व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खोट्या प्रसाराला बळी पडू नका!

खोट्या प्रसाराला बळी पडू नका!

खोट्या प्रसाराला बळी पडू नका!

“मूर्ख प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास ठेवतो.”नीतिसूत्रे १४:१५, पंडिता रमाबाई भाषांतर.

शिक्षण व प्रॉपगंडा यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शिक्षण म्हणजे व्यक्‍तीला विचार कसा करावा ते शिकवणे. प्रॉपगंडा म्हणजे व्यक्‍तीला काय विचार करावा ते सांगणे. चांगला शिक्षक कोणत्याही विषयाच्या सर्व बाजू लोकांसमोर मांडतो आणि त्यांवर विचार करायला त्यांना प्रेरणा देतो. पण प्रॉपगंडा करणारे लोकांना त्यांचे मत व्यक्‍त करण्याची संधीच देत नाहीत, केवळ स्वतःच्या विचारांचा व मतांचा लोकांवर भडिमार करत राहतात. सहसा त्यांचा खरा उद्देश काय आहे ते कळत नाही. ते वस्तुस्थिती जशी आहे तशी तुमच्यापुढे मांडण्याऐवजी फक्‍त काही गोष्टीच पुढे आणतात तर काही गोष्टींवर मुद्दाम पडदा टाकतात. तसेच, काही गोष्टी तिखटमीठ लावून सांगतात. खोटी माहिती आणि अर्थसत्य लोकांना सांगणे ही प्रॉपगंडा करणाऱ्‍यांची विशेषता आहे. बुद्धीला पटणाऱ्‍या नव्हे, तर हृदयाला भिडणाऱ्‍या गोष्टी सांगणे हाच त्यांचा उद्देश असतो.

प्रॉपगंडा करणारे आपला संदेश अशा पद्धतीने मांडतात की तो लोकांना चांगला, रास्त किंवा योग्य वाटावा; त्यांनी सुचवल्याप्रमाणे केल्यास तुम्ही प्रतिष्ठित लोक ठराल असे तुम्हाला भासवले जाते. त्यांचा सल्ला पाळल्यामुळे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही सुशिक्षित, सुजाण नागरिक बनता, सुखी आणि सुरक्षित राहता.

बायबलमध्ये अशा लोकांना “व्यर्थ बोलणारे” व “फसविणारे” म्हटले आहे. अशा लोकांपासून तुम्ही कसे सांभाळून राहू शकता? (तीत १:१०) या लोकांचे विशिष्ट डावपेच असतात. ते तुमच्या लक्षात आले तर आपोआपच तुम्हाला मिळणाऱ्‍या माहितीचे तुम्ही स्वतःच परीक्षण करून पाहू शकता. यासंदर्भात खाली काही सूचना दिल्या आहेत.

निवडक असा: माणसाने खुल्या विचारांचे असावे. पण आपले मन बिनजाळीच्या पाईपसारखे असू नये; ज्यातून काहीही वाहू शकते, कचरा देखील. आपल्या डोक्यात वाईट विचार भरले जावे असे कोणालाही वाटणार नाही. प्राचीन काळातील राजा आणि उपदेशक असलेल्या शलमोनाने बजावून सांगितले: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” (नीतिसूत्रे १४:१५) तेव्हा, निवडक असणे गरजेचे आहे. आपल्यासमोर येणारी कोणतीही माहिती चांगली आहे किंवा वाईट हे पडताळून पाहिले पाहिजे; काय घ्यावे व काय टाकून द्यावे हे ठरवले पाहिजे.

पण काही लोक फार संकुचित विचारांचे असतात. फायदेकारक ठरू शकेल अशी सत्य माहिती पडताळून पाहायला देखील ते तयार नसतात. तर मग, योग्य संतुलन कसे साधता येईल? नवीन माहिती पडताळून पाहण्याकरता आपल्याकडे काही आदर्श असले पाहिजे. बायबलच्या आधारावर आपल्याला हे ठरविण्यास मदत होईल की कोणती गोष्ट खरी आहे आणि कोणती नाही. आपल्यासमोर नवीन माहिती येते तेव्हा आपण खुल्या मनाने तिच्याकडे पाहतो. बायबलच्या आदर्शांच्या तुलनेत ही माहिती पडताळून पाहतो आणि मग जी उपयोगी आहे, खरी आहे अशी माहिती आपण घेतो. पण तेच जर ही माहिती बायबलच्या आदर्शांनुसार नाही असे आपल्याला आढळले, तर तिच्यामुळे आपले नुकसान होऊ शकते हे ओळखून आपण ती माहिती घेण्याचे टाळतो.

निर्णयशक्‍तीचा उपयोग करा: निर्णयशक्‍ती म्हणजे “विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता.” यामुळे “एक व्यक्‍ती दोन गोष्टींतला फरक ओळखू शकते.” निर्णयशक्‍ती असलेली व्यक्‍ती वेगवेगळ्या गोष्टींतले बारकावे ओळखून चांगल्यावाईटातला फरक समजते.

निर्णयशक्‍तीचा उपयोग केल्यास, जे लोक “गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंतःकरणे भुलवितात” अशा लोकांना आपण लगेच ओळखू शकतो. (रोमकर १६:१८) तसेच जी माहिती उपयोगाची नाही किंवा आपली दिशाभूल करू शकते अशी माहिती नाकारण्यासही यामुळे आपल्याला मदत होईल. पण ही माहिती दिशाभूल करणारी आहे किंवा नाही हे तुम्ही कसे ओळखू शकता?

पारख करायला शिका: पहिल्या शतकातील ख्रिस्ती शिक्षक योहान याने म्हटले: “अती प्रिय मित्रांनो, तुम्ही जो काही संदेश ऐकता, त्यावर केवळ कोणीतरी सांगतो की तो देवाकडून आलेला संदेश आहे, म्हणून नेहमीच विश्‍वास ठेवू नका. तो खरोखरच देवाकडून आहे की नाही, याची प्रथम परीक्षा करा.” (१ योहान ४:१, सुबोध भाषांतर) काही लोक स्पंजसारखे असतात, सर्व काही शोषून घेतात. आजच्या जगातल्या बऱ्‍याच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला लगेच खऱ्‍या वाटतील.

आपण कोणती माहिती घ्यावी कोणती घेऊ नये हे ज्याने त्याने ठरवावे. ज्याप्रमाणे आपण खाल्लेल्या अन्‍नामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो त्याचप्रमाणे आपण जी माहिती घेतो त्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच, काहीही वाचताना, पाहताना किंवा ऐकताना नेहमी ती माहिती खरी आहे किंवा नाही याचे परीक्षण करा.

आपल्या स्वतःच्या मतांची निःपक्षपातीपणे परीक्षा करायला आपण तयार असले पाहिजे. कारण शेवटी आपल्याला जे वाटते ते केवळ एक वैयक्‍तिक मत आहे. आणि आपले मत भरवशालायक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ते वस्तुस्थितीवर आधारित आहे का, आपण ते इतरांना पटवून देऊ शकतो का आणि ते कोणत्या आदर्शांना धरून आहे हे पारखून पाहणे महत्त्वाचे आहे.

प्रश्‍न विचारा: आपण पाहिल्याप्रमाणे, आज असे अनेक लोक आहेत जे आपल्याला ‘लाघवी भाषणाने भुलवू’ शकतात. (कलस्सैकर २:४) म्हणूनच कोणी आपल्याला काही पटवून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रश्‍न विचारणे महत्त्वाचे आहे.

सर्वप्रथम, संदेश देणारी व्यक्‍ती काहीतरी पूर्वग्रह बाळगून आहे का हे पाहा. हा संदेश सांगण्यामागचा मूळ हेतू काय आहे? जर त्या संदेशात शिवराळ किंवा मार्मिक भाषा वापरली असेल तर त्यामागे कोणता उद्देश आहे हे लक्षात घ्या. तो संदेश मुळात पटण्यासारखा आहे का? तसेच ती माहिती तुम्हाला देणाऱ्‍यांचा नावलौकिक विचारात घ्या. ते खरे बोलणारे म्हणून ओळखले जातात का? ही माहिती कशाच्या आधारावर दिली जात आहे, एखाद्या व्यक्‍तीच्या किंवा संस्थेच्या विचारांच्या आधारावर, की कोणत्या ग्रंथाच्या आधारावर? मग यांवर तुम्ही विश्‍वास ठेवू शकता का? सदर विषयावर शास्त्रीय किंवा भरवशालायक माहिती त्यांच्याजवळ आहे का? विशिष्ट संदेश देताना तुमच्या भावनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला गेला का? तसे असल्यास स्वतःला विचारा ‘भावनांच्या आहारी न जाता विचार केल्यास हा संदेश स्वीकारण्यालायक आहे का?’

केवळ लोकांमागे जाऊ नका: सर्वजण विचार करत आहेत ते खरे नाही किंवा योग्य नाही याची जाणीव झाल्यास सर्वांपेक्षा वेगळा विचार करण्यास घाबरू नका. सर्वांनी विशिष्ट गोष्टीवर विश्‍वास ठेवला किंवा विशिष्ट प्रकारे विचार केला म्हणून तुम्हीही तसाच विचार केला पाहिजे का? सर्वजण म्हणतात म्हणून एखादी गोष्ट खरी असे म्हणता येणार नाही. इतिहासात अशी कित्येक उदाहरणे आहेत की सर्वांनी मानलेली एखादी गोष्ट खोटी असल्याचे नंतर शाबीत झाले. तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांची गर्दीमागेच जाण्याची प्रवृत्ती असते. निर्गम २३:२ येथे दिलेली आज्ञा नेहमी आठवणीत ठेवण्यालायक आहे: “दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्‍या बहुजनसमाजास अनुसरू नको.”

खरे ज्ञान आणि प्रॉपगंडा यातील फरक

याआधीच उल्लेख केल्याप्रमाणे, योग्य विचार करण्यासाठी बायबलमुळे आपल्याला मदत होऊ शकते. येशूने देवाच्या वचनाविषयी जे म्हटले होते त्यावर यहोवाचे साक्षीदार पूर्ण विश्‍वास ठेवतात: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) आणि याचे कारण असे आहे, की बायबलचा मूळ लेखक स्वतः परमेश्‍वर यहोवा आहे, ज्याला स्तोत्रकर्त्याने ‘सत्यस्वरूप देव’ म्हणून संबोधित केले होते.—स्तोत्र ३१:५.

आज अत्याधुनिक माध्यमांच्या साहाय्याने अतिव्यापक प्रमाणावर प्रॉपगंडा केला जात आहे. पण अशा या काळातही आपण सत्य ज्ञानाकरता यहोवाच्या वचनाकडे वळू शकतो. हे ज्ञान ‘बनावट गोष्टी सांगणाऱ्‍यांपासून’ आपले रक्षण करील.—२ पेत्र २:३.

[९ पानांवरील चित्र]

निर्णयशक्‍तीच्या साहाय्याने तुम्ही निरुपयोगी किंवा दिशाभूल करणारी माहिती ओळखून ती नाकारू शकता

[१० पानांवरील चित्रे]

तुम्ही जे वाचता किंवा पाहता ते वस्तुस्थितीला धरून आहे किंवा नाही याचे परीक्षण करा

[११ पानांवरील चित्र]

सर्वजण मानतात म्हणून एखादी गोष्ट खरी असे म्हणता येत नाही

[११ पानांवरील चित्र]

सत्य ज्ञानाकरता आपण खात्रीने देवाच्या वचनाकडे वळू शकतो