रक्तहीन उपचार व शस्त्रक्रिया यांची वाढती लोकप्रियता
रक्तहीन उपचार व शस्त्रक्रिया यांची वाढती लोकप्रियता
“शस्त्रक्रिया करतेवेळी रक्ताचा उपयोग करणाऱ्या सर्व डॉक्टरांनी आता रक्तहीन शस्त्रक्रियेचा गांभीर्यपूर्वक विचार करावा.”—डॉ. योआयेकिम बोल्ट, ॲनेस्थेशिओलॉजीचे प्रोफेसर, लुटविग्जहाफेन, जर्मनी.
एड्सच्या शोकांतिकेमुळे आज वैज्ञानिक आणि डॉक्टर कोणतेही ऑपरेशन करताना मोठी खबरदारी बाळगतात. उदाहरणार्थ, रुग्णाला रक्त द्यायचे असल्यास त्याआधी ते रक्ताची कसून तपासणी करतात. पण, एवढ्याने रोग जडण्याचा धोका टळत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ट्रान्सफ्यूशन नियतकालिक म्हणते: “रक्त निर्धोक करण्यासाठी कितीही प्रयत्न केलेत तरी ते पूर्णपणे निर्धोक करणे अशक्य आहे. म्हणून रक्त घेण्यास लोक कचरतात.”
त्यामुळे रक्त देण्याआधी डॉक्टर दोनवेळा विचार करतात, ताबडतोब रक्त देत नाहीत. सॅन फ्रॅन्सिस्को, कॅलिफोर्नियाचे
डॉ. ॲलेक्स जापोलांस्की म्हणतात: “खरे तर रक्तसंक्रमणाचा काहीएक फायदा नाही. म्हणूनच आम्ही ते शक्यतो टाळण्याचाच जास्त प्रयत्न करतो.”आज सर्वसामान्य जनतेला देखील रक्त घेण्याचे धोके स्पष्ट दिसू लागले आहेत. कॅनडामध्ये १९९६ साली एक सर्व्हे घेतला होता तेव्हा ८९ टक्के लोकांनी म्हटले की त्यांना रक्त घ्यायला मुळीच आवडणार नाही; पण, रक्ताऐवजी आणखी एखादा पर्यायी उपचार असल्यास त्यासाठी त्यांची काही हरकत नसेल. जर्नल ऑफ वॅस्क्यूलर सर्जरी या नियतकालिकेने म्हटले की, “रक्त घेण्या-देण्याबाबत सगळेच रुग्ण यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणे एक नकारात्मक पवित्रा घेणार नाहीत. पण, कोणता ना कोणता रक्तसंक्रमित आजार जडण्याच्या धोक्यामुळे आपल्या सर्व रुग्णांसाठी आपल्याला एखादी रक्तहीन उपचार पद्धत शोधावी लागेल हे आता आमच्या लक्षात आले आहे.”
अनेकांची पसंत
पण, आनंदाची गोष्ट अशी की आज रक्तहीन उपचार आणि रक्तहीन शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. आणि अनेकांसाठी हा नाइलाज किंवा शेवटचा पर्याय नाही तर ही उपचारपद्धती त्यांची पहिली पसंत आहे. त्याला कारणही तसेच आहे. ब्रिटनचे कन्सलटंट सर्जन, स्टीवन जेफ्री पोलर्ड यांचे म्हणणे आहे, की रक्तविरहीत उपचारामुळे “जितके लोक आजारी पडतात किंवा दगावतात तितकेच लोक रक्त देऊन केलेल्या उपचारामुळे आजारी पडतात किंवा दगावतात. पण, रक्तसंक्रमणामुळे रुग्णांना सहसा जो प्रादुर्भाव होतो किंवा गुंतागुंतीची स्थिती निर्माण होते त्याचा रक्त न घेणाऱ्या रुग्णांना धोका नसतो.”
पण मनात प्रश्न येतो, की रक्तहीन उपचाराची सुरवात झाली कशी? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. कारण रक्त देऊन रुग्णावर उपचार करण्याची पद्धत जर विसाव्या शतकात प्रलचित झाली; तर स्पष्टच आहे, की त्यापूर्वी रक्त न देताच रुग्णावर उपचार केले जायचे. पण, गेल्या वीसएक वर्षांत रक्तहीन उपचार आणि रक्तहीन शस्त्रक्रिया करण्यात काही डॉक्टर अगदी सराईत झाले आहेत. उदाहरणार्थ, १९६० च्या दशकात प्रसिद्ध सर्जन डेन्टन कूली यांनी रक्त न देता कित्येक ओपन हार्ट सर्जरी केल्या आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे १९७० नंतरच्या वर्षांत रक्तसंक्रमित हेपाटायटिसच्या रुग्णांची संख्या उत्तरोत्तर वाढू लागली. त्यामुळे रक्त देण्याऐवजी आणखीन कोणता उपचार करता येईल का याचा शोध डॉक्टर मंडळी करू लागली. आणि काही काळातच
म्हणजे १९८० च्या काळात डॉक्टरांची अनेक पथके रक्तहीन शस्त्रक्रिया प्रत्यक्षात करू लागली होती. पुढे एड्सचा संसर्ग तुफान वेगाने सर्वत्र पसरू लागला तेव्हा सदर उपचार पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अनेक डॉक्टर या पथकांचा सल्ला घेऊ लागले. याचा परिणाम असा झाला, की १९९० नंतर अनेक हॉस्पिटल्समध्ये रक्त न देता रुग्णावर उपचार करणे शक्य झाले आहे आणि ही उपचार पद्धत हवी असलेल्या रुग्णांना ताबडतोब आणि पूर्ण मदत केली जाते.ही उपचार पद्धत इतकी यशस्वी ठरली आहे, की बरेच डॉक्टर आता रक्ताशिवाय ऑपरेशन करू शकतात. पूर्वी ज्या ऑपरेशनमध्ये किंवा एमर्जेन्सीमध्ये रुग्णाला रक्त देणे अत्यंत जरूरी समजले जायचे अशा केसेसमध्ये देखील रुग्णाला रक्त देण्याची गरज पडत नाही. होय, पूर्वी जे शक्य नव्हते ते आता सहजशक्य झाले आहे. कनेडियन जर्नल ऑफ ॲनेस्थेशिया यात डी. एच. डब्ल्यू. वाँग म्हणतात: “कार्डियक आणि व्हॅस्क्यूलर ऑपरेशन, स्त्रीरोग अथवा जनन समस्यांसंबंधित ऑपरेशन, ऑर्थोपेडिक अथवा युरोलॉजिकल यांसारख्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया रक्त न देताही यशस्वीपणे केल्या जातात.
रक्तहीन शस्त्रक्रियेचा एक फायदा हा आहे, की यात रुग्णावर अधिक चांगल्याप्रकारे उपचार केले जातात. क्लीव्हलँड, ओहायओचे डॉ. बेन्जामिन जे रेइकस्टेन यांच्या मते, “ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला कमीतकमी रक्तस्राव होईल याची काळजी घेणे हाच एका सक्षम डॉक्टरचा उद्देश असतो.” दक्षिण आफ्रिकेचे एक कायदाविषयक नियतकालिक म्हणते, की रक्तहीन शस्त्रक्रियेला सहसा “कमी वेळ लागतो. तसेच, अधिक स्वच्छता राखून कमी खर्चात अशा शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय, ऑपरेशननंतर रुग्णाची देखभाल करण्यासाठी जास्त वेळ आणि पैसाही खर्च होत नाही.” अर्थात, आज जगभरातील १८० हॉस्पिटल्समध्ये रक्तहीन उपचार आणि रक्तहीन शस्त्रक्रिया यांचे खास कार्यक्रम का राबवले जातात याची ही फक्त एकदोन कारणे आहेत.
रक्त-संक्रमणाविषयी यहोवाच्या साक्षीदारांचा दृष्टिकोन
रक्ताविषयी असलेल्या बायबलमधील नियमांमुळे यहोवाचे साक्षीदार रक्त घेत नाहीत. * पण याचा अर्थ, ते उपचारच घेऊ इच्छित नाही असे नाही. ज्या उपचारात रुग्णाला रक्ताचा एक थेंबही दिला जात नाही अशा उपचार पद्धतीचा ते पूर्ण फायदा घेतात. न्यूयॉर्क हॉस्पिटलचे भूतपूर्व डायरेक्टर ऑफ सर्जरी डॉ. रिचर्ड के. स्पेन्स यांचे म्हणणे आहे: “आपल्यावर आणि आपल्या प्रिय जनांवर उत्तमातला उत्तम उपचार व्हावा अशी यहोवाच्या साक्षीदारांची इच्छा आहे. किंबहुना, इतर लोकांपेक्षा याच लोकांना उपचार पद्धतींविषयी अधिक माहिती आहे आणि यामुळेच सर्वोत्तम उपचार पद्धत निवडण्यास त्यांना मदत होते.”
अनेक यहोवाच्या साक्षीदारांवर रक्तविरहित शस्त्रक्रिया करून आता बरेच डॉक्टर या उपचार पद्धतीत प्रविण झाले आहेत. सर्जन डेन्टन कूली यांचेच उदाहरण घ्या. त्यांच्या टीमने २७ वर्षांत रक्त न देता ६६३ यहोवाच्या साक्षीदारांची ओपन हार्ट सर्जरी केली आहे. यावरून हेच सिद्ध होते की रक्ताशिवाय हार्टचे ऑपरेशन्स करणे मुळीच अशक्य नाही.
एकीकडे रक्त न घेतल्यामुळे बऱ्याच लोकांनी यहोवाच्या साक्षीदारांना नको ते बोलून त्यांचा अपमान केला, तर दुसरीकडे ॲनेस्थेसिस्ट ऑफ ग्रेट ब्रिटन ॲण्ड आयरलँडमध्ये प्रकाशित केलेल्या एका लेखाने म्हटले, की रक्तासंबंधित यहोवाच्या साक्षीदारांचा अढळ विश्वास हेच दाखवून देतो की “त्यांना जीवनाची कदर आहे.” आज लोकांना जो सुरक्षित उपचार मिळत आहे तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांचा मोठा हात राहिला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण रक्त घेण्यास त्यांनी नेहमीच नकार दिला आहे. नॉर्वेच्या नॅशनल हॉस्पिटलचे प्रोफेसर स्टेन ए. इवनसन यांचे म्हणणे आहे की “देशभरात उत्तम स्वास्थ्य आणि निगा राखण्यात यहोवाच्या साक्षीदारांचे मोठे योगदान आहे. सर्जरी करण्याची गरज निर्माण होते तेव्हा आपल्याला कोणत्या स्वरूपाचा उपचार हवा आहे त्याविषयी ते आपल्या डॉक्टरांशी सविस्तर बोलतात. होय, त्यांच्या अढळ धार्मिक विश्वासामुळेच आज आम्ही एवढी प्रगती केली आहे.”
रक्तहीन उपचार पद्धतींबद्दल डॉक्टरांना अधिक माहिती देण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी हॉस्पिटल लियजॉन कमिटी स्थापन केली आहे. सध्या जगभरात अशा १,४०० कमिट्या असून रक्तहीन उपचार आणि रक्तहीन शस्त्रक्रिया या विषयांवर त्यांचे ३,००० हून अधिक लेख कंम्प्युटरवर उपलब्ध आहेत. यामुळे डॉक्टरांना आणि या क्षेत्राशी संबंध असलेल्या इतर लोकांना याची माहिती मिळू शकते. या कमिट्यांविषयी बॉस्टन कॉलेज लॉ स्कूलचे प्रोफेसर डॉ. चार्ल्स बॅरन यांचे असे मत आहे, की “हॉस्पिटल लियजॉन कमिटीमुळेच तर आज केवळ यहोवाच्या साक्षीदारांना नव्हे तर दुसऱ्या कोणत्याही रुग्णाला अकारण रक्त देण्याची गरज पडत नाही.” *
यहोवाच्या साक्षीदारांनी रक्तहीन उपचारांबद्दल जी काही माहिती गोळा केली आहे त्याचा मेडिकल क्षेत्रातील लोकांना फायदाच झाला आहे. उदाहरणार्थ, काही लेखकांनी मिळून ऑटोट्रांस्फूशन: थेराप्यूटिक प्रिंसिपल्स ॲण्ड ट्रेंड्स या शीर्षकाचे एक पुस्तक लिहिले. हे पुस्तक लिहिताना, रक्तहीन उपचाराच्या आणखीन कोण-कोणत्या पद्धती आहेत याविषयी त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांकडून माहिती घेतली. आणि साक्षीदारांनीही मोठ्या आनंदाने त्यांची मदत केली. त्याबद्दल साक्षीदारांचे आभार मानताना या लेखकांनी म्हटले: “या विषयाचा आम्ही बराच सखोल अभ्यास केला आहे; पण, रुग्णाला रक्त न देण्याविषयी यहोवाच्या साक्षीदारांनी जितकी उत्तम, सुस्पष्ट आणि पूर्ण माहिती दिली तशी अभावाने कोणी दिली असती.”
आज मेडिकल क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे, की आता बहुतेक लोक रक्तहीन उपचाराचा गंभीरपणे विचार करू लागले आहेत. तर मग भविष्यात आपण कशाची अपेक्षा करू शकतो? एड्सच्या जीवाणूचा शोध लावणारे प्रोफेसर लूक मॉन्टान्ये यांचे असे म्हणणे आहे: “ज्या अर्थी, आमचे डोळे हळू हळू उघडू लागले आहेत आणि नवनवीन माहिती आमच्या हाती लागत आहे त्यावरून अशी अपेक्षा करता येईल की लवकरच अशी एक वेळ येईल जेव्हा रक्तसंक्रमण काळाच्या पडद्याआड गडप होईल.” तोपर्यंत, रक्तहीन उपचार पद्धत अनेकांच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा किरण निर्माण करत राहील.
[तळटीपा]
^ हॉस्पिटलची परवानगी घेऊन हॉस्पिटल लियजॉन कमिटी हॉस्पिटलच्या मेडिकल स्टाफला याविषयी अधिक माहिती देऊ शकते. याशिवाय, आपल्या उपचाराविषयी डॉक्टरांशी मनमोकळेपणे बोलण्याकरता रुग्ण व्यक्तीला मदत हवी असल्यास ही कमिटी मोठ्या आनंदाने रुग्णाची मदत करण्यास तयार असते.
[७ पानांवरील चौकट/चित्रे]
डॉक्टर काय म्हणतात?
‘आता केवळ यहोवाच्या साक्षीदारांवर नव्हे, तर प्रत्येक रुग्णावर रक्त न घेता शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. माझ्या मते, प्रत्येक डॉक्टरने उपचार करताना रुग्णाला रक्त देण्याचं टाळावं.’—डॉ. जोॲकिम बोल्ट, ॲनेस्थेशिओलॉजीचे प्रोफेसर, लूटविग्जहाफेन, जर्मनी.
“रक्तसंक्रमणाच्या पद्धतीत पूर्वीपेक्षा आता बरीच सुधारणा झाली असली तरी रक्तसंक्रमणामुळे रुग्णाची रोग-प्रतिकार शक्ती कमजोर होणं, हेपाटायटिस आणि एड्ससारखे रोग जडणं अशा अनेक धोक्यांची शक्यता नाकारता येत नाहीत.”—डॉ. टेरेन्स जे. साकी, मेडिसनचे क्लिनिकल असिस्टन्ट प्रोफेसर.
“बहुतेक डॉक्टर काहीएक विचार न करता ताबडतोब रुग्णाला रक्त देतात. मी मात्र असं करत नाही.”—डॉ. ॲलॅक्स जेपोलांस्की, सॅन फ्रॅन्सिस्को हार्ट इंस्टिट्यूटमधील कार्डियाक सर्जरीचे डायरेक्टर.
“पोटाचे एक सामान्य ऑपरेशन करण्यासाठी मला नाही वाटत रुग्णाला रक्त देण्याची गरज आहे.”—डॉ. योहानेस शेले, सर्जरीचे प्रोफेसर, येना, जर्मनी.
[चित्रे]
डॉ. टेरेन्स जे. साकी
डॉ. जोॲकिम बोल्ट
[८, ९ पानांवरील चौकट/चित्रे]
रक्तहीन सर्जरी आणि उपचार
काही पद्धती
फ्लूइड्स (द्रव्य): रिंगर्स लॅक्टेट सोल्यूशन, डेक्सट्रान, हाइड्रॉक्सीथील स्टार्च आणि यांसारखे काही फ्ल्यूइड्स शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य राखण्यासाठी वापरली जातात. यामुळे शरीरातील रक्त कमी झाल्याने सहसा येणारे झटके येत नाहीत. सध्या ज्या फ्ल्यूइड्सची तपासणी केली जात आहे त्यांपैकी काही शरीराच्या विविध भागांना ऑक्सिजन-पुरवठा देखील करतात.
ड्रग्ज (औषधे): प्रयोगशाळेत तयार केल्या जाणाऱ्या प्रोटिन्समुळे लाल रक्त पेशी (इरिथ्रोपॉयेटिन), ब्लड प्लेटलेट्स (इन्टरल्यूकिन-११) आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशी (जीएम-सीएसएफ, जी-सीएसएफ) यांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. असे काही ड्रग्ज (अप्रोटिनिन, अँटिफायब्रिनॉलिटिक्स) आहेत ज्यांमुळे ऑपरेशनच्या वेळी जास्त रक्तस्राव होत नाही; तर अशीही काही औषधे (डेस्मोप्रेसिन) आहेत ज्यामुळे अति-रक्तस्राव कमी करता येतो.
बायोलॉजिकल हिमोस्टॅट्स: शरीराच्या ज्या भागांतून रक्तस्त्राव होतो त्यांवर कॉलॅजेन आणि सेल्यूलोसचे गॉज अथवा पॅड्स लावून रक्तस्राव पूर्णपणे रोखला जाऊ शकतो. तर उघड्या जखमांमध्ये फायब्रिन ग्लूज आणि सीलंट घातल्यामुळे किंवा रक्तस्राव होणाऱ्या उतींवर हे लावल्यामुळे रक्तस्राव थांबवला जाऊ शकतो.
रक्त साठवणे: आजकाल अशा काही मशीन्सचा उपयोग केला जातो ज्यांत ऑपरेशन करतेवेळी वाहणारे रक्त साठवले जाते. या मशीनमध्ये रक्त चांगल्या प्रकारे शुद्ध करून मग सुरक्षित पद्धतीने पुन्हा रुग्णाला दिले जाते. या पद्धतीमुळे काही रुग्णांचे कित्येक लिटर रक्त वाचले आहे.
ऑपरेशनची उपकरणे: ऑपरेशनमध्ये रक्तवाहिन्यांची चीरफाड करण्याकरता उपयोगात येणाऱ्या उपकरणांद्वारे रक्तवाहिन्या लगेच पुन्हा बंदही करता येतात. रक्तस्राव रोखणारीही काही उपकरणे आहेत. लॅपेरास्कोपिक सारख्या उपकरणांचा, रक्तस्राव होऊ नये म्हणून मोठमोठ्या ऑपरेशन्समध्ये उपयोग केला जातो.
ऑपरेशन करण्याच्या पद्धती: कोणतेही ऑपरेशन यशस्वी व्हायचे असल्यास ऑपरेशनच्या आधी अनेक अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घेणे जरूरी आहे. त्यामुळे ऑपरेशन करतेवेळी डॉक्टरांना कोणतीही अडचण भासणार नाही. ऑपरेशनच्या वेळी अति-रक्तस्राव होऊ लागल्यास सगळ्यात प्रथम हा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करण्यास हवा. चोवीस तासांत रक्तस्राव थांबला नाही तर रुग्णाच्या जीवाला धोका पोहंचण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदाच मोठे ऑपरेशन करून घेण्याऐवजी छोटे-छोटे ऑपरेशन्स करून अति-रक्तस्रावाचा धोका कमी केला जाऊ शकतो.
[१० पानांवरील चौकट/चित्रे]
रक्तहीन उपचार—नवीन “उपचार पद्धत”?
सावध राहा! नियतकालिकाने वैद्यकीय क्षेत्रातील चार तज्ज्ञांशी रक्तहीन उपचार आणि रक्तहीन सर्जरीच्या लाभांची चर्चा केली.
आपल्या धार्मिक विश्वासांमुळे रक्त न घेणाऱ्या रुग्णांशिवाय आणखी कोणते रुग्ण रक्तहीन उपचार पद्धत पसंत करतात?
डॉ. स्पॅन: आमच्या केंद्रात रक्तहीन उपचार करवून घेणारे रुग्ण सहसा सुशिक्षित, जाणकार असतात. तेव्हा, आपण काय करत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना असते.
डॉ. शँडर: १९९८ मध्ये, इतर कारणांसाठी रक्त न घेणाऱ्या रुग्णांची संख्या, आपल्या धार्मिक विश्वासांमुळे रक्त न घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत अधिक होती.
डॉ. बॉएड: कॅन्सरच्या रुग्णांचाच विचार करा. त्यांना रक्त दिलं नाही तर त्यांची तब्येत बरीच सुधारते; शिवाय, हा रोग पुन्हा होण्याची शक्यता देखील रक्त घेणाऱ्यांच्या तुलनेत कमी झाल्याचं सिद्ध झालं आहे.
डॉ. स्पॅन: आमच्या इथे सहसा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि त्यांचे कौटुंबिक सदस्य रक्तहीन उपचार करवून घेण्यासाठी येतात. एवढेच काय, मोठमोठ्या सर्जन्सची देखील हीच विनंती असते की आम्ही रक्त न देता त्यांच्यावर उपचार करावा. एका सर्जनच्या पत्नीला ऑपरेशनसाठी आमच्याकडे आणलं होतं तेव्हा त्या सर्जनने आम्हाला अगदी निक्षून सांगितलं: “कुठल्याही परिस्थितीत तिला रक्त दिलं जाणार नाही एवढी काळजी घ्या!”
डॉ. शॅन्डर: माझ्या ॲनेस्थेशिया विभागातील सदस्यांचं म्हणणे आहे की, ‘ज्या रुग्णांवर रक्त न देता उपचार केला जातो त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होते. पण, रक्तहीन उपचार पद्धत इतकी परिणामकारक असताना आपण अजूनही दोन उपचार पद्धतींचा का बरं उपयोग करतो? प्रत्येक रुग्णावर आपल्याला याच पद्धतीनं उपचार करता येणार नाही का?’ म्हणूनच रक्तहीन उपचार आणि रक्तहीन शस्त्रक्रिया ही एक नवीन उपचार पद्धत म्हणून पुढे यावी अशी आमची इच्छा आहे.
श्री. अर्नशॉ: आजपर्यंत आम्ही फक्त यहोवाच्या साक्षीदारांवरच रक्तहीन शस्त्रक्रिया करत आलो आहोत. पण, प्रत्येक रुग्णावर हाच उपचार केला जावा अशी आमची इच्छा आहे.
ही नवीन उपचार पद्धत महागडी आहे का?
श्री. अर्नशॉ: नाही, ही उपचार पद्धत मुळीच खर्चिक नाही.
डॉ. शँडर: उलट, रक्तहीन उपचार पद्धतीत २५ टक्के खर्च वाचतो.
डॉ. बॉएड: दुसरे कशासाठी नाही तर निदान खर्च कमी करण्याच्या हेतूने तरी या उपचार पद्धतीचा उपयोग करता येण्यासारखा आहे.
ही नवीन उपचार पद्धत कितपत यशस्वी झाली आहे?
डॉ. बॉएड: मला तरी असं वाटतं, की ही पद्धत बरीच यशस्वी ठरली आहे. शिवाय, ही तर फक्त सुरवात आहे. आणि रक्तविरहित उपचार पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आणखी बरीच कारणं आपल्याला मिळत आहेत.
[चित्रे]
डॉ. डोनॉट आर. स्पॅन ॲनेस्थेशिओलॉजीचे प्रोफेसर, झ्यूरिक, स्वित्झर्लंड
डॉ. आरीए शँडर ॲनेस्थेशिओलॉजीचे असिस्टन्ट क्लिनिकल प्रोफेसर, अमेरिका
श्री. पीटर अर्नशॉ, एफआरसीएस, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, लंडन, इंग्लंड
डॉ. मार्क इ. बॉएड ऑबस्टेट्रिक्स व गाइनेकोलॉजीचे प्रोफेसर, कॅनडा
[११ पानांवरील चौकट]
रुग्णाने काय करावे
▪ रक्तसंक्रमणाची गरज निर्माण होईपर्यंत हातावर हात ठेवून बसू नका; तर रक्तहीन उपचाराविषयी आपल्या डॉक्टरांना पुरेशा वेळेआधी कल्पना द्या. हे खासकरून गरोदर स्त्रियांच्या बाबतीत तसेच ज्यांना लहान-लहान मुले आहेत अशा आईवडिलांच्या बाबतीत आणि वयस्करांच्या बाबतीत महत्त्वाचे आहे.
▪ तुमच्या ज्या काही इच्छा किंवा अटी असतील त्या लेखी स्वरूपात तुमच्या डॉक्टरांना द्या. आणि काही कायदेशीर कागदपत्रांच्या माध्यमाने असे करण्याची सोय असल्यास त्याचा आवर्जून फायदा घ्या.
▪ तुमचा डॉक्टर तुम्हाला रक्त घेण्यास जबरदस्ती करत असेल तर अशा एखाद्या डॉक्टरकडे जा जो तुमच्या इच्छेनुसार रक्त न देता तुमच्यावर उपचार करण्यास तयार असेल.
▪ रक्तविरहित ऑपरेशन करण्यासाठी रुग्णाला जी औषधे दिली जातात त्यांचा परिणाम होण्यासाठी सहसा वेळ लागतो. त्या दरम्यान ऑपरेशन करणे अत्यंत जरूरीचे आहे असे वाटल्यास वेळ लावू नका.