व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मेक्सिकोत विवेकासंबंधी अधिक स्वातंत्र्य दिले जाईल का?

मेक्सिकोत विवेकासंबंधी अधिक स्वातंत्र्य दिले जाईल का?

मेक्सिकोत विवेकासंबंधी अधिक स्वातंत्र्य दिले जाईल का?

मेक्सिकोतील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

मेक्सिकोमध्ये प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. तरीही, उपासनेच्या स्वातंत्र्यासंबंधी कायद्याने पूर्णपणे मोकळीक दिलेली नाही; अजूनही यासंबंधित काही निर्बंध पाळावे लागतातच. उदाहरणार्थ, सैन्यात भरती होण्यासंबंधाने, नैतिक किंवा धार्मिक कारणांवरून आक्षेप घेण्याची संकल्पनाच या देशात जणू अज्ञात आहे. याच कारणास्तव, नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोच्या (यूएनएएम) इन्स्टिट्यूट ऑफ लिगल इन्व्हेस्टिगेशन्सने (कायदेशीर चौकशी संस्था), “मेक्सिकोत आणि इतरत्र नैतिक किंवा धार्मिक कारणांवरून आक्षेप घेणे” या विषयावर एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र ठेवण्याचे ठरवले. यूएनएएमची इन्स्टिट्यूट ऑफ लिगल इन्व्हेस्टिगेशन्स ही एक सरकारी संस्था आहे. स्थापित कायदेकानून आणि त्यांचा अंमल याविषयी चौकशी किंवा तपास करणे हा त्या संस्थेचा उद्देश आहे. मेक्सिकोतल्या यहोवाच्या साक्षीदारांना, “यहोवाचे साक्षीदार आणि नैतिक किंवा धार्मिक कारणांवरून आक्षेप घेणे” या विषयावर भाषण सादर करण्यास त्यांचा एक प्रतिनिधी पाठवण्याचे आमंत्रण देण्यात आले.

प्राध्यापक आपले मत व्यक्‍त करतात

स्पेनच्या ग्रॅनाडा कायदा विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या डॉ. हावीयेर मार्टिनस टॉरॉन यांनी “आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नैतिक किंवा धार्मिक कारणांवरून आक्षेप घेणे” या भाषणात म्हटले की, विवेक स्वातंत्र्य आणि विवेकाच्या आधारे काही कायद्यांवर किंवा नियमांवर आक्षेप घेण्याच्या हक्काला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. त्यांनी स्पेनमधल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थितीचा आणि ग्रीसमधल्या कोकीनाकीस खटल्याचा उल्लेख केला. *

युएनएएमच्या इन्स्टिट्यूट ऑफ लिगल इन्व्हेस्टिगेशन्समध्ये प्राध्यापक असणारे डॉ. होसे लुइस सोबरानस फरनेनडेझ यांनी, “या विषयावरील मेक्सिकन अनुभव” यावर भाषण दिले. ते म्हणाले की, “धार्मिक संघटना आणि सार्वजनिक उपासनेचा मेक्सिकन कायदा, नैतिक किंवा धार्मिक कारणांवरून आक्षेप घेण्याचा थेट निषेध करतो याची विशेष दखल घेतली पाहिजे.” या वेळी ते पहिल्या कलमाचा उल्लेख करत होते; त्यात म्हटले आहे: “कोणत्याही धार्मिक विश्‍वासांच्या आधारे कोणालाही या देशातील कायद्यांमध्ये सूट मिळणार नाही. कायद्यांमध्ये नमूद केलेल्या जबाबदाऱ्‍या आणि कर्तव्ये टाळण्यासाठी कोणीही व्यक्‍ती धार्मिक कारणे देऊ शकत नाही.” समारोपात डॉ. सोबरानस म्हणाले: “मेक्सिकोत नैतिक किंवा धार्मिक कारणांवरून आक्षेप घेण्यासंबंधाने नवीन नियम करणे अगत्याचे आहे असे आम्हाला वाटते.”

त्यांनी हे देखील सांगितले की, ध्वजवंदन न करण्याविषयी साक्षीदारांच्या बायबल-आधारित विश्‍वासामुळे दरवर्षी त्यांच्या हजारो मुलांना शाळेत समस्यांचा सामना करावा लागतो. साक्षीदारांच्या काही मुलांना तर शाळेत प्रवेशसुद्धा दिला जात नाही. तथापि, मानवी हक्क मंडळाकरवी अपील केल्याने पुष्कळांना शिक्षणाचा हक्क देण्यात आला आहे. काही शैक्षणिक अधिकाऱ्‍यांनी शाळेतून मुलांना बाहेर काढले जाऊ नये म्हणून काही पावले उचलली आहेत; परंतु काही शिक्षकांनी याकडे कानाडोळा केला आहे. साक्षीदारांच्या या भूमिकेबद्दल अधिकाऱ्‍यांनी सहिष्णुता दाखवली आहे; परंतु मेक्सिकोतल्या शाळांमध्ये या संदर्भात कोणताही नियम नाही.

या परिसंवादात, इतर धर्मांमध्ये निर्माण होणाऱ्‍या अशाच प्रकारच्या आक्षेपांबद्दलही चर्चा करण्यात आली. यामध्ये, पवित्र मानल्या जाणाऱ्‍या दिवशी काम करण्याची सक्‍ती, धार्मिक विश्‍वासांचे उल्लंघन करणाऱ्‍या पद्धतींप्रमाणे पेहराव करण्याची सक्‍ती वगैरे उदाहरणे देण्यात आली. लष्करी सेवा आणि विशिष्ट वैद्यकीय उपचारांसंबंधीच्या आक्षेपांचाही यात समावेश करण्यात आला.

यहोवाचे साक्षीदार आणि कैसर

मेक्सिकोतल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातील एका प्रतिनिधीने यहोवाच्या साक्षीदारांच्या मूलभूत विश्‍वासांविषयी सारांशात सांगितले. साक्षीदार, बायबलमधील तत्त्वांचे कशाप्रकारे पालन करतात याविषयी समजावून सांगताना त्यांनी काही तत्त्वे सर्वांपुढे मांडली. लूक २०:३५ या वचनानुसार ख्रिश्‍चनांना “कैसराचे ते कैसराला” देण्याची गरज आहे हे त्यांनी दाखवले. नंतर रोमकर १३:१ चाही उल्लेख करत त्यांनी म्हटले की, ख्रिश्‍चनांनी जगातल्या अधिकारी वर्गाचा सन्मान करणे जरूरीचे आहे. त्यांनी हे ठासून सांगितले की, यहोवाचे साक्षीदार सर्वसाधारण लोक आहेत, ते कसोशीने नियमांचे पालन करणारे प्रामाणिक नागरिक आहेत, ते वेळेवर कर देतात, सुव्यवस्थित जीवन जगतात, आपली घरे स्वच्छ ठेवतात आणि आपल्या मुलांना चांगले शालेय शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.

यानंतर, साक्षीदार ध्वजवंदन का करत नाहीत याचा शास्त्रवचनीय आधार त्यांनी दाखवून दिला; या गोष्टीला दहा आज्ञांमध्ये अर्थात निर्गम २०:३-५ येथे पुरावा मिळतो. तेथे म्हटले आहे: “माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरीव मूर्ति करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीहि प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको.”

म्हणून, यहोवाचे साक्षीदार केवळ देवाचीच उपासना करतात; ते कोणत्याही प्रतिमेची किंवा मूर्तीची उपासना करत नाहीत. असे असले तरीही, एखाद्या राष्ट्रीय चिन्हाबद्दल ते कधीही अपमानजनक भाषा वापरत नाहीत किंवा त्याची विटंबना करत नाहीत.

या बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांचा काय दृष्टिकोन आहे हे दाखवण्याकरता पर्पल ट्रायंगल्स नावाचा व्हिडिओपट सादर करण्यात आला. या व्हिडिओत, नात्सी जर्मनीमध्ये (१९३३-४५) यहोवाचे साक्षीदार कसे खंबीर राहिले होते हे दाखवले गेले आहे. त्यामध्ये कुसरो परिवाराची कहाणी दिली आहे; या कुटुंबाने नात्सींच्या शासनात छळ सहन केला परंतु आपल्या विश्‍वासांबाबतीत कोणतीही हातमिळवणी केली नाही. *

त्यानंतर, यहोवाचे साक्षीदार बायबलच्या कोणत्या वचनाच्या आधारावर रक्‍त संक्रमण स्वीकारत नाहीत हे सांगण्यात आले. (उत्पत्ति ९:३, ४; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) जागतिक इस्पितळ सहकार्य समितीबद्दलही स्पष्टीकरण देण्यात आले. शिवाय, यहोवाच्या साक्षीदारांना रक्‍तहीन शस्त्रक्रिया करण्यात सहकार्य दिलेल्या डॉक्टरांच्या यशाबद्दलही सांगण्यात आले.

या चर्चासत्राला दररोज किमान १०० लोक उपस्थित राहत होते; यांच्यातले पुष्कळ जण वकील होते. मेक्सिकोच्या धार्मिक व्यवहाराच्या दफ्तराचे सदस्य देखील येथे उपस्थित होते. नैतिक किंवा धार्मिक कारणांवरून आक्षेप घेण्याविषयी तज्ज्ञांचे काय मत आहे हे उपस्थित असलेल्या सर्वांना समजले. मेक्सिकोतल्या विधीमंडळाला ही संकल्पना नवीन आहे. तथापि, फ्रान्स, पोर्तुगल, स्पेन आणि अमेरिका या प्रजासत्ताक राष्ट्रांमध्ये त्याचप्रमाणे झेकिया आणि स्लोव्हाकियासारख्या काही भूतपूर्व कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये देखील याला पूर्ण मान्यता मिळालेली आहे.

[तळटीपा]

^ टेहळणी बुरूजच्या सप्टेंबर १, १९९३ (इंग्रजी) अंकातला “ग्रीसमध्ये प्रचार करण्याच्या हक्काला युरोपियन उच्च न्यायालयाची संमती” आणि डिसेंबर १, १९९८ अंकातला “सुवार्तेचा कायदेशीररित्या बचाव करणे” हा लेख पाहा.

^ टेहळणी बुरूजच्या (इंग्रजी) सप्टेंबर १, १९८५ अंकातला, “तुरुंगवास आणि मरणापुढेही माझ्या कुटुंबाने देवाला त्यागले नाही” हा लेख तसेच जानेवारी १५, १९९४ (इंग्रजी) अंकातील पृष्ठ ५ देखील पाहा.

[२३ पानांवरील चित्र]

मेक्सिकोतील यहोवाच्या साक्षीदारांना प्रचाराचे स्वातंत्र्य बहुमोलाचे वाटते