व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भयंकर ज्वालामुखीविरुद्ध ख्रिस्ती बंधुप्रेमाचा विजय

भयंकर ज्वालामुखीविरुद्ध ख्रिस्ती बंधुप्रेमाचा विजय

भयंकर ज्वालामुखीविरुद्ध ख्रिस्ती बंधुप्रेमाचा विजय

कॅमरूनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

आफ्रिकेच्या पश्‍चिमेकडे असलेल्या कॅमरून देशात मागच्या वर्षी एका भयंकर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. समुद्र सपाटीपासून १३,३५३ फुटांच्या उंचीवर असलेल्या माऊंट कॅमरून नावाच्या या ज्वालामुखी पर्वताचा उद्रेक होण्याची या शतकात ही पाचवी वेळ होती. शिवाय, हा आजपर्यंत येथे झालेला सर्वात विध्वंसकारी व भयंकर ज्वालामुखी उद्रेक होता.

शनिवार मार्च २७, १९९९ रोजी दुपारी या भयंकर दुर्घटनेची सुरवात झाली. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बुएया गावातल्या ज्या लोकांनी ज्वालामुखीचा उद्रेक होताना प्रत्यक्ष पाहिले ते सांगतात की उद्रेक झाला तेव्हा घरांच्या भिंती, इमारती, इतकेच काय, मोठमोठे वृक्ष देखील गदागदा हलत होते. नंतर संध्याकाळी साडेआठच्या सुमारास या सबंध परिसराला सर्वात जबरदस्त हादरा बसला. ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या दुआला गावाला देखील भूकंपाचे धक्के बसले. ला मेसाझे या वृत्तपत्राच्या मार्च ३०, १९९९ च्या अंकात ठळक मथळा होता: “माऊंट कॅमरूनचा राक्षसी उद्रेक—२,५०,००० जण आगीच्या लोटांत.” या बातमीपत्रात पुढे असे म्हटले होते: “दोन दिवसांदरम्यान भूकंपाचे एकूण ५० धक्के बसले आहेत. चार नवीन ज्वालामुखी तयार झालेले दिसत आहेत; शेकडो लोक बेघर झाले असून बुएया येथील राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानाचे देखील बरेच नुकसान झाले आहे.”

बुएया येथे जवळजवळ ८० यहोवाचे साक्षीदार राहतात. त्यांपैकी बऱ्‍याच जणांची घरे पूर्णपणे उद्ध्‌वस्त झाली; यात एक राज्य सभागृह देखील उद्ध्‌वस्त झाले. पण जीवित हानी मात्र झाली नाही.

ख्रिस्ती बंधुप्रेमाची प्रचिती

या विध्वंसकारी दुर्घटनेमुळे भयंकर नुकसान झाले; ख्रिस्ती बंधुप्रेमाला आव्हान देणारी ही घटना होती. लगेच एक साहाय्य समिती नेमण्यात आली; यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने आर्थिक साहाय्य पुरवले आणि शेकडो साक्षीदारांनी वेळ, शक्‍ती व आर्थिक मदत देऊन आपल्या प्रेमाचा पुरावा दिला.

सगळ्यांनी आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. अनेक मंडळ्यांनी खाद्य पदार्थ पाठवले. एका साक्षीदाराने १,००० सिमेंटच्या विटा दान दिल्या. आणखी एकाने छताला बसवण्याकरता ॲल्युमिनियमचे पत्रे स्वस्त दराने मिळवून दिले. एक बांधव बांधकामासाठी लाकूड आणण्याकरता सोळा किलोमीटर पायी चालत गेला. एका तरुणाचे नुकतेच लग्न ठरले होते; सासरच्या लोकांना वधूमूल्य देण्याकरता जमवलेल्या पैशांनी त्याने त्याचे लाकूड कापण्याचे यंत्र दुरुस्त करून घेतले. मग जंगलात जाऊन तीन आठवडे त्याने बांधवांच्या घरांसाठी भरपूर लाकूड कापले. एक सबंध घर बांधता येईल इतके लाकूड त्याने कापले होते! अनेक धडधाकट तरुण बांधवांनी हे सर्व लाकूड पाच किलोमीटर दूर डोक्यावर वाहून नेले; तेथून पुढे एका ट्रकमधून ते नेण्यात आले.

बांधवांच्या पडलेल्या घरांच्या पुनर्बांधणीचे कार्य एप्रिल २४ तारखेला सुरू झाले. ६० स्वयंसेवक या कामाकरता पुढे आले. शनिवारी व रविवारी स्वयंसेवकांची संख्या २०० पर्यंत वाढली. नोकरी करणारे तीन बांधव दररोज आपल्या कामानंतर बांधकामात मदत करायला यायचे आणि कधीकधी तर पहाटेपर्यंत काम करून मग घरी जायचे. दुआला येथे राहणारा एक साक्षीदार सकाळी कामावर जाऊन आल्यानंतर मोटरसायकलने ७० किलोमीटरचा प्रवास करून मध्यरात्रीपर्यंत बांधकामात मदत करायचा व मग घरी परतायचा. अशारितीने, अवघ्या दोन महिन्यांत सहा घरे बांधून पूर्ण झाली. दरम्यान बुएया मंडळीच्या सभा, एका बांधवाच्या घरी घेतल्या जात होत्या; सभांना येणाऱ्‍यांची संख्या मंडळीच्या सदस्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट होती.

साहाय्य समितीने पाणी शुद्ध करण्याकरता ४०,००० पेक्षा अधिक औषधी गोळ्या वाटल्या. शिवाय, ज्वालामुखीच्या राखेमुळे व विषारी वायूमुळे श्‍वसनसंबंधीचे आजार जडलेल्या दहा जणांना वैद्यकीय मदत देण्यात आली. हे ख्रिस्ती बंधुप्रेम अनुभवायला मिळालेल्यांची प्रतिक्रिया काय होती?

ख्रिस्ती बंधूप्रेमाचा विजय

बांधवांनी बांधलेली घरे पाहिल्यानंतर प्रॉव्हिन्शियल डेलिगेशन ऑफ ॲग्रिकल्चरच्या एका सदस्याने असे म्हटले: “हे घरच बंधूप्रेमाचं . . . प्रतीक आहे.” एका शिक्षिकेने म्हटले: “जीवनात पहिल्यांदा मला असे काही पाहायला मिळाले . . . तुम्ही खरोखर खरे ख्रिस्ती आहात.”

ज्यांना मदत करण्यात आली त्यांनीही अगदी मनापासून आभार मानले. तीमथी नावाच्या ६५ वर्षांच्या व सहसा आजारीच राहणाऱ्‍या एका बांधवाने म्हटले: “आमच्या नवीन घराकडे मी जितक्यांदा पाहतो तितक्यांदा माझ्या डोळ्यात पाणी येतं. यहोवाने आमच्यावर केलेल्या उपकाराबद्दल त्याचे कितीही आभार मानले तरी कमीच.” चार मुलांची आई असलेल्या एक विधवेचे घर कोसळल्यामुळे ती अक्षरशः रस्त्यावर आली. त्यातल्या त्यात तिने घराची दुरुस्ती करायला मजूर आणले तेव्हा तिच्या घराचे छत बसवण्यासाठी आणलेले सामानच त्यांनी चोरून नेले. पण साक्षीदार स्वयंसेवक या निराधार विधवेच्या मदतीला धावून आले. ती म्हणते: “तुमचे आभार मानण्याकरता माझ्याजवळ शब्द नाहीत. तुम्ही माझी मदत केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.” एका ख्रिस्ती वडिलांची पत्नी, एलिझाबेथ म्हणते: “यहोवाच्या संस्थेतल्या बांधवांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे पाहून मला अत्यंत आनंद होतो. आपण एका जिवंत देवाची उपासना करतो याचाच हा पुरावा आहे.”

माउंट कॅमरून ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा बरेच काही उद्ध्‌वस्त झाले, पण ख्रिस्ती बांधवांच्या प्रेमाला मात्र धक्का लागला नाही. प्रेषित पौलाने देवाच्या प्रेरणेने लिहिलेले हे शब्द अगदी खरे आहेत, की कोणत्याही परिस्थितीत “प्रीती कधी अंतर देत नाही.”—१ करिंथकर १३:८.

[१० पानांवरील चित्रे]

लाव्हारसाच्या प्रवाहांत बरेच काही उद्ध्‌वस्त झाले

[११ पानांवरील चित्र]

पडलेल्या घरांची दुरुस्ती करणारे मेहनती स्वयंसेवक

[१०, ११ पानांवरील चित्र]

माउंट कॅमरून