एका लहान बेटाकडून महान धडा
एका लहान बेटाकडून महान धडा
रापा नुई, हे जगातले सर्वात दुर्गम आणि सर्वात कमी वस्ती असलेले बेट आहे; १७० चौरस किलोमीटरचे हे बेट ज्वालामुखीपासून तयार झालेले असून तेथे अक्षरशः एकही झाड नाही. * हे बेट एक ऐतिहासिक स्मारक बनले आहे. त्याचे एक कारण आहे तिथल्या दगडी मूर्ती, ज्यांना मोआई असे म्हणतात. या मूर्ती एके काळी अस्तित्वात असलेल्या जिवंत संस्कृतीचे अवशेष आहेत.
ज्वालामुखीच्या खडकातून कोरलेल्या काही मोआई मूर्ती इतक्या खोलवर जमिनीत पुरलेल्या आहेत की त्यांची फक्त विशाल डोकीच नजरेस पडतात. काही मूर्तींचे धड जमिनीच्या वर आहे; आणि काही मोआई मूर्तींच्या डोक्यावर अजूनही दगडातूनच कोरलेला अंबाडा आहे ज्याला पुकाओ म्हणतात. पण बहुतेक मूर्ती अर्धवट अवस्थेतच दगडाच्या खाणींजवळ किंवा प्राचीन रस्त्यांच्या कडेला पडलेल्या दिसतात. असे वाटते जणू सगळे शिल्पकार आपली कामे जिथल्या तेथे टाकून निघून गेले. उभ्या असलेल्या काही मूर्ती एकमेकांपासून फार दूरदूर आहेत तर काहींच्या रांगा आहेत ज्यात पंधरा पंधरा मूर्ती आढळतात. पण प्रत्येक मूर्ती समुद्राकडे पाठ करून उभी आहे. म्हणूनच, अनेक वर्षांपासून पर्यटक या मूर्तींना पाहून गोंधळून जातात.
पण अलीकडील वर्षांमध्ये, मोआई मूर्तींचे रहस्य उलगडण्यात आले आहे; त्यासोबतच त्या काळच्या संस्कृतीचा एकाएकी नाश होण्यामागील कारण शोधण्यासही सुरवात झाली. आणि प्रकाशात आलेली वस्तुस्थिती पाहता ती केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची नाही तर एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका नुसार, ती संस्कृती “आधुनिक जगाकरता एक महत्त्वाचा धडा आहे.”
तो धडा पृथ्वीमधील नैसर्गिक संपत्तीचा कसा वापर केला जावा यासंबंधी आहे. अर्थात, एका लहान बेटाच्या तुलनेत पृथ्वीमध्ये अनेक जटिल आणि वैविध्यपूर्ण जैविक रचना आहेत; पण म्हणून आपण रापा नुईद्वारे मिळालेल्या धड्याकडे कानाडोळा करू नये. तर मग, आपण रापा नुईच्या इतिहासातील काही ठळक गोष्टी पाहू या. सा.यु. ४०० मध्ये या इतिहासाची सुरवात झाली; तेथे आलेली पहिली कुटुंबे जहाजांमध्ये बसून आली. त्या वेळी, आकाशात उडणाऱ्या शेकडो सागरी पक्ष्यांशिवाय तेथे कोणीही नव्हते.
नंदनवनमय बेट
त्या बेटावर वनस्पतींच्या अनेक जाती नव्हत्या. परंतु, माडाची झाडे, हाऊ हाऊ आणि टोरोमिरोचे वृक्ष होते; शिवाय, लहान जातींची झाडे, वनस्पती, फर्न आणि गवत मुबलक प्रमाणात होते. या दुर्गम भागात, कमीत कमी सहा वेगवेगळ्या जातींचे पक्षी होते; त्यात घुबड, बगळे, रेल आणि पोपट यांचाही समावेश होता. शिवाय, डिस्कव्हर या पत्रिकेनुसार रापा नुई हे “पोलिनेशियातील आणि कदाचित सबंध पॅसिफिकमधील सागरी पक्ष्यांच्या विणीच्या ठिकाणांपैकी सर्वात उत्तम ठिकाण” होते.
येथे वसाहती केलेल्या लोकांनी येताना आपल्यासोबत कोंबड्या आणि खाण्याच्या प्रकारातले उंदीर आणले; हे उंदीर त्यांच्याकरता एक खास आवडता पदार्थ होता. त्यांनी भाज्यांचे आणि फळांचे काही प्रकार आणले जसे की, टारो, सुरण, रताळ, केळी आणि ऊस. तेथील जमीन सकस असल्यामुळे त्यांनी लागलीच झाडे तोडून लागवडीला सुरवात केली—पण शेतीसाठी जंगलतोड करण्याचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणासोबत दिवसेंदिवस वाढतच गेले. रापा नुई मात्र एक लहानसेच क्षेत्र होते आणि मुबलक वनश्री असतानाही खरे तर तेथील वृक्ष मर्यादितच होते.
रापा नुईचा इतिहास
रापा नुईच्या इतिहासाविषयी आपल्याला जे काही ठाऊक आहे ते मुख्यतः तीन प्रकारच्या तपासणींवर आधारलेले आहे: परागकण तपासणी, पुरातनवस्तुशास्त्र आणि जीवाश्मविज्ञान. परागकण तपासणीसाठी तलाव आणि दलदलीच्या
गाळातून परागकणांचे नमुने घ्यावे लागतात. या नमुन्यांद्वारे शेकडो वर्षांआधी कोणकोणत्या आणि किती वनस्पती होत्या तसेच किती प्रमाणात होत्या तेसुद्धा स्पष्ट होते. आणि जितक्या खोलवर परागकण सापडतो तितकाच तो जुना असतो.पुराणवस्तुशास्त्र आणि जीवाश्मविज्ञान घरे, भांडी, मोआई मूर्ती तसेच अन्नासाठी वापर करण्यात आलेल्या प्राण्यांचे अवशेष या गोष्टींचा आधार घेतात. रापा नुईचे सगळे अहवाल चित्ररूपात असल्याने ते समजून घेणे कठीण आहे, युरोपियन लोकांचा संपर्क येण्याआधीच्या तारखा निश्चित नाहीत तसेच अनेक गोष्टी सिद्ध करता येऊ शकत नाहीत. त्या शिवाय, खाली दिलेल्या काही घटनांच्या तारखाही अचूक नाहीत; त्या पुढेमागे असण्याची शक्यता आहे. ठळक अक्षरांत दिलेल्या सर्व तारखा सामान्य युगातल्या आहेत.
४०० सुमारे २० ते ५० पोलिनेशियन लोक, १५ मीटरच्या किंवा त्याहून लांब असलेल्या दुहेरी जहाजांमध्ये बसून आले. ती होडी ८,००० किलोग्रॅम वजन झेपण्यास समर्थ होती.
८०० गाळातील परागकणांच्या प्रमाणातील घट हे दाखवून देते की जंगलतोड सुरू झाली होती. जंगलतोडीमुळे रिकाम्या जागेत गवताचे प्रमाण वाढू लागले तसे गवताच्या परागकणांचे प्रमाण वाढते.
९००-१३०० या काळादरम्यान, खाद्यासाठी शिकार केलेल्या प्राण्यांची जी हाडे उत्खननात सापडली त्यांपैकी एक तृतीयांश हाडे डॉल्फिन माशांची आहेत. सागरातून डॉल्फिन मासे पकडून आणण्यासाठी मोठ्या होड्यांची गरज होती; या होड्या मोठमोठ्या माडाच्या झाडाच्या बुंध्यातून बनवल्या जायच्या. मोआई बनवण्याचे काम या वेळी जोरात चालले होते; या मूर्ती इकडून तिकडे हलवण्यासाठी आणि उभ्या करण्यासाठी लागणारे साहित्य देखील झाडांपासूनच मिळवले जायचे. दिवसेंदिवस वाढणारी शेती आणि सरपणाची आवश्यकता यामुळे जंगले हळूहळू नाहीशी होऊ लागली.
१२००-१५०० मूर्ती बनवण्याचे काम अगदी जोरात चालले आहे. मोआई मूर्ती आणि या मूर्तींकरता बनवले जाणारे व्यासपीठ तयार करण्यात रापा नुईचे रहिवाशी बरीच शक्ती आणि साधनसामग्री खर्च करतात. पुरातनवस्तुशास्त्रज्ञ ज्यो ॲन व्हॅन टिलबर्ग लिहितात: “रापा नुईचा समाज आणखी मोठ्या आणि जास्त प्रमाणात मूर्ती बनवण्याला प्रोत्साहन देत होता.” त्या पुढे म्हणतात की, “सुमारे ८०० ते १,३०० वर्षांच्या कालावधीत अंदाजे १,००० मूर्ती बनवण्यात आल्या . . . , [म्हणजे तेव्हाच्या] सर्वाधिक लोकसंख्येच्या अंदाजांनुसार प्रत्येक सात ते नऊ लोकांमागे एक मूर्ती.”
मोआई मूर्ती जरी दफन विधींमध्ये आणि शेतीसंबंधी विधींमध्ये वापरल्या जात होत्या तरी त्यांची पूजा केली जात नव्हती. कदाचित आत्मे त्यांच्यात वसती करत असतील असा त्यांचा विश्वास असावा. त्या शिल्पकारांची शक्ती,
स्थान आणि वंशावळी यांचेही प्रतीक असावी असे वाटते.१४००-१६०० लोकसंख्येचे प्रमाण ७,००० ते ९,००० इतके वाढते. उरलेसुरलेले जंगल पूर्णतः नाहीसे होते; त्याचे एक कारण म्हणजे, या वृक्षांचे परागण करणारे व बियांचा फैलाव करणारे या बेटावरील मूळ पक्षीच नामशेष झाले होते. डिस्कव्हर म्हणते, “बेटावरील एकूणएक पक्ष्याची जात नामशेष झाली.” जंगल नाहीसे होण्यात उंदरांचाही हातभार होता; पुराव्यांवरून दिसून येते की, उंदीर माडाच्या झाडाचे कवचधारी फळ खात असत.
आतापर्यंत जमिनीची धूप होऊ लागली, लहान ओहोळ आटू लागले आणि पाण्याची टंचाई भासू लागली. सुमारे १५०० च्या नंतरच्या कालखंडातील डॉल्फिन माशांची हाडे सापडत नाहीत; कदाचित झाडे नष्ट झाल्यामुळे त्यांना होड्या बनवता येत नव्हत्या म्हणून असे असावे. आता बेटावरून निघून जाण्याचा कोणताही मार्ग उरत नाही. अन्न मिळत नसल्यामुळे एक एक करून सगळ्या सागरी पक्ष्यांचा खातमा केला जातो. कोंबड्या जास्त खाल्ल्या जातात.
१६००-१७२२ जंगलतोड, जास्त उपयोगामुळे जमीन निकस होणे आणि धूप या सर्व कारणांचा पीकांवर दुष्परिणाम झाला. मोठ्या प्रमाणावर उपासमार होऊ लागली. रापा नुई लोकांमध्ये फूट पडून दोन गट तयार झाले. सामाजिक अराजकतेची, कदाचित नरभक्षकांचीही पहिली चिन्हे दिसू लागली. लढायांचा जोर वाढला. संरक्षणासाठी लोक गुहांमध्ये राहू लागले. १७०० सालाच्या आसपास लोकसंख्येने अंदाजे २,००० चा उच्चांक गाठला होता.
१७२२ डच शोधक, याकोप रॉखव्हेन या पहिल्या युरोपियन व्यक्तीने या बेटाचा शोध लावला. आणि हा शोध लावला तो दिवस ईस्टरचा दिवस होता म्हणून त्यांनी ईस्टर आयलंड हे नाव दिले. त्यांचा पहिला अहवाल असा होता: “[ईस्टर आयलंडचा] उदध्वस्त झालेला प्रदेश विलक्षण दारिद्र्य आणि ओसाडीचेच दृश्य होते.”
१७७० एव्हाना, रापा नुईतील विरोधी गट एकमेकांच्या मूर्तींचा नाश करू लागतात. ब्रिटिश शोधक कॅप्टन जेम्स कुक १७७४ साली आले तेव्हा त्यांना अनेक नष्ट केलेल्या मूर्ती दिसल्या.
१८०४-६३ इतर संस्कृतींशी संपर्क वाढला. आता पॅसिफिकमध्ये गुलामगिरीचे प्रमाण वाढले. आणि रोगराईमुळेही अनेकजण दगावले. पारंपरिक रापा नुई संस्कृतीचा अंत झाला.
१८६४ आतापर्यंत सर्वच मोआई मूर्ती पाडण्यात आल्या. त्यातील अनेक मूर्तींची डोकी उडवण्यात आली.
१८७२ स्थानिक लोकांपैकी फक्त १११ लोक बेटावर उरले.
अठराशे अठ्ठ्यानव साली, रापा नुई हे चिलीचा प्रांत बनले. अलीकडील वर्षांमध्ये, रापा नुईमध्ये विविध प्रकारचे सुमारे २,१०० लोक होते. चिली राष्ट्राने या संपूर्ण बेटाला एक ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित केले आहे. रापा नुईचे अनोखे वैशिष्ट्य आणि इतिहास टिकवण्यासाठी अनेक मूर्ती पुन्हा उभ्या करण्यात आल्या आहेत.
वर्तमानासाठी एक धडा
आपण आपलाच नाश करत आहोत हे रापा नुई लोकांनी का ओळखले नाही आणि संकट का टाळले नाही? या परिस्थितीविषयी अनेक संशोधकांचे काय मत आहे ते पाहा.
“येथील जंगले . . . एका रात्रीत नाहीशी झाली नाहीत—तर याला अनेक वर्षे लागली, अगदी हळूहळू हे घडले. . . . शिल्पकार, अधिकारी आणि प्रमुखांच्या स्वार्थामुळे बेटावरील कोणा रहिवाश्याने जंगलतोडीविषयी ताकीद दिली असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल.”—डिस्कव्हर.
“त्यांनी आध्यात्मिक आणि राजकीय कल्पनांना ज्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांना फार मोठी किंमत द्यावी लागली, कारण असे करण्यात ते आपल्या बेटाचे नैसर्गिक सौंदर्य हरवून बसले.”—ईस्टर आयलंड—आर्कियोलॉजी, इकोलॉजी, ॲण्ड कल्चर.
“रापा नुईची जी स्थिती झाली त्यावरून हेच कळते की, अनियंत्रित वाढ आणि मर्यादेपलीकडे वातावरणावर कब्जा ठेवणे ही फक्त औद्योगिक जगाचीच वृत्ती नाही तर मानवी वृत्ती आहे.”—नॅशनल जिओग्रॅफिक.
मानवाच्या सध्याच्या स्थितीत आज काहीच फेरबदल झाला नाही तर काय? मानवजात जर या पृथ्वीवर—अंतराळात तरंगणाऱ्या या बेटावर—परिस्थितीकीच्या दृष्टीने न झेपणारे ओझे लादत राहिली तर काय? एका लेखकाने म्हटले की रापा नुईमुळे एक मोठा फायदा झाला आहे. आपल्याला इशारा देण्यासाठी “उदध्वस्त झालेल्या इतर समाजांचे इतिहास आहेत.”
पण प्रश्न येतो, की मानव या इतिहासांकडे लक्ष देत आहे का? प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी एकामागोमाग एक नामशेष होणे हे सर्व ज्या भयप्रद वेगाने घडत आहे त्यावरून तरी असे वाटत नाही. लिंडा कोबनर आपल्या झू बुक या पुस्तकात लिहितात: “एक, दोन किंवा पन्नास जाती नामशेष झाल्याने कोणते परिणाम घडतील हे आपण सांगू शकत नाही. जाती अशाचप्रकारे नामशेष झाल्यामुळे त्याचे कोणते परिणाम घडतील हे कळण्याआधीच निसर्गात बदल घडून येत आहेत.”
कोणी एक विध्वंसक इसम एखाद्या विमानातील प्रत्येक वेळी एक खिळा काढत असेल तर नेमका कोणता खिळा शेवटचा असेल व त्यानंतर विमान कोसळेल हे त्याला ठाऊक नसते. ज्या वेळी तो शेवटचा खिळा काढला जातो त्या वेळी विमानाची दुर्घटना अटळ होते. पण, विमान कदाचित पुढच्याच उड्डाणात कोसळणार नाही. अशाचप्रकारे, मानव देखील दर वर्षी २०,००० जाती या वेगाने पृथ्वीमधील जिवंत “खिळे” काढून टाकत आहेत आणि त्यांच्या थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही! पण पृथ्वीला हे सगळे असह्य होईल ती घटका कोणाला ठाऊक आहे? आणि असे पूर्व ज्ञान असल्याचा खरोखर काही परिणाम घडेल का?
ईस्टर आयलंड—अर्थ आयलंड या पुस्तकाने अशी एक महत्त्वाची टिपणी केली: “ज्या व्यक्तीने [रापा नुई बेटावरील] शेवटले झाड तोडले तिला दिसत होते की ते शेवटले झाड होते. तरीही तिने (किंवा त्याने) ते पाडलेच.”
“धर्म बदलला तरच आशा आहे”
ईस्टर आयलंड—अर्थ आयलंड हे पुस्तक पुढे म्हणते, “आपण आपला धर्म बदलला तरच आशा आहे. आर्थिक वाढ, विज्ञान, तंत्रज्ञान, सदैव उंचावत जाणारे राहणीमान आणि स्पर्धा या आपल्या सर्वशक्तिमान समजल्या जाणाऱ्या देवी-देवता म्हणजे ईस्टर आयलंडवरील विशाल मूर्तींसारख्या आहेत. तेथे गावागावांमध्ये सर्वात मोठी मूर्ती बनवण्यासाठी स्पर्धा लागत होती. . . . नैसर्गिक संपत्तीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला . . . , पण त्या मूर्ती निर्माण करणे, इकडून तिकडे हलवणे त्यांना उभे करणे हे सगळे निरर्थकच होते.”
एका बुद्धिमान व्यक्तीने एकदा असे म्हटले होते: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) “पावले नीट टाकणे” हे आपल्याला फक्त निर्माणकर्ताच दाखवू शकतो. शिवाय, आपल्या दुःखद स्थितीतूनही फक्त तोच आपली सुटका करू शकतो. ही शाश्वती त्याने आपल्या वचनात अर्थात बायबलमध्ये दिली आहे; या पुस्तकात गतकालीन संस्कृतींची अनेक चांगली आणि वाईट उदाहरणे देखील दिली आहेत. या अंधकारमय समयात हे पुस्तक ‘आपल्या मार्गासाठी प्रकाश’ ठरू शकते.—स्तोत्र ११९:१०५.
सरतेशेवटी तो मार्ग, आज्ञाधारक मानवांना शांती आणि समृद्धीकडे अर्थात एका नवीन जगात नेईल ज्यामध्ये दक्षिण पॅसिफिकमधील रापा नुई नावाचा हा चिमुकला प्रदेश देखील असेल.—२ पेत्र ३:१३.
[तळटीपा]
^ या बेटावरील रहिवाशी स्वतःला तसेच बेटालाही रापा नुई याच नावाने बोलवत असले तरी या बेटाला ईस्टर आयलंड आणि तेथील रहिवाशांना ईस्टर आयलँडर्स या नावाने जास्त ओळखले जाते.
[२३ पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
ईस्टर आयलंड
[चित्राचे श्रेय]
Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.
[२३ पानांवरील चित्र]
“अंदाजे १,००० मूर्ती बनवण्यात आल्या”
[२५ पानांवरील चित्रे]
सबंध पृथ्वी आणि दूरवर वसलेली बेटे देखील बगीच्यासमान बनतील