मुक्या पक्षांनी दिला कैद्यांना हितोपदेश
मुक्या पक्षांनी दिला कैद्यांना हितोपदेश
दक्षिण आफ्रिकेतील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
दक्षिण आफ्रिकेतील संडे ट्रिब्यून दैनिकात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार पॉल्समोर तुरुंगातल्या अतिशय भयंकर कैद्यांचे मनःपरिवर्तन घडले आहे; आणि हे कठीण काम करून दाखवले आहे चिमुरड्या पक्षांनी. अलीकडेच १४ कैद्यांवर कॉकटिएल्स आणि लव्हबड्र्स या पक्षांचा उपयोग करून एक अभिनव प्रयोग करण्यात आला.
नेमके काय करण्यात आले? प्रत्येक कैद्याच्या कोठडीत कृत्रिम उष्णतेने पक्षांच्या लहान पिलांना वाढवण्याचे यंत्र ठेवण्यात आले. मग प्रत्येक कैद्याला एक पिलू देण्यात आले; जवळजवळ पाच आठवड्यांपर्यंत कैद्याला रात्रंदिवस दर दोन तीन तासांनी त्या इवल्याशा पिलाला हाताने भरवावे लागे. यानंतर पिलू मोठे झाल्यावर त्याला पिंजऱ्यात ठेवून, हा पिंजरा कैद्याच्या कोठडीत ठेवण्यात आला. नंतर पक्षी मोठा झाल्यानंतर त्याला विकायला नेण्याची वेळ आली. आपला पक्षी परत देताना काही कैदी अक्षरशः रडले.
दररोज पिलांशी बोलल्यामुळे, त्यांची काळजी घेतल्यामुळे कदाचित या सराईत गुन्हेगारांच्या पाषाणहृदयांना पाझर फुटला असावा; आता ते पूर्वीपेक्षा प्रेमळ आणि सौम्य झाले आहेत. एका कैद्याने म्हटले: “त्या पक्षांनीच मला माणसाळवले.” दुसऱ्या कैद्याने पक्षांकडून आपल्याला सहनशीलता शिकायला मिळाल्याचे सांगितले. चोरी केल्यामुळे शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने सांगितले की पिलाची काळजी घेताना त्याला जाणीव झाली की आपल्या मुलांची काळजी घेणे ही आईवडिलांची “फार मोठी जबाबदारी आहे”—पण तुरुंगात येण्याआधी संधी असूनही आपण ही जबाबदारी पूर्ण केली नाही, मुलांकडे दुर्लक्ष केले याची त्याला खंत वाटते.
या पिलांची काळजी घेतल्यामुळे कैद्यांना आणखी एक फायदा झाला आहे. या अभिनव प्रयोगाचे कल्पक विकस ग्रेसे म्हणतात, “पक्षांची काळजी घेण्याचे कौशल्य शिकल्यामुळे या प्रयोगात सहभागी झालेल्या कैद्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना पक्षीपालन केंद्रांत किंवा पशूपक्षांच्या डॉक्टरकडे काम मिळू शकेल.”