व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निराशेवर काही उपाय?

निराशेवर काही उपाय?

बायबलचा दृष्टिकोन

निराशेवर काही उपाय?

माणूस कधीनाकधी तरी निराश होतोच. पण काही लोक इतके निराश होतात की त्यांना जीवन नकोसे होते.

प्राचीन काळच्या देवाच्या विश्‍वासू सेवकांवरही अनेक समस्या आल्या, असे बायबलमध्ये वाचायला मिळते. तेव्हा आपण देवाची सेवा करत आहोत म्हणून आपल्यावर निराशाजनक समस्या येणारच नाहीत असे समजू नये. एलिया आणि ईयोब यहोवाचे विश्‍वासू सेवक होते. त्या दोघांचाही यहोवाशी अगदी निकटचा नातेसंबंध होता तरीसुद्धा, त्यांच्यापुढे जेव्हा समस्या आल्या, दबाव आले तेव्हा तेही निराश झाले. इतके की, त्यांनीही मरणे पसंत केले. दुष्ट ईजबेल राणीपासून आपला जीव मुठीत धरून पळालेल्या एलियाला, ‘आपला प्राण गेला तर बरे होईल असे वाटले.’ (१ राजे १९:१-४) ईयोब या धार्मिक मनुष्यावर तर समस्यांचा जणू डोंगरच कोसळला. त्याला एक भयंकर आजार जडला होता, शिवाय त्याची दाहीच्या दाही मुले अपघातात मरण पावली. (ईयोब १:१३-१९; २:७, ८) यांसर्वामुळे तो इतका निराश झाला, की “माझ्या या अस्थिपंजरापेक्षा मला मरण पुरवेल,” असे तो म्हणाला. (ईयोब ७:१५) यावरून असे दिसते, की देवाच्या या विश्‍वासू सेवकांनाही अनेक चिंतांनी भेडसावले होते.

आज काही जण म्हातारपणामुळे होणाऱ्‍या वेदना, विवाहसोबत्याचा मृत्यू किंवा गंभीर आर्थिक समस्या यांमुळे निराश होत असतील. सततचा मानसिक ताण, गतजीवनात घडलेल्या एखाद्या दुःखद घटनेची सतत येणारी आठवण किंवा कौटुंबिक समस्या यांमुळे काहींना आपण समस्यांच्या महासागरात गटांगळ्या खात आहोत आणि येणाऱ्‍या प्रत्येक लाटेमुळे किनाऱ्‍यावर येण्याऐवजी आणखीनच खोल महासागरात जात आहोत असे वाटेल. एका मनुष्याने म्हटले: “तुम्हाला असे वाटू लागते, की कोणालाही तुमची गरज नाही. तुम्ही मेल्यावरसुद्धा कोणाला तुमची आठवण राहणार नाही. एकाकीपणाची भावना कधीकधी तर तुम्हाला खायला उठते.”

काही लोकांच्या परिस्थितीमध्ये बदल होतो आणि त्यांच्या मनावरचे ओझे जरा हलके होते. पण समजा परिस्थिती बदलण्याची आशाच नसेल तर? बायबलमध्ये निराशेवर काही उपाय सांगण्यात आला आहे का?

बायबलमधील मदत

एलिया आणि ईयोब या दोघांना त्यांच्या समस्येतून सोडवण्याचे सामर्थ्य यहोवा देवाकडे होते. (१ राजे १९:१०-१२; ईयोब ४२:१-६) बायबल म्हणते: “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.” (स्तोत्र ४६:१; ५५:२२) निराशेच्या ओझ्याखाली आपण कितीही दबून गेलेलो असलो तरी, यहोवा आपल्याला आश्‍वासन देतो, की ‘तो त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने आपल्याला सावरेल.’ किती दिलासा देणारे हे शब्द आहेत! (यशया ४१:१०) यहोवाने आपल्याला मदत करण्यासाठी त्याचा हात पुढे केला आहे, मग आपण त्याला प्रतिसाद कसा देऊ शकतो?

प्रार्थना करण्याद्वारे. प्रार्थना केल्यास, “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति [आपली] अंतःकरणे व [आपले] विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील,” असे बायबल म्हणते. (फिलिप्पैकर ४:६, ७) दुःखामुळे आपल्याला आशेचा कोणताही किरण दिसणार नाही. पण, आपण ‘प्रार्थनेत तत्पर राहिलो,’ तर यहोवा आपल्या अंतकरणाचे व मनाचे रक्षण करील व संकटात टिकून राहण्याकरता आपल्याला शक्‍ती देईल.—रोमकर १२:१२; यशया ४०:२८-३१; २ करिंथकर १:३, ४; फिलिप्पैकर ४:१३.

आपली नक्की कोणती समस्या आहे हे आपण प्रार्थनेत स्पष्टपणे बोललो तर आपला फायदा होईल. कदाचित आपल्याला आपले विचार शब्दांत मांडता येणार नाहीत, पण जेव्हा आपण यहोवाबरोबर खुल्या मनाने बोलतो, आपल्याला काय वाटते किंवा आपल्या समस्येचे नेमके काय कारण आहे हे त्याला सांगतो तेव्हा तो आपली मदत करायला नक्की पुढे येतो. आपल्याला त्याने टिकून राहण्यासाठी शक्‍ती द्यावी अशी देखील आपण त्याला दररोज विनंती करू शकतो. स्तोत्रकर्ता आपल्याला हमी देतो: “[परमेश्‍वर] आपले भय धरणाऱ्‍यांची इच्छा पुरवितो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो.”—स्तोत्र १४५:१९.

प्रार्थनेसोबत आपण आणखी एक गोष्ट केली पाहिजे. ती म्हणजे, आपण एकटे राहण्याचे टाळले पाहिजे. (नीतिसूत्रे १८:१) काही लोकांनी जेव्हा आपल्या वेळेचा आणि शक्‍तीचा इतरांना मदत करण्याकरता उपयोग केला तेव्हा त्यांना टिकून राहण्याची शक्‍ती मिळाली. (नीतिसूत्रे १९:१७; लूक ६:३८) मरीया नावाच्या एका स्त्रीचे उदाहरण घ्या. * तिला कॅन्सर आहे, ती नेहमी बिछान्यावरच असायची. शिवाय, एका वर्षात तिच्या कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. यामुळे ती किती निराश झाली असेल याची कल्पना करा. पण आता जास्त दिवस दुःख करत बसण्यात काही अर्थ नाही असा विचार करून ती जबरदस्तीने बिछान्यातून उठली आणि आपल्या दररोजच्या कामाला लागली. याशिवाय जवळजवळ दररोज ती लोकांना बायबलच्या गोष्टी शिकवायला बाहेर पडू लागली, सभांना नियमितरीत्या येऊ लागली. घराबाहेर असेपर्यंत ठीक होते, पण घरात आल्यावर पुन्हा तिच्या मनात पूर्वीच्या गोष्टी यायच्या आणि ती दुःखी व्हायची. पण इतरांना मदत करण्यात आपला जास्तीतजास्त वेळ खर्च केल्यामुळे तिला निराशेवर मात करणे शक्य झाले आहे.

पण समजा आपल्याला प्रार्थना करायला कठीण वाटत असेल आणि लोकांमध्ये मिसळणे अशक्य वाटत असेल तर काय करावे? अशावेळी आपण इतरांकडून मदत मिळवू शकतो. बायबल आपल्याला उत्तेजन देते, की आपण ‘मंडळीच्या वडिलांकडून’ मदत मिळवू शकतो. (याकोब ५:१३-१६) बऱ्‍याच काळापासून तीव्र उदासीनतेने पीडित असलेल्या एका मनुष्याने म्हटले: “तुम्ही ज्यांच्यावर भरवसा ठेवता अशा लोकांबरोबर बोलल्यामुळे तुमचं मन हलकं होतं आणि यामुळे तुमची विचारशैली बदलते, तुम्ही नव्या दृष्टिकोनातून विचार करू लागता.” (नीतिसूत्रे १७:१७) पण समजा, तुमची डिप्रेशनची समस्या हाताबाहेर गेली असल्यास तुम्ही उचित वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. *मत्तय ९:१२.

कबूल आहे की समस्यांवर आपण इतक्या सहजासहजी मात करू शकणार नाही, पण आपल्याला निदान एकदा तरी यहोवावर भरवसा ठेवून पाहिले पाहिजे. आपल्याला मदत करण्याच्या त्याच्या क्षमतेला आपण केव्हाही क्षुल्लक समजू नये. (२ करिंथकर ४:८) तत्परतेने प्रार्थना करणे, एकटे राहण्याचे टाळणे व ख्रिस्ती मंडळीतील वडिलांकडून मदत मिळवणे या तीन गोष्टींमुळे आपल्याला निराशेवर मात करण्याकरता फार मोलाची मदत होऊ शकते. बायबल आपल्याला वचन देते की फार लवकर देव, निराशेला कारणीभूत ठरणाऱ्‍या सर्व गोष्टी काढून टाकणार आहे. खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा देवावरील विश्‍वास केव्हाही कमी होणार नाही. ते अगदी आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत आहेत जेव्हा “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत.”—यशया ६५:१७; प्रकटीकरण २१:४.

[तळटीपा]

^ तिचे खरे नाव नाही.

^ सावध राहा! या मासिकात कोणतेही विशिष्ट उपचार सुचवण्यात आलेले नाहीत. कोणताही वैद्यकीय उपचार घेण्याआधी त्या उपचार पद्धतीमुळे बायबल तत्त्वांचे उल्लंघन होणार नाही याची ख्रिश्‍चनांनी खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी, टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९८८ (इंग्रजी), पृष्ठे २५-९ पाहा.