व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

भारताची लोकसंख्या १०० कोटींच्या पार गेली

संयुक्‍त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागानुसार, भारताच्या लोकसंख्येने ऑगस्ट १९९९ मध्ये १०० कोटींची संख्या पार केली. केवळ ५० वर्षांआधी भारताची लोकसंख्या आताच्या लोकसंख्येच्या एक-तृतीयांश होती. भारतातली लोकसंख्या सध्या १.६ टक्के प्रती वर्ष या गतीने वाढत आहे. हे असेच चालत राहिले तर सुमारे चाळीस वर्षांमध्ये भारत चीनला मागे टाकून जगातले सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र बनेल. “आताच जगातले एक-तृतीयांश लोक भारत आणि चीन या राष्ट्रांमध्ये राहतात,” असे वृत्त द न्यूयॉर्क टाईम्सने दिले. ५० वर्षांहून कमी कालावधीत, भारतातली अपेक्षित आयुर्मर्यादा ३९ वर्षांपासून ६३ वर्षांपर्यंत वाढली.

जीभेची स्वच्छता

प्रिन्स जॉर्ज सिटिझन वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार, जीभेवर लपलेले सूक्ष्मजंतू तोंडाच्या दुर्गंधीला कारणीभूत असलेला सल्फर वायू निर्माण करतात. “कोरड्या आणि ऑक्सीजनरहित ठिकाणी सूक्ष्मजंतूंची भरभराट होत असते म्हणून हे सूक्ष्मजंतू आपल्या फुफ्फुसांपर्यंत जाणाऱ्‍या हवेपासून दूर म्हणजेच आपल्या तोंडातील चिरांमध्ये राहतात,” असे त्यात म्हटले होते. दात घासणे आणि फ्लॉसिंग केल्यामुळे दात स्वच्छ होतात खरे पण याने फक्‍त २५ टक्के सूक्ष्मजंतू नाहीसे होतात. दातांचे डॉक्टर ॲलन ग्रोव्ह यांच्या मते, युरोपमध्ये प्राचीन काळापासून चालत आलेली जीभ खरडण्याची रीत “हीच तोंडाची दुर्गंधी रोखण्याची एकमात्र गुणकारक पद्धत आहे.” “जीभ स्वच्छ ठेवायची असेल तर टुथब्रशपेक्षा” प्लास्टिकचा टंग-क्लिनर सर्वात उत्तम आहे, असे सिटिझन वृत्तपत्र म्हणते.

“सर्वात प्रमुख जीवनावश्‍यक पदार्थ”

“पाणी हा सर्वात प्रमुख जीवनावश्‍यक पदार्थ आहे कारण आपल्या शरीरात पाण्याचीच मात्रा जास्त आहे,” असे टोरोंटो स्टार बातमीपत्रात म्हटले आहे. “आपल्या शरीरातल्या पाण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी जरी घटले तरी ते जीवावर बेतू शकते.” पाण्याने आपल्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहते; एवढेच नव्हे तर पाण्याद्वारे “रक्‍तातून आणि शरीरातल्या संस्थांतून विविध अवयवांना पोषक तत्त्वे पोहंचवली जातात आणि तिथला मल वाहून नेला जातो. ते सांध्यांसाठी आणि मोठ्या आंतड्यासाठी वंगणासारखे ठरते आणि यामुळे बद्धकोष्ठता होत नाही.” सामान्य प्रौढ व्यक्‍तीला दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्‍यक आहे. कॉफी, इतर कोणतेही कार्बोनेटेड पेय किंवा मद्याचे सेवन केले जात असेल तर साधे पाणी अधिक पिण्याची गरज आहे कारण वर दिलेल्या पदार्थांनी निर्जलीकरण होऊ शकते. एका आहारतज्ज्ञाच्या मते, तहान लागली तरच पाणी पिणे हे चुकीचे आहे, कारण तहान लागेपर्यंत शरीरातले सगळे पाणी जवळजवळ संपत आलेले असते. त्या बातमीपत्रात पुढे म्हटले आहे की, “दिवसभरात, दर तासाला एक ग्लास पाणी प्यायल्याने बहुतेकांची गरज भागू शकते.”

उचित आहार

सर्वसाधारणपणे, १० ते १४ या वयोगटातल्या मुलींची उंची त्या कालावधीत दहा इंचाने तर वजन १८-२२ किलोंनी वाढते. तर १२ ते १६ या वयोगटातल्या मुलांची उंची त्या कालावधीत १२ इंचाने आणि वजन २२-२७ किलोंनी वाढते. जलद गतीने होत असलेल्या या वाढीमुळे साहजिकच किशोरवयीनांना जरा विचित्र वाटते आणि म्हणून पुष्कळजण आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. “परंतु जेवण कमी करणे किंवा अमुकच खावे तमुक खाऊ नये असे स्वतःवर निर्बंध घालणे प्रकृतीसाठी चांगले नसते,” असे आहारतज्ज्ञ लिन रॉब्लिन द टोरोंटो स्टार यात लिहितात. रॉब्लिन यांच्या मते, अशाने शरीराला योग्य ती पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्याचप्रमाणे, आतापासूनच आहार कमी केला तर “खाण्याच्या अनुचित सवयी अंगवळणी पडतात आणि त्यामुळे पुढे आणखी गंभीर प्रकारचे आहारासंबंधी विकार उद्‌भवू शकतात.” त्या म्हणतात की, किशोरवयीनांनी आपल्या वजनाविषयी वास्तविक दृष्टिकोन बाळगावा आणि “उचित आहार घेऊन, व्यायाम करून आणि आत्म-समाधानी राहून” स्वास्थ्यकारी वजन राखावे.

तंबाखूचा मुलांना धोका

लंडनच्या गार्डियन वृत्तपत्रात सांगितल्यानुसार, जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) असा अंदाज आहे की, जगातली ५० टक्के मुले तंबाखूचा धूर घेत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे. दमा आणि श्‍वसनसंबंधी इतर विकार, बाळाचा एकाएकी मृत्यू (सडन इंफंट डेथ सिंड्रोम), कानाच्या मधल्या भागाचा रोग आणि कर्करोग हे विकार अप्रत्यक्ष धूम्रपानाशी संबंधित आहेत. संशोधनातून हे देखील निष्पन्‍न झाले आहे की, धूम्रपान करणाऱ्‍यांची मुले शैक्षणिकदृष्ट्या चांगली कामगिरी बजावत नाहीत आणि त्यांच्या वागणुकीमध्येही अनेक दोष दिसून येतात. दोन्ही पालक धूम्रपान करत असले, तर मुलांमध्ये आरोग्य समस्या निर्माण होण्याची ७० टक्के अधिक शक्यता आहे आणि घरामध्ये फक्‍त एक व्यक्‍ती धूम्रपान करत असली तरी ही शक्यता ३० टक्के असतेच. तंबाखूच्या सवयीमुळे आपल्या कुटुंबाला कोणता धोका आहे हे ओळखण्यासाठी पालकांना आरोग्यसंबंधी शिक्षण देणे आणि शाळांमध्ये त्याचप्रमाणे मुलांची वर्दळ असते अशा ठिकाणी धूम्रपानाला सक्‍त बंदी घालणे अशा मागण्या जागतिक आरोग्य संघटना करत आहे.

पर्यटनाचा पहिला क्रमांक

जागतिक पर्यटन संघटनेने (डब्ल्यूटीओ) काढलेल्या अंदाजांनुसार, “आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या सध्याच्या वार्षिक ६२,५०० कोटी संख्येत २०२० सालापर्यंत १ कोटी ६० लाख इतकी वाढ होण्याची शक्यता आहे.” हे पर्यटक २ लाख कोटी अमेरिकन डॉलर्स खर्च करतील असा अंदाज केला गेला आहे; अशाने “पर्यटन हा जगातला सर्वात मोठा उद्योग होईल.” आतापर्यंत तरी, युरोप हे पर्यटनाचे सर्वात लोकप्रिय ठिकाण मानले गेले आहे. सर्वात अधिक पर्यटक फ्रान्समध्ये जातात; १९९८ मध्ये तेथे गेलेल्या पर्यटकांची संख्या ७ कोटी इतकी होती. परंतु, २०२० सालापर्यंत चीन सर्वात अग्रगण्य असेल असा अंदाज केला जातो. तरीही, वेगवेगळ्या देशांना भेटी देण्याची सुसंधी काही खास लोकांनाच मिळते. १९९६ साली, जगातल्या लोकसंख्येतील केवळ ३.५ टक्के लोक परदेश दौऱ्‍यावर गेले. डब्ल्यूटीओच्या अनुमानांनुसार, २०२० सालापर्यंत ही संख्या ७ टक्क्यांपर्यंत पोहंचेल.

खडखड्या सापाचा बदला

न्यू सायंटिस्ट यात असा अहवाल होता की, “खडखड्या साप मेल्यावरही दंश करू शकतो आणि मरणानंतर बदला घेण्याचा हा विचित्र प्रकार काही नवीन नाही.” या विषयावर अभ्यास करणाऱ्‍या दोन डॉक्टरांच्या मते, अमेरिकेतील अरिझोना येथे ११ महिन्यांच्या कालावधीत, खडखड्या सापाच्या दंशावर उपचार करायला आलेल्या ३४ रुग्णांपैकी ५ जणांनी म्हटले की, साप मारला गेल्यानंतर त्यांना चावला होता. त्यांच्यातल्या एकाने तर सापाला गोळी घातली, नंतर त्याचे शिर धडापासून वेगळे केले, सापाची हालचाल बंद होईपर्यंत तो थांबला आणि नंतर त्याने त्याचे डोके उचलले. पण डोके उचलल्या उचलल्या सापाने त्याच्या दोन्ही हातांचा चावा घेतला. त्या पत्रिकेत असे म्हटले होते की, आधीच्या अभ्यासांवरून असे निष्पन्‍न झाले आहे की, खडखड्या सापाचे धडापासून वेगळे केलेले डोकेसुद्धा “मरणानंतर एका तासापर्यंत त्याच्यासमोर हलणाऱ्‍या वस्तूंवर हल्ला करू शकते.” सर्पतज्ज्ञांचा असा विश्‍वास आहे की, “ही एक परावर्तनक्रिया आहे; त्याच्या नाकाच्या आणि डोळ्यांच्या मधोमध तापमानातला बदल ओळखणाऱ्‍या खळग्यामुळे (रंध्र) ही प्रतिक्रिया दाखवली जाते.” डॉ. जेफ्री सुशार्ड असा इशारा देतात की, डोके आणि धड वेगळे केलेल्या खडखड्या सापाला “लहान साप” समजावे. ते म्हणतात, “सापाला स्पर्श करायचाच असेल तर लांब काठीचा वापर करा.”

ऊर्जेची असाधारण साधने

न्यू कॅलिडोनिया येथील युवेआ बेटावर खनिज तेल उपलब्ध नाही. पण वीज निर्माण करण्यासाठी तेथे खोबरेल तेलाचा उपयोग केला जातो असे स्यान्स ए अवनीर ही फ्रेंच पत्रिका म्हणते. फ्रेंच अभियांत्रिक ॲलन लीनार्ड यांना खोबरेल तेलावर चालणारे यंत्र बनवायला १८ वर्षे लागली. या यंत्राच्या साहाय्याने एक जनरेटर चालते आणि त्या जनरेटरवर खाऱ्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे प्लांट चालते. आणि प्लांटद्वारे त्या द्वीपावरील २३५ कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. लीनार्ड यांच्या मते, त्यांनी निर्माण केलेले १६५ किलोवॉटचे हे यंत्र, ऊर्जा निर्मिती आणि इंधन वापर करण्यामध्ये डिझेल इंजिनांच्या तोडीचे आहे.

दरम्यान, भारतातल्या गुजरात राज्यातील कलाली गावामध्ये, वीज निर्मितीसाठी बैलांच्या शक्‍तीचा उपयोग करण्यात आला आहे. नवी दिल्लीच्या डाऊन टू अर्थ या पत्रिकेत असे वृत्त दिले होते की, एक वैज्ञानिक आणि त्याची भाची या दोघांनी मिळून ऊर्जा निर्मितीसाठी एक युक्‍ती काढली. एका गिअरबॉक्सवर एक लहानसा जनरेटर चालवला आणि त्या गिअरबॉक्सला जोडलेला दांडा फिरवण्यासाठी चार बैलांचा वापर केला. त्या जनरेटरला जोडलेल्या बॅटरींकरवी पाण्याचा पंप आणि धान्य दळणाची गिरणी चालवली जाते. डाऊन टू अर्थ या पत्रिकेनुसार या पद्धतीने, ऊर्जेच्या एककासाठी येणारा खर्च जास्तीतजास्त ४ रूपये आहे; पण तोच खर्च पवनचक्कींनी निर्माण होणाऱ्‍या ऊर्जेच्या एककासाठी ४० रूपये तर सौर फलकांनी निर्माण होणाऱ्‍या ऊर्जेसाठी ९६० रूपये इतका आहे. तथापि, गावकऱ्‍यांना वर्षातील तीन महिने शेतकामासाठी बैलांची मदत लागते; त्यामुळे बैल उपलब्ध नसतात तेव्हा ऊर्जा साठवून ठेवण्याचा परिणामकारक मार्ग शोधण्याचा प्रयत्न चालला आहे.

आरोग्यासाठी चालणे उत्तम

चालल्याने वजन कमी होते आणि तणाव नाहीसा होतो; पण त्याशिवाय “रक्‍तदाब आणि हृदयाचा झटका येण्याचा धोका” देखील कमी होतो असे टोरोंटोच्या द ग्लोब ॲण्ड मेल यात म्हटले आहे. निरोगी राहण्यासाठी वेळ काढणे आवश्‍यक आहे. साधारण किती वेळ? “निरोगी उत्साही जीवनासाठी कॅनडाचे शारीरिक हालचाल मार्गदर्शक याच्यानुसार, सर्वसाधारण गतीने चालत असल्यास प्रती दिवशी ६० मिनिटे चालण्याची गरज आहे—दिवसातून सहा वेळा दहा-दहा मिनिटांकरता चालणे आवश्‍यक आहे.” प्रती दिवशी ३० ते ६० मिनिटे भरभर चालणे किंवा सायकल चालवणे किंवा दररोज २० ते ३० मिनिटे जॉगिंग करणे हे आरोग्यासाठी हितकर आहे. ग्लोब हे वृत्तपत्र सांगते की, खेळती हवा असणारे, लवचीक तळाचे, पायाला चांगला आधार देणारे, आतून मऊ कूशन असणारे व बोटांसाठी मोकळी जागा असणारे बूट वापरावेत.

स्तनपानाने वजन नियंत्रित राहते?

स्तनपानाचा आणखी एक फायदा संशोधकांना दिसून आला आहे: स्तनपानामुळे बाळ मोठे झाल्यावर गलेलठ्ठ होत नाही. फोकस या जर्मन बातमीपत्रात, म्युनिक विद्यापीठाच्या संशोधन मंडळाने घेतलेल्या अभ्यासावरून प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, पाच ते सहा वर्षांच्या वयोगटातील ९,३५७ मुलांच्या वजनाची आणि त्यांच्या लहानपणच्या आहाराची पाहणी करण्यात आली. त्यांच्या संशोधनातून हे निष्पन्‍न झाले की, तीन ते पाच महिन्यांपर्यंत स्तनपान केलेल्या मुलांना शाळेत प्रवेश करतेवेळी स्तनपान न केलेल्या मुलांपेक्षा लठ्ठ होण्याची ३५ टक्के कमी शक्यता होती. खरे पाहता, जितक्या जास्त कालावधीपर्यंत स्तनपान केले जाते तितकेच विनाकारण वजन वाढण्याची शक्यता कमी होते. एका संशोधकाच्या मते, आईच्या दुधात असलेल्या पदार्थांमुळे हा फायदा होतो कारण ते पदार्थ चयापचयक्रियेला मदतदायी ठरतात.