आजच्या समाजातील नैतिकता खरोखर खालावली आहे का?
आजच्या समाजातील नैतिकता खरोखर खालावली आहे का?
“पूर्वीच्या काळाच्या तुलनेत नैतिकदृष्ट्या आजच्या समाजाची स्थिती चांगली की वाईट” असे इतिहासकारांना विचारल्यास त्यांपैकी काहीजण कदाचित म्हणतील की प्रत्येक काळाची नीतिमूल्ये त्या काळातल्या समाजाला अनुलक्षून असतात. तेव्हा दोन विभिन्न काळांतील नीतीमूल्यांची तुलना करणे कठीण आहे.
उदाहरणार्थ, १६ व्या शतकापासून युरोपात हिंसक गुन्हे कसे वाढत गेले याबद्दल विचार करता येईल. त्याकाळी, म्हणजे आजपासून ४०० वर्षांआधी देखील सर्रास खून व्हायचे. त्याकाळीही बरेच लोक कायदा आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करायचे. दोन घराण्यांतील वैरामुळे तर कधीकधी मोठ्या प्रमाणात रक्तपात घडायचा.
पण इतिहासकार आर्न यारिक व योहान सॉयदरबर्ग यांनी मानिक्सोवार्दित ऑक माक्तेन (माणसाची किंमत आणि सत्ता) या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, १६०० ते १८५० दरम्यानच्या काळात काही ठिकाणी “सामाजिक जीवन बऱ्याच प्रमाणात सुधारल्याचे व लोकांमध्ये सुसंस्कृतपणा आल्याचे प्रकर्षाने जाणवले.” लोक एकमेकांशी सहानुभूतीने वागायला शिकले—दुसऱ्यांचे दुःख समजून घेऊ लागले. काही इतिहासकारांनी सांगितल्याप्रमाणे, १६ व्या शतकात चोरी आणि मालमत्तेचे नुकसान यांप्रकारचे गुन्हे आजच्यापेक्षा फारच कमी होते. खासकरून खेड्यांपाड्यांत चोऱ्या किंवा दरोडे पडण्याचे प्रकार फार कमी व्हायचे.
अर्थात, त्याकाळात गुलामांचा व्यापार केला जायचा. आणि या व्यापाराच्या नावाखाली इतिहासातले सर्वात निंद्य गुन्हे करण्यात आले; युरोपियन व्यापारी आफ्रिकेतून पुरुष, स्त्रिया व मुलांना जबरदस्तीने उचलून न्यायचे. लाखोच्या संख्येने या लोकांना गुलाम बनवून त्यांना अकथनीय यातना दिल्या जायच्या.
अशारितीने मागील काही शतकांकडे पाहिल्यास असे दिसून येईल की काही गोष्टी आजच्यापेक्षा पूर्वीच्या काळी बऱ्या होत्या तर काही आजच्यापेक्षा वाईट. पण मागील शतकांपेक्षा फार वेगळे आणि फार गंभीर असे काहीतरी २० व्या शतकात घडले आणि अजूनही घडत आहे.
इतिहासाला कलाटणी देणारे—विसावे शतक
इतिहासकार यारिक व सॉयदरबर्ग म्हणतात: “१९३० च्या दशकात खूनाच्या घटना पुन्हा एकदा वाढू लागल्या आणि जवळजवळ पन्नास वर्षांपासून त्या वाढतच आहेत.”
बऱ्याच अभ्यासकांच्या मते २० व्या शतकात नीतिमूल्यांचा फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आढळतो. नैतिक तत्त्वज्ञानाविषयी एका निबंधात असे म्हटले आहे: “लैंगिकता आणि नैतिक सभ्यता यांबद्दलची लोकांची मते मागील तीसचाळीस वर्षांत पार बदलून गेली आहेत. पूर्वी नैतिक आणि अनैतिक काय हे सहसा समाजाकडून ठरवले जायचे, आणि यांविषयी समाजात कडक नियम असायचे. पण आता मात्र प्रत्येकजण आपापला निर्णय घेण्यास मोकळा आहे.”
होय, आजकाल बऱ्याच लोकांचे असे मत आहे की लैंगिक आचरणासंबंधी आणि इतर नैतिक प्रश्नांसंबंधी प्रत्येकजण स्वतःचा निर्णय घेऊ शकतो. याचा पुरावा म्हणजे, १९६० साली अमेरिकेत जन्मलेल्या एकूण बालकांपैकी केवळ ५.३ टक्के बालके वैवाहिक संबंधांच्या बाहेर जन्माला आली होती, तर १९९० साली २८ टक्के बालके वैवाहिक संबंधांच्या बाहेर जन्मली होती.
अमेरिकेतील नोटर डॅम विद्यापीठात संयुक्त राष्ट्रांचे सेनेटर ज्यो लीबरमन यांनी आजच्या समाजात “नैतिक पोकळी” आली आहे असे मत व्यक्त केले. अर्थात, “चांगले व वाईट याबद्दलच्या पारंपरिक कल्पना हळूहळू लोप पावल्या आहेत.” लीबरमन यांच्या मते “जवळजवळ दोन पिढ्यांपासून हा बदल घडून आला आहे.”
देवाधर्माबद्दल अनास्था
विसाव्या शतकात अशाप्रकारचा बदल घडून येण्यामागे काय कारण असावे? इतिहासकारांचे आणि विश्लेषकांचे याबद्दल काय मत आहे? मानिक्सोवार्दित ऑक माक्तेन या पुस्तकात म्हटले आहे, “मागच्या दोन शतकांदरम्यान मानवी समाजात घडून आलेल्या परिवर्तनांपैकी सर्वात मोठे म्हणजे आता लोकांना पूर्वीसारखी देवाधर्माबद्दल आस्था राहिलेली नाही.” दुसऱ्या शब्दांत “आता लोकांना धार्मिक तत्त्वांच्या आधारावर नव्हे तर स्वतःच्या वैयक्तिक मताप्रमाणे निर्णय घेण्याची मुभा आहे. १८ व्या शतकातल्या प्रबोधनकाळात काही तत्त्वज्ञानांनी, बायबल हेच देवाचे सत्य वचन आहे हे अमान्य केले. आजच्या काळात दिसणाऱ्या देवाधर्माबद्दलच्या अनास्थेची सुरवात तेव्हाच झाली होती.” आणि म्हणूनच आजकाल लोक नैतिक मार्गदर्शनाकरता धर्माकडे वळत नाहीत; खासकरून ख्रिस्ती धर्मांत ही गोष्ट पाहायला मिळते.
पण १८ व्या शतकात मांडण्यात आलेले तत्त्वज्ञान आज, म्हणजे तब्बल २०० वर्षांनंतर कसे काय लोकप्रिय होऊ लागले आहे? वरती उल्लेख केलेल्या पुस्तकातच याचे उत्तर दिले आहे: “अशाप्रकारचे विचार सामान्य माणसापर्यंत पोचणे तितके सोपे नव्हते. त्यामुळे ही धार्मिक अनास्था हळूहळू पसरली.”
पारंपरिक नीतिमूल्यांना आणि ख्रिस्ती धार्मिक तत्त्वांना धुडकावून लावण्याची ही प्रवृत्ती मागच्या २०० वर्षांपासून हळूहळू मुळावत असली तरीसुद्धा, २० व्या शतकात ती अचानक जगव्याप्त प्रमाणावर कशी पसरली? मागील काही दशकांपासून धार्मिक अनास्था प्रकर्षाने जाणवू लागली आहे. असे का?
स्वार्थी आणि असमाधानी वृत्ती
एक कारण म्हणजे २० व्या शतकात तंत्रज्ञानात व आर्थिक क्षेत्रात झालेला जलद विकास. डी झाइट नावाच्या जर्मन मासिकातील एका लेखात सांगितल्याप्रमाणे आज आपण “पूर्वीच्या अप्रगतिशील जगात नव्हे तर झपाट्याने बदलत चाललेल्या एका विलक्षण काळात जगत आहोत.” याच लेखात पुढे म्हटले होते, की समाजात घडत असलेल्या परिवर्तनांमुळे आजच्या लोकांमध्ये गळेकापू स्पर्धा पाहायला मिळते, जो तो स्वतःचा स्वार्थ साधू पाहात आहे.
सदर लेखात पुढे म्हटले आहे की, “स्वार्थ साधण्यासाठी आज माणूस काहीही करायला तयार आहे. म्हणूनच निर्घृण अपराधांच्या घटना आज इतक्या सर्वसामान्य झाल्या आहेत आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे. बऱ्याच देशांमध्ये तर सरकार चालवणारेच भ्रष्टाचार करून आपली घरे भरत आहेत. लोकांमध्ये स्वतःच्या
फायद्यापलीकडे कशाचा विचार करण्याची क्षमताच राहिलेली नाही, जो तो वखवखलेला आहे.”प्रिन्सटन विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक, रॉबर्ट वूथनाऊ यांनी अमेरिकन समाजाचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की मागच्या पिढीच्या तुलनेत आजची अमेरिकन पिढी फक्त पैसा कमवणे हे एकच ध्येय डोळ्यापुढे ठेवून धडपड करत आहे. वूथनाऊ यांच्या अभ्यासानुसार “श्रीमंत होण्याचा एकच ध्यास घेतल्यामुळे इतरांचा आदर करणे, प्रामाणिकपणे काम करणे, शेजारपाजाऱ्यांशी मिळून मिसळून राहणे यांसारख्या गोष्टींना महत्त्व राहिलेले नाही. बरेच अमेरिकन नागरिक याबद्दल काळजी व्यक्त करतात.”
कोणत्याही मार्गाने पैसा मिळवण्याची वृत्ती समाजात वाढण्याचे आणखी एक कारण आहे. मोठ्या उद्योगांत उच्च पदांवर काम करणाऱ्यांना भरपूर पगार मिळतो, निवृत्तीनंतरही भरपूर सवलती मिळतात; पण त्यांच्याच हाताखाली काम करणाऱ्यांना मात्र ते वारंवार पगारवाढीची मागणी न करण्याचा उपदेश देतात. “बडे उद्योगपती जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या प्रयत्नात असतात, पण समस्या ही आहे की त्यांना पाहून सामान्य माणूसही त्यांच्यासारखाच पैसा कमवण्यासाठी काहीही करायला तयार होतो. अशारितीने हे बडे उद्योगपती सामान्य माणसाला गैरमार्गाने पैसा कमवायला प्रवृत्त करतात. साहजिकच सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर देखील नैतिक दर्जा आपोआपच खालावतो.” असे मत ख्रिश्चन कौन्सिल ऑफ स्वीडनचे नीतीशास्त्राचे सहप्राध्यापक आणि धर्मशास्त्र विभागाचे संचालक केल ऊवे यांनी व्यक्त केले.
मनोरंजनवेडी संस्कृती
विसाव्या शतकाच्या शेवटल्या पन्नास वर्षांत झालेल्या नैतिक अधःपतनाला आणखी एक गोष्ट जबाबदार आहे. ती म्हणजे आजची मनोरंजनवेडी संस्कृती. सिनेट सदस्य लीबरमन म्हणतात त्याप्रमाणे, “आजच्या समाजाची नीतिमूल्ये कोण ठरवतात, तर टीव्ही कार्यक्रमांचे व चित्रपटांचे निर्माते, फॅशन ॲड्व्हरटायजर्स, रॅप स्टार्स आणि मनोरंजन जगतातील इतर अनेक व्यक्ती. यांचा आपल्या संस्कृतीवर आणि खासकरून आपल्या मुलांच्या मनावर जबरदस्त पगडा आहे; पण त्यांच्यामुळे समाजात किती मोठ्या प्रमाणात अनैतिकता पसरत चालली आहे याची त्यांना जराही पर्वा नाही.”
लीबरमन यांनी एका हेवी मेटल बँडने बनवलेल्या रेकॉर्डचे उदाहरण दिले. या रेकॉर्डचे नाव आहे, कॅनिबल कॉप्स (नरभक्षक प्रेत). चाकूच्या धाकावर एका स्त्रीवर केल्या जाणाऱ्या बलात्काराचे या रेकॉर्डमध्ये सविस्तर वर्णन केले आहे. लीबरमन व त्यांच्या एका सहकाऱ्याने
या रेकॉर्ड कंपनीकडे ही रेकॉर्ड प्रसिद्ध न करण्याची विनंती केली. पण अर्थातच त्याचा काही फायदा झाला नाही.एकीकडे आईवडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार करू इच्छितात तर दुसरीकडे मनोरंजनाच्या वेडाने झपाटलेला आजचा समाज मुलांना आपल्या सापळ्यात ओढत आहे. या परिस्थितीमुळे, जबाबदार आईवडील कोंडीत सापडले आहेत. आणि ज्या आईवडिलांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची सवड किंवा इच्छा नाही अशा कुटुंबांत काय परिस्थिती आहे? लीबरमन सांगतात त्याप्रमाणे, “अशा कुटुंबांत सर्रास मनोरंजनाच्या माध्यमांतूनच मुलांवर संस्कार होत आहेत. टीव्ही, सिनेमाचा पडदा आणि सीडी प्लेयर (आणि आता या यादीत इंटरनेटची भर पडली आहे) हेच या मुलांचे शिक्षक बनले आहेत. चांगले काय व वाईट काय, जीवनात महत्त्वाचे काय व कमी महत्त्वाचे काय याचे शिक्षण याच माध्यमांतून त्यांना मिळत आहे.”
चांगल्यावाईटाची जाणीवच राहिलेली नाही
या अनैतिक प्रभावांमुळे तरुण पिढीवर कोणते परिणाम झाले आहेत? अलीकडच्या वर्षांत लहान व किशोरवयीन मुलांनी निर्घृण हत्या व हिंसक कृत्ये केल्याची बरीच प्रकरणे घडली. यांपैकी काही घटनांमध्ये या मुलांनी आपल्याच वयाच्या मुलांची तर काही घटनांमध्ये मोठ्या माणसांचीही हत्या केली.
स्वीडनमध्ये १९९८ साली एक अतिशय भयंकर घटना घडली. पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलांनी आपल्यासोबतच खेळणाऱ्या एका चार वर्षांच्या मुलाची गुदमरून हत्या केली! या मुलांना अशी कृत्ये करताना आपण किती भयंकर कृत्य करत आहोत, अपराध करत आहोत याचे काहीच भान नसते का? एका बाल मनोविकार तज्ज्ञाने उत्तर दिले की, “आपण अपराध करत आहोत, मर्यादा ओलांडत आहोत हे कळण्यासाठी या मुलांवर तसे संस्कार केले जाणे गरजेचे आहे. मुले कोणाला आपला आदर्श समजतात आणि मोठ्या माणसांच्या वागणुकीतून ते काय शिकतात याचाही त्यांच्या चांगल्यावाईटाच्या जाणिवेवर प्रभाव पडतो.”
अतिशय हिंसक व भयंकर गुन्हेगारांतही ही जाणीव नसल्याचे दिसून येते. स्वीडन येथील एका विद्यापीठात मनोरोगचिकित्सा या विषयाचे प्राध्यापक स्टेन लेवॉन्डर यांनी सांगितले की तुरुंगातल्या एकूण कैद्यांपैकी १५ ते २० टक्के कैदी मनोरुग्ण आहेत. ते अतिशय आत्मकेंद्रित आहेत, कोणाविषयी त्यांना दयामाया नाही, चांगले व वाईट यातला फरक त्यांना कळत नाही आणि ते समजून घ्यायलाही तयार नाहीत. आजकाल अगदी नॉर्मल वाटणाऱ्या लहान मुलांत आणि तरुणांतही नैतिकतेची जाणीव नाहीशी होत चालली आहे असे दिसून येते. तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका क्रिस्टीना हॉफ सॉमर्स यांचे म्हणणे आहे, की आज आपण “नैतिकतेच्या बाबतीत अक्षरशः आदीमानवाच्या युगात गेलो आहोत.” तरुण विद्यार्थ्यांचे निरीक्षण करत असताना त्यांना दिसून आले की चांगले काय व वाईट काय याचा निर्णय करण्याची वेळ आल्यास ही मुले अगदी गोंधळून जातात. आणि शेवटी, चांगले किंवा वाईट असे मुळात काही नसतेच असे उत्तर देतात. त्यांच्या मते चांगले व वाईट हे प्रत्येकाने आपल्या मनानुसार ठरवले पाहिजे.
सॉमर्स यांच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना माणसाच्या जीवनाबद्दलही कदर नाही असे दिसून येते; माणसाचे जीवन मोलाचे आहे हा विचार ते चक्क अमान्य करतात. उदाहरणार्थ, तुमच्या पाळीव प्राण्याचा आणि एखाद्या अनोळखी माणसाचा जीव धोक्यात असेल तर तुम्ही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न कराल असे विचारले तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या पाळीव प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करू असे उत्तर दिले.
सॉमर्स म्हणतात “आपली तरुण पिढी मुळातच वाईट, क्रूर किंवा बेईमान आहे अशातला भाग नाही. सरळ सांगायचं तर त्यांना चांगल्यावाईटाची जाणीवच नाही.” जगात चांगले किंवा वाईट असे काहीही नसते, तर हा ज्याचा त्याचा विशिष्ट गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो असे आजच्या तरुण पिढीचे मत बनू लागले आहे. ही त्यांची वृत्तीच समाजाकरता सर्वात धोक्याची आहे.
शेवटी काय, तर आपल्या काळात नैतिकतेचा ऱ्हास झाला आहे ही केवळ एक कल्पना नाही; ही वस्तूस्थिती आहे. बऱ्याच लोकांना पुढे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबद्दल काळजी वाटते. डी झाइट मासिकातल्या लेखात असे म्हटले होते, की जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू “कमकुवत होऊन, अलीकडे समाजवादी यंत्रणा कोलमडली त्याप्रमाणे ती कोलमडेल.”
हा नैतिक ऱ्हास कशाचा संकेत आहे? भविष्य कसे असेल?
[६, ७ पानांवरील चित्रे]
“आजच्या समाजाची नीतिमूल्ये कोण ठरवतात, तर टीव्ही कार्यक्रमांचे व चित्रपटांचे निर्माते, फॅशन ॲड्व्हरटायजर्स, रॅप स्टार्स आणि मनोरंजन जगतातील इतर अनेक व्यक्ती . . .”