इतकी अनीती का?
इतकी अनीती का?
मागच्या काही वर्षांत समाजाची नैतिक मूल्ये कमालीची घसरली आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. समाजाची नैतिक जाणीव हळूहळू नाहीशी होत चालली आहे. पण असे का घडत आहे, आणि भविष्यात शेवटी काय होणार आहे?
काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, सबंध मानवी समाजच विनाशाकडे वाटचाल करत आहे का? की समाजाच्या नैतिकतेत घडून आलेला बदल, काळाच्या ओघात घडणाऱ्या इतर नैसर्गिक बदलांप्रमाणेच आहे?
बऱ्याच लोकांना असे वाटते. त्यांच्या मते आपल्या काळात आलेली ही अनैतिकतेची लाट, आली तशीच निघूनही जाईल. इतिहासात असे बऱ्याचदा आणि बऱ्याच बाबतीत घडले आहे असे ते म्हणतात. काही दिवसांनी समाजाची नैतिक स्थिती आधीसारखीच होईल आणि पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे लोक नैतिक आदर्शांनुसार वागू लागतील. या लोकांचे म्हणणे कितपत खरे आहे?
‘शेवटला काळ’
उत्तर जाणून घेण्यासाठी, आपण एका अशा ग्रंथातून माहिती घेऊ ज्याला अनेक शतकांपासून सबंध जगात नैतिक मार्गदर्शनाचा आधार मानले गेले आहे. होय, देवाचे वचन बायबल यात केलेल्या एका भविष्यवाणीशी आजच्या जगाची परिस्थिती तंतोतंत जुळते. मनुष्य इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या काळाला या भविष्यवाणीत ‘शेवटला काळ’ किंवा ‘युगाची समाप्ती’ म्हटले आहे. (२ तीमथ्य ३:१; मत्तय २४:३) या शब्दांवरून स्पष्ट होते की याच काळात एका युगाची समाप्ती होऊन एक नवे युग सुरू होईल.
देवाचे वचन सांगते की शेवटल्या काळी “कठीण दिवस येतील.” हा शेवटला काळ ओळखण्यासाठी बायबलमध्ये अनेक चिन्हे दिली आहेत. ही सर्व चिन्हे या विलक्षण काळाचे अगदी स्पष्ट वर्णन करतात.
लोकांमधील वाईट प्रवृत्त्या
बायबलमध्ये दिलेल्या चिन्हांपैकी आजच्या काळात प्रामुख्याने दिसून येणारे चिन्ह म्हणजे: ‘माणसे सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील.’ (२ तीमथ्य ३:२, ५) इतिहासात इतर कोणत्याही काळात देवाधर्माबद्दल बेपर्वाईची वृत्ती इतक्या व्यापक प्रमाणात दिसून आली नाही. देव हाच सर्वश्रेष्ठ अधिकार आहे आणि बायबलमध्ये दिलेला मार्ग हाच एकमात्र सत्याचा मार्ग आहे असे मानण्याची लोकांना जरूर वाटत नाही. अर्थात, धर्म अजूनही आहेत पण लोकांवर त्यांचा तितका प्रभाव राहिलेला नाही. केवळ नावाला लोक धर्म पाळतात.
शेवटल्या काळाचे आणखी एक चिन्ह बायबलमध्ये दिलेले आहे: “माणसे . . . असंयमी, क्रूर . . . होतील” आणि “अनीति वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीति थंडावेल.” (२ तीमथ्य ३:२, ३; मत्तय २४:१२) “क्रूर” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ, “माणुसकी नसलेला किंवा भावनाशून्य” असाही होतो. आजकाल तर अगदी कोवळी मुले देखील “क्रूर” बनली आहेत, आणि हिंसक गुन्हे देखील करू लागली आहेत.
तंत्रज्ञानात आणि आर्थिक क्षेत्रात झालेल्या जलद विकासामुळे माणूस जास्तीतजास्त पैसा व संपत्ती मिळवण्याच्या मागे लागला आहे; पैशासाठी बहुतेक लोक जुन्या नैतिक आदर्शांना सरळ धुडकावू लागले आहेत. आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणाचीही आणि कशाचीही पर्वा न करता होईल तितके हिसकावून घेण्याची प्रवृत्ती आज सर्रास पाहायला मिळते. जुगाराचे वेगवेगळे प्रकार आज इतके लोकप्रिय होण्याचेही हेच कारण आहे; माणूस अत्यंत स्वार्थी झाला आहे. शिवाय, मागच्या तीस चाळीस वर्षांच्या गुन्हेगारीची आकडेवारी देखील या गोष्टीला दुजोरा देते.
आपल्या काळात प्रकर्षाने जाणवणाऱ्या आणखी एका २ तीमथ्य ३:२, ४) विलासी वृत्तीच्या लोकांची आज काही कमी नाही. त्यांना फक्त आपली वासना तृप्त करायची असते. पण लग्न करून एका व्यक्तीला जीवनभर विश्वासू राहण्याची जबाबदारी मात्र नकोशी वाटते. कोलमडलेली कुटुंब व्यवस्था, आईवडिलांच्या प्रेमाला आणि कौटुंबिक जीवनाच्या आनंदाला मुकलेली मुले, एकट्याने कुटुंब चालवणारे स्त्रीपुरुष, आणि शरीरसंबंधांतून उद्भवणारे भयंकर रोग हे सर्व याचेच परिणाम आहेत.
गोष्टीचा शेवटल्या काळाच्या चिन्हांत उल्लेख केला होता: “माणसे . . . देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी . . . होतील.” (आणखी एक चिन्ह म्हणजे, ‘माणसे स्वार्थी व धनलोभी होतील.’ (२ तीमथ्य ३:२) डी झाइट या जर्मन मासिकानुसार “[आजची अर्थव्यवस्था] स्वार्थाच्याच जोरावर टिकून आहे.” पैसा कमवणे हे आज कित्येक लोकांच्या जीवनाचे एकमात्र ध्येय आहे. इतिहासात आणखी कोणत्याच काळात पैशाचे असे वेड लोकांना नव्हते. आणि या वेडापायी लोक नैतिक आदर्श पूर्णपणे विसरले आहेत.
जागतिक घटना
मनुष्याची प्रवृत्ती बिघडण्यासोबतच, शेवटल्या काळात सबंध मानवजातीला हादरून सोडतील अशा जागतिक घटना घडतील असेही बायबलमध्ये सांगण्यात आले होते. उदाहरणार्थ, त्यात म्हटले आहे की, “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मऱ्या येतील व दुष्काळ पडतील.”—लूक २१:१०, ११.
विसावे शतक सोडल्यास, इतिहासातल्या इतर कोणत्याही काळात मनुष्याला इतक्या जागतिक संकटांना तोंड द्यावे लागले नव्हते; शिवाय इतक्या कमी कालावधीत इतक्या जास्त लोकांवर परिणाम करणारी संकटे देखील पूर्वी कधीच आली नव्हती. उदाहरणार्थ, या शतकातच १० कोटी पेक्षा जास्त लोक युद्धांत मृत्यूमुखी पडले; ही संख्या पूर्वीच्या अनेक शतकांत युद्धांमध्ये मृत्यूमुखी
पडलेल्यांच्या एकूण संख्येपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. ज्यांना जागतिक युद्ध म्हणण्यात आले, अशी दोन भयंकर युद्धे या २० व्या शतकातच झाली. यापूर्वी अशी जागतिक युद्धे कधीही झाली नव्हती.या सर्वामागची दुष्ट शक्ती
एक शक्तिशाली, दुष्ट आत्मिक प्राणी अस्तित्वात असल्याचे बायबल सांगते, “जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे.” लोकांसमोर निरनिराळे मोह आणून त्यांना देवाच्या नीतिनियमांचे उल्लंघन करायला लावायचे, अनैतिक कामे करण्यास प्रवृत्त करायचे हा आज त्याचा एकच उद्देश आहे. बायबल सांगते की “आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन” सैतान या शेवटल्या काळात पृथ्वीवर आला आहे.—प्रकटीकरण १२:९, १२.
बायबलमध्ये दियाबलाला “जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपति म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपति” म्हणण्यात आले आहे. (इफिसकर २:२) याचा अर्थ, आज दियाबलाचा बहुतेक मानवांवर जबरदस्त पगडा आहे. त्या लोकांना कदाचित याची कल्पनाही नसेल. हवेत असणारे विषारी वायू ज्याप्रमाणे आपल्याला दिसत नाहीत, त्याचप्रमाणे सैतानाचा दुष्ट प्रभाव आपल्यावर होत असूनही कधीकधी तो जाणवत नाही.
उदाहरणार्थ, व्हिडियो, चित्रपट, टीव्ही, इंटरनेट, जाहिराती, पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे यांसारख्या प्रसिद्धी माध्यमांतून सैतानाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. यांपैकी बरेचसे साहित्य सहसा भोळ्या तरुणांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने सादर केलेले असते; आणि त्यात विशिष्ट वंशांबद्दल द्वेष, भूतविद्या, अनैतिकता आणि भयंकर हिंसा यांसारख्या गोष्टी भरलेल्या असतात.
बायबलमध्ये केलेले शेवटल्या दिवसांचे वर्णन आणि प्रत्यक्ष आजच्या जगात चाललेल्या गोष्टींत किती साम्य आहे हे पाहून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटते. २० व्या शतकाच्या आधी देखील काही घटना या वर्णनाशी जुळतात हे कबूल आहे. पण, ही सर्व चिन्हे पूर्ण होताना केवळ २० व्या शतकातच दिसली आणि आता या २१ व्या शतकातही ती दिसत आहेत.
लवकरच नव्या युगाची पहाट
काही लोक म्हणतात की मानवजातीचा विनाश होईल, तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की आतापर्यंत चालत आले आहे तसेच सर्वकाही पुढेही चालत राहील. पण या दोन्ही प्रकारच्या लोकांचे म्हणणे बरोबर नाही. बायबलमध्ये स्पष्ट सांगितले आहे, की या पृथ्वीवरच्या मानवी राज्यांचा अंत होऊन एक नवे राज्य या पृथ्वीवर राज्य करू लागेल.
शेवटल्या काळाची चिन्हे सांगितल्यानंतर येशूने म्हटले: “ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.” (लूक २१:३१) देवाच्या या राज्याबद्दलच येशू लोकांना प्रचार करत होता. (मत्तय ६:९, १०) आणि देवाने आपल्या या राज्याचा राजा म्हणून येशूला नेमले आहे; या राज्याचे शासन फार लवकर या पृथ्वीवर सुरू होईल.—लूक ८:१; प्रकटीकरण ११:१५; २०:१-६.
शेवटला काळ संपुष्टात येईल तेव्हा देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा, येशू ख्रिस्त, या राज्याच्या सर्व शत्रूंचा सर्वनाश करेल. म्हणजे दियाबल आणि त्याला समर्थन देणाऱ्या सर्वांचा विनाश केला जाईल. तेव्हा कोठे आजचा नीतिभ्रष्ट झालेला समाज नाहीसा होऊन एक नवे जग येईल ज्यात प्रत्येक जण नीतिमान असेल. (दानीएल २:४४) या नव्या जगात सर्व चांगल्या मनाचे लोक एका सुंदर पृथ्वीवर सर्वकाळ जीवनाचा आनंद लुटतील.—लूक २३:४३; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४.
आजच्या जगात बोकाळलेली अनीती पाहून हळहळणारे आणि शेवटल्या काळाची चिन्हे पूर्ण होत आहेत हे समजून घेणारे, एका उज्ज्वल भविष्याकडे मोठ्या आशेने पाहू शकतात. मानवांबद्दल काळजी असणाऱ्या सर्वसमर्थ निर्माणकर्त्याचे आपण शतशः आभार मानले पाहिजे, कारण या पृथ्वीसाठी असलेला त्याचा अद्भुत उद्देश तो लवकरच पूर्ण करील.—स्तोत्र ३७:१०, ११, २९; १ पेत्र ५:६, ७.
मनुष्याच्या प्रेमळ निर्माणकर्त्याबद्दल आणि नीतिमत्तेच्या नव्या जगात जगण्याच्या आशेबद्दल आणखी ज्ञान घेण्याचे यहोवाचे साक्षीदार तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत. कारण बायबलनुसार, “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.
[१० पानांवरील चित्र]
चांगल्या मनाचे लोक एका सुंदर पृथ्वीवर सर्वकाळ जीवनाचा आनंद लुटतील