व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव कधी बदलतो का?

देव कधी बदलतो का?

बायबलचा दृष्टिकोन

देव कधी बदलतो का?

‘जुन्या करारातला’ देव (याव्हे) “क्रूर” आहे, असे मानवशास्त्रज्ञ जॉर्ज डोरसी म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले, की “या देवाला मुळी दयामायाच नाही. तो लुटारूंचा, छळ करणाऱ्‍यांचा, योद्धांचा किंवा युद्धाचा देव आहे.” इतर लोकांचेही जॉर्ज यांच्यासारखेच विचार आहेत. म्हणूनच, मग काही लोकांच्या मनात असे प्रश्‍न येतात, की जुन्या करारातला देव यहोवा खरोखरच इतका क्रूर आहे का? ‘नवीन करारातील’ प्रेमळ आणि दयाळू देव होण्यासाठी त्याने मग आपले रूप बदलले का?

फार पूर्वीपासूनच बायबलच्या देवाविषयी लोकांमध्ये मतभेद होते. परंतु, सर्वात पहिल्यांदा सा. यु. दुसऱ्‍या शतकातल्या मारसियोन नावाच्या विद्वानाने आपले मत व्यक्‍त केले. त्याने म्हटले, ‘जुन्या करारातला’ देव हिंसक, खुनशी आहे; त्याची उपासना करणाऱ्‍यांना तो भौतिक आशीर्वाद देतो. पण येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट झालेला ‘नवीन करारातला’ देव परिपूर्ण, प्रेमळ, दयाळू व क्षमाशील आहे असे त्याचे म्हणणे आहे.

परिस्थितीनुरूप यहोवा कार्य करतो

“यहोवा” याचा शब्दशः अर्थ “तो घडवून आणतो” असा होतो. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, यहोवा त्याची सर्व अभिवचने पूर्ण करण्याकरता अभिवचनांचा पूर्तिकर्ता बनतो. मोशेने देवाला त्याचे नाव विचारले असताना, यहोवाने त्याच्या नावातील अर्थाचे स्पष्टीकरण याप्रकारे दिले: “मला जे व्हायचे ते मी होईन.” (निर्गम ३:१४, NW) पंडिता रमाबाई भाषांतर असे म्हणते: “जो मी आहे तो मी आहे.”

म्हणजे, यहोवा त्याच्या नीतिमान उद्देशांना व अभिवचनांना पूर्ण करण्यास जी भूमिका घेणे आवश्‍यक आहे ती तो घेतो, किंवा जसे आवश्‍यक असेल तसे स्वतःला बनवतो. म्हणूनच बायबलमध्ये यहोवाला पुढीलप्रमाणे वेगवेगळ्या पदव्या दिल्या आहेत: सृष्टीकर्ता, पिता, सार्वभौम प्रभू, मेंढपाळ, सेनाधीश यहोवा, प्रार्थना ऐकणारा, न्यायाधीश, महान शिक्षक, उद्धारकर्ता इत्यादी. आपले प्रेमळ उद्देश पूर्ण करण्याकरता यहोवाने या आणि अशा कित्येक भूमिका घेतल्या.—निर्गम ३४:१४; शास्ते ११:२७; स्तोत्र २३:१; ६५:२; ७३:२८; ८९:२६; यशया ८:१३; ३०:२०; ४०:२८; ४१:१४; १ तीमथ्य १:११.

मग याचा अर्थ, देवाचे व्यक्‍तिमत्त्व किंवा त्याचे दर्जे बदलले असा होतो का? नाही. देवाविषयी याकोब १:१७ (मराठी कॉमन लँग्वेज बायबल) मध्ये त्याच्याविषयी असे म्हटले आहे, की त्याला “पालट नाही व फिरण्याची छायाही नाही.” मग यहोवा, न बदलता प्रत्येक परिस्थितीनुसार कसे काय कार्य करतो?

हे कसे शक्य आहे ते समजण्यासाठी आईवडील आपल्या मुलांची काळजी घेताना कशा वेगवेगळ्या भूमिका घेतात याचा विचार करा. दिवसभरातील कामात, आईवडिलांना सल्लागार, आचारी, घरकाम पाहणारा, शिक्षक, शिस्त लावणारा, मित्र, कारागीर, परिचारिका अशा कित्येक भूमिका घ्याव्या लागतात. या भूमिका बजावताना, आईवडिलांचे व्यक्‍तिमत्त्व बदलत नाही. ते फक्‍त उद्‌भवणाऱ्‍या परिस्थितीनुरूप कार्य करत असतात. हेच यहोवाच्या बाबतीत देखील खरे आहे. त्याच्या सृष्टीच्या फायद्यासाठी अशी कोणतीही भूमिका नाही जी तो घेऊ शकत नाही.—रोमकर ११:३३.

उदाहरणार्थ, बायबलच्या हिब्रू आणि ख्रिश्‍चन ग्रीक या दोन्ही भागांत यहोवाला प्रेम आणि दयेचा देव असे म्हटले आहे. सा.यु.पू. आठव्या शतकातील मीखा संदेष्ट्याने यहोवाविषयी असे विचारले: “तुजसमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करितोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकितोस; तो आपला राग सर्वकाळ ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.” (मीखा ७:१८) तसेच, प्रेषित योहानाने हे लोकप्रिय वाक्य लिहिले: “देव प्रीति आहे.”—१ योहान ४:८.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, बायबलच्या दोन्ही भागांमध्ये यहोवाला, वारंवार घोर पातके करणाऱ्‍यांचा, देवाच्या नियमांचा अपश्‍चात्तापीपणे भंग करणाऱ्‍यांचा आणि इतरांचा छळ करणाऱ्‍यांचा न्याय करणारा नीतिमान न्यायाधीश असे म्हटले आहे. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “[यहोवा] सर्व दुर्जनांचा नाश करितो.” (स्तोत्र १४५:२०) आणि योहान ३:३६ म्हणते: “जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”

न बदलणारे गुण

यहोवाचे व्यक्‍तिमत्त्व आणि त्याचे प्रमुख गुण—प्रेम, बुद्धी, न्याय आणि शक्‍ती—बदललेले नाहीत. इस्राएल लोकांना त्याने सांगितले: “मी परमेश्‍वर बदलणारा नव्हे.” (मलाखी ३:६) मानवजातीला निर्माण करून ३,५०० वर्ष पूर्ण झाल्यावर तो असे बोलला होता. संपूर्ण बायबलचे परीक्षण केल्यावर आपल्याला यहोवाचे वरील शब्द किती खरे आहेत आणि त्याचे दर्जे व गुण केव्हाही बदलत नाहीत हे दिसून येते. जुन्या करारातला देव हिंसक किंवा खुनशी आहे आणि नवीन करारात तो प्रेमळ बनला, असा जो लोकांनी दावा केला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे कारण यहोवा पहिल्यापासूनच प्रेमळ आहे. त्याच्या व्यक्‍तिमत्त्वात काहीच फरक झालेला नाही आणि तशी गरजच नव्हती.

बायबलमध्ये सर्रासपणे दिसून येते त्यानुसार, धार्मिकतेच्या बाबतीत तो जसा कडक होता किंवा एदेन बागेतील मानवांबद्दल त्याला जितके प्रेम होते त्यात कमी-जास्त असा काहीच फरक झालेला नाही. बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यहोवाने आपले व्यक्‍तिमत्त्व बदलले आहे असे वाटते, परंतु खरे पाहता ते त्याच्या न बदलणाऱ्‍या व्यक्‍तिमत्त्वाचे फक्‍त वेगवेगळे पैलू आहेत. उद्‌भवलेल्या वेगवेगळ्या परिस्थितींमुळे व वेगवेगळ्या लोकांमुळे त्याने या वेगवेगळ्या भूमिका घेतल्या.

तेव्हा शास्त्रवचनांतून आपल्याला हे स्पष्टपणे समजले आहे, की देवाचे व्यक्‍तिमत्त्व बदललेले नाही आणि ते भवितव्यातही बदलणार नाही. सातत्य आणि न बदलणाऱ्‍या वृत्तीच्या बाबतीत यहोवापेक्षा कोणीही वरचढ नाही. आपण सर्ववेळी त्याच्यावर निर्भर राहू शकतो, भरवसा ठेवू शकतो.

[१२, १३ पानांवरील चित्रे]

सदोम आणि गमोराचा नाश करणारा देवच . . .

. . . नवीन धार्मिक जग आणणार आहे