व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रक्‍तसंक्रमणाचा वादग्रस्त इतिहास

रक्‍तसंक्रमणाचा वादग्रस्त इतिहास

रक्‍तसंक्रमणाचा वादग्रस्त इतिहास

“आज तांबड्या रक्‍तपेशींपासून तयार केलेले एखादे नवीन औषध कोणी बाजारात आणले तर त्या औषधाचा वापर करण्याचा परवाना मिळवणे अतिशय कठीण जाईल.”—डॉ. जेफ्री मॅक्लो

सन १६६७ च्या दशकातली गोष्ट. बाहेर कडाक्याची थंडी पडली होती. आँटवान मॉरेय नावाच्या एका खतरनाक वेड्याला झाँ बेटीस्ट दनी (फ्रान्सचे राजे १४ वे लुई यांचे प्रमुख डॉक्टर) यांच्याकडे उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरने त्या वेड्याला वासराचे रक्‍त दिले. डॉक्टरचे म्हणणे होते, की त्याच्या वेडेपणावर हा एक रामबाण “उपाय” असून त्यामुळे वेडा नक्कीच ताळ्यावर येईल. पण, डॉक्टरने विचार केला होता तसे मुळीच झाले नाही. वासराचे रक्‍त दिल्याने त्या वेड्याला थोडेफार बरे वाटू लागले खरे; पण थोड्या वेळानंतर त्याला वेडेपणाचे आणखीनच तीव्र झटके येऊ लागले. वेडेपणाचा एक झटका इतका जबरदस्त होता, की त्यातच हा वेडा जिवानिशी गेला.

आर्सेनिक विषामुळे तो वेडा मरण पावला हे नंतर कळाले खरे, पण रुग्णाला जनावराचे रक्‍त दिल्यामुळे संबंध फ्रान्समध्ये मोठी खळबळ माजली. अशाप्रकारच्या उपचाराविरुद्ध जनतेने आवाज उठवला आणि त्यामुळे १६७० मध्ये रुग्णाला रक्‍त देण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर लगेच ब्रिटन सरकाराने आणि पोपने देखील या उपचार पद्धतीला पायबंद घातला. अशाप्रकारे, रक्‍तसंक्रमणाची प्रक्रिया पुढच्या १५० वर्षांच्या काळात गडप झाली.

प्राणघातक उपचार

पण १९ व्या शतकात जेम्स ब्लन्डेल यांनी पुन्हा एकदा उपचारात रक्‍तसंक्रमणाचा वापर सुरू केला. त्यानंतर अशा प्रकारची उपचार पद्धत जोर धरू लागली. का? कारण ब्लन्डेल यांनी या प्रक्रियेत आधुनिक साधनांच्या उपयोगाखेरीज अनेक सुधारणा देखील केल्या होत्या. शिवाय, रक्‍तसंक्रमणाच्या त्यांच्या प्रक्रियेत केवळ मनुष्याच्या रक्‍ताचा उपयोग करण्यावर त्यांनी जोर दिला. अशाप्रकारे, पुन्हा एकवार रक्‍तसंक्रमणाच्या प्रक्रियेने डोके वर काढले.

परंतु, १८७३ साली पोलंडचे डॉक्टर एफ. गेझेलीयस यांनी एक धक्केदायक माहिती लोकांपुढे मांडली. त्यांनी म्हटले की ज्या ज्या लोकांना रक्‍त दिले होते त्यांपैकी निम्मेअधिक रुग्ण दगावले होते. हे ऐकून नामांकित डॉक्टर देखील रक्‍तसंक्रमणाच्या विरोधात बोलू लागले. अशाप्रकारे, पुन्हा एकदा डॉक्टरांनी उपचारात रक्‍तसंक्रमणाचा वापर करण्याचे बंद केले.

मग, १८७८ साली जॉर्ज आएम या फ्रेंच डॉक्टरने एक सलाईन सोल्यूशन तयार केले. उपचारात रक्‍ताऐवजी सलाइन सोल्यूशनचा उपयोग करता येतो. या सोल्यूशनचे अनेक फायदे होते. जसे की हे सोल्यूशन रुग्णाला दिल्यामुळे कोणतेही साइड इफेक्टस्‌ किंवा विपरीत परिणाम होत नव्हते. शरीराबाहेर असलेल्या रक्‍ताच्या काही काळातच जशा गुठळ्या किंवा गाठी होतात तशा या सोल्यूशनच्या गुठळ्या होत नसल्यामुळे ते अगदी सहजपणे कोठेही नेता येत होते. अशा सर्व फायद्यांमुळे साहजिकच आएम यांनी तयार केलेल्या सलाइन सोल्यूशनचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला. पण, दुःखाची गोष्ट अशी, की अद्यापही काही डॉक्टर उपचारात रक्‍ताचा उपयोग करत होते. असे का?

याचे मूळ कारण होते ऑस्ट्रियाचे डॉक्टर कार्ल लँडस्टायनर. त्यांनी रक्‍तासंबंधित एक नवीनच माहिती लोकांसमोर आणली. सन १९०० मध्ये त्यांनी याचा शोध लावला, की माणसाच्या रक्‍ताचे वेगवेगळे ग्रुप किंवा गट असतात आणि एका ब्लडग्रुपचे रक्‍त दुसऱ्‍या बल्डग्रुपच्या रक्‍ताला चालत नाही. त्यामुळे यापूर्वी ज्या लोकांना रक्‍त दिले होते त्यांपैकी बहुतेक जण दगावले होते. प्रकाशात आलेल्या या नव्या माहितीमुळे अशी घोडचूक पुन्हा होणार नव्हती. कारण रक्‍त देताना रक्‍तदात्याचा आणि रुग्णाचा रक्‍तगट एक आहे किंवा नाही एवढेच डॉक्टरांना तपासून पाहायचे होते. लोकांच्या मते ही माहिती योग्य वेळी समोर आली कारण पहिले विश्‍व युद्ध नुकतेच सुरू झाले होते. त्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा एकदा रुग्णांना रक्‍त देण्याचा उपक्रम सुरू केला.

युद्ध आणि रक्‍तदान

पहिल्या महायुद्धात घायळ झालेल्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात रक्‍त देण्यात आले. पण, युद्धभूमीपर्यंत रक्‍त पोहंचवणे इतके सोपे नव्हते कारण एकदा का रक्‍त शरीराच्या बाहेर काढले तर त्याच्या गुठळ्या व्हायला जास्त वेळ लागत नाही. पण, २० व्या शतकाच्या सुरवातीस, या समस्येवर न्यूयॉर्कच्या माउंट सायनाय हॉस्पिटलमधील रिचअर्ड लूइसन या डॉक्टरने उपाय शोधून काढला. त्यांनी अशा एका पदार्थाचा शोध लावला जो रक्‍तात मिसळल्यास रक्‍ताच्या गुठळ्या किंवा गाठी होत नाहीत. तो पदार्थ म्हणजे सोडियम साइट्रेट. हा एक मोठा चमत्कारच असल्याचे काही डॉक्टरांना वाटले. किंबहुना, बर्ट्रम एम. बर्नहाइम या प्रख्यात डॉक्टरने तर त्यास जगातले “आठवे आश्‍चर्य” म्हटले.

त्यानंतर दुसऱ्‍या महायुद्धाला सुरवात झाली आणि रक्‍ताच्या मागणीत पहिल्यापेक्षा अधिक वाढ झाली. त्यावेळी “रक्‍तदान, महादान,” “तुमचे रक्‍त एखाद्याला जीवदान देईल” आणि “ज्याने तुमच्यासाठी रक्‍त सांडले तुम्ही त्याला आपले रक्‍त देणार नाही का?” अशी घोषवाक्ये ठिकठिकाणी भिंतीवर लिहिण्यात आली होती. अशा उत्तेजक घोषवाक्यांमुळे लोकांच्या मनात इतका उत्साह संचारला की दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेत लोकांनी चक्क ६५,००,००० लीटर रक्‍तदान केले; लंडनमध्ये अंदाजे २,६०,००० लीटरहून अधिक रक्‍तदान केले गेले. पण, रक्‍त-संक्रमणामुळे अनेक प्रकारचे आजार जडतात हे लवकरच लक्षात आले.

रक्‍तसंक्रमित आजार

दुसऱ्‍या महायुद्धानंतर वैद्यकिय क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली. त्यामुळे अशी काही ऑपरेशन्स करणे शक्य झाले ज्यांचा आधी कोणी विचारही केला नसता. पण, या अशा ऑपरेशन्समध्ये रुग्णाला रक्‍त द्यावे लागायचे. जगभरात मोठ्या प्रमाणात डॉक्टर मंडळी या उपचार पद्धतीचा उपयोग करू लागली. त्यामुळे रक्‍ताच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जागतिक पातळीवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली.

पण, काही काळातच या उपचार पद्धतीची दुसरी बाजू उजेडात आली. कारण रक्‍त घेतल्यामुळे लोकांना अनेक प्रकारचे आजार होत होते. उदाहरणार्थ, कोरियाच्या युद्धकाळात ज्या लोकांना रक्‍त दिले होते त्यांपैकी तब्बल २२ टक्के (दुसऱ्‍या महायुद्धातील रुग्णांच्या संख्येच्या तिप्पट) लोकांना हेपाटायटिसचा आजार जडल्याचे समजते. सन १९७० मध्ये यू.एस. सेंटर्स फॉर डिझीज कंट्रोल या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या आजारामुळे दर वर्षी ३,५०० लोकांचा मृत्यू होत होता. इतर काहींनी तर ही संख्या दहापट असल्याचे सांगितले आहे.

हेपाटायटिस हा रक्‍तसंक्रमित आजार आहे हे समजल्यानंतर रक्‍ताची चाचणी करण्यात येऊ लागली आणि त्यामुळे हेपाटायटिस-बी च्या रुग्णांची संख्या रोडावली. पण, मग दुसरा एक आजार सुरू झाला जो याहीपेक्षा जीवघेणा ठरला; तो आजार होता हेपाटायटिस सी. असे म्हटले जाते, की अमेरिकेत जवळजवळ चाळीस लाख लोक या आजाराचे बळी ठरले आणि यांपैकी हजारोंना रक्‍त घेतल्यामुळे हा आजार जडला होता. त्यामुळे मग रक्‍ताची अधिक काळजीपूर्वक चाचणी होऊ लागली. परिणामी हेपाटायटिस-सी हा आजार हळूहळू कमी होऊ लागला. पण, तरीही रक्‍त घेतल्यामुळे आणखीन एखादा नवीन आजार झाला तर? आणि तो लक्षात येईपर्यंत बराच वेळ झाला तर? अशी एक भिती लोकांच्या मनात घर करून राहिली.

आणखी एक धोका: एचआयव्ही (HIV) दूषित रक्‍त

पुढे, १९८० च्या दशकात लक्षात आले, की रक्‍तामध्ये एचआयव्ही अर्थात एड्‌स रोगजंतू देखील असू शकतात. सुरवातीला, आपल्याजवळ असलेल्या रक्‍तसाठ्यात हा रोगजंतू असण्याची शक्यता रक्‍त पेढीवाल्यांनी साफ नाकारली. एचआयव्हीच्या रोगजंतूंमुळे एखादा आजार जडेल हे मानायला देखील काही लोक तयार नव्हते. डॉ. ब्रूस इवट म्हणतात: “लोकांनी आमच्या म्हणण्यावर अजिबात विश्‍वास ठेवला नाही. . . . त्यांनी या कानानं ऐकलं आणि त्या कानानं सोडून दिलं.”

आज मात्र अनेक देशांमध्ये लोकांना एचआयव्ही रोगजंतूंने दूषित असलेले रक्‍त दिल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. उदाहरणार्थ, फ्रान्समध्ये १९८२ आणि १९८५ च्या दरम्यान जवळजवळ ६,००० ते ८,००० लोकांना एचआयव्ही दूषित रक्‍त दिल्याचा अंदाज बांधला जातो. आफ्रिकेत एचआयव्हीची बाधा झालेल्या एकूण रुग्णांपैकी १० टक्के लोकांना आणि पाकिस्तानमध्ये ४० टक्के लोकांना हा रोग रक्‍तसंक्रमणामुळे झाला आहे. विकसित राष्ट्रांमध्ये रक्‍ताची अतिशय काळजीपूर्वक चाचणी केली जात असल्यामुळे या रोगाचे प्रमाण आज फारच कमी झाले आहे. पण, विकसनशील आणि गरीब देशांमध्ये ही समस्या आहे तशीच आहे, कारण रक्‍ताची काळजीपूर्वक चाचणी करण्याकरता लागणारी उपकरणे व सुविधा या देशांत उपलब्ध नाहीत.

कदाचित, यामुळेच अलीकडच्या काही वर्षांत उपचारात आणि शस्त्रक्रियेत रक्‍त न घेणे लोकांना अधिक सुरक्षित वाटू लागले आहे. पण, यामुळे धोका संभवण्याची काही शक्यता आहे का?

[६ पानांवरील चौकट]

रक्‍त द्यावे किंवा नाही ही डॉक्टरांची इच्छा

अमेरिकेत दर वर्षी ३०,००,००० रुग्णांना जवळजवळ ५५,००,००० लीटर रक्‍त दिले जाते. एवढी मोठी संख्या पाहून तुम्हाला कदाचित वाटेल की रक्‍तसंक्रमणाच्या बाबतीत सर्व डॉक्टर एकच नियम पाळत असतील. पण द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसन हे नियतकालिक म्हणते, की “रुग्णाला रक्‍त द्यावे किंवा नाही हे ठरवण्याकरता डॉक्टरांना मदत होईल असे काहीच नाही.” वास्तवात, प्रत्येक डॉक्टर आपल्या मनाप्रमाणे हा निर्णय घेतो. रुग्णाला रक्‍ताची गरज आहे किंवा नाही आणि असलीच तर किती रक्‍त द्यावे हे ठरवण्याकरता डॉक्टरांमध्ये कोणताही एक नियम नसतो. आक्टा आनेस्टाजीयोलोजिका बेल्जीका या मेडिकल नियतकालिकानुसार, “रुग्ण व्यक्‍तीला रक्‍त द्यावे अथवा न द्यावे हे सर्वस्वी डॉक्टरांवर अवलंबून असते, रुग्णावर किंवा त्याच्या स्थितीवर नव्हे.” हे लक्षात घेता, “अंदाजे ६६ टक्के रुग्णांना अनुचितपणे किंवा चुकीच्या प्रमाणात रक्‍त दिले जाते असे द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसन या नियतकालिकाने जे म्हटले त्याचे आपल्याला आश्‍चर्य वाटायला नको.

[५ पानांवरील चित्रे]

दुसऱ्‍या महायुद्धात रक्‍ताची मागणी विलक्षण वाढली

[चित्राचे श्रेय]

Imperial War Museum, London

U.S. National Archives photos