेक पांढरे मासे मत्सोद्योगासाठी पकडले जातात. त्याशिवाय, दर वर्षी असंख्य शार्क मासे त्यांच्या शरीराच्या विविध अंगांपासून (खासकरून त्याच्या परांपासून) बनणाऱ्‍या वस्तूंसाठी पकडले जातात. अलीकडच्या काही वर्षांत त्यांची आणि खासकरून पांढऱ्‍या शार्कची संख्या रोडावल्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

त्यांच्याबद्दलची माहिती प्रकाशात येत आहे

शार्क मासे समुद्रातल्या सर्व आजारी, मरणाला टेकलेल्या, मेलेल्या प्राण्यांना फस्त करत असल्यामुळे ते एका अर्थी समुद्र स्वच्छ करत असतात. तेव्हा, शार्क माशांची जितकी अधिक संख्या तितके महासागरातले पाणी स्वच्छ आणि आरोग्यदायी.

सध्या निरनिराळ्या कारणांमुळे शार्क माशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे हे लक्षात घेऊन द स्पीशीज सर्व्हायवल कमिशन ऑफ दी इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्सरव्हेशन ऑफ नेचर या संघटनेने शार्क विश्‍वाच्या विविध समस्यांचा सखोल अभ्यास करण्याकरता शार्क तज्ज्ञ मंडळाची नेमणूक केली आहे. पण, पांढऱ्‍या शार्कचा अभ्यास करणे वाटते तितके सोपे नाही. कारण एक तर त्यांचे प्रजननाचे प्रमाण फार कमी आहे. दुसरे म्हणजे बंदिस्त अवस्थेत ते जास्त दिवस जिवंत राहत नाहीत. यास्तव, त्यांच्या राहत्या ठिकाणातून त्यांना बाहेर न काढता तिथल्या तिथेच त्यांचा अभ्यास करावा लागतो.

शार्क माशांविषयीची बरीच माहिती आता प्रकाशात आल्यामुळे या लक्षवेधक जलचर प्राण्यासंबंधी लोकांच्या विचारसरणीत बराच फरक पडला आहे. पण, मोठ्या पांढऱ्‍या शार्कमध्ये काहीएक फरक पडलेला नाही. तो एक क्रूर राक्षस नसला तरी एक भयानक जलचर प्राणी जरूर आहे. तेव्हा त्याच्याशी जरा जपूनच वागावे. होय, अतिशय जपून!

[तळटीपा]

^ मोठा पांढरा शार्क किंवा पांढरा शार्क याला अनेक नावांनी ओळखले जाते. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामध्ये त्याला व्हाईट पॉइंटर म्हणतात; तर दक्षिण आफ्रिकेत त्याला ब्लू पॉइंटर म्हणतात.

[११ पानांवरील चित्र]

शार्क माशाचा जबडा अतिशय मोठा आणि भयानक असतो

[१० पानांवरील चित्राचे श्रेय]

Photos by Rodney Fox Reflections

South African White Shark Research Institute