व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या अपत्याची जबाबदारी नाकारणारे—खरंच जबाबदारीतून मुक्‍त होतात का?

आपल्या अपत्याची जबाबदारी नाकारणारे—खरंच जबाबदारीतून मुक्‍त होतात का?

तरुण लोक विचारतात . . .

आपल्या अपत्याची जबाबदारी नाकारणारे—खरंच जबाबदारीतून मुक्‍त होतात का?

“‘मी तुझ्या बाळाची आई होणार आहे’ असं ती म्हणाली तेव्हा मला धक्काच बसला. कोण या बाळाची काळजी घेणार? कुटुंब वगैरे चालवणं मला शक्यच नव्हतं. कुठेतरी पळून जावंसं वाटलं.”—जिम. *

“अजून विशीही न गाठलेल्या जवळजवळ १० लाख मुली दर वर्षी . . . गरोदर राहतात. यांपैकी ७८% मुले अनैतिक संबंधांतून झालेली असतात.”

जुन्या काळात, आपण जन्म दिलेल्या अपत्याची जबाबदारी घेण्याची माणसांची वृत्ती होती. पण टीनेज फादर्स या पुस्तकानुसार, “आजकाल अनैतिक संबंधांतून मुलं होणं पूर्वीइतकी शरमेची गोष्ट राहिलेली नाही.” काही देशांतल्या विशिष्ट समाजांत तर लग्नाआधी मुलं होणं हे पुरुषांकरता प्रतिष्ठेचं चिन्ह मानलं जातं! पण आपल्याच या मुलांची जबाबदारी स्वीकारायला मात्र फार कमी तरुण तयार होतात. बहुतेक जण या जबाबदारीपासून अक्षरशः पळ काढतात. *

पण प्रश्‍न येतो, की केवळ त्या परिस्थितीतून पळ काढल्याने एक व्यक्‍ती तिच्या अनैतिक आचरणाच्या दुष्परिणामांपासून खरोखरच मुक्‍त होते का? बायबलनुसार नाही. बायबल सांगते: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) अनैतिक संबंध ठेवणाऱ्‍या स्त्री व पुरुष दोघांना आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण अनैतिकतेपासून दूर राहण्याचा बायबलचा सुस्पष्ट सल्ला पाळल्यास हे सर्व दुःखद परिणाम टाळता येतात.

पळ काढणे—वाटते तितके सोपे नाही

बाळाची काळजी घेणं सोपं नाही; बराच वेळ व पैसा खर्च करावा लागतो. आई व वडील यांच्या जीवनात पूर्वीइतके स्वातंत्र्य राहात नाही. यंग अन्वेड फादर्स या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे: “काही तरुणांना ‘कोणाची काळजी घेणं वगैरे’ कटकट वाटते. शिवाय खिशाला फटका बसतो तो वेगळाच.” पण अशा स्वार्थी वृत्तीच्या या तरुणांना मोठी किंमत द्यावी लागते. आजकाल बऱ्‍याच देशात आपल्या मुलाची जबाबदारी न घेणाऱ्‍या पुरुषाला कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगारच मानले जाते. बाळाचा पिता तोच आहे असे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यावर या तरुणाला कित्येक वर्षांपर्यंत आपल्या बाळाच्या पालनपोषणाकरता आर्थिक मदत देण्यास भाग पाडले जाते. आणि हे योग्यच नाही का? कित्येक तरुणांना तर शिक्षण थांबवावे लागते आणि मिळेल ती नोकरी करून आपल्या अपत्याच्या पालनपोषणाला आर्थिक हातभार लावावा लागतो. स्कूल-एज प्रेग्नेंसी ॲन्ड पेरेन्टहुड पुस्तकात म्हटल्यानुसार, “एखाद्याला जितक्या कमी वयात मूल होतं, तितकंच त्याचं शिक्षणही कमी होतं.” आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मुलाच्या संगोपनाकरता या तरुणाला पैसा कमवता आला नाही तर साहजिकच त्याला कर्ज घेऊन ही जबाबदारी पूर्ण करावी लागते.

अर्थात सगळेच तरुण आपल्या मुलांबद्दल बेपर्वा नसतात. सुरवातीला बरेच तरुण आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. एका सर्व्हेनुसार ७५ टक्के तरुण आपल्या बाळाला पाहायला हॉस्पिटलमध्ये येतात. पण सुरवातीचा हा उत्साह निवळल्यावर जेव्हा जबाबदाऱ्‍या समोर येतात तेव्हा बरेचजण माघार घेतात.

एकतर नोकरी मिळणे आधीच कठीण; त्यात, या तरुणांजवळ आवश्‍यक कौशल्ये व पात्रताही नसते. त्यामुळे साहजिकच ते निराश होतात. आपण आपली जबाबदारी पूर्ण करू शकत नाही याचे त्यांना वाईट वाटते आणि म्हणून शेवटी नाईलाजाने ते निघून जातात. पण काही तरुणांना आयुष्यभर पस्तावा होत राहतो. एक तरुण सांगतो: “कधीकधी मी विचार करतो, माझा मुलगा आता कुठे असेल? त्याची कोण काळजी घेत असेल? . . . मी त्याला वाऱ्‍यावर सोडून निघून आलो याचा मला पस्तावा होतो, पण आता त्याचा उपयोग नाही. मी आपल्या मुलाला गमावलं. कोण जाणे, एखाद्या दिवशी तोच मला शोधून काढेल.”

मुलांना होणारं नुकसान

आपली जबाबदारी टाकून निघून जाणाऱ्‍या या तरुणांचं मन त्यांना सारखं टोचत राहतं. आपल्या मुलांचं आपण नुकसान केलं याची त्यांना लाज वाटत राहते. बायबलमध्ये सांगितले आहे, की मुलाचे संगोपन आई व वडील दोघांनी मिळून केले पाहिजे कारण बाळाला त्या दोघांची गरज असते. (निर्गम २०:१२; नीतिसूत्रे १:८, ९) आपल्या मुलांना टाकून जाणारा पिता त्यांना अक्षरशः समस्यांच्या खाईत लोटतो. संयुक्‍त राष्ट्रांच्या आरोग्य व मानवी सेवा विभागाच्या एका वृत्तानुसार: “वडील नसलेल्या कुटुंबातील मुले सहसा शाळेत तितकी चांगली प्रगती करू शकत नाहीत. तोंडी परीक्षेत आणि गणितात सहसा त्यांना कमी गुण असतात. वरच्या वर्गांत गेल्यावरही त्यांचे गुण सुधारत नाहीत, त्यांच्या वागणुकीत अनेक दोष निर्माण होतात, तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. तरुणपणी, या मुलांना कमी वयातच लग्नाआधी अनैतिक संबंधांतून मुलं होण्याची शक्यता जास्त असते. ते सहसा मधूनच शिक्षण सोडून देतात; त्यानंतर ते धड शिक्षणही घेत नाही आणि धड नोकरीही करत नाहीत.”

ॲट्‌लांटिक मन्थली नावाच्या मासिकात सांगितल्याप्रमाणे “सामाजिक व वैज्ञानिक पुरावा दाखवून देत आहे की घटस्फोटामुळे विभक्‍त झालेल्या कुटुंबातली किंवा अनैतिक संबंधांतून झालेली मुले सहसा जीवनात इतर मुलांच्या तुलनेत कमी प्रगती करतात. एकच पालक असलेल्या कुटुंबांतील मुले गरीबच राहण्याची शक्यता इतर मुलांपेक्षा सहापट जास्त असते.”

हे निष्कर्ष आकडेवारीच्या आधारावर काढण्यात आले आहेत. त्यामुळे याला अपवादही असू शकतात. प्रतिकूल परिस्थितींत वाढलेली मुले देखील कधीकधी फार चांगली, सुसंस्कृत असतात. पण या निष्पाप मुलांना टाकून जाणाऱ्‍या त्यांच्या पित्याला मात्र आयुष्यभर रुखरुख लागलेली असते. एका अनौरस मुलाचा पिता अत्यंत खेदाने म्हणतो, “मी त्या बिचाऱ्‍याचे जीवन [बरबाद] केले.”

कठीण जबाबदारी

सगळेच तरुण आपली जबाबदारी टाकून निघून जात नाहीत. काहींना आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव असते आणि त्यांना आपल्या मुलांचे चांगल्याप्रकारे संगोपन करण्याची मनापासून इच्छा असते. पण इच्छा असणे वेगळे आणि प्रत्यक्ष करून दाखवणे वेगळे. लग्नाआधी पिता बनलेल्या तरुणाला फारसे कायदेशीर अधिकार नसतात, त्यामुळे तो आपल्या मुलाला किती वेळा, किती वेळासाठी भेटू शकतो हे सहसा मुलाची आई आणि तिचे कुटुंबीय ठरवतात. याआधी उल्लेख केलेला जिम म्हणतो, “माझ्याच मुलाबद्दल मला काहीही ठरवण्याचा अधिकार नाही.” काही निर्णय तर वडिलाचा विरोध असतानाही घेतले जातात, उदाहरणार्थ, बाळाला दत्तक देण्याचा किंवा गर्भपात करण्याचा निर्णय. * एक तरुण म्हणतो, “त्यांनी माझं मूल अनोळखी लोकांना देऊन टाकलं तेव्हा मला फार जड गेलं, पण माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता.”

आपली प्रेयसी गर्भवती आहे हे कळल्यावर काही तरुण लग्न करायला तयार होतात. * लग्न केल्यामुळे समाजापुढे त्या मुलीची लाजिरवाणी स्थिती होणार नाही हे कबूल आहे. तसेच मुलालाही आईवडील दोघांचे प्रेम मिळेल. या तरुण व तरुणीच्या हातून चूक घडली असली तरीसुद्धा, त्यांचे कदाचित एकमेकांवर खरोखरच प्रेम असेल. पण लक्षात असू द्या, की तो तरुण पिता बनू शकतो म्हणून बायको व मुलांची जबाबदारी पेलण्याची मानसिक आणि भावनिक प्रौढता त्याच्याजवळ असेलच असे नाही. तसेच आर्थिक दृष्टीने देखील तो कुटुंब चालवू शकेलच असे नाही. अभ्यासांवरून हेच दिसून आले आहे, की गरोदरपणामुळे नाईलाजाने केलेले विवाह सहसा टिकत नाहीत. तेव्हा घाईगडबडीत लग्न करून मोकळं होणं हाच सर्वात उत्तम निर्णय नाही.

बरेच तरुण आपल्या अपत्याच्या पालनपोषणाकरता आर्थिक हातभार लावण्याची स्वतःहून इच्छा व्यक्‍त करतात. यापूर्वी सांगितल्यानुसार, हे सोपे नाही. १८ वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक काळ आपल्या मुलासाठी पैसा पुरवत राहण्यासाठी त्याला बरीच मेहनत करावी लागते. पण आर्थिक हातभार लावल्यामुळे निदान आई व मुलावर दारिद्र्‌यात राहण्याची पाळी येत नाही.

मुलाचे संगोपन करताना इतर कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते? लग्नाआधीच आईवडील बनलेल्या या जोडप्याचे पालक कदाचित पुन्हा शारीरिक संबंध येतील या भीतीने त्यांना एकमेकांना भेटण्याची परवानगी देणार नाहीत. कदाचित बाळाच्या आईला आपल्या बाळाला त्याच्या वडिलाने भेटूच नये असे वाटत असेल. पण जर वडिलाला आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी दिली गेली, तर काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुन्हा अशी चूक घडू नये म्हणून त्या दोघांसोबत आणखी कोणीतरी असणे सर्वात उत्तम.

आपल्या मुलाची चांगली काळजी घेता यावी म्हणून काही विवाह न झालेले पिता आपल्या मुलाला अंघोळ घालणे, भरवणे किंवा वाचून दाखवणे इत्यादी कामे शिकून घेतात. बायबलच्या आदर्शांबद्दल ज्ञान मिळाल्यामुळे एखादा तरुण आपल्या मुलाला देवाच्या वचनातील गोष्टी शिकवण्याचाही प्रयत्न करू शकतो. (इफिसकर ६:४) वडिलांचे प्रेम अजिबातच न मिळण्यापेक्षा काही प्रमाणात तरी ते मिळणे चांगले आहे, पण आपल्यासोबत राहणाऱ्‍या वडिलांचं प्रेम, वात्सल्य, मार्गदर्शन सतत मिळण्याशी याची तुलना करता येणार नाही. बाळाच्या आईने पुढे लग्न केले तरी दुसराच कोणता माणूस आपल्या मुलाचे पालनपोषण करतो हे पाहून वाईट वाटेल तरीसुद्धा बाळाच्या खऱ्‍या पित्याला काहीएक करता येणार नाही.

लग्नापूर्वी मूल होणं हे आईवडिलांना आणि मुलाला देखील अत्यंत दुःखदायक ठरते. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवा देवाला अनैतिक वर्तनाचा वीट असल्यामुळे असे काम करणारे त्याच्या नजरेतून उतरतात. (१ थेस्सलनीकाकर ४:३) अर्थात अशी जटील समस्या आल्यानंतरही, आणखी दुःखदायक परिणाम होऊ नयेत म्हणून काही उपाय करता येतात, पण अनैतिक काम करून अशी वेळ येऊच न देणे हे सर्वात उत्तम. एका तरुणाने म्हटले: “लग्नाआधी मूल झाल्यावर तुमचं जीवन कायमचं बदलतं.” या तरुणाचे म्हणणे अगदी खरे आहे. लग्नाआधीच वडील बनणाऱ्‍याला जीवनभर आपल्या चुकीचे दुष्परिणाम भोगावे लागतात. (गलतीकर ६:८) बायबलचा सल्लाच सर्वात उत्तम आहे: “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा.”—१ करिंथकर ६:१८.

[तळटीपा]

^ काही नावं बदलली आहेत.

^ सावध राहा! नियतकालिकाच्या मे ८, २००० अंकातील “तरुण लोक विचारतात . . . लग्नाआधी मुलांना जन्म देणं—पौरुषाचं लक्षण आहे का?” हा लेख पाहा. आणि लग्नाआधी गरोदर राहणाऱ्‍या मुलींना सहन कराव्या लागणाऱ्‍या दुष्परिणामांबद्दल जुलै २२, १९८५ अंकात “तरुण लोक विचारतात . . . लग्नाआधी गरोदरपण—मला येऊ शकतं का?” या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

^ सावध राहा! (इंग्रजी) याच्या मार्च ८, १९९५ अंकातील “तरुण लोक विचारतात . . . गर्भपात—हा उपाय आहे का?” नावाचा लेख पाहा.

^ मोशेच्या नियमशास्त्रानुसार एखाद्या कुमारिकेशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्‍या मनुष्याला तिच्याशी लग्न करावे लागायचे. (अनुवाद २२:२८, २९) पण मुलीच्या पित्याला लग्नाला परवानगी न देण्याचा अधिकार होता. (निर्गम २२:१६, १७) आज ख्रिस्ती लोक नियमशास्त्राच्या अधीन नाहीत पण लग्न होण्याआधी शारीरिक जवळीक करणे किती गंभीर प्रकारचे पाप आहे हे वरील माहितीवरून कळून येते.—टेहळणी बुरूज नोव्हेंबर १५, १९८९ (इंग्रजी) अंकातील “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.

[१५ पानांवरील चित्र]

अनैतिक गोष्टींत न गुंतणेच सर्वात उत्तम