धूम्रपान कसे सोडाल
धूम्रपान कसे सोडाल
सायकल शिकू इच्छिणाऱ्याने पहिल्यांदाच सायकल हातात घेतल्यावर त्याला ती चालवता येईल का? तशाचप्रकारे, तंबाखू किंवा सिगारेटची सवय सोडताना पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला यश येईल अशी अपेक्षा करू नका. ही सवय सोडायचा तुम्ही पक्का निर्धार केला असेल तर हिंमत हारू नका; यशस्वी होईपर्यंत वारंवार प्रयत्न करण्याची तयारी ठेवा. अधूनमधून, एखाद्यावेळी मोह अनावर होऊन पुन्हा सिगारेट ओढलीच तर आपण हरलो आहोत असे समजून खचून जाऊ नका. उलट या अनुभवातून धडा घ्या, पुढच्यावेळी जास्त खंबीर राहण्याचा निर्धार करा. काही जणांना ज्या सूचनांचा उपयोग झाला आहे त्यांपैकी काही येथे देत आहोत. कदाचित तुम्हालाही त्या उपयोगी पडतील.
मनाची तयारी
◼ सिगारेट सोडल्यामुळे आपलाच फायदा होणार आहे याची आधी तुम्हाला स्वतःला खात्री पटणे गरजेचे आहे. तुम्ही सिगारेट का सोडू इच्छिता याची कारणे एका कागदावर लिहून घ्या. ही सवय सोडल्यामुळे होणाऱ्या फायद्यांचीही एक यादी तयार करा. सिगारेट सोडून दिल्यावर जेव्हा तुम्ही ही यादी वाचाल तेव्हा तुमचा निश्चय अधिकच पक्का होईल. सिगारेट सोडण्याचे सर्वात प्रमुख कारण, देवाचे मन आनंदित करणे हे असले पाहिजे. बायबल आपल्याला देवावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती करण्याची आज्ञा देते. पण आपण जर तंबाखू किंवा सिगारेटच्या सवयीचे गुलाम असू तर साहजिकच आपण या आज्ञेचे पालन करू शकणार नाही.—मार्क १२:३०.
◼ तुम्हाला सहसा केव्हा सिगारेटची तलब लागते आणि का, हे शोधून काढा. आज आपण केव्हा आणि कोठे सिगारेट ओढली हे एका कागदावर लिहून ठेवल्यास तुम्हाला मदत होईल. कारण, सहसा कोणत्या परिस्थितीत तुम्हाला सिगारेट ओढायचा मोह होतो हे तुम्हाला कळेल आणि त्यामुळे तुम्ही अशी वेळ येण्याचे टाळू शकता.
सिगारेट सोडण्याची तारीख ठरवा
◼ एक विशिष्ट दिवस निवडा आणि कॅलेंडरवर या तारखेवरती खूण करून ठेवा. मनावर ताण असेल असा दिवस निवडू नका. पण तो दिवस आल्यावर मात्र त्या दिवसापासून सिगारेट कायमची सोडून द्या.
◼ ठरवलेला दिवस येण्याआधीच ॲशट्रे, आगपेट्या, लायटर वगैरे सर्व फेकून द्या. तंबाखू, सिगारेटचा वास असलेले कपडे स्वच्छ धुवा.
◼ तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना, मित्रांना आणि घरातल्या सर्वांना तुम्ही घेतलेल्या निर्णयानुसार वागण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देत राहण्याची विनंती करा. तुमच्यासमोर कोणी सिगारेट ओढू लागल्यास त्यांना ती विझवायला स्पष्टपणे सांगा.
◼ सिगारेट सोडण्याच्या दिवशी काहीतरी वेगळे करायचे ठरवा. जिथे धूम्रपानाला बंदी आहे अशा एखाद्या ठिकाणी, म्युझियम किंवा इतर कोणत्या ठिकाणी जायचे ठरवा. थोडा वेळ
व्यायाम करा—पोहायला जा, सायकलवर किंवा पायीच फिरायला जा.पुन्हा तलब लागली तर
तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून सिगारेटची सवय असेल तर साहजिकच ती सोडताना सुरवातीला तुम्हाला थोडा त्रास होईल. शेवटची सिगारेट विझवल्यावर काही तासांतच तुम्हाला हा त्रास सुरू होईल. चिडचिड, अस्वस्थपणा, चिंता, खिन्नपणा, झोप न लागणे, खूप भूक लागणे आणि अर्थातच, सिगारेटची अनावर ओढ लागणे ही काही लक्षणे दिसू लागतील. हा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे औषध मागू शकता. सिगारेट पूर्णपणे सोडून देण्यासाठी आणखी काही गोष्टी सहायक ठरू शकतात.
◼ सुरवातीचे काही आठवडे जेवणात लो कॅलरीचे म्हणजे हलके पदार्थ घ्या; पाणी भरपूर प्या. मधल्यावेळेत भूक लागली तर गाजर किंवा सेलरी यांसारख्या कच्च्या भाज्या खाव्यात असा काही जण सल्ला देतात. व्यायाम जरूर करा कारण यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि तुम्हाला बेचैन वाटणार नाही.
◼ ज्या ठिकाणी किंवा ज्या विशिष्ट स्थितीत तुम्हाला सिगारेट ओढायचा जास्त मोह होतो, असे ठिकाण व प्रसंग आवर्जून टाळा.
◼ तुमचे मन तुम्हाला पुन्हा सिगारेट ओढायाला प्रवृत्त करू लागले तर लागलीच सावध व्हा. सुरवातीला काही दिवस असे विचार मनात येणे साहजिक आहे. उदाहरणार्थ, ‘आज अगदी असह्य झालं आहे, तेव्हा फक्त आज एकदाच, मग नाही.’ ‘सिगारेट माझी एकच कमजोरी आहे, बाकी तर मला कोणत्याच वाईट सवयी नाहीत.’ ‘लोक उगाच अतिशयोक्ती करतात, तंबाखू इतकी काही वाईट नाही; नव्वदी पार केलेल्या कितीतरी सिगारेट पिणाऱ्यांना मी स्वतः ओळखतो.’ ‘मरायला काही न काही निमित्त पाहिजेच.’ ‘तंबाखूशिवाय काही मजा नाही.’
◼ सिगारेट ओढण्याची इच्छा अनावर झाल्यास, सिगारेट काढून पेटवण्याआधी मुद्दाम थोडे थांबा, उशीर लावा. फक्त दहा मिनिटेही तुम्ही थांबला तरी तुमची इच्छा थोडी ओसरल्याचे तुम्हाला आढळेल. सिगारेट कायमची सोडण्याचा विचार पचवणे काहीजणांना कठीण जाते. तेव्हा कायमचा विचार करण्याऐवजी फक्त आजच्यापुरता विचार करा. आज दिवसभर सिगारेटला हात लावायचा नाही असे ठरवा.
◼ तुम्हाला देवाची सेवा करायची इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग दाखवण्याची देवाला विनंती करा. आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याची इच्छा जे लोक प्रामाणिकपणे पूर्ण करू इच्छितात आणि जे त्याच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना तो योग्यवेळी जरूर ‘साहाय्य’ करतो. (इब्री लोकांस ४:१६) अर्थात चमत्कार होण्याची वाट पाहू नका. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा त्यानुसार वागणेही महत्त्वाचे आहे.
पुन्हा सुरू करण्याची घोडचूक करू नका
◼ पहिले तीन महिने तुम्हाला अत्यंत कठीण जातील, पण त्यानंतरही धूम्रपान करणाऱ्यांची सोबत शक्यतो टाळा. शिवाय कोणत्या विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला सिगारेट प्यायचा जास्त मोह होतो हे ओळखून ती आवर्जून टाळा.
◼ अधूनमधून सिगारेट प्यायला हरकत नाही असा चुकूनही विचार करू नका. सिगारेट सोडून एक वर्ष झाल्यावरही तुमच्या मनात असे विचार येतच राहतील, तेव्हा सावध राहा!
◼ “फक्त एक सिगारेट” असे म्हणून ओढण्याचा मोह खासकरून टाळा. एक ओढल्यावर दुसरी, मग तिसरी असे व्हायला काही वेळ लागत नाही. आतापर्यंत केलेली सगळी मेहनत आपल्याच हाताने वाया घालवू नका. पण समजा खूप प्रयत्न करूनही तुम्हाला मोह आवरताच आला नाही आणि तुम्ही सिगारेट ओढलीच, तर निराश होऊ नका. पुढच्यावेळी मोहाला बळी न पडण्याचा संकल्प करा.
लाखो लोकांनी सिगारेटची सवय सोडली आहे, तेव्हा तुम्हीही सोडू शकता. यासाठी आवश्यक आहे फक्त प्रबळ इच्छा आणि मनस्वी प्रयत्न!