व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंग टोचणे उचित आहे का?

अंग टोचणे उचित आहे का?

तरुण लोक विचारतात . . .

अंग टोचणे उचित आहे का?

“मुलामुलींनी ओठांवर आणि अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी टोचून त्यात रिंगा किंवा स्टड्‌स घातलेलं मी पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा मला वाटलं, ‘अरे! हे काहीतरी खास दिसतंय.’”—लीझा.

फक्‍त लीझालाच नव्हे तर पुष्कळ तरुणांना असंच वाटतं. हल्लीचे तरुण भुवया, जीभ, ओठ, नाभी अशा शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी टोचून त्यात रिंगा किंवा स्टड्‌स घालतात. या प्रथेला बॉडी पिअरसिंग (अंग टोचणे) म्हणतात. *

हीदर नावाच्या एका १६ वर्षांच्या मुलीला अंग टोचून घेण्याची पद्धत फारच आवडली. तिला असं ठामपणे वाटतं की, तिने नाभी टोचून त्यात रिंग अडकवली तर ती “एकदम खास” दिसेल. एकोणीस वर्षांच्या ज्योने तर केव्हाच आपल्या जीभेत एक बारबेलसारखा अलंकार घातला. दुसऱ्‍या एकीने, लोकांच्या “नजरा तिच्याकडे वळाव्यात आणि त्यांना धक्का बसावा” म्हणून आपली भुवई टोचून घेतली आहे.

अंग टोचून त्यात अलंकार घालणे ही काही नवीन प्रथा नाही. बायबल काळातसुद्धा रिबका नावाच्या एका स्त्रीने नथनी घातली होती. (उत्पत्ति २४:२२, ४७) ईजिप्तमधून बाहेर पडणाऱ्‍या इस्राएली लोकांनी कानात दागिने घातले होते. (उत्पत्ति ३२:२) परंतु हे दागिने कसे घातले होते म्हणजे कान किंवा नाक टोचून घातले होती की काय हे ठाऊक नाही. विश्‍वासू दास-दासींचे कान टोचले जायचे; अर्थात, हे त्यांच्या मालकांना विश्‍वासू राहिल्याचे प्रतीक होते. (निर्गम २१:६) टोचण्याची प्रथा इतर प्राचीन संस्कृतींमध्येही अनुसरली जात होती. ॲझ्टेक आणि माया या लोकांच्या संस्कृतीत धार्मिक कारणांसाठी जीभ टोचून घेत. आफ्रिकन लोकांमध्ये आणि दक्षिण अमेरिकन इंडियन्समध्ये आजही ओठांना छिद्र पाडण्याची रीत प्रचलित आहे. नाकात दागिने घालणे हे मेलानेशियन, भारतीय व पाकिस्तानी लोकांमध्येही रूढ आहे.

अलीकडच्या काही वर्षांपर्यंत, पाश्‍चात्त्य देशांमध्ये स्त्रिया फक्‍त आपले कान टोचत होत्या. पण आता किशोरवयीन, तरुण मुली आणि मुलंसुद्धा अंगावर वाटेल तेथे टोचून त्यात अलंकार घालत आहेत.

टोचून घेण्याचे कारण?

पुष्कळजण, सगळे करतात म्हणून किंवा फॅशन आहे म्हणून टोचून घेतात. इतरांना वाटतं की, टोचून घेतल्यानं त्यांच्या सौंदर्यात भर पडेल. खरं तर, हे वेड सुप्रसिद्ध मॉडेल, स्पोट्‌र्स स्टार्स आणि लोकप्रिय संगीतकारांमुळे पसरलं आहे. काही तरुण, आपण स्वतंत्र आहोत हे दाखवण्यासाठी, आपली वेगळी ओळख बनवण्यासाठी किंवा आम्ही कोणीतरी खास आहोत असं सिद्ध करण्यासाठी अंग टोचून घेतात. स्तंभलेखक जॉन लीओ म्हणतात: “अंगावर ठिकठिकाणी टोचून घेण्यामागे पालक चिडावेत आणि मध्यमवर्गीयांना धक्का बसावा हीच मुख्य ध्येयं असतात.” असमाधान, वेगळेपणा, उद्दामपणा, बंडखोर वृत्ती हे सर्व अशा वागणुकीला कारणीभूत असतात.

काही युवक मानसिक किंवा भावनिक कारणांमुळे अंग टोचून घेतात. काहींना वाटतं की, अंग टोचल्याने त्यांचा आत्म-विश्‍वास वाढतो. बालपणी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या काही युवकांना असं वाटतं की अशाने ते स्वतःच्या शरीरावर आपला अधिकार दाखवू शकतात.

शरीराला अपायकारक

परंतु अंग टोचण्याचे सर्वच प्रकार सुरक्षित आहेत का? अनेक डॉक्टरांच्या मते त्यातले काही प्रकार अपायकारक आहेत. स्वतःहून अंग टोचून घेणे तर निश्‍चितच हानीकारक आहे. काहीवेळा पेशेवाईक लोकांकडूनही टोचणे धोक्याचे ठरू शकते. पुष्कळांना नीटसं प्रशिक्षण मिळालेलं नसतं; त्यांनी आपल्या मित्रांकडून किंवा मासिकांमधून किंवा व्हिडिओ पाहून कसं टोचायचं ते शिकून घेतलेलं असतं. त्यामुळे, स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांच्या पद्धती ठीक नसतात किंवा अंग टोचण्यामध्ये कोणते धोके आहेत हेसुद्धा त्यांना ठाऊक नसतं. अंग टोचून देणाऱ्‍या अनेकांना तर शरीरशास्त्राचं धड ज्ञानही नसतं. ही काही क्षुल्लक गोष्ट नाही, कारण चुकीच्या ठिकाणी टोचल्याने अत्याधिक रक्‍तस्राव होऊ शकतो. चुकून शीरेवर टोचल्याने तर कायमची हानी पोहंचू शकते.

आणखी एक गंभीर धोका आहे संसर्ग होण्याचा. निर्जंतुक न केलेल्या साधनांचा टोचण्याकरता उपयोग केल्यामुळे हेपटायटिस, एड्‌स, क्षयरोग आणि धनुर्वातासारखे प्राणघातक रोगही होऊ शकतात. याचा अर्थ निर्जंतुक पद्धतींनी टोचून घेतल्यास काळजी करण्याचे कारण नाही असे समजू नका; त्यानंतरही संसर्ग होऊ शकतो. उदाहरणार्थ, नाभी टोचलेली असेल, तर सतत त्यावर कपडे घासल्याने टोचलेल्या ठिकाणची जखम चिघळू शकते. आणि अशी जखम बरी व्हायला कधी कधी आठ-नऊ महिने देखील लागू शकतात.

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कानाच्या वरच्या बाजूला किंवा नाक टोचणं हे कानाच्या पाळीला टोचण्यापेक्षा जास्त हानीकारक असतं. अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ फेशिअल प्लास्टिक ॲण्ड रिकंस्ट्रक्टिव्ह सर्जरीच्या एका वृत्तपत्रात म्हटलं होतं: “कानाच्या वरच्या बाजूला अनेक छिद्र करणे तर विशेषकरून एक मोठी समस्या आहे कारण गंभीर प्रकारचे संसर्ग झाल्याने संपूर्ण कानालाच कायमची हानी पोहंचू शकते. नाकाच्या भागातला संसर्ग जवळपासच्या रक्‍त पेशींमध्ये आणि मेंदूपर्यंतही पोहंचू शकतो.” त्या वृत्तपत्रात शेवटी असे म्हटले आहे: “खरे तर, कानाची पाळी सोडून दुसरीकडे कोठेही [टोचून] घेतले जाऊ नये.”

इतर अपाय म्हणजे, डागणे आणि दागिन्यांची अलर्जी. स्तनासारख्या नाजूक ठिकाणी रिंगा घातल्या असतील तर कपड्यांमध्ये अडकल्यामुळे किंवा ओढले गेल्यामुळे टोचलेला भाग सहजासहजी फाटू शकतो. आणि एखाद्या तरुणीच्या स्तनावर अशाप्रकारे इजा झाल्यास दूध वाहिन्या बंद पडू शकतात. शिवाय, तिने यावर काहीच उपचार केला नाही तर भविष्यात तिला आपल्या बाळाला दूध पाजताना त्रास होऊ शकतो किंवा तिला कधीच दूध पाजता येणार नाही.

अमेरिकन डेंटल असोसिएशनने अलीकडेच तोंडाच्या कोणत्याही भागाला टोचणे हा आरोग्यासाठी धोका आहे असे घोषित केले. जसे की, दागिना घशात अडकल्यामुळे श्‍वास बंद होणे, जीभ बधीर होणे किंवा चव घेण्याची क्षमताच नष्ट होणे, दीर्घ काळापर्यंत रक्‍तस्राव होणे, दागिना दातांखाली आल्यामुळे दात तुटणे किंवा मोडणे, सतत थुंकी येणे, लाळ गळणे, हिरड्यांना इजा होणे, तोतरेपणासारखा वाचा विकार निर्माण होणे, श्‍वास घेताना, चावताना, गिळताना अवघड जाणे असे अनेक त्रास होऊ शकतात. केंड्रा नावाच्या एक तरुणीने आपली जीभ टोचून घेतली तेव्हा तिची जीभ “फुग्यासारखी टंब सुजली.” यात आणखी भर म्हणजे, ज्याच्याकडून केंड्राने जीभ टोचली होती त्या व्यक्‍तीने हनुवटीत अडकवण्याचे स्टड तिच्या जीभेत अडकवले होते; त्यामुळे तिची जीभ चिरली गेली होती. तिला बोलताच येत नव्हते.

इस्राएलांनी आपल्या शरीरांबद्दल आदर दाखवावा आणि कोणत्याही प्रकारे शरीराला इजा करू नये असे देवाने त्यांना शिकवले होते. (लेवीय १९:२८; २१:५; अनुवाद १४:१) आज, ख्रिस्ती लोक मोशेच्या नियमशास्त्राला बांधील नसले, तरीही आपल्या शरीरांबद्दल आदर दाखवण्याची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. (रोमकर १२:१) तर मग, शरीराला काही अपाय होऊ न देणे शहाणपणाचे नाही का? अर्थात, आरोग्य राखणे हेच या सर्व दक्षतेमागचे कारण नाही; इतरही काही कारणे विचारात घेतली पाहिजेत.

कोणती वृत्ती प्रदर्शित होते?

अंग टोचण्याच्या प्रथेविषयी बायबलमध्ये काही स्पष्ट नियम दिलेला नाही. मात्र आपण “भिडस्तपणाने व मर्यादेने” स्वतःला शोभवावे असे प्रोत्साहन बायबलमध्ये दिले आहे. (१ तीमथ्य २:९) जगाच्या एका भागात कदाचित एक गोष्ट सभ्यपणाची मानली जात असेल, पण तुमच्या स्थानिक परिसरात याविषयी काय दृष्टिकोन आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जगाच्या एका भागात स्त्रियांचे कान टोचणे सर्वसामान्य गोष्ट असेल. परंतु तीच गोष्ट दुसऱ्‍या एखाद्या देशात किंवा संस्कृतीत स्वीकारली जात नसेल.

पुरुषांनी शरीरावर ठिकठिकाणी टोचून घेणे किंवा कानात दागिने घालणे ही नामांकित लोकांमध्ये लोकप्रिय प्रथा असली, तरी पाश्‍चात्त्य देशांमध्ये या प्रथेला जनसामान्यांमध्ये स्वीकृती मिळालेली नाही. याचे एक कारण म्हणजे, कैदी, मोटारसायकल गँगचे सदस्य, पंक रॉकर्स आणि समलिंगी लोक अशाप्रकारे शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी टोचून घेतात. अनेक लोक, आपण वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी किंवा बंडखोर वृत्ती दाखवण्यासाठी अंग टोचून घेतात. पण, प्रत्येकालाच हा प्रकार आवडतो असे नाही; काहींना असला पेहराव पाहून किळस येते किंवा तिटकारा वाटतो. ॲश्‍ली नामक एक साक्षीदार मुलगी म्हणते: “माझ्या वर्गात एक मुलगा आहे, त्याने अलीकडेच नाक टोचून घेतलंय. त्याला वाटतं की तो खूप ग्रेट दिसतो. मला तर त्याला पाहून किळस येते!”

म्हणूनच, अमेरिकेतल्या एका सुप्रसिद्ध दुकानात, ग्राहकांशी थेट संपर्क असलेल्या कर्मचाऱ्‍यांकरता असा नियमच केला आहे की, त्यांनी कानात एकच अलंकार घालावा. शिवाय, शरीराच्या इतर भागांवर नजरेस पडेल असे कोठेही टोचलेले नसावे. याविषयी एका कंपनीतली स्त्री-प्रतिनिधी म्हणते की, “ग्राहकांची काय प्रतिक्रिया असेल हे सांगता येत नाही.” व्यवसाय मार्गदर्शकांचेही असेच म्हणणे आहे की, नोकरीसाठी मुलाखतीला जाणाऱ्‍या विद्यालयीन मुलांनी “कानातले घालू नये किंवा अंगावर कोठेही टोचून घेऊ नये; आणि मुलींनी . . . नाकात रिंगा घालू नयेत.”

विशेषतः, तरुण ख्रिश्‍चनांनी आपल्या पेहरावाबद्दल, स्वरूपाबद्दल दोनदा विचार करावा; खासकरून प्रचाराला जाताना. आपल्या ‘सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून ते कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण’ होऊ इच्छित नाहीत. (२ करिंथकर ६:३, ४) टोचून घेण्याविषयी तुमचे स्वतःचे काही मत असेल; परंतु तुमचा पेहराव म्हणजे तुमची मनोवृत्ती आणि जीवनशैली यांचे प्रतिबिंब असते हे लक्षात ठेवा. तर मग, तुम्हाला स्वतःची कोणती प्रतिमा बनवायची आहे?

शेवटी तुम्हाला आणि तुमच्या पालकांनाच निर्णय घ्यायचा आहे. बायबलचा असा उचित सल्ला आहे की, “हे जग तुम्हाला त्याच्या साच्यात कोंबण्याचा प्रयत्न करील; पण तुम्ही त्यात कोंबले जाऊ नका.” (रोमकर १२:२, फिलिप्स) कारण, तुम्हालाच परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.

[तळटीप]

^ पुष्कळशा देशांमध्ये सर्वसाधारणपणे आणि सांस्कृतिकरित्या समाजमान्य असलेल्या पद्धतींबद्दल आम्ही या लेखात बोलत नाही. तर आजकाल अंग टोचण्याच्या अतिरेकी फॅडबद्दल आम्ही येथे बोलत आहोत.—पाहा मे १५, १९७४ चे टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे ३१८-१९.

[१४ पानांवरील चित्रे]

अंग टोचून घेण्याचं फॅड युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे