व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

मुलांसाठी कामे

“वेळेच्या बंधनात अडकलेले पालक, आपल्या मुलांना घरकामात मदत करायला सहसा प्रोत्साहन देत नाहीत,” असे द टोरोन्टो स्टार म्हणते. पॉसिटिव्ह डिसिप्लीन नावाच्या पुस्तकाची लेखिका, जेन नेल्सन म्हणतात की, घरकामात “मुलांना कधीच स्वारस्य वाटणार नाही” तरीही अशा कामांमुळे मुले “स्वावलंबी होतात, त्यांचा स्वतःवरील भरवसा वाढतो.” चाईल्ड नावाच्या मासिकाने केलेल्या एका अभ्यासानुसार, दोन ते तीन वर्षांच्या मुलांना, खेळणी उचलून जागेवर ठेवणे व घाण झालेले कपडे धुण्याकरता बादलीत जाऊन ठेवणे यासारखी कामे देता येतात. तीन ते पाच वर्षांच्या मुलांना जेवणाची तयारी करणे, खरकटी ताटे उचलून मोरीत ठेवणे व स्वतःच्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे यासारखी कामे देता येतात. ५ ते ९ वर्षांची मुले आपला बिछाना आवरू शकतात, बागेतले गवत काढून ती साफसूफ करू शकतात. आणि ९ ते १२ वर्षांची मुले भांडी धुणे, कचरा फेकून देणे, झाडू मारणे अशी छोटीमोठी कामे करू शकतात. “आणि अमुक काम अमुक वेळी संपवावे अशी निश्‍चित वेळ दिल्यास अधिक चांगले,” असे श्रीमती नेल्सन म्हणाल्या.

गोंधळ करणारे विद्यार्थी

आजपर्यंत तरी, जपानमध्ये किशोरवयीन मुलांनी बंड केल्याच्या फार कमी घटना घडल्या आहेत. पण आता, संपूर्ण जपानमधील शिक्षकांची तक्रार आहे, की आजकालच्या वर्गातील गोंधळ घालणाऱ्‍या मुलांना आवरणे अतिशय कठीण झाले आहे. टोकियो सरकारने ९-११ व १४ वर्षांच्या वयोगटातील मुलांचा सर्व्हे घेतला. त्यापैकी ६५ टक्के मुलांना त्यांच्या मित्रांचा, ६० टक्के मुलांना त्यांच्या पालकांचा आणि ५० टक्के मुलांना त्यांच्या शिक्षकांचा कंटाळा आला होता. चाळीस टक्के मुलांनी म्हटले की ते आपला राग आवरू शकत नाहीत. आणि पाचापैकी एकाने म्हटले की, सामानाची आदळआपट किंवा मोडतोड करण्याद्वारे ते आपला राग व्यक्‍त करतात.

मुले आणि झोप

पेरन्ट्‌स नावाचे मासिक म्हणते, की “मुलांनी रात्री किती वाजेपर्यंत जागले पाहिजे फक्‍त याबाबतीतच नव्हे तर झोपण्यापूर्वी ते काय करू शकतात याबाबतीतही नियम घालून दिले पाहिजेत. टीव्ही पाहणे, कम्प्युटर व व्हिडिओ गेम्स खेळणे, इंटरनेटवर शोधभ्रमण करणे ही उत्तेजक कार्ये असल्यामुळे मुलांच्या डोक्यात सतत विचार चाललेला असतो. शिवाय, शाळेनंतर होणाऱ्‍या कार्यहालचालींमुळे मुलांना आपला गृहपाठ देखील संपवता येत नाही.” संशोधनावरून असे दिसून आले आहे, की लहान मुलांना पुरेशी झोप न मिळाल्यास ते हायपरॲक्टीव्ह म्हणजेच अतिक्रियाशील होतात; तर प्रौढ लोक सुस्त आणि गुमसुम बनतात. त्यामुळे, ज्या मुलांना व्यवस्थित झोप मिळालेली नसते ते शाळेत लक्ष एकाग्र करू शकत नाहीत, शिकलेल्या गोष्टी ध्यानात ठेवू शकत नाहीत आणि गणिते सोडवू शकत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, मुलांकरता झोपण्याची एक निश्‍चित वेळ पालकांनी ठरवली पाहिजे आणि मुले थकलीत किंवा खेळू शकत नाहीत म्हणून झोपायला पाठवू नये तर झोप महत्त्वाची आहे असा विचार केला पाहिजे.

भारतातील “तातडीची दडलेली गरज”

गेल्या काही वर्षांत भारतात आरोग्य आणि कल्याण यांत बऱ्‍याच सुधारणा झाल्या असल्या तरी, कुपोषण मात्र “तातडीची दडलेली गरज” बनली आहे, असे द टाईम्स ऑफ इंडियाने बातमी दिली. कुपोषणामुळे भारताला आरोग्य निगा आणि कमी उत्पन्‍नासाठी २३,००,००,००० डॉलरहून अधिक पैसा खर्च करावा लागतो. एका अहवालानुसार, भारतात चार वर्षांखालील ५० टक्क्यांहून अधिक मुले कुपोषित आहेत; ३० टक्के नवजात बालके जन्मतःच “कमी वजनाची” असतात आणि ६० टक्के स्त्रियांमध्ये रक्‍ताची कमी आहे. जागतिक बँक येथील सामाजिक विकास खात्यातील ज्येष्ठ तज्ञ, मीरा चॅटर्जी असे म्हणतात, की “कुपोषणामुळे फक्‍त लोकांचे आणि कुटुंबांचे जीवनच उद्‌ध्वस्त होत नाही तर शिक्षणासाठी खर्च केलेल्या पैशाचा मोबदलाही यामुळे कमी होतो तसेच सामाजिक व आर्थिक प्रगतीतील तो सर्वात मोठा अडथळा आहे.”

सर्वात उत्तम वाहतूक साधन?

तीन-चाकी सायकल रिक्षांचा भारतात कित्येक दशकांपासून वापर होत आला आहे. पण आऊटलुक मासिक म्हणते की या तीन-चाकी सायकल रिक्षांच्या रचनेत फारसा फरक झालेला नाही. “मागील बाजूस प्रवाशांकरता घसरती लाकडी बैठक, मोठी लोखंडी चाके आणि गीअर नसलेल्या या रिक्षा आजही जशा का तशाच आहेत.” अलीकडच्या काळात मात्र सायकल रिक्षा चालवण्याबद्दल बराच विरोध करण्यात आला आहे कारण या रिक्षा चालवणाऱ्‍या चालकांवर खूप ताण पडतो; बहुतेकदा ही रिक्षा चालवणारे वृद्ध आणि अशक्‍त लोक असतात. पण भारतात हवेचे प्रदूषण जास्तच वाढत चालल्यामुळे सायकल रिक्षाला आणखी एक संधी देण्यात आली आहे. दिल्लीतील एका कंपनीने सुधारित प्रकारची रिक्षा तयार केली आहे, जी वजनाने हलकी आहे आणि वाऱ्‍याचा प्रतिरोध करू शकणाऱ्‍या रचनेत आहे. तिच्या गेअरसिस्टममुळे चालकाला पेडल मारताना जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत. चालकाची सीट देखील पाठीला त्रास होणार नाही अशी आहे, पुढचे हँडल सोईस्कर आहे, त्यामुळे चालकाच्या मनगटावर जास्त ताण पडत नाही आणि उतारूंसाठी सोईस्कर व ऐसपैस बैठका आहेत. या कंपनीचे प्रोजेक्ट लिडर टी. विनित म्हणाले, की ही रिक्षा “सध्याच्या राजकीय स्थितीला साजेशी आहे जेथे मानवी हक्क आणि प्रदूषणमुक्‍त वातावरण असले सामान्य माणसांच्या डोक्यावरून जाणारे शब्द वारंवार वापरले जातात.” आऊटलुक मासिक म्हणते की “ही साधीसुधी रिक्षा कदाचित २१ व्या शतकातली सर्वात उत्तम वाहतुक साधन ठरेल.”

माऊंट एव्हरेस्टची उंची वाढत चालली आहे

“जगातील सर्वात उंच पर्वत, माऊंट एव्हरेस्टची उंची, वैज्ञानिकांना वाटायची त्यापेक्षाही जास्त आहे आणि अधिकच वाढत चालली आहे,” असे रॉयटर्सच्या अलीकडील बातमीपत्रात म्हटले होते. “गिर्यारोहकांनी आधुनिक उपग्रह सिस्टमद्वारे एव्हरेस्टची उंची मोजली तेव्हा ती [८,८५० मीटर]—जवळजवळ [८.९ किलोमीटर] उंच असल्याचे दिसून आले . . . १९५४ मध्ये जेव्हा एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यात आली तेव्हा ती [८,८४८ मीटर] होती. म्हणजे, एव्हरेस्ट पर्वताची उंची [दोन मीटरने] वाढली आहे.” ही वाढलेली दोन मीटरची उंची बर्फाच्छादित शिखराच्या टोकाची आहे. पण त्या बर्फाखालच्या खडकाची उंची अजूनपर्यंत तरी समजलेली नाही. द नॅशनल जिओग्रॅफिक सोसायटी आता एव्हरेस्ट पर्वताच्या या नवीन उंचीची नोंद आपल्या नकाशांमध्ये करणार आहे. हा एव्हरेस्ट पर्वत—म्हणजे, संपूर्ण हिमालय पर्वत रांगच—खरे तर, वर वाढत जाण्याखेरीज, ईशान्येकडे म्हणजे चीनच्या दिशेने दर वर्षी १.५-६ मिलिमीटर असा विस्तारत चालला आहे.

वडील आणि मुली

अलीकडेच, हेल्थ कॅनडाने २,५०० युवकांचा सर्व्हे घेतल्याची बातमी कॅनडाच्या ग्लोब ॲण्ड मेल नावाच्या बातमीपत्रकात छापून आली होती. या सर्व्हेतून असे दिसून आले की मुलांमध्ये, खासकरून मुलींमध्ये आणि त्यांच्या पित्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. ५१ टक्के मुलांशी तुलना केल्यावर असे दिसून आले की १५ ते १६ वयोगटातील फक्‍त ३३ टक्के मुली “आपल्या समस्यांविषयी अगदी सहजपणे आपल्या वडिलांबरोबर बोलतात.” सदर अहवाल पुढे म्हणतो, की तरीसुद्धा “मुली आपल्या वडिलांचा खूप आदर करतात व त्यांना त्यांच्या आधाराची आवश्‍यकता वाटते.” क्वीन्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ॲलन किंग कबूल करतात, की “विशेषतः आपल्या किशोरवयीन मुलांबरोबर बोलायला पित्यांना फार जड जाते.” पुष्कळ वडील या काळात आपल्या मुलांबरोबर लैंगिक विषय व घातक वागणुकीविषयी बोलायचे टाळतात; त्यांना ते अतिशय कठीण वाटते. पण हे प्राध्यापक, पित्यांना आपल्या मुलांबरोबर असे कठीण विषय बोलण्याचे उत्तेजन देतात; कारण आजकाल बहुतेक माता इतक्या व्यस्त झाल्या आहेत की त्यांना आपल्या मुलांबरोबर वेळ घालवता येत नाही.

सुपर सुमो पैलवान

जपानमधील क्रिडा तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की त्यांचे सुमो पैलवान जगभरात त्यांच्या लठ्ठपणामुळे लोकप्रिय आहेत, पण आता ते इतके गलेलठ्ठ झाले आहेत की त्यांना आता स्वतःचेच ओझे पेलवत नाही. न्यू सायंटिस्ट मासिकातील वृत्तानुसार, गेल्या पाच वर्षांत दोन सर्वोत्कृष्ट वर्गांतील सुमो पैलवानांना इजा पोहंचण्याच्या घटना दुप्पट झाल्या. त्यामुळे शरीर वैज्ञानिकांनी ५० पैलवानांच्या वजनाची तुलना त्यांच्या पायांच्या शक्‍तीबरोबर केली. सदर वृत्तानुसार, “२५ टक्के पैलवानांच्या पायांत, आपल्या बोजड शरीराचे वजन पेलण्याची शक्‍ती नव्हती.” १९७४ मध्ये, सर्वोत्कृष्ट कुस्ती खेळणाऱ्‍या सुमो पैलवानांचे वजन १२६ किलो होते. १९९९ मध्ये ते १५६ किलो झाले. सुमोंविषयी बोलणारी महिला वार्ताहार डोरीन सिमन्ड्‌स यांचे म्हणणे आहे, की “पहिल्या पेक्षा आता, सगळ्याच जपानी लोकांचे सरासरी वजन वाढले असल्यामुळे असे झाले असावे.” पण वजन जास्त असले की सुमो पैलवान चांगली कुस्ती खेळू शकतो असे काही नाही. सिमन्ड्‌स पुढे म्हणाल्या: “पेअरसारखा आकार हा सर्वात उत्तम आकार मानला जातो. आखूड पाय, भारी मांड्या व मजबूत पोटऱ्‍या, असा सुमोचा आकार असला पाहिजे.”

सिगारेटच्या धुराचा मुलांना धोका

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरक्ले वेलनेस लेटर नावाच्या एका बातमीपत्राने जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या एका रिपोर्टबद्दल असे म्हटले, की “जगातील निम्मी मुले म्हणजे सुमारे ७०,००,००,००० पेक्षाही अधिक मुले धूम्रपान करणाऱ्‍यांच्या सहवासात राहतात.” पुढील २० वर्षांमध्ये धूम्रपान करणाऱ्‍यांची संख्या १,६०,००,००,००० पर्यंत पोहंचण्याची शक्यता आहे. ही गोष्ट विचारात घेता, धूम्रपान करणाऱ्‍या व्यक्‍तीच्या सतत आसपास राहणाऱ्‍या अधिक मुलांना सिगारेटच्या धुराचा त्रास होईल. या धुरामुळे मुलांना कानाचे व श्‍वसनाचे आजार होण्याची जास्त शक्यता असेल.