व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूची उपासना करावी का?

येशूची उपासना करावी का?

बायबलचा दृष्टिकोन

येशूची उपासना करावी का?

अनेक शतकांपासून, ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या धर्मात येशूची उपासना केली जाते. पण स्वतः येशूने सांगितले की उपासना केवळ सर्वसमर्थ देव यहोवा याची केली जावी. सैतानाने येशूला आपल्या पाया पडायला सांगितले तेव्हा येशूने उत्तर दिलेः “परमेश्‍वर तुझा देव ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.” (मत्तय ४:१०) पुढे आपल्या शिष्यांनाही येशूने हेच सांगितले: “पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे.”—मत्तय २३:९.

एका शोमरोनी स्त्रीसोबत बोलताना देवाची उपासना आत्म्याने व खरेपणाने करावी असे येशूने सांगितले. “आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे.” (योहान ४:२३, २४) यावरून हे स्पष्ट होते की, उपासना ही केवळ एकच खरा देव यहोवा याचीच केली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्‍त कोणाची किंवा कशाचीही उपासना करणे म्हणजे मूर्तिपूजा आहे; आणि बायबलच्या इब्री तसेच ग्रीक शास्त्रवचनांमध्ये मूर्तिपूजा करू नये अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.—निर्गम २०:४, ५; गलतीकर ५:१९, २०.

काहीजण म्हणतील, ‘पण येशूचीही उपासना करावी असे बायबलमध्ये सुचवलेले नाही का?’ इब्री लोकांस १:६ मध्ये पौलाने, ‘देवाचे सर्व दूत त्याला [येशूला] नमन करोत’ असे म्हटले नाही का? बायबलमध्ये मूर्तिपूजेविषयी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार आपण हे शास्त्रवचन कशाप्रकारे समजू शकतो?

बायबलमध्ये उपासनेचे स्पष्टीकरण

पौलाने येथे नमन (किंवा उपासना) असे म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होतो हे आपण सगळ्यात आधी समजून घेतले पाहिजे. त्याने येथे प्रोस्कीनेओ हा ग्रीक शब्द वापरला. अंगर्स बायबल डिक्शनरी म्हणते की या शब्दाचा अक्षरशः अर्थ, ‘आदराने कोणा व्यक्‍तीच्या हाताचे चुंबन घेणे किंवा तिचा सन्मान करणे’ असा होतो. डब्ल्यू. इ. वाईन यांनी लिहिलेल्या ॲन एक्सपोसिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वड्‌र्स यात त्या शब्दाचा अर्थ, “देवाला किंवा मनुष्याला आदर दाखवण्याचे कृत्य” असा होतो. बायबल काळात, प्रोस्कीनेओ म्हणजे कोणा मोठ्या व्यक्‍तीसमोर अक्षरशः वाकणे.

येशूच्या एका दृष्टान्तात एका दासाचे वर्णन केले आहे जो आपल्या धन्याकडून घेतलेले कर्ज फेडू शकत नाही. त्यामुळे “तो दास त्याच्या [राजाच्या] पाया पडून त्याला नमन करून [येथे प्रोस्कीनेओ या शब्दाचेच एक रूप वापरले आहे] म्हणाला, ‘प्रभू, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी सर्व फेड करीन.’” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय १८:२६; पं.र.भा.) येथे प्रोस्कीनेओ या ग्रीक शब्दाचे भाषांतर नमन असे केले आहे. मग याचा अर्थ हा मनुष्य राजाची पूजा किंवा उपासना करत होता का? नाही. तो फक्‍त एका राजाला अर्थात त्याच्या धन्याला आणि अधिकाऱ्‍याला योग्य तो आदर, सन्मान दाखवत होता.

बायबल काळातल्या पौर्वात्य देशांमध्ये, अशाप्रकारे लवून नमस्कार करण्याची किंवा आदर दाखवण्याची प्रथाच होती. याकोबसुद्धा आपला भाऊ एसाव याला भेटला तेव्हा त्याने त्याला सात वेळा लवून नमन केले. (उत्पत्ति ३३:३) ईजिप्शियन दरबारात योसेफाला मोठे स्थान होते म्हणून त्याच्या भावांनी देखील त्याचा सन्मान करत त्याला लवून मुजरा केला. (उत्पत्ति ४२:६) हे सर्व मुद्दे पाहिल्यावर, येशूचा जन्म झाला तेव्हा तो ‘यहूद्यांचा राजा’ आहे हे ओळखून काही ज्योतिषी त्याला पाहायला आले तेव्हा काय घडले हे आपल्याला नीट समजू शकेल. बायबलमध्ये सांगितल्यानुसार, “पाया पडून त्यांनी त्याला नमन [प्रोस्कीनेओ] केले.”—मत्तय २:२, ११.

या सगळ्यावरून स्पष्ट होते की, काही बायबल भाषांतरांमध्ये “नमन करणे” (अर्थात, उपासना करणे) असा भाषांतरित केलेला प्रोस्कीनेओ हा शब्द फक्‍त यहोवा देवाची आराधना करण्याच्या संदर्भातच वापरला जात नाही. तर एखाद्या व्यक्‍तीला आदर आणि सन्मान दाखवण्याकरताही तो लागू होऊ शकतो. गैरसमज होऊ नये म्हणून काही बायबल भाषांतरांनी, इब्री लोकांस १:६ येथील प्रोस्कीनेओ या शब्दाचे, “मान देणे” (न्यू जेरूसलेम बायबल), “आदर करणे” (द कम्प्लीट बायबल इन मॉडर्न इंग्लीश), “वाकून नमस्कार करणे” (ट्‌वेटीयथ सेंच्युरी न्यू टेस्टमेंट), किंवा “नतमस्तक होणे” (न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन) असे भाषांतर केले आहे.

येशूला नमन करणे योग्य आहे का

येशूसमोर नतमस्तक होणे किंवा त्याला नमन करणे योग्य आहे का? होय, निश्‍चितच! इब्री लोकांना लिहिलेल्या आपल्या पत्रात प्रेषित पौलाने म्हटले की, “सर्व गोष्टींचा वारीस” म्हणून येशू “उर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला” आहे. (इब्री लोकांस १:२-४) म्हणून, “स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडगा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल करावे.”—फिलिप्पैकर २:१०, ११.

लवकरच, येशू ख्रिस्त त्याला मिळालेल्या उच्च अधिकाराचा उपयोग करून या पृथ्वीला सुंदर बगीचा बनवेल. आणि देवाच्या मार्गदर्शनाखाली आणि येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारे जे कोणी त्याच्या नीतिमान शासनाला पाठिंबा देतात त्यांच्याकरता तो या जगातून दुःख, वेदना, निराशा या सर्व गोष्टी मिटवून टाकेल. म्हणूनच त्याला सन्मान, आदर आणि आज्ञाधारकता दाखवणे उचित नाही का?—स्तोत्र २:१२; यशया ९:६; लूक २३:४३; प्रकटीकरण २१:३, ४.

“ईर्ष्यावान देव”

आपण केवळ यहोवा देवाचीच भक्‍ती केली पाहिजे आणि त्याच्यावरच श्रद्धा ठेवली पाहिजे असे बायबल स्पष्टपणे दाखवते. मोशेने देवाचे वर्णन “ईर्ष्यावान देव” असे केले. शिवाय बायबल म्हणते की, “ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा.”—अनुवाद ४:२४; प्रकटीकरण १४:७.

खऱ्‍या उपासनेत येशूलाही महत्त्वाचा भाग आहे. आदर आणि सन्मान मिळण्यास तो पात्र आहे. (२ करिंथकर १:२०, २१; १ तीमथ्य २:५) आणि यहोवा देवाकडे जाण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे. (योहान १४:६) हे सगळे लक्षात ठेवून, खरे ख्रिस्ती फक्‍त सर्वसमर्थ देव यहोवा याचीच उपासना करतात.