व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ॲनाकोंडा—अलीकडेच उजेडात आलेली खास माहिती

ॲनाकोंडा—अलीकडेच उजेडात आलेली खास माहिती

ॲनाकोंडा—अलीकडेच उजेडात आलेली खास माहिती

सावध राहा! मासिकाच्या स्टाफ लेखकाकडून

तुम्हाला कोणकोणते साप आवडतात? मला मात्र मोठमोठ्या सापांची माहिती घ्यायला आवडते. मोठमोठे साप म्हणजे ॲनाकोंडा. ॲनाकोंडा बोईडी जातीचे साप आहेत. ॲनाकोंडा इतर सापांपेक्षा अजस्र दिसतात पण इतके दिवस त्यांच्याविषयी कोणाला जास्त माहिती नव्हती. आता मात्र त्यांच्याविषयी अधिक माहिती उजेडात येत आहे.

जीववैज्ञानिक केसूस ए. रिबास आणि न्यू यॉर्कमधील वाईल्डलाईफ कन्सर्वेशन सोसायटीचे संशोधक (WCS) १९९२ मध्ये पहिल्यांदा व्हेनेझुएलाच्या जंगलात ॲनाकोंडांचा अभ्यास करायला गेले होते. * तिथे सहा वर्षे राहून ॲनाकोंडांचा अभ्यास केल्यानंतर मिळालेली नवीन माहिती त्यांनी छापली. ही कोणती नवीन माहिती असावी, असा मी विचार करू लागलो. आणि ती मिळवण्याच्या कामाला लागलो.

नाव आणि जाती

एकदा मी, माझ्या ब्रुकलिनमधल्या ऑफिसमधून WCS च्या मुख्यालयात गेलो. हे मुख्यालय न्यू यॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात आहे. ॲनाकोंडाविषयी माझ्याकडे बरीच माहिती होती.

हा साप दक्षिण अमेरिकेत आढळतो. परंतु त्याचे नाव मात्र दूरच्या देशात ठेवले गेले. काहींचे म्हणणे आहे, की ॲनाकोंडा हे नाव यानईकौलर्रे या तामीळ शब्दांवरून पडले असावे. यानई शब्दाचा अर्थ “हत्ती” आणि कौलर्रे शब्दाचा अर्थ “ठार मारणारा” असा होतो. दुसऱ्‍या लोकांचे म्हणणे आहे, की ॲनाकोंडा हे नाव श्रीलंकेतील सिन्हाला भाषेतल्या हेनाकान्ध्या या जोडशब्दावरून पडले आहे. (हेना या शब्दाचा अर्थ “वीज” आणि कान्ध्या शब्दाचा अर्थ “बुंधा” असा होतो.) खरे तर, श्रीलंकेतील सिन्हाला भाषेतला हा शब्द अजगरासाठी वापरला जातो. हे नाव कदाचित पोर्तुगीज व्यापाऱ्‍यांनी आशियातून दक्षिण अमेरिकेत आणले असावे.

यूनेक्टिस म्युरिनस हे ॲनाकोंडाचे शास्त्रीय नाव आहे, पण ते पूर्णपणे बरोबर आहे असे वाटत नाही. कारण यूनेक्टिसचा अर्थ “उत्तम पोहणारा” होतो ते बरोबर आहे. पण म्युरिनसचा अर्थ होतो, “उंदराच्या रंगाचा,” आणि हे अगदी चुकीचे आहे. एका पुस्तकात म्हटले आहे की ऑलिव्ह ग्रीन (फिकट हिरवा रंग) रंगाच्या सापासाठी म्युरिनस “हा शब्द वापरणे चुकीचे आहे.”

ॲनाकोंडाचे शास्त्रीय नाव व त्याच्या जाती यांविषयी माहिती देणाऱ्‍या एका पुस्तकानुसार या सापाच्या दोन जाती आहेत. एका जातीचे ॲनाकोंडा हिरव्या रंगाचे असतात. यांच्याबद्दलच या लेखात सांगितले आहे. या सापांना हिरवे ॲनाकोंडा किंवा वॉटर बोआ (पाण्यात राहणारा अजगर) असेही म्हटले जाते. हे साप विशेषकरून ॲमेझॉन, ऑरिनोको नद्याच्या पाणवठ्यात व गियाना येथेही पाहायला मिळतात. आणि दुसऱ्‍या जातीचे ॲनाकोंडा हे पिवळ्या रंगाचे (ई. नोटेयस) व आकाराने लहान असतात. हे पराग्वे, दक्षिण ब्राझील आणि उत्तर अर्जेन्टिना येथे आढळतात.

एका तज्ज्ञाबरोबर भेट

ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयाचे क्षेत्र सुमारे २६५ एकरमध्ये विखुरलेले आहे. याच्या चहुकडे झाडेच झाडे आहेत. आणि या प्राणिसंग्रहालयात ४,००० पेक्षा अधिक प्राणी व जवळजवळ बारा ॲनाकोंडा आहेत. माझे स्वागत करण्यासाठी विल्यम होल्मस्ट्रम खाकी गणवेषात प्राणिसंग्रहालयाच्या गेटवर उभे होते. ते WCS च्या सरिसर्पांचा अभ्यास करणाऱ्‍या विभागाचे प्रमुख आहेत. ५१ वर्षांच्या मिस्टर विल्यम यांचा चेहरा नेहमी हसरा असतो. व्हेनेझुएलामध्ये ॲनाकोंडांचा अभ्यास करणाऱ्‍या टीममध्ये तेही होते. त्यांच्या मते, शास्त्रज्ञांना तिसऱ्‍या जातीचा ॲनाकोंडा (ई. डेशौन्से) सापडला आहे. हा ॲनाकोंडा उत्तर-पूर्व ब्राझील आणि फ्रेंच गियानाच्या किनाऱ्‍यावर आढळतो. * आज दुपारी मिस्टर होल्मस्ट्रम माझे गाईड होणार आहेत.

इतर लोकांना जशी कुत्री किंवा पोपट आवडतात तसे माझ्या गाईडला, मिस्टर विल्यम यांना साप आवडतात हे माझ्या लगेच लक्षात आले. त्यांनी मला सांगितले, की ते लहान होते तेव्हापासून त्यांच्या आईवडिलांनी सलॅमँडर, बेडूक आणि असेच इतर प्राणी पाळले होते. “बाबांना आवडायचं, आई मात्र कशी तरी सहन करायची.” आणि मिस्टर विल्यम आपल्या वडिलांसारखेच निघाले, हे काही वेगळे सांगायला नको.

बोजड शरीर आणि लक्षणीय फरक

प्राणिसंग्रहालयात सरिसर्पांना ठेवण्याची जागा १०० वर्षे जुनी आहे. ॲनाकोंडांना जेथे ठेवले आहे तेथे आम्ही दोघे थांबलो. ॲनाकोंडा अजस्र असतात हे मला माहीत होते, पण आता मी प्रत्यक्ष जेव्हा या महाकाय जीवाला पाहिले तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना. त्याच्या डोक्याच्या पुढच्या बाजूला त्याचे गोल नाक आहे. त्याचे डोके मानवाच्या तळहातापेक्षाही मोठे होते. पण त्याच्या शरीराच्या मानाने त्याचे डोके अतिशय लहान वाटते. माझ्या गाईडने मला सांगितले, की ही मादी ॲनाकोंडा आहे. तिची लांबी १६ फूट आहे आणि तिचे वजन ८० किलो आहे. तिची जाडी टेलिफोनच्या खांबासारखी आहे. पण ही मादी ॲनाकोंडा म्हणे, १९६० मध्ये पकडण्यात आलेल्या मादी ॲनाकोंडासमोर “पिल्लू” वाटते, कारण त्या गोलमटोल मादी ॲनाकोंडाचे वजन जवळजवळ २२७ किलो होते!

पण नर ॲनाकोंडा मादीच्या तुलनेत आकाराने लहान असतात. सरिसर्पांचा अभ्यास करणाऱ्‍यांना ही गोष्ट माहीत होती. पण जंगलांमध्ये जेव्हा त्यांनी प्रत्यक्षात नर ॲनाकोंडांना पाहिले तेव्हा ते मादी ॲनाकोंडाची पिल्ले असल्याचे वाटले. सहसा मादी ॲनाकोंडा नरापेक्षा पाचपट मोठी असते. जीववैज्ञानिक केसूस ए. रिबास आपल्या अनुभवावरून म्हणतात, की नर आणि मादीत इतका फरक असतो की एखादा त्यांना पाहून सहजपणे फसू शकतो. रिबास यांनी ॲनाकोंडाचे एक पिल्लू पाळले होते. पण हे पिल्लू आपला नेहमी का चावा घेत होते हे त्यांना समजत नव्हते. जंगलांमध्ये ॲनाकोंडांचा अभ्यास करताना केसूस यांना समजले, की त्यांनी घरी पाळलेले ॲनाकोंडाचे पिल्लू नसून, पूर्ण वाढलेला व चिडलेला नर ॲनाकोंडा आहे!

पकडणाऱ्‍यास बक्षीस!

ॲनाकोंडा त्यांच्या बोजड शरीरामुळे लोकप्रिय झालेत यात काही शंका नाही, पण त्यांची लांबी देखील काही कमी नसते. एका सिनेमात तर ४० फूट लांबीचा ॲनाकोंडा दाखवला होता. ४० फूट लांबीचा ॲनाकोंडा नसतो, पण ३० फूट लांब असलेला ॲनाकोंडा पाहिल्यावर आपल्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

तीस फूट लांबीच्या ॲनाकोंडांची संख्या रोडावत चालली आहे. जंगलांमध्ये अभ्यास करताना अभ्यासकांनी पकडलेली सर्वात मोठी मादी ॲनाकोंडा फक्‍त १७ फूट लांब आणि ९० किलोग्रामची होती. खरे तर, मोठमोठे ॲनाकोंडा इतक्या सहजासहजी सापडत नाहीत. ९० वर्षांपूर्वी न्यू यॉर्कमधील एका प्राणी-विज्ञान संस्थेने, (आज त्याला WCS म्हटले जाते) जाहीर केले होते, की जो कोणी ३० फूटांपेक्षा जास्त लांबीचा ॲनाकोंडा पकडून देईल त्याला १,००० डॉलरचे बक्षीस दिले जाईल. पण आजपर्यंत कोणी ते बक्षीस जिंकू शकले नाही. मिस्टर होल्मस्ट्रम म्हणाले: “दर वर्षी आम्हाला दक्षिण अमेरिकेतून ३० फूट लांबीचा ॲनाकोंडा पकडल्याचे दोन-तीन फोन येत असतात. पण आम्ही त्यांना पुरावा मागतो तेव्हा कोणीही पुरावा पाठवत नाही.” आता जर कोणी ३० फूट लांबीचा ॲनाकोंडा पकडून आणलाच तर त्याला ५०,००० डॉलर दिले जातील!

जवळून पाहणे

मिस्टर होल्मस्ट्रम मला दुसऱ्‍या मजल्यावर घेऊन जातात. तेथे पुष्कळ ॲनाकोंडांना ठेवले आहे. ही जागा उष्ण व दमट आहे. येथे ॲनाकोंडांची पैदास केली जाते. आम्ही एका काचेच्या खोलीजवळ आलो. आत एक मादी ॲनाकोंडा होती. तिला जवळून पाहता यावे म्हणून मिस्टर होल्मस्ट्रमने त्या खोलीचे दार उघडले.

त्यानंतर आम्ही दोघेही त्या खोलीत गेलो. आमच्यात आणि ॲनाकोंडात फक्‍त दोन मीटरचे अंतर होते. मादी ॲनाकोंडाने हळूच आपले डोके वर केले आणि ती आमच्या दिशेने येऊ लागली. आता आमच्या आणि तिच्यात फक्‍त एक मीटरचे अंतर होते.

मिस्टर होल्मस्ट्रम लगेच मला म्हणाले: “बाहेर पडू या, हिला भूक लागलेली दिसते.” हे ऐकून मी लगेच खोलीच्या बाहेर पळालो. आम्ही दार लावून घेतले आणि बाहेरून तिचे निरीक्षण करू लागलो. मादीने आपले डोके मागे नेले आणि वेटोळा मारून निपचित पडली.

ॲनाकोंडाला लक्ष देऊन पाहिल्यास तुम्हाला त्याच्या डोक्याच्या पुढच्या बाजूला वर त्याचे डोळे आणि नाक पाहायला मिळेल. यामुळेच तर तो सुसरींप्रमाणे नाक आणि डोळे पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवून आपले सगळे शरीर पाण्याखाली सोडतो, आणि पाण्याखालून पुढे सरकत सरकत सावजापर्यंत पोहंचून त्याला धरतो.

घट्ट वेटोळे पण ढिला जबडा

ॲनाकोंडा हा बिनविषारी साप आहे. तो आपल्या भक्ष्याला घट्ट आवळून ठार मारतो. तो भक्ष्याला चुरडत नाही तर त्याचे श्‍वसन बंद पडेपर्यंत आपला विळखा घट्ट करतो. बदकापासून हरणापर्यंत जे दिसेल ते ॲनाकोंडा खातो. पण मनुष्याला खाल्याच्या फार कमी बातम्या आहेत.

ॲनाकोंडाला आपले अन्‍न चावून किंवा फाडून खाता येत नाही. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण भक्ष्य, मग ते त्याच्या आकारामानापेक्षा मोठे असले तरी, गिळण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा पर्याय नसतो. तुम्हाला ॲनाकोंडासारखे खायचा प्रयत्न करायचा आहे का? मग एक अख्खा नारळ, शेंगदाणा गिळल्याप्रमाणे खायचा प्रयत्न करा. ॲनाकोंडाचे खाणे असेच आहे. तो कसे खातो?

मिस्टर होल्मस्ट्रम म्हणतात: “ॲनाकोंडा भक्ष्याला गिळत असताना असे वाटते जणू त्याचे डोके भक्ष्यावर चालत आहे. ते पुढे म्हणाले, की ॲनाकोंडाचा जबडा अगदी ढिला असतो आणि त्याचे दात मागच्या बाजूला वळलेले असतात. आपले अवजड भक्ष्य गिळायला सुरवात करण्याआधी तो खालचा जबडा ढिला सोडतो. मग खालच्या जबड्याची एक बाजू पुढे सरकवतो, दातांनी भक्ष्य धरतो आणि मग ती बाजू मागे ओढून भक्ष्य तोंडात ओढून घेतो. अशाप्रकारे, एकावेळी एका बाजूच्या जबड्याने तो भक्ष्य हळूहळू गिळत जातो. त्याचा वरचा जबडा देखील अशाचप्रकारे हलवता येऊ शकतो. त्यामुळे ॲनाकोंडा आपले भक्ष्य गिळत असताना त्याचा जबडा जणू भक्ष्यावर चालत आहे असा भास होतो. भक्ष्य गिळल्यावर तो जांभया देतो आणि मग त्याच्या लवचीक डोक्याचा हरएक भाग पूर्वीसारखा होतो.

ॲनाकोंडा भक्ष्य गिळत असताना त्याचा श्‍वास बंद होत नाही का? नाही. कारण त्याच्या तोंडाच्या खालच्या बाजूला एक लांब श्‍वासनलिका असते. भक्ष्य गिळताना ॲनाकोंडा आपली श्‍वासनलिका बाहेर ढकलतो. यामुळे खाताना देखील ॲनाकोंडा श्‍वास घेऊ शकतो.

कसे ओळखायचे?

माझ्या गाईडने एका खास डब्याचे झाकण काढले. त्यामध्ये ॲनाकोंडाची दोन पिल्ले होती. ही दोन्ही पिल्ले दिसायला एकसारखी होती. तेव्हा मी विचार करू लागलो, की व्हेनेझुएलाच्या जंगलात गेलेल्या अभ्यासकांना इतक्या ॲनाकोंडांमध्ये फरक कसा कळला असेल.

ही समस्या त्यांनी कशी सोडवली त्याबद्दल मिस्टर होल्मस्ट्रम म्हणाले, की त्यांनी पेपर क्लिप्सचे छोटे छोटे नंबर बनवले आणि ते गरम करून ॲनाकोंडांच्या डोक्यावर डाग दिले. ही पद्धत चांगली होती, पण ॲनाकोंडा जेव्हा आपली कात टाकतो तेव्हा टाकलेल्या कातीबरोबर तो नंबरही निघून जातो. सर्व परिश्रम वाया जातात. नंतर, अभ्यास करणाऱ्‍यांना समजले, की प्रत्येक ॲनाकोंडावरच त्याचे एक ओळखचिन्ह असते. त्याच्या शेपटीच्या खालच्या पिवळ्या रंगावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. मनुष्याच्या बोटांच्या ठशांप्रमाणे हे ठिपके देखील वेगवेगळे असतात. आम्ही फक्‍त एका कागदावर प्रत्येक ॲनाकोंडाच्या शेपटीखालच्या ठिपक्यांची आकृती काढून घ्यायचो. अशाप्रकारे, अभ्यास करताना आम्ही अगदी सहजपणे ८०० ॲनाकोंडा ओळखू शकलो.”

ब्रीडींग बॉल

शेवटी मिस्टर होल्मस्ट्रमने मला त्यांच्या ऑफिसमध्ये लावलेला एक फोटो दाखवला जो त्यांनी व्हेनेझुएलात घेतला होता. या फोटोत अनेक ॲनाकोंडांनी एकमेकांना वेटोळे घातले होते. हे काय असावे असा प्रश्‍न मला पडला. होल्मस्ट्रमनी मला सांगितले, की ॲनाकोंडा मादीबरोबर संग करत असल्याचा हा फोटो आहे. याला इंग्रजीत ब्रीडींग बॉल म्हटले जाते. (पृष्ठ २८ वरील चित्र पाहा.) “या इतक्या ॲनाकोंडांमध्ये एक मादी आहे. एकदा आम्ही पाहिले की एका मादीला १३ नरांनी पीळ घातला होता. आतापर्यंतचे ते एक रेकॉर्ड आहे.”

हे नर भांडत होते का? होय. त्यांची एकप्रकारची स्लोमोशनमध्ये कुस्ती चालली होती. प्रत्येक नर दुसऱ्‍या नरांना मादीपासून दूर करून स्वतः तिच्याबरोबर संग करू पाहत होता. नरांची अशाप्रकारची कुस्ती दोन ते चार आठवडे चालते. मग यांच्यामध्ये कोण जिंकतो? सर्वात जलद की सर्वात शक्‍तिशाली नर? संशोधक अद्याप उत्तराच्या शोधात आहेत.

माझी मनोरंजक टूर संपल्यावर मी माझ्या गाईडचे आभार मानले. परतत असताना मी पाहिलेल्या गोष्टींवर मनन करू लागलो. केसूस रिबास यांच्या मते, “ॲनाकोंडा मजेदार प्राणी आहे.” मला त्यांचे हे म्हणणे पटले नाही; पण, ॲनाकोंडांनी मात्र माझे लक्ष आकर्षित केले. संशोधक या महाकाय प्राण्यांची आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भविष्यात कदाचित त्यांच्याविषयीची आणखी नवीन व मनोरंजक माहिती उजेडात येईल.

[तळटीपा]

^ व्हेनेझुएलन वाईल्डलाईफ डिपार्टमेंट आणि आंतरराष्ट्रीय वनस्पती व वन्यजीवन रक्षक विभाग यांनी या प्रकल्पाचा खर्च केला होता.

^ उभयचर व सरिसर्पांच्या अभ्यासासाठी असलेल्या संस्थेने प्रकाशित केलेले जर्नल ऑफ हर्पटॉलजी, क्र. ४, १९९७, पृष्ठे ६०७-९.

[२६ पानांवरील चित्र]

व्हेनेझुएलात ॲनाकोंडांचा अभ्यास करताना

[२७ पानांवरील चित्र]

विल्यम होल्मस्ट्रम

[२८ पानांवरील चित्र]

ब्रीडींग बॉल