व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एल्निनो म्हणजे काय?

एल्निनो म्हणजे काय?

एल्निनो म्हणजे काय?

पेरूच्या लिमा येथील अप्युरिमाक नदीचे पात्र एरवी कोरडे ठणठणीत असते. पण, अचानकच या नदीला पूर आला आणि या नदीने अक्राळविक्राळ रूप धारण करून आसपासचा परिसर गिळंकृत केला. या पुरात कार्मेन नावाच्या स्त्रीचा सगळा संसारच वाहून गेला; ती दुखातिशयाने म्हणते: “हे संकट माझ्या एकटीवरच गुदरलेलं नाहीए.

आणखीन कितीतरी जणांचे संसार असे उद्‌ध्वस्त झालेत.” पेरूच्या उत्तरेला झालेल्या मुसळधार पावसाने तिथल्या किनारपट्टीजवळील सेक्यूरा वाळवंटाच्या काही भागाचे थेट सरोवरात रूपांतर केले; काही काळापुरते निर्माण झालेले हे ५,००० चौरस किलोमीटर पसरलेले सरोवर पेरूतील दुसरे सर्वात विशाल सरोवर ठरले. जगातल्या इतर भागांत, भयानक पूर, तीव्र वादळे आणि अनावृष्टीमुळे अन्‍नटंचाई, रोग, वणवा त्याचप्रमाणे पीकांचे, मालमत्तेचे आणि वातावरणाचे नुकसान झाले. हे सगळे कशामुळे घडले? पुष्कळजण एल्निनोला जबाबदार ठरवतात; एल्निनोची सुरवात १९९७ सालाच्या शेवटाला, उष्णकटिबंधीय किंवा विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातून झाली आणि सुमारे आठ महिने सतत याने विध्वंस माजविला.

पण, हे एल्निनो म्हणजे नेमके काय? त्याची सुरवात कशी होते? दूरदूरपर्यंत याचा परिणाम का होतो? मोठ्या प्रमाणात होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्याकरता याचे आगाऊ व निश्‍चितरूपात भाकीत करता येणे शक्य आहे का?

समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्याने सुरवात

“पेरूच्या किनारपट्टीजवळ दर दोन ते सात वर्षांमध्ये येणाऱ्‍या उष्ण पाण्याच्या प्रवाहाला खरे तर, एल्निनो म्हटले जाते” असे न्यूझवीक नियतकालिकात म्हटले होते. शेकडो वर्षांआधी, तेव्हाच्या खलाशांच्या लक्षात आले की पेरूच्या किनारपट्टीजवळील पाण्याच्या तापमानात वाढ होते. आणि हे उष्ण प्रवाह नाताळाच्या काळादरम्यान येत असल्यामुळे त्यांना एल्निनो हे नाव पडले; एल्निनो ही स्पॅनिश संज्ञा असून तिचा अर्थ ‘बाळ येशू’ असा होतो.

पेरूच्या किनारपट्टीजवळचे पाणी उष्ण झाले की तिथल्या प्रदेशात मुसळधार पाऊस पडतो. या पावसामुळे रुक्ष वाळवंट हिरवीगार होतात आणि गुराढोरांचीही भरभराट होते. पण पावसाचा जोर कमी झाला नाही तर पूर देखील येतो. शिवाय, सागराच्या उष्ण पाण्याच्या वरच्या थरामुळे खालच्या थरातले पोषक तत्त्वे असलेले शीत पाणी वरती येत नाही. त्यामुळे, पुष्कळ सागरी जीव आणि काही पक्षीसुद्धा अन्‍नाच्या शोधात स्थलांतर करतात. काही काळानंतर, एल्निनोचे परिणाम पेरूच्या किनारपट्टीपासून दूरपर्यंत जाणवतात. *

वारे आणि पाण्यातून एल्निनोचा उगम

परंतु, पेरूच्या किनारपट्टीजवळ महासागराचे तापमान असे अचानकच का वाढते? हे समजण्यासाठी आपण प्रथम वॉकर सर्क्युलेशन या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या मोठ्या चक्राविषयी जाणून घेऊ या; पूर्व आणि पश्‍चिमेकडील उष्णकटिबंधीय पॅसिफिकच्या दरम्यान हवामानात हे चक्र घडते. * इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाजवळ सूर्यामुळे पश्‍चिमेकडील पाण्याचा वरचा थर उष्ण होतो तेव्हा उष्ण आणि दमट हवा वातावरणातून वरती उठते. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाब निर्माण होतो. वरती उठणारी हवा थंड होते, तिच्यातला दमटपणा नाहीसा होतो आणि त्या भागात पर्जन्यवृष्टी होते. वातावरणाच्या वरच्या भागातली ही शुष्क हवा वाऱ्‍याच्या प्रवाहामुळे पूर्वेकडे नेली जाते. पूर्वेकडे येता येता या हवेतील तापमान कमी होते व ती जड होते आणि पेरू व एक्वादोर येथे पोहंचल्यावर खाली उतरते. यामुळे त्या भागातील सागराच्या पृष्ठभागाजवळ अतिदाबाची स्थिती निर्माण होते. आणि कमी उंचीच्या ठिकाणी व्यापारी वारे नावाचे प्रवाह पश्‍चिमेकडे, इंडोनेशियाकडे उलटे वाहतात आणि अशाप्रकारे हे चक्र पूर्ण होते.

उष्णकटिबंधीय पॅसिफिकच्या पृष्ठभागाच्या तापमानावर या व्यापारी वाऱ्‍यांचा कसा परिणाम होतो? न्यूझवीक म्हणते: “हे वारे लहानशा तळ्यातल्या झुळुकांसारखीच काम करतात. ते उष्ण पाण्याला पश्‍चिम पॅसिफिककडे ढकलतात ज्यामुळे एक्वादोरसारख्या ठिकाणापेक्षा तिथली समुद्र पातळी ६० सेंटीमीटरने जास्त आणि ८ डिग्री सेल्सियसने अधिक उष्ण असते.” पूर्वेकडील पॅसिफिकमध्ये, खालच्या स्तरातले पोषक तत्त्वे असलेले शीत पाणी वरती येते ज्यामुळे सागरातील जीवांची वाढ होते. यास्तव, एरवी किंवा एल्निनो नसताना पूर्वेकडील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान पश्‍चिमेकडील पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा थंड असते.

हवामानातला कोणता बदल एल्निनोला कारणीभूत ठरतो? नॅशनल जिओग्रॅफिक म्हणते, “काही ठराविक वर्षांनंतर व्यापारी वारे कमी होतात किंवा अगदीच नाहीसे होतात. याचे कारण अद्याप वैज्ञानिकांना समजलेले नाही.” हे वारे कमी होतात तेव्हा इंडोनेशियाजवळ जमा झालेल्या उष्ण पाण्याचा प्रवाह पूर्वेकडे वाहू लागतो. त्यामुळे पेरू त्याचप्रमाणे पूर्वेच्या इतर भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. याचा हवामानावर परिणाम होतो. एका संदर्भानुसार, “पूर्वेकडील उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागराचे पाणी उष्ण झाल्यामुळे वॉकर चक्र दुर्बल होते आणि जोरदार पावसाचा अभिसरण पट्टा पूर्वेकडे वळतो; अर्थात, पश्‍चिमेकडून मध्यात आणि तेथून पूर्वेकडील उष्णकटिबंधीय पॅसिफिककडे जातो.” यामुळे, सबंध विषुववृत्तीय पॅसिफिकमध्ये हवामानातले बदल जाणवतात.

प्रवाहातील खडकाप्रमाणे

एल्निनोमुळे उष्णकटिबंधीय पॅसिफिकच्या पाण्याच्या प्रवाहापासून फार दूरवर असलेल्या ठिकाणी देखील हवामानात बदल घडू शकतात. हे बदल, हवामानातील अभिसरण व्यवस्थेच्या माध्यमाने घडतात. ज्याप्रमाणे प्रवाहाच्या मध्यभागी असलेल्या खडकामुळे संपूर्ण प्रवाहात तरंग निर्माण होतात त्याचप्रमाणे एका ठिकाणच्या हवामानातील अभिसरणामध्ये बदल झाल्याने त्याचे परिणाम दूरपर्यंत पसरतात. उष्णकटिबंधीय सागरातील उष्ण पाण्याच्या वरती उठणारे घनदाट ढग वातावरणात खडकासारखा अडथळा निर्माण करतात ज्यामुळे हजारो किलोमीटर दूरच्या ठिकाणातील हवामानात बदल होतात.

वरच्या अक्षवृत्तांमध्ये, एल्निनोचा जोर वाढतो आणि पूर्वेकडील वेगाने वाहणाऱ्‍या झोत वाऱ्‍याची दिशा बदलतो. या अक्षवृत्तांमध्ये बहुतांश वादळांच्या प्रवाहाला झोत वारेच पुढे ढकलतात. झोत वाऱ्‍यांचा जोर वाढल्याने किंवा दिशा बदलल्याने मौसमी हवामान कमीजास्त देखील होऊ शकते. उदाहरणार्थ, उत्तर संयुक्‍त संस्थानांतल्या काही भागांमध्ये, एल्निनोचा हिवाळा नेहमीपेक्षा जरा सौम्य असतो तर दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पावसाळी आणि थंड असतो.

पूर्वभाकीत करणे शक्य आहे का?

प्रत्येक वादळामुळे काय घडेल हे केवळ काही दिवसांआधीच सांगितले जाऊ शकते. पण एल्निनोच्या बाबतीतही असेच आहे का? नाही. एल्निनोविषयी भाकीत करताना फक्‍त अल्पावधीच्या हवामानातील घडणांबद्दल सांगितले जात नाही तर दूरदूरपर्यंत कित्येक महिन्यांसाठी हवामानात असाधारण बदल घडणार असल्याचे सांगितले जाते. शिवाय, हवामान संशोधकांना एल्निनोबद्दल भाकीत करण्यामध्ये बऱ्‍यापैकी यश मिळाले आहे.

उदाहरणार्थ, १९९७-९८ च्या दरम्यान झालेल्या एल्निनोविषयी १९९७ च्या मे महिन्यातच म्हणजेच सुमारे सहा महिन्यांआधी कळवण्यात आले होते. सध्या उष्णकटिबंधीय पॅसिफिकमध्ये ७० तरंग ठेवण्यात आले आहेत ज्यांच्याकरवी सागराच्या पृष्ठभागावरील वाऱ्‍याची स्थिती आणि ५०० मीटर खोलवरील तापमानाची नोंद केली जाते. हवामानसंबंधी संगणकांमध्ये ही माहिती भरली जाते तेव्हा हवामानाविषयी पूर्वसूचना मिळते.

एल्निनोविषयी पूर्वसूचना मिळाल्याने लोकांना तयार राहायला मदत मिळते. जसे की, १९८३ पासून पेरूमध्ये एल्निनोविषयी दिल्या जाणाऱ्‍या पूर्वसूचनांमुळे शेतकऱ्‍यांना पावसाळी वातावरणासाठी योग्य असलेले पशुपालन करण्यास आणि पिके काढण्यास तर कोळी लोकांना मासे पकडण्याऐवजी उष्ण पाण्यासोबत येणारी कोळंबी पकडण्यास उत्तेजन दिले गेले आहे. होय, अचूक भाकीत आणि पूर्वतयारी यांच्याद्वारे एल्निनोमुळे होणारी जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकते.

आपल्या पृथ्वीच्या वातावरणावर नियंत्रण करणाऱ्‍या क्रियांबद्दलचे वैज्ञानिक संशोधन, सुमारे ३,००० वर्षांआधी प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने लिहिलेल्या प्रेरित शब्दांच्या अचूकतेला पुष्टी देतात. त्याने असे लिहिले: “वायु दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो; तो एकसारखा घुमत जाऊन पुनः पुनः आपली फेरी करितो.” (उपदेशक १:६) आधुनिक माणसाला वाऱ्‍याचे प्रवाह आणि सागरी प्रवाह यांचा अभ्यास करून हवामानाविषयी बरीच माहिती मिळालेली आहे. म्हणून आपण एल्निनोसारख्या घटनांसंबंधी सूचनांकडे लक्ष देऊन या ज्ञानाचा फायदा करून घेऊ या.

[तळटीपा]

^ याच्या विरोधात, दक्षिण अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीजवळ ठराविक काळानंतर पाणी थंड होते याला ला निना (या स्पॅनिश शब्दाचा अर्थ आहे “लहान मुलगी”) असे म्हणतात. ला निनामुळेही हवामानातले बदल दूरदूरपर्यंत जाणवतात.

^ या चक्राला सर गिल्बर्ट वॉकर यांचे नाव पडले आहे कारण याच ब्रिटिश शास्त्रज्ञाने या क्रियेचा १९२० च्या दशकात अभ्यास केला होता.

[२७ पानांवरील चौकट]

एल्निनोच्या विपत्तीचा इतिहास

१५२५: पेरूमध्ये सर्वात प्राचीन एल्निनोच्या घटनेचा ऐतिहासिक अहवाल.

१७८९-९३: एल्निनोमुळे भारतात ६,००,००० हून अधिक मृत्युमुखी पडले आणि दक्षिण आफ्रिकेत तीव्र दुष्काळ पडला.

१९८२-८३: या घटनेमुळे विशेषतः उष्णकटिबंधीय भागांमध्ये २,००० हून अधिक जीवित हानी आणि १,३०० कोटी डॉलर्सची वित्त हानी झाली.

१९९०-९५: एकसाथ तीन घटनांनी एल्निनोची सर्वात दीर्घ घटना नोंदवली.

१९९७-९८: एल्निनोमुळे पूर आणि दुष्काळ येण्याविषयी पूर्वसूचना देण्यात पहिल्यांदाच यश मिळूनही जगभरात सुमारे २,१०० लोक मृत्युमुखी पडले, ३,३०० कोटी डॉलर्सची हानी झाली.

[२४, २५ पानांवरील रेखाचित्र/नकाशे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

साधारण

वॉकर सर्क्युलेशन मार्ग

जोरदार व्यापारी वारे

उष्ण सागरी जल

शीत सागरी जल

एल्निनो

झोत वाऱ्‍यांची दिशा बदलते

दुर्बल व्यापारी वारे

उष्ण पाणी पूर्वेकडे वाहते

असाधारण उष्णता किंवा कोरड

असाधारण थंडी किंवा पाऊस

[२६ पानांवरील रेखाचित्र/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

एल्निनो

वरती पृथ्वी गोलावर दाखवलेले लाल रंग, असाधारण उष्ण पाण्याला सूचित करतात

साधारण उष्ण पाणी पश्‍चिम पॅसिफिकमध्ये वाहिल्याने पूर्वेकडे पोषक तत्त्वे असलेले शीत पाणी वरती येते

एल्निनो

दुर्बल व्यापारी वाऱ्‍यांमुळे उष्ण पाणी पूर्वेकडे वाहू लागते ज्यामुळे शीत पाणी वरती येत नाही

[२४, २५ पानांवरील चित्रे]

पेरू

पूरग्रस्त सेक्यूरा वाळवंट

मेक्सिको

लिंडा वादळ

कॅलिफोर्निया

कडे कोसळणे

[चित्राचे श्रेय]

पृष्ठे २४-५ डावीकडून उजवीकडे: Fotografía por Beatrice Velarde; Image produced by Laboratory for Atmospheres, NASA Goddard Space Flight Center; FEMA photo by Dave Gatley