व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागतिक व्यसन

जागतिक व्यसन

जागतिक व्यसन

बिल हा एक सभ्य, सुजाण गृहस्थ होता. निरोगी, धडधाकट होता. त्याचे कौटुंबिक जीवनही चारचौघांसारखे होते. पण, त्याला एक वाईट सवय होती; सिगारेट ओढण्याची. तरुण वयातच त्याला हे व्यसन जडले होते. ही सवय किती वाईट आहे याची पुढे त्याला जाणीव झाली; आणि ही सवय सोडायची त्याला इच्छाही होती, पण म्हणावे तितके हे सोपे नव्हते. सिगारेट पिण्याचा मूर्खपणा चुकूनही करू नका असे तो आपल्या मुलांना वारंवार बजावून सांगायचा; पण, असे म्हणताना त्याच्या तोंडात मात्र सिगारेट असायची. कधीकधी तर तो सिगारेट्‌सचे पॅकेट चुरडून फेकून द्यायचा, पुन्हा कधी सिगारेट पिणार नाही अशी शपथ घ्यायचा. पण, त्याप्रमाणे तो फार काळ वागायचा नाही. आधी चोरून-लपून आणि मग सर्वांसमोर तो पुन्हा सिगारेट पिऊ लागायचा.

पंधरा वर्षांपूर्वी बिल कॅन्सरने गेला. त्याआधी बरेच महिने त्याला असह्‍य वेदना सोसाव्या लागल्या. सिगारेटची सवय त्याला नसती तर आज कदाचित तो जिवंत असता. त्याची पत्नी विधवा झाली नसती आणि मुले अनाथ झाली नसती.

धूम्रपानाच्या जिवघेण्या सवयीमुळे आज बिलसारख्या कित्येकांचे संसार उद्ध्‌वस्त होत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या (डब्ल्यूएचओ) वृत्तानुसार दर वर्षी चाळीस लाख जण तंबाखू व सिगारेटच्या व्यसनामुळे दगावतात. दुसऱ्‍या शब्दांत, दर आठ सेकंदांना एक व्यक्‍ती. तंबाखूचे व्यसन हे जागतिक आरोग्य समस्यांच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. या व्यसनाला आळा घातला तर बरेचसे आजार टाळता येण्यासारखे आहेत. पण, आहे तीच स्थिती राहिली तर मात्र आजपासून वीस वर्षांनंतर धूम्रपान हे जगभरात होणाऱ्‍या मृत्यूंचे व अपंगत्वाचे सर्वात प्रमुख कारण ठरेल. म्हणजे एड्‌स, टीबी, प्रसूतीशी संबंधित समस्या, मोटार दुर्घटना, आत्महत्या आणि खून या सर्व कारणांमुळे दगावणाऱ्‍या लोकांपेक्षा धूम्रपानामुळे दगावणाऱ्‍यांची संख्या जास्त असेल.

सिगारेटची सवय म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण आहे. हे माहीत असूनही, दर दोन पावलांवर कोणी न कोणी सिगारेट ओढताना दिसतो. डब्ल्यूएचओच्या वृत्तानुसार जगात कमीतकमी शंभर कोटी दहा लाख लोक धूम्रपान करतात. याचा अर्थ एकंदर लोकसंख्येपैकी तीस टक्के प्रौढ व्यक्‍ती सिगारेटच्या सवयीचे गुलाम आहेत.

या समस्येवर संशोधन करणारे सांगतात की, सिगारेट उत्पादन करणाऱ्‍या कंपन्यांविरुद्ध न्यायालयात सतत तक्रारी केल्या जातात; आणि कोर्टातले वाद मिटवण्यासाठी या कंपन्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतात; पण यामुळे त्यांना फारसा फरक पडत नाही कारण वर्षाला त्यांना कितीतरी कोटी डॉलर्सचा नफा मिळत असतो. अमेरिकेतच, सिगारेट कारखान्यांत दररोज एक कोटी पन्‍नास लाख सिगारेटी तयार केल्या जातात. सबंध जगात सिगारेट कंपन्या सरकारी धोरणांच्या मदतीने वर्षाला पाच महापद्‌म सिगारेटींची विक्री करतात!

ही सवय इतकी घातक असूनही लोकांना ती सोडायला इतके कठीण का जाते? तुम्हीपण या सवयीचे गुलाम आहात का, मग तुम्हाला धूम्रपानाच्या बेड्यांपासून मुक्‍तता कशी मिळू शकते? पुढच्या लेखात या प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत.