व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

मिच चक्रीवादळ “जीवघेण्या वादळातून निभाव!” (जुलै ८, १९९९) या प्रेरणादायक लेखासाठी तुमचे अगदी मनापासून आभार मानू इच्छिते. मला सहसा इ-मेलद्वारे आपल्या बांधवांवर आलेल्या विपत्तींविषयी कळते; पण त्यातली केवढी माहिती खरी असते ते देवच जाणे. सदर लेखात दिलेली माहिती वाचून फार प्रोत्साहन मिळाले. आपण कठीण काळात राहत आहोत याचीच ही आठवण आहे.

सी. पी., अमेरिका

या विपत्तीत कित्येकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले याचे दुःख तर आहेच, पण या गरजवंतांच्या मदतीकरता जीवाची पर्वा न करणाऱ्‍या आपल्या बांधवांबद्दल वाचून फार आनंद झाला. त्या लेखात दिलेल्या एका फोटोत एक बांधव आपल्या पडक्या घरासमोर उभा असलेला दाखवला आहे. तो फोटो पाहिल्यावर मी विचार करत होतो की, माझ्याजवळ तर सगळेकाही आहे, तरीदेखील मी का तक्रार करीत असतो?

आर.सी.एन., ब्राझील

घातक जीवन-शैली गेल्या काही महिन्यांपासून माझी तब्येत ठीक नव्हती. पण, आपली जीवन-शैली बदलून आपण आपली प्रकृती सुधारू शकतो हे ऐकून मला बरे वाटले. “तुमची जीवन-शैली घातक आहे का?” (ऑगस्ट ८, १९९९) ही लेखमाला वाचल्यावर मला असे जाणवले की, मी काही पदार्थ खाण्याचे कमी करायला हवे आणि त्याऐवजी माझ्या आहारात फळे व भाज्या यांचे प्रमाण वाढवायला हवे.

इ.पी.एम., ब्राझील

उशिरा दिसणारे परिणाम “कित्येक वर्षांनंतर अंकुरलेलं बीज” (ऑगस्ट ८, १९९९) हा लेख वाचून मला प्रोत्साहन मिळाले. मला पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरून आता तीन वर्षे झाली आहेत. मला ज्यावेळी माझ्या अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळत नाहीत तेव्हा मी निराश होते आणि ही सेवा सोडून द्यावी असे वाटते. पण हा लेख वाचल्यापासून मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करते आणि बाकीचे यहोवावर सोडून देते.

टी. एन., जपान

थट्टेचा बळी जुलै ८, १९९९ अंकातला “तरुण लोक विचारतात . . . थट्टेचा सामना मी कसा करू शकतो?” हा लेख मला फारच आवडला. सुरवातीपासूनच माझ्या वर्गातली मुलं माझ्या विश्‍वासाबद्दल मला अनेक प्रश्‍न विचारून भंडावून सोडत असत. काहीवेळा त्यांच्या प्रश्‍न विचारण्याच्या पद्धतीमुळे मला फार वाईट वाटायचं. पुष्कळदा तर मी चिडलेसुद्धा. पण आता मला समजलं की ह्‍या आपल्या विश्‍वासाच्या परीक्षा आहेत. आणि शाळेत सगळेच माझी थट्टा करतात असे नाही, पुष्कळांनी माझे ऐकलेसुद्धा आहे.

एल. सी., अमेरिका

मी धार्मिक उत्सवांमध्ये किंवा देशभक्‍तीच्या समारंभांमध्ये भाग घेत नाही म्हणून माझीसुद्धा थट्टामस्करी केली जाते. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणामुळे आणि बायबलच्या नैतिक दर्जांना अनुसरून राहिल्यामुळेही मला फार त्रास देण्यात आला आहे. अशावेळी अचूक ज्ञानामुळे मला माझी बाजू मांडायला मदत मिळाली. त्यामुळे मला माझ्या विश्‍वासांबद्दल अगदी निरडतेने लोकांशी बोलता आले आहे.

एच. सी., झांबिया

सध्या मी ५० शीची आहे, तरीसुद्धा खास तरुणांसाठी लिहिलेला हा लेख मला फार आवडला. काहीवेळा सेवाकार्यात येणाऱ्‍या विरोधामुळे आपण चिडतो आणि विरोध करणाऱ्‍याला सडेतोड उत्तर द्यावेसे वाटते. म्हणूनच, त्या लेखात ज्याचे स्मरण करून दिले ते मला विशेष आवडले, त्यात म्हटले होते की, “एखादे अपमानकारक उत्तर मग वरवरून ते कितीही विनोदी वाटत असले तरी त्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे होईल; म्हणजे आणखीन थट्टा करण्याला वाव मिळेल.” माझ्यावर असे प्रसंग येतात तेव्हा मी उलटे उत्तर देत आहे असे न भासवता माझी बाजू मांडते. आणि या लेखात पुन्हा एकदा आठवण करून दिल्यामुळे मला अशी खात्री पटली आहे की मला असेच करत राहण्याची गरज आहे.

ए. एफ., अमेरिका

दीर्घायुषी व्हावे तुम्ही सादर केलेल्या “दीर्घायुषी आणि निरोगी कसे व्हावे” (सप्टेंबर ८, १९९९) या उत्तम लेखमालेबद्दल आभार मानल्याशिवाय मला राहावले नाही. आता मला सरासरी आयुर्मर्यादा आणि अपेक्षित आयुर्मर्यादा यांच्यातला फरक कळाला. शिवाय, म्हातारपणात चांगले आरोग्य टिकवण्यासाठी जे आवश्‍यक सल्ले त्यात दिले आहेत त्याद्वारे मी माझ्या ८८ वर्षांच्या आजोबांची मदत करू शकतो; कारण ते नेहमीच स्वतःची कीव करत असतात.

टी. एन., अमेरिका

ऐकणारा कुत्रा “श्‍वान माझं श्रवणयंत्र!” (ऑगस्ट ८, १९९९) या लेखाबद्दल तुमचे मी आभार मानू इच्छिते. कर्णबधिर लोकांना किती गंभीर अडीअडचणींना तोंड द्यावे लागते हे कळाल्यावर त्यांना समजून घेण्यास मला मदत मिळाली आहे. मला स्वतःला कुत्र्यांचं वेड आहे. कुत्रीसुद्धा लोकांना मदत आणि आधार देतात याबद्दल वाचून मला आनंद झाला.

एल. बी., इटली

माझ्याकडेसुद्धा मदतीला अशीच एक कुत्री आहे. मला पाठीचा एक रोग झाल्यामुळे मी सहसा व्हीलचेअरमध्येच बसून असते. माझी कुत्री मला खूप मदत करते. तिचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. खरेदी करताना किंवा घर साफ करताना ती माझी मदत करते. प्रचार कार्याला मी जाते तेव्हासुद्धा ती माझी बॅग उचलायला मला मदत करते.

के. डब्ल्यू., अमेरिका