व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आजच्या समाजाची नैतिक स्थिती

आजच्या समाजाची नैतिक स्थिती

आजच्या समाजाची नैतिक स्थिती

एप्रिल १९९९ मध्ये एक दिवशी सकाळी अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यातील डेन्व्हर जवळच्या लिटलटन गावात एक भयंकर घटना घडली. १७-१८ वर्षांच्या दोन मुलांनी एका शाळेच्या आवारात प्रवेश करून बेछूट गोळीबार केला व बॉम्ब टाकले. या दुर्घटनेत बारा विद्यार्थी आणि एक शिक्षक यांना आपला जीव गमवावा लागला. आणखी २० हून अधिक जणांना गंभीर दुखापती झाल्या. हे भयनाट्य घडल्यानंतर त्या दोन मुलांनी आत्महत्या केली. अजून विशीही न गाठलेल्या या मुलांना विशिष्ट लोकांबद्दल तीव्र द्वेष होता असे सांगितले जाते.

दुःखाची गोष्ट म्हणजे, वरती दिलेल्या उदाहरणांशी मिळत्याजुळत्या घटनांबद्दल जवळजवळ दररोजच आपल्याला ऐकायला मिळते. सबंध जगात वृत्तपत्रांमध्ये, रेडिओ व टीव्हीवर असल्या बातम्या हमखास असतात. नॅशनल सेंटर फॉर एज्युकेशन स्टॅटिस्टिक्सच्या वृत्तानुसार १९९७ साली अमेरिकेतील शाळांमध्ये जवळजवळ ११,००० हिंसक घटनांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. या सर्व घटनांमध्ये कोणते न कोणते शस्त्र वापरण्यात आले होते. जर्मनीतील हॅम्बर्ग शहरात नोंदलेल्या हिंसक घटनांच्या संख्येत १९९७ सालादरम्यान १० टक्क्यांची वाढ झाली; संशयित आरोपींपैकी ४४ टक्के आरोपी २१ वर्षांखालील होते.

राजकीय पुढाऱ्‍यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्‍यांच्या भ्रष्टाचाराबद्दलही काही वेगळे सांगायला नको. युरोपियन युनियन कमिशनर अनीटा ग्राडिन यांनी १९९८ साली सादर केलेल्या एका वृत्तानुसार १९९७ सालादरम्यान युरोपियन युनियनमध्ये १०० कोटी चाळीस लाख डॉलर्सची अफरातफर झाली. पार्किंगचा कायदा मोडल्यामुळे लावलेला दंड रद्द करून घेण्यापासून तर कृषी व्यापाराकरता किंवा इतर व्यापाराकरता बेकायदेशीर मार्गाने युरोपियन युनियनच्या सबसिड्या मिळवण्यापर्यंत सर्व गैरप्रकार करण्यात आले. मोठ्या प्रमाणात काळा पैसा लपवणाऱ्‍यांनी आणि शस्त्रांचे व ड्रग्सचे स्मगलिंग करणाऱ्‍यांनी युरोपियन युनियनच्या कर्मचाऱ्‍यांना ही प्रकरणे दाबून टाकण्यासाठी लाच दिली होती. युरोपियन युनियन कमिशनच्या सर्व सदस्यांनी १९९९ साली राजीनामा दिला.

पण समाजातल्या वरच्या वर्गातले लोकच असे घोटाळे करतात अशातला भाग नाही. युरोपियन युनियन कमिशनच्याच एका रिपोर्टनुसार युरोपियन युनियनच्या एकंदर राष्ट्रीय उत्पन्‍नापैकी १६ टक्के उत्पन्‍न हे अनधिकृत व्यापारांतून मिळालेले असते, ज्यांसाठी कर देखील दिला जात नाही. रशियात एकूण राष्ट्रीय वार्षिक उत्पन्‍नापैकी निम्मे बेकायदेशीर उत्पन्‍न असते. शिवाय, अमेरिकेतील भ्रष्टाचार व घोटाळ्यांच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्‍या संस्थेने असे सांगितले की अमेरिकेतील कंपन्यांचे कर्मचारी कंपनीचे पैसे किंवा इतर वस्तू चोरत असल्यामुळे या कंपन्यांना दर वर्षी ४०,००० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागते.

बरेच बालसंभोगी लहान मुलांना बेकायदेशीर लैंगिक कृत्ये करायला फुसलावण्यासाठी इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. स्वीडनमधील सेव्ह द चिल्ड्रन नावाच्या एका संस्थेच्या प्रतिनिधीने सांगितल्यानुसार, इंटरनेटवर बालसंभोगाविषयीची माहिती व चित्रे (चाईल्ड पोर्नोग्रॅफी) प्रकाशित केली जाणे हा एक चिंतेचा विषय बनला आहे. नॉर्वेत १९९७ साली याच संस्थेला इंटरनेटवर चाईल्ड पोर्नोग्रॅफी दाखवणाऱ्‍या वेब साईट्‌सची माहिती देणारे १,८८३ संदेश मिळाले. पुढच्या वर्षी म्हणजे १९९८ मध्ये ही संख्या एकदम वाढून ५००० झाली. या वेबसाईट्‌सवर दिली जाणारी माहिती अशा देशांत तयार केली जाते जेथे सरकार किंवा स्थानिक अधिकारी या घृणास्पद प्रकाराला आळा घालण्यास असमर्थ आहेत.

जुना काळ बरा होता का?

आजच्या समाजातल्या नैतिकतेचा असा ऱ्‍हास होताना पाहून बऱ्‍याच लोकांना अत्यंत दुःख होते; आईवडिलांचा किंवा आजीआजोबांचा काळ यापेक्षा लाखपट बरा होता, असे ते बोलूनही दाखवतात. कारण आईवडील, आजीआजोबा सहसा सांगत असतात की त्यांच्या काळात लोक आजच्यासारखे बेईमान नव्हते; माणूस श्रीमंत असो की गरीब त्याला नैतिकतेची जाण होती. लोक कष्टाची कमाई खायचे, वेळ आल्यास एकमेकांच्या मदतीला धावून यायचे, कुटुंबात एकोपा होता, मुलाबाळांना कुटुंबात सुरक्षित वाटायचे आणि मोठे होऊन ते आपल्या घरच्या शेतीचे काम किंवा कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करायचे आणि समाधानाने राहायचे.

याचा अर्थ जुन्या काळातल्या समाजाची नैतिक स्थिती खरच आजच्यापेक्षा बरी होती का? की फक्‍त जुन्या काळाची ओढ आपल्याला त्या काळातले सर्वकाही चांगले होते असे म्हणायला प्रवृत्त करते? इतिहासकार आणि इतर सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास करणारे याविषयी काय म्हणतात ते पाहू या.

[३ पानांवरील चौकट]

नैतिकता म्हणजे नेमके काय?

या लेखांत ‘नैतिकता’ हा शब्द मनुष्याच्या व्यवहारांत चांगले व वाईट यातला फरक दाखवणाऱ्‍या तत्त्वांचे पालन करण्याच्या संदर्भात वापरला आहे. प्रामाणिकपणा, सत्यवादीपणा आणि दैनंदिन व्यवहारांत, खासकरून स्त्रीपुरुष संबंधांत उच्च नीतिनियमांचे पालन हे सर्व यात समाविष्ट आहे.