व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसते

आमच्या कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसते

आमच्या कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसते

लार्स आणि जुडिथ वेस्टरगार यांचा अनुभव

डेन्मार्कमधील चारचौघांसारखंच त्यांचंही कुटुंब. टुमदार घराभोवती असलेली छान बाग. घराच्या भिंतीवर त्यांच्या हसऱ्‍या मुलांचा एक मोठा फोटो.

या कुटुंबात, पतिपत्नी आणि त्यांची तीन मुलं आनंदानं राहतात. पतीचं नाव आहे, लार्स. तो यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत वडील आहे. त्याची पत्नी जूडिथ पायनियर (पूर्ण वेळेची सेविका) आहे. या दोघांचा संसार आता सुखानं चालला आहे. पण काही वर्षांपूर्वी असं नव्हतं. एक वेळ अशी होती जेव्हा लार्स आणि जूडिथ यांच्या मनात एकमेकांविषयी द्वेष होता. इतका की त्यांनी एकेदिवशी घटस्फोट घेतला. मुलांची त्यांच्या वडिलांपासून ताटातूट झाली. सुखी संसाराची घडी एकदम विस्कटली.

मग विस्कटलेली घडी पुन्हा कशी बसली? त्यांचं कुटुंब पुन्हा एकत्र कसं आलं? लार्स आणि जूडिथ यांना त्यांच्या अनुभवाविषयी आपल्याला सांगायचं. त्यांना वाटतं की त्यांच्या अनुभवावरून दुसऱ्‍यांनाही काही शिकता येण्यासारखं आहे.

आनंदी सुरवात

लार्स: १९७३ च्या एप्रिल महिन्यात आमचं लग्न झालं. सर्व काही सुरळीत चाललं होतं. आम्हाला बायबलविषयी किंवा यहोवाच्या साक्षीदारांविषयी काही माहीत नव्हतं. पण आम्हाला वाटायचं, की सर्व लोकांनी मिळून प्रयत्न केले तर हे जग राहण्यालायक एक सुंदर ठिकाण होईल. त्यामुळे आम्ही दोघंही राजकारणात भाग घेऊ लागलो. पुढे आम्हाला, मार्टिन, थॉमस आणि योनस ही तीन मुलं झाली, आमचा आनंद द्विगुणित झाला.

जूडिथ: मी एका सिव्हिल सर्व्हिस कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होते. राजकारणात आणि लेबर युनिएनमध्ये माझा भाग असायचा. हळूहळू मला मोठ-मोठी पदं मिळू लागली.

लार्स: एका मोठ्या लेबर युनियनमध्ये मी कामाला होतो. लवकरच मला बढती मिळाली. यश जणू काय आमच्या पायाशी लोळण घेत होतं.

दुरावा निर्माण होणं

लार्स: आम्ही दोघंही आपापल्या कामात इतके व्यस्त होत गेलो, की एकमेकांबरोबर बोलायला आम्हाला वेळच मिळायचा नाही. आम्ही दोघंही एकाच राजकीय पार्टीसाठी काम करत होतो पण आमची कामं मात्र वेगवेगळ्या विभागांत होती. मुलांकडे लक्ष द्यायलाही आमच्याकडे वेळ नव्हता. त्यांच्याकडे लक्ष द्यायला आम्ही कोणाला तरी सांगायचो किंवा मग त्यांना पाळणाघरात सोडायचो. आम्ही दोघंही आमच्याच कामात व्यस्त असल्यामुळे आमच्या संसारात काही ताळमेळ राहिला नाही. आणि दोघं कधी घरी राहिलोच तर, या नाही तर त्या कारणावरून आमची जोरदार भांडणं व्हायची. मग तणाव घालवण्यासाठी मी पिऊ लागलो.

जूडिथ: आम्हा दोघांना तसं एकमेकांबद्दल, मुलांबद्दल प्रेम होतं, पण प्रेमाने, आनंदाने राहण्याऐवजी आमचे सारखे खटके उडू लागले. आमच्या या भांडणांत आमची गरीब बिचारी मुलं मात्र होरपळून निघाली.

लार्स: घरात शांती राहावी म्हणून मी नोकरी देखील सोडली. इतकंच नव्हे तर १९८५ मध्ये आम्ही घर बदलून या लहानशा गावात राहायला आलो. काही दिवस सर्वकाही सुरळीत झाल्यासारखं वाटलं; पण काही काळानंतर आम्ही दोघं नवरा-बायको पुन्हा आमच्या नेहमीच्या कामात गुंग झालो. शेवटी, लग्नानंतर १६ वर्षांनी १९८९ सालाच्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही घटस्फोट घेतला. आमच्या कुटुंबाची घडी पूर्णपणे विस्कटली होती.

जूडिथ: माझ्या कुटुंबाची आणि मुलांची ही अवस्था पाहून मी खिन्‍न झाले. आम्ही दोघं एकमेकांचा इतका द्वेष करत होतो की, दोघंही मुलांचा ताबा घेऊ पाहत होतो. पण शेवटी कोर्टानं माझ्या बाजूने निकाल दिला. मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी माझ्यावर आली.

लार्स: कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा आम्ही प्रयत्न केला खरा, पण त्याचा काही फायदा झाला नाही. आम्ही देवाकडे प्रार्थनाही केली होती. पण देवाबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती.

जूडिथ: आमची परिस्थिती काही सुधरली नाही, म्हणून आम्हाला वाटलं की देवाने आमची प्रार्थना ऐकली नसावी. परंतु, आता आमची खात्री पटली आहे की देव प्रार्थना ऐकतो. आणि याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो.

लार्स: कुटुंबाला सावरण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, स्वतःला बदलले पाहिजे याची आम्हा दोघांना जाणीव झाली नाही. त्यामुळे आम्ही कायमचे एकमेकांपासून दुरावलो.

लार्सच्या जीवनाला अनपेक्षित वळण

लार्स: घटस्फोटानंतर मी एकटा राहू लागलो. त्यावेळी घडलेल्या घटनांमुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. एकदा यहोवाचे साक्षीदार माझ्या घरी आले तेव्हा मी त्यांच्याकडून दोन मासिकं घेतली. पूर्वी मी यहोवाच्या साक्षीदारांना दरवाजात उभे देखील करत नव्हतो. पण या वेळेस मात्र मी त्यांच्याकडून मासिकं घेतली. ती वाचल्यानंतर मला कळालं, की साक्षीदार खरं तर देवाला आणि येशूलाही मानतात. याचं मला खूप आश्‍चर्य वाटलं. ते ख्रिश्‍चन आहेत हे मला माहीतच नव्हतं.

त्या दरम्यान, माझी ओळख एका स्त्रीबरोबर झाली आणि आम्ही दोघं एकत्र राहू लागलो. ती पूर्वी यहोवाची साक्षीदार होती. मी जेव्हा तिला प्रश्‍न विचारले तेव्हा तिने मला बायबलमधून त्यांची उत्तरं दिली. देवाचे नाव यहोवा आहे हे तिनेच मला सांगितलं. तेव्हा मला कळलं, की “यहोवाचे साक्षीदार” “देवाचे साक्षीदार” आहेत!

त्या स्त्रीने मला, यहोवाच्या साक्षीदारांच्या ॲसेंब्ली हॉलमध्ये होणारं जाहीर भाषण ऐकायला सांगितलं. मी तिथे गेलो. कार्यक्रम ऐकल्यानंतर माझी आस्था वाढू लागली. आणखी शिकायला मिळावं म्हणून मी जवळच्या राज्य सभागृहात जाऊ लागलो आणि त्यानंतर मी बायबलच्या अभ्यासाला सुरवात देखील केली. त्या स्त्रीबरोबर लग्न न करता राहणं हे चुकीचं आहे, हे मला बायबल अभ्यास केल्यानंतर कळलं. म्हणून मग मी गावी जाऊन तिथे एकटा राहू लागलो. मला स्वतःची लाज वाटू लागली होती, पण मी तिथे देखील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधला आणि माझा बायबलचा अभ्यास चालू ठेवला.

माझ्या मनात अजूनही काही शंका होत्या. यहोवाचे साक्षीदार खरोखरच देवाचे लोक आहेत का? मग, मला लहानपणी मिळालेली शिकवण चुकीची होती का? माझे आईवडील सेव्हेंथ डे ॲडवेन्टीस्ट असल्यामुळे मला त्यांचीच शिकवण मिळाली होती. मी एका ॲडवेन्टीस्ट सेवकाला भेटलो. दर बुधवारी तो माझा अभ्यास घ्यायला यायचा आणि दर सोमवारी यहोवाचे साक्षीदार माझा बायबलचा अभ्यास घ्यायला यायचे. मला या दोघांकडून चार मुद्द्‌यांवर स्पष्ट उत्तरं हवी होती. येशूचे पुन्हा येणं, पुनरुत्थान, त्रैक्याची शिकवण आणि मंडळीचे व्यवस्थापन. माझ्या शंकेचं निरसन काही महिन्यांतच झालं. माझ्या चारही मुद्द्‌यांचं स्पष्टीकरण मला फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांकडूनच मिळालं. बायबलमधूनच त्यांनी मला हे चार मुद्दे नीट समजावून सांगितले. तेव्हापासून मी मंडळीच्या सर्व कामांत उत्साहाने भाग घेऊ लागलो आणि यहोवाला माझं जीवन समर्पित केलं. १९९० सालच्या मे महिन्यात मी बाप्तिस्मा घेतला.

जूडिथचं काय झालं?

जूडिथ: घटस्फोटानंतर मी पुन्हा चर्चला जाऊ लागले. लार्स यहोवाचा साक्षीदार झाला आहे हे ऐकल्यावर मला मुळीच आनंद वाटला नाही. योनस हा आमचा धाकटा मुलगा कधीकधी त्याच्या वडलांना, लार्सला भेटायला जायचा. पण त्याने योनसला साक्षीदारांच्या सभांना घेऊन जाऊ नये, असं मी त्याला बजावलं होतं. योनसला सभांना घेऊन जाता यावे म्हणून लार्सने कोर्टाकडून परवानगी मागितली, पण कोर्टाने त्याची विनंती फेटाळून लावली.

दरम्यान मी एका मनुष्याबरोबर राहू लागले होते. मी राजकारणात आणि इतर सामाजिक कार्यात आणखीनच गुंतले गेले. त्यामुळे विस्कटलेल्या आमच्या घराची घडी पुन्हा बसण्याची सुतराम शक्यता राहिली नाही, कोणी तसं सुचवलंही असतं तर ते अशक्य वाटलं असतं.

यहोवाचे साक्षीदार किती खोटे आहेत हे सिद्ध करता यावं म्हणून मी एका पाळकाकडे गेले. त्यांना यहोवाच्या साक्षीदारांविषयी काहीच माहीत नव्हतं आणि त्यांच्याकडे त्यांचं कोणतंही साहित्य नव्हतं. ते मला फक्‍त इतकंच म्हणाले, की तू त्यांच्यापासून दूर राहा. पण त्यांच्या या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही. एकदा, मला नाईलाजानं त्यांना भेटावच लागलं.

यहोवाचा साक्षीदार असलेला माझा भाऊ स्वीडनमध्ये राहत होता. राज्य सभागृहात होणाऱ्‍या त्याच्या लग्नाला त्याने मला बोलावलं होतं. या लग्नात मी साक्षीदारांना भेटले. मला आलेल्या अनुभवामुळे साक्षीदारांबद्दलचं माझं मतच बदललं. मला नेहमी वाटायचं की हे लोक फार कंटाळवाणे असतील. पण माझा विचार चुकीचा होता. ते प्रेमळ आणि आनंदी लोक होते.

लार्सने त्याच्या जीवनात खूप बदल केला होता. तो आता एक जबाबदार व्यक्‍ती झाला होता. तो मुलांबरोबर वेळ घालवू लागला. प्रेमाने वागू लागला, त्याची भाषा देखील सुधरली आणि पूर्वीप्रमाणे दारू पिण्याचं त्याने सोडून दिलं. माझी त्याच्याकडून हीच अपेक्षा होती. आता तो खूप हवाहवासा वाटू लागला. पण आता तो माझा पती नव्हता, कदाचित दुसरी स्त्री त्याच्याबरोबर लग्न करील या विचारानं मी खूप निराश झाले.

मी एक “डाव” रचला. एकदा योनस लार्सकडे राहायला गेला होता तेव्हा मी माझ्या दोन बहिणींना लार्सकडे घेऊन गेले. माझ्या दोन बहिणी योनसला भेटायला आल्या आहेत असं मी खोटंच सांगितलं. आम्ही फिरायला एका बागेत गेलो. माझ्या दोन बहिणी योनससोबत बागेत खेळत होत्या. मी आणि लार्स एका बाकावर जाऊन बसलो.

‘आता पुढं काय?’ असं विचारताच लार्सने मला एक पुस्तक दिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं, तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे. * मला ते पुस्तक देताना लार्स म्हणाला, की कुटुंबात पती आणि पत्नीची काय भूमिका आहे यावर जे अध्याय आहेत ते वाचून पाहा. आणि या अध्यायांतील सर्व शास्त्रवचनं मी बायबल उघडून पाहावीत अशी त्याने मला खास विनंती केली.

मग, आम्ही दोघं बाकावरून उठलो तेव्हा मी त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण लार्सनं मला प्रतिसाद दिला नाही. मला त्यावेळी त्याचा खूप राग आला. पण नंतर मला जाणवलं, की लार्स माझ्यासोबत तसा वागला ते बरोबरच होतं. हे माझ्याच चांगल्याकरता होतं. खरं तर, त्याने स्वीकारलेल्या नव्या धर्माबद्दल माझं काय मत आहे हे जाणण्याआधी माझ्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध वाढवण्याची त्याची इच्छा नव्हती.

या सर्व गोष्टींमुळे मला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणखी जाणून घ्यावसं वाटू लागलं. दुसऱ्‍या दिवशी यहोवाची साक्षीदार असलेल्या एका व्यक्‍तीला मी भेटले. त्यांच्या धर्माबद्दल मला आणखी माहिती द्यावी म्हणून मी तिला आणि तिच्या नवऱ्‍याला माझ्या घरी यायला सांगितलं. माझ्या सर्व प्रश्‍नांची त्यांनी बायबलमधून उत्तरं दिली. आता मला कळलं, की यहोवाचे साक्षीदार बायबलमधूनच लोकांना शिकवतात. हेच सत्य आहे, हे मला प्रत्येक चर्चेनंतर कबूल करावंच लागलं.

या दरम्यान मी इव्हॅन्जिलिकल लूथरन चर्चला जायचं सोडून दिलं होतं आणि राजकारणातील सर्व कामं बंद केली होती. मी धूम्रपानही सोडून दिलं. यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. १९९० सालच्या ऑगस्ट महिन्यात मी बायबलचा अभ्यास करायला सुरवात केली आणि एप्रिल १९९१ मध्ये मी बाप्तिस्मा घेऊन यहोवाची साक्षीदार बनले.

दुसरा विवाह

जूडिथ: आम्ही दोघंही वेगवेगळ्या मार्गाला गेलो होतो हे खरं आहे. पण बायबलचा अभ्यास केल्यामुळे व बायबलमधील शिकवणींचे पालन केल्यामुळे आम्ही स्वतःत बदल केले. आता आम्ही दोघंही यहोवाचे साक्षीदार आहोत. आम्हाला एकमेकांबद्दल पूर्वीपेक्षा अधिक प्रेम वाटू लागलं. आम्हाला पुन्हा लग्न करायला काहीच हरकत नव्हती. आणि आम्ही तेच केलं. यावेळी आमचं लग्न यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात झालं.

लार्स: शेवटी अशक्य ते शक्य झालं! विस्कटलेली आमच्या कुटुंबाची घडी पुन्हा व्यवस्थित बसली. आम्हाला किती आनंद झाला होता याचं आम्ही वर्णन करू शकत नाही.

जूडिथ: आमच्या लग्नाला आमची तिन्ही मुलं, नातेवाईक, जुने-नवीन मित्र आले होते. हा आगळावेगळाच अनुभव होता! लग्नाला आलेली काही पाहुणेमंडळी आम्हाला, आमच्या पहिल्या लग्नापासून ओळखत होती. आमच्या कुटुंबाचं झालेलं मिलन पाहून त्यांना खूप आनंद झाला होता, शिवाय साक्षीदारांमधला खरा आनंद पाहूनही त्यांना आश्‍चर्य वाटलं.

मुलं

लार्स: आमच्या बाप्तिस्म्यानंतर आमच्या दोन मुलांनी यहोवाला त्यांचं जीवन समर्पित केलं. हे पाहून तर आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

जूडिथ: योनस लार्सला भेटायला जाऊ लागला तेव्हापासूनच त्याला बायबलमधील सत्य आवडू लागलं होतं. तो दहा वर्षांचा होता तेव्हा तो मला एकदा म्हणाला की, मला बाबांबरोबर राहायला जायचंय, कारण ते “बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे वागतात.” वयाच्या १४ व्या वर्षी योनसने बाप्तिस्मा घेतला. त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता तो पूर्ण वेळेचा एक सेवक आहे.

लार्स: आमचा मोठा मुलगा, मार्टीन आता २७ वर्षांचा आहे. आम्ही दोघांनी केलेले बदल पाहून तोही प्रभावीत झाला. तो दुसरीकडे राहायला गेला. दोन वर्षांपूर्वी त्याने तिथल्या यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला. पाच महिन्यांत त्याने बाप्तिस्मा घेण्याइतकी प्रगती केली आहे. ख्रिश्‍चन या नात्याने त्याने आपल्या भवितव्याबद्दलच्या योजना केल्या आहेत.

आमचा दुसरा मुलगा, थॉमस सध्या तरी यहोवाचा साक्षीदार नाही. तरीपण आम्ही त्याच्यावर प्रेम करतो व त्याच्याबरोबर चांगले वागतो. आमच्या कुटुंबात झालेला बदल पाहून त्यालाही आनंद होतो. बायबलमधून शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागल्यामुळेच आम्ही एकत्र येऊ शकलो. बहुतेकदा आम्ही एकत्र जमतो आणि कुटुंब मिळून मजा करतो. हे सर्व यहोवाच्या आशीर्वादामुळेच शक्य झालं.

आमचं आजचं जीवन

लार्स: आता आम्ही परिपूर्ण झालो आहोत असं मी म्हणत नाही. पण एक गोष्ट मात्र आम्ही शिकलो: सुखी विवाहासाठी नवराबायकोत प्रेम आणि एकमेकांबद्दल आदर असणं महत्त्वाचं आहे. आज आमच्या विवाहाचा पाया पहिल्यासारखा नाही. आम्ही यहोवा देवाला सर्वोच्च अधिकारी मानतो, व आपण त्याच्यासाठी जगत आहोत हे आम्ही दोघांनीही समजून घेतलं आहे. आता जूडिथ आणि मला कोणतीही गोष्ट वेगळे करू शकणार नाही. आम्ही पूर्ण भरवशाने भवितव्याकडे वाटचाल करीत आहोत.

जूडिथ: आमचं एक झालेलं कुटुंब, यहोवाच विवाहाचा आणि कुटुंबाचा सर्वोत्तम सल्लागार आहे याचा पुरावा आहे असं मला वाटतं.

[तळटीपा]

^ सन १९७८ मध्ये वॉच टावर संस्थेद्वारे प्रकाशित केलेले. (सध्या छापले जात नाही.)

[२२ पानांवरील चित्र]

लार्स आणि जूडिथ, १९७३ साली त्यांचा पहिला विवाह झाला त्यावेळी

[२३ पानांवरील चित्र]

त्यांची तीन मुलं

[२५ पानांवरील चित्र]

बायबल तत्त्वे लागू केल्यामुळे पुन्हा एक झालेले लार्स आणि जूडिथ