व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतिहास घडवणारे डॉक्टर

इतिहास घडवणारे डॉक्टर

इतिहास घडवणारे डॉक्टर

झॉजे नावाचे एक गृहस्थ बेल्जियमच्या यूपेया गावात राहतात. वयाची साठी उलटली आणि त्यांना लिव्हरचा विकार जडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार म्हणून डॉक्टरांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लान्ट (यकृत रोपण) करायला सांगितले. पण, लिव्हर ट्रान्सप्लान्ट करण्याच्या विचाराने या गृहस्थांना धक्काच बसला. साहजिक आहे. कारण ३०-४० वर्षांपूर्वी असे ऑपरेशन करून रुग्ण वाचू शकतो अशी कल्पनाच कोणाला करता येत नव्हती. इतकेच काय, १९७० च्या दशकात देखील अशा प्रकारची फक्‍त ३० टक्के ऑपरेशन्स यशस्वी व्हायची. आज मात्र काळ बदलला आहे. हल्ली लिव्हर ट्रान्सप्लान्टसारखी मोठमोठी ऑपरेशन्स किती सर्रासपणे आणि किती यशस्वीपणे केली जातात हे कोणी सांगायला नको.

पण, लिव्हर ट्रान्सप्लान्ट करताना बहुतेक वेळा मोठ्या प्रमाणात रक्‍तस्राव होतो. त्यामुळे ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला सहसा रक्‍त दिले जाते. हीच झॉजे यांची समस्या होती. त्यांना लिव्हर ट्रान्सप्लान्ट तर करायचे होते, पण आपल्या धार्मिक विश्‍वासाला डावलून रक्‍त घ्यायला मात्र ते तयार नव्हते. मग, रक्‍त न देता रुग्णाचे लिव्हर ट्रान्सप्लान्ट करणे ही अशक्यकोटीतील गोष्ट आहे का? काहींना कदाचित असेच वाटेल. पण, हॉस्पिटलच्या प्रमुख सर्जनला मात्र तसे मुळीच वाटले नाही. त्यांचा पूर्ण विश्‍वास होता, की इतर डॉक्टरांच्या मदतीने त्यांना रक्‍ताविना हे ऑपरेशन करता येण्यासारखे आहे. अर्थात, त्यांना फक्‍त असे वाटलेच नाही तर त्यांनी ही कमाल करूनही दाखवली. मग काय? ऑपरेशननंतर अवघ्या २५ दिवसांत झॉजे आपल्या घरी परतले. *

टाईम नियतकालिक अशा डॉक्टरांना “मेडिकल सायन्सचे महापुरुष” म्हणते ते काही उगाच नाही. त्यांच्यामुळेच तर रक्‍त न देता आज मोठमोठ्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. मुख्य म्हणजे आज बरेच लोक रक्‍ताचा अंश नसलेली औषधे आणि रक्‍तहीन शस्त्रक्रियाच जास्त पसंत करतात. काय कारण असावे? ते जाणून घेण्यासाठी आपण रक्‍तसंक्रमणाचा वादग्रस्त इतिहास पडताळून पाहू या.

[तळटीप]

^ ऑरगन ट्रान्सप्लान्ट (अवयव रोपण) करावे की नाही हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा प्रश्‍न आहे असे यहोवाचे साक्षीदार मानतात.

[३ पानांवरील चित्र]

जगभरात सध्या ९०,००० हून अधिक असे डॉक्टर आहेत ज्यांनी यहोवाच्या साक्षीदारांवर रक्‍त न देता उपचार करण्याची तयारी दाखवली आहे