व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धूम्रपानाची सवय तुम्ही का सोडावी?

धूम्रपानाची सवय तुम्ही का सोडावी?

धूम्रपानाची सवय तुम्ही का सोडावी?

ज्यांना जगण्याची इच्छा आहे आणि ज्यांना आनंदी, समाधानी जीवन जगण्याची इच्छा आहे, अशांनी चुकूनही सिगारेट पिऊ नये. बऱ्‍याच काळापासून सिगारेट पिणाऱ्‍या लोकांपैकी निम्मे, आज न उद्या या सवयीमुळे दगावतील. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनचे (डब्ल्यूएचओ) डायरेक्टर-जनरल म्हणतात: “सिगारेट ही फार चलाखीने तयार केलेली वस्तू आहे . . . एका सिगारेटीत ठराविक प्रमाणातच निकोटीन असल्यामुळे सिगारेट पिणाऱ्‍या व्यक्‍तीला पुढच्या सिगारेटची ओढ लागते. ही ओढ व्यसन बनते आणि हे व्यसन त्या व्यक्‍तीच्या मृत्यूचे कारण.”

तेव्हा सिगारेट सोडण्याचे पहिले कारण म्हणजे हे व्यसन आरोग्याला आणि जीवाला घातक आहे. सिगारेट ओढल्यामुळे २५ पेक्षा जास्त जिवघेणे रोग होऊ शकतात असे दिसून आले आहे. उदाहरणार्थ, हृदयविकार, पक्षाघात, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, एम्फिसिमा आणि बऱ्‍याच प्रकारचे कर्करोग, विशेषतः फुफ्फुसांचा कर्करोग.

अर्थात, सिगारेट पिणाऱ्‍या व्यक्‍तीला कधीकधी बरीच वर्षे यांपैकी कोणतेही रोग होत नाहीत. पण म्हणून काही त्या व्यक्‍तीला या सवयीमुळे कोणतेच नुकसान होत नाही असे म्हणता येईल का? नाही. सिगारेटच्या जाहिरातींत सहसा सिगारेट पिणारे फारच देखणे, आकर्षक आणि निरोगी दाखवले जातात. पण प्रत्यक्षात तसे नसते. धूम्रपान करणाऱ्‍यांच्या तोंडाची दुर्गंधी येते, त्यांच्या दातांवर डाग पडतात आणि त्यांची नखे देखील पिवळट पडतात. पुरुषांना या सवयीमुळे नपुंसकत्वही येऊ शकते. सिगारेट पिणाऱ्‍यांना सहसा खोकला आणि दम लागण्याचा त्रास असतो. चेहऱ्‍यावर अकाली सुरकुत्या पडण्याची आणि त्वचारोग देखील होण्याची शक्यता असते.

दुसऱ्‍यांना होणारा त्रास

बायबल म्हणते: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३९) तुमचे सर्वात जवळचे शेजारी म्हणजे तुमच्या घरातले लोक. त्यांच्यावर तुमचे प्रेम असेल तर तुम्ही धूम्रपान सोडलेच पाहिजे.

कारण सिगारेट पिण्याच्या तुमच्या सवयीमुळे इतरांना त्रास होतो. पूर्वी, कोणत्याही ठिकाणी बिनधास्त सिगारेट पिण्याची मुभा होती, कोणी सहसा काही बोलायचे नाही. पण आता मात्र लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. कारण तुमच्याजवळ उभा राहून कोणी सिगारेट पीत असेल, तर त्या धुराचा श्‍वास घेतल्यामुळेही बरेच आजार होऊ शकतात हे आता बऱ्‍याच लोकांना समजले आहे. सिगारेट न पिणाऱ्‍या व्यक्‍तीच्या जोडीदाराच्या तुलनेत सिगारेट पिणाऱ्‍या व्यक्‍तीच्या जोडीदाराला फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची तीस टक्के अधिक शक्यता आहे. शिवाय, धूम्रपान करणाऱ्‍यांच्या मुलांना देखील पहिल्या दोन वर्षांत न्युमोनिया किंवा ब्रॉन्कायटिस होण्याची जास्त शक्यता असते.

सिगारेट ओढणाऱ्‍या गरोदर स्त्रिया होणाऱ्‍या बाळाचा जीव अक्षरशः धोक्यात घालतात. सिगारेटच्या धुरात निकोटीन, कार्बन मोनोक्साईड आणि इतर विषारी रसायने असतात आणि हे विषारी पदार्थ आईच्या रक्‍तप्रवाहातून सहज बाळापर्यंत पोचू शकतात. यामुळे अचानक गर्भपात होणे, मृत बालक जन्माला येणे आणि नवजात शिशुंचा मृत्यू होणे यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. शिवाय ज्या बालकांची आई गर्भावस्थेत धूम्रपान करत होती अशी बालके सडन इन्फंट डेथ सिंड्रोमने (बालकांचा अचानक मृत्यू होण्याचा विकार) दगावण्याची तिप्पट शक्यता असते.

अनावश्‍यक खर्च

धूम्रपान सोडण्याचे आणखी एक कारण म्हणजे हा एक महागडा शौक आहे. वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवर धूम्रपानामुळे होणाऱ्‍या आजारांवर दरवर्षी केला जाणारा खर्च दोन हजार कोटी डॉलर इतका आहे. शिवाय, हे आजार होणाऱ्‍यांना जो त्रास, ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेगळ्याच.

सिगारेट ओढणाऱ्‍याला या सवयीमुळे वर्षाला किती खर्च होतो हे शोधून काढणे अगदी सोपे आहे. तुम्हाला ही सवय असेल तर हे सोपे गणित तुम्हीही करून पाहा. दररोज तुम्ही सिगारेटींवर जितके पैसे खर्च करता, त्या संख्येला ३६५ ने गुणा. यावरून, वर्षाला तुम्ही सिगारेटींवर किती पैसे खर्च करता हे तुम्हाला दिसून येईल. आता त्या संख्येला दहाने गुणा. पुढच्या दहा वर्षांपर्यंत तुम्ही सिगारेट पीत राहिला तर तुम्हाला किती खर्च येईल हे यावरून तुम्हाला कळून येईल. धक्का बसला ना? विचार करा, याच पैशात तुम्हाला किती काही करता आले असते.

सुरक्षित पर्याय?

सिगारेट कंपन्या टार आणि निकोटीनचे कमी प्रमाण असलेल्या सौम्य सिगारेटींच्या जाहिराती देतात. धूम्रपानामुळे होणाऱ्‍या दुष्परिणामांचा धोका कमी करण्यासाठी या खास सौम्य सिगारेटी असतात. पण या सौम्य सिगारेटी ओढू लागल्यानंतरही त्या व्यक्‍तीला सवयीप्रमाणे पूर्वीइतक्याच निकोटीनची ओढ असते. त्यामुळे मग ती व्यक्‍ती जास्त सिगारेटी ओढू लागते, मोठे झुरके घेऊ लागते किंवा पुन्हापुन्हा झुरके घेते. या सौम्य सिगारेटींपासून शरीराला काहीच नुकसान नाही अशातला भाग नाही. तेव्हा, सिगारेटची सवय पूर्णपणे सोडून देणेच सर्वात उत्तम.

पाईप आणि सिगार्स ओढण्याविषयी काय? जाहिराती पाहिल्यावर लोकांना पाईप किंवा सिगार्स ओढणे हे प्रतिष्ठितपणाचे लक्षण आहे असे वाटते. पण यांतून निघणारा धूर देखील सिगारेटींच्या धुराइतकाच घातक आहे. सिगार किंवा पाईप यांतून निघणारा धूर जरी सिगारेटच्या धुराप्रमाणे शरीरात जात नसला तरीसुद्धा यामुळे ओठांचा, तोंडाचा किंवा जिभेचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते.

काही लोकांना सिगारेटची सवय नसली तरी तपकीर ओढण्याची किंवा तंबाखू खाण्याची सवय असते. बाजारात तपकीर म्हणजेच तंबाखूची पावडर तसेच खाण्याची तंबाखू देखील लहानशा डब्यांमध्ये किंवा पाकिटांत मिळते. पण या सवयी देखील नुकसानकारक आहेत. कारण तपकीर, तंबाखू व गुटखा यासर्वांमुळे श्‍वासाची दुर्गंधी, दातांवर डाग, तोंडाचा किंवा श्‍वासनलिकेचा कॅन्सर, निकोटीनचे व्यसन, तोंडात पांढरे फोड व त्यांमुळे होणारा कॅन्सर, हिरड्यांचे विकार आणि इतर दंत विकार होऊ शकतात. सिगारेट ओढण्यापेक्षा या सवयी चांगल्या असे कधीही समजू नका.

सवय सोडून देणे सर्वात उत्तम

बरीच वर्षे धूम्रपान केल्यानंतर तुम्ही ही सवय सोडून देता तेव्हा तुम्हाला कोणते चांगले परिणाम पाहायला मिळतील? शेवटची सिगारेट विझवल्यानंतर अवघ्या वीस मिनिटातच तुमचे ब्लड प्रेशर नॉर्मलवर येईल. एका आठवड्यात तुमच्या शरीरातले सगळे निकोटीन नाहीसे होईल. एका महिन्यानंतर खोकला, सायनसचा त्रास, थकवा, धाप लागणे हे सर्व कमी होऊ लागेल. पाच वर्षांनंतर, फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे दगावण्याचा धोका ५० टक्क्यांनी घटेल. पंधरा वर्षांनंतर तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता ही सामान्य तब्येतीच्या, कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्‍तीला असते तितकीच राहील.

अन्‍न पूर्वीपेक्षा जास्त रुचकर लागेल. तुमच्या तोंडाला, शरीराला आणि कपड्यांना सिगारेटचा उग्र वास राहणार नाही. तंबाखू किंवा सिगारेटी विकत घेण्यात तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. तुमचा आत्मसम्मान वाढेल, काहीतरी करून दाखवल्याचे समाधान मिळेल. तुम्हाला मुले असल्यास तुमचे उदाहरण पाहून ते देखील धूम्रपानापासून दूर राहतील. तुमचे आयुष्य वाढेल. शिवाय, देवाची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान तुम्हाला लाभेल कारण बायबल म्हणते: “देहाच्या . . . सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू.” (२ करिंथकर ७:१) तुम्हाला सिगारेटचे व्यसन असेल तर आता खूप उशीर झाला आहे, आता ही सवय सोडता येणार नाही असा कधीही विचार करू नका. जितक्या लवकर तुम्ही ही सवय सोडून द्याल तितके चांगले.

म्हणायला सोपे पण करायला महाकठीण

ही सवय सोडायची मनापासून तुमची कितीही इच्छा असली तरीसुद्धा हे सोपे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखूत असलेला निकोटीन नावाचा अंमली पदार्थ. याची एकदा चटक लागली की मग ती सहजासहजी कमी होत नाही. डब्ल्युएचओनुसार, “व्यसन लावणाऱ्‍या ड्रग्सपैकी निकोटीन हे हेरॉईन आणि कोकेन यांपेक्षाही जास्त शक्‍तिशाली असल्याचे दिसून आले आहे.” हेरॉईन आणि कोकेनमुळे व्यक्‍तीला जशी लगेच नशा चढते तसे निकोटीनमुळे होत नाही आणि त्यामुळे लोकांना या ड्रगच्या शक्‍तीचा अंदाज येत नाही. पण जी हल्की धुंदी यामुळे येते ती लोकांना वारंवार धूम्रपान करायला भाग पाडते. निकोटीनमुळे तुम्हाला तरतरी येते; तुमचा तणाव कमी होतो. पण खरे पाहता तो तणाव काही प्रमाणात निकोटीनची तलब लागल्यामुळेच निर्माण झालेला असतो.

निकोटीनच्या व्यसनाशिवाय, आणखी एक कारण आहे ज्यामुळे सिगारेट सोडणे बऱ्‍याच जणांना महाकठीण वाटते. ते असे की, सिगारेटची सवय असलेल्या व्यक्‍तीला खिशातून सिगारेट काढण्यापासून ती पेटवून झुरके घेण्यापर्यंतची सबंध क्रियाच जणू अंगवळणी पडलेली असते. या सवयीबद्दल विचारले असता काहीजण म्हणतात ‘तेवढाच हाताला उद्योग असतो,’ तर काहीजण म्हणतात ‘टाइमपास होतो.’

धूम्रपान सोडायला कठीण बनवणारे तिसरे कारण म्हणजे दररोजच्या जीवनात या सवयीला नकळत प्रोत्साहन दिले जाते. सिगारेट कंपन्या दरवर्षी या जाहिरातींवर जवळजवळ सहाशे कोटी डॉलर खर्च करतात. तुम्ही कोठेही जा, तुम्हाला तिथे या जाहिराती दिसतील. जाहिरातींत सिगारेट पिणारे अतिशय आकर्षक, सुदृढ, देखणे, निरोगी आणि बुद्धिमान दिसतात. सहसा लोकांना आकर्षित करेल अशा दृश्‍यांतच त्यांना दाखवले जाते, उदाहरणार्थ घोडेस्वारी करताना, पोहताना, किंवा टेनिस खेळताना. चित्रपटांत आणि टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्‍या कार्यक्रमांतही खलनायकच नव्हे तर हिरो देखील सिगारेट ओढताना दाखवला जातो. शिवाय, तंबाखू व सिगारेट विकणाऱ्‍या दुकानांचा तोटा नाही. पुन्हा, या वस्तू विकायला कायदेशीर परवानगीही आहे. आपल्या स्वतःला सिगारेटची सवय नसली तरीसुद्धा आपण जातो त्या जवळजवळ प्रत्येक ठिकाणी धूम्रपान करणारे हजर असतात. तेव्हा, सिगारेटच्या दुष्परिणामांपासून सहजासहजी सुटका नाही.

ॲस्पिरिन घेऊन जशी डोकेदुखी घालवता येते तशी सिगारेटची सवय घालवण्यासाठी कोणती गोळी घेता येत नाही. हे कठीण काम यशस्वीपणे करून दाखवण्यासाठी त्या व्यक्‍तीलाच प्रबळ इच्छा असणे महत्त्वाचे आहे. वजन घटवण्यासाठी जशी बराच काळ कठीण मेहनत करावी लागते, त्याचप्रकारे सिगारेट किंवा तंबाखूची सवय घालवण्यासाठीही दृढ निर्धाराने बराच काळ प्रयत्न करावे लागतात. आणि यात कितपत यश मिळते हे सर्वस्वी त्या व्यक्‍तीवरच अवलंबून असते.

[५ पानांवरील चौकट]

लहानपणी लागलेली सवय

अमेरिकेत घेतलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले, की ज्यांनी लहानपणी कुतुहलापोटी सिगारेट ओढून पाहिली अशांपैकी २५ टक्के लोकांना पुढे सिगारेटचे व्यसन लागले. ज्यांनी कोकेन व हेरॉइन एकदा घेऊन पाहिले होते त्या लोकांमध्येही या ड्रग्सचे व्यसन लागण्याचे प्रमाण सारखेच आहे. सिगारेटची सवय लागलेल्या किशोरवयीनांपैकी ७० टक्के जणांना आपण सिगारेट ओढू लागल्याचा पस्तावा होतो पण यांपैकी फार कमी जण ही सवय सोडण्यात यशस्वी होतात.

[५ पानांवरील चौकट]

सिगारेटच्या धुरात काय असते?

सिगारेटच्या धुरात टार नावाचा पदार्थ असतो, ज्यात ४,००० रसायने असतात. या रसायनांपैकी ४३ रसायने कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. सायनाइड, बेन्झीन, मेथनॉल आणि ॲसिटलीन (टॉर्चच्या बॅटरीत याचा उपयोग करतात) ही त्यांपैकी काही रसायने आहेत. सिगारेटच्या धुरात नायट्रोजन ऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइड हे दोन विषारी वायू देखील असतात. या धुरातला मुख्य घटक म्हणजे निकोटीन. हे सहजासहजी व्यसन लावणारे शक्‍तिशाली ड्रग आहे.

[६ पानांवरील चौकट]

धूम्रपान सोडायला एखाद्या व्यक्‍तीला तुम्हीही मदत करू शकता

तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी माहिती असल्यामुळे कदाचित तुम्ही स्वतः धूम्रपान करत नसाल, पण तुमच्या मित्रांपैकी किंवा तुमच्या कुटुंबातल्या कोणाला ही सवय असेल तर साहजिकच तुम्हाला वाईट वाटत असेल. ही सवय सोडून द्यायला तुम्ही त्यांना मदत करू शकता का? सिगारेट ओढणाऱ्‍या व्यक्‍तीला सतत तिच्या वाईट सवयीबद्दल टोचणे, ही सवय सोडून देण्यासाठी तिच्यापुढे गयावया करणे, सिगारेट सोडायला भाग पाडायचा प्रयत्न करणे किंवा तिची टर उडवणे व्यर्थ आहे. हे सर्व केल्याने तुम्ही त्या व्यक्‍तीला ही सवय सोडायला लावू शकत नाही. लांबलचक भाषण देण्याचाही काही उपयोग होणार नाही. उलट तुमच्या या प्रयत्नांमुळे वैतागून, आपला तणाव दूर करण्यासाठी ती व्यक्‍ती जास्तच सिगारेटी ओढू लागेल. तेव्हा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा; ही सवय मोडणे किती कठीण आहे हे समजून घ्या आणि एखाद्या व्यक्‍तीला ही सवय सोडणे दुसऱ्‍या व्यक्‍तीपेक्षा जास्त कठीण जाऊ शकते याचीही जाणीव असू द्या.

तुम्ही कोणाला धूम्रपान सोडायला भाग पाडू शकत नाही. ही सवय सोडण्यासाठी लागणारी ताकद आणि खंबीरपणा मुळात त्या व्यक्‍तीजवळच असला पाहिजे. हे लक्षात ठेवून, प्रेमळपणे त्या व्यक्‍तीच्या मनात ही सवय सोडून देण्याची इच्छा कशी जागी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करा.

हे कसे करता येईल? योग्य वेळी, त्या व्यक्‍तीबद्दल तुम्हाला वाटणारे प्रेम व्यक्‍त करा आणि तिच्या या सवयीमुळे तुम्हाला किती काळजी वाटते हे तिला सांगा. तिने सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही तिला लागेल ती मदत कराल असे आश्‍वासन द्या. अर्थात तुम्ही वारंवार हीच पद्धत उपयोगात आणलीत तर त्यात काही अर्थ राहणार नाही आणि काही उपयोगही होणार नाही.

तुमच्या मित्राने किंवा घरातल्या व्यक्‍तीने सिगारेट सोडायचा निर्णय घेतला, तर तुम्ही त्या व्यक्‍तीला कशी मदत करू शकता? सिगारेट पिण्याचे एकदम सोडून दिल्यावर सुरवातीला त्या व्यक्‍तीला त्रास होईल; वैद्यकीय भाषेत याला विथड्रॉवल सिम्पटम्स म्हणतात. तो किंवा ती कदाचित चिडचिड करू लागेल, उदास राहील; डोकेदुखी किंवा झोप न लागणे यांसारखी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे दिसल्यास, त्या व्यक्‍तीला प्रेमळपणे आठवण करून द्या की हा त्रास लवकरच बंद होईल; तिला सांगा की तिचे शरीर, झालेल्या परिवर्तनाशी जुळवून घेत आहे याचीच ही लक्षणे आहेत. नेहमी आनंदी व आशावादी दृष्टिकोन ठेवा. तिने ही सवय सोडल्यामुळे तुम्हाला किती आनंद झाला हे सांगायला विसरू नका. आणि तिची सवय पूर्णपणे सुटेपर्यंत तिला मदत करत राहा; तिला पुन्हा सिगारेट ओढायची इच्छा होईल अशाप्रकारचे तणावपूर्ण प्रसंग आवर्जून टाळा.

पण, समजा सर्व करूनही ती व्यक्‍ती एखाद्यावेळी सिगारेट पिण्याच्या मोहाला बळी पडलीच तर? अर्थात, तुम्हाला वाईट तर वाटेल पण तिने फार मोठा गुन्हा केला आहे असे त्या व्यक्‍तीला भासवू नका. तिला समजून घ्या. या अनुभवातून तुम्ही व ती व्यक्‍ती देखील काही शिकत आहे असे समजा; असे केल्यामुळे पुढच्या वेळी तिला जास्त सोपे जाईल.

[७ पानांवरील चित्र]

सिगारेट कंपन्या जाहिरातींवर दरवर्षी जवळजवळ सहाशे कोटी डॉलर खर्च करतात