मतप्रसार घातक ठरू शकतो
मतप्रसार घातक ठरू शकतो
“खरी बातमी बाहेर येईपर्यंत, अफवा सात समुद्रापलीकडे गेलेली असते.”—मार्क ट्वेन
“नीच, यहुदीच ना तू शेवटी!” असे म्हणत एका शिक्षिकेने तिच्या सात वर्षांच्या एका विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. इतकेच नाही, तर तिने वर्गातील सर्व मुलांना या मुलाच्या तोंडावर थुंकण्यास सांगितले. आणि लगेच बाकीची सर्व मुले त्या मुलावर थुंकण्यास ओळीने उभी राहिली.
तो विद्यार्थी खरे तर या शिक्षिकेचा भाचाच होता; आणि तिला चांगले माहीत होते की तो मुलगा आणि त्याचे आईवडील ज्यू वंशाचे नव्हते. ते यहुदी धर्माचेही नव्हते. ते यहोवाचे साक्षीदार होते आणि म्हणूनच ती त्याचा रागराग करत होती. यहोवाच्या साक्षीदारांवरील आपला राग व्यक्त करण्याकरता तिने त्या मुलाला यहुदी म्हटले कारण त्या काळात सर्वसामान्य लोकांच्या मनांत यहुदी लोकांविषयी घृणा निर्माण झाली होती. याशिवाय तेथील पाळकांनी यहोवाच्या साक्षीदारांविषयी या शिक्षेकेचे आणि इतर विद्यार्थ्यांचे मन कलुषित केले होते. त्या बिचाऱ्या मुलाच्या आईवडिलांवर कम्युनिस्ट आणि गुप्तहेर असण्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यामुळे शिक्षिकेने त्या मुलावर थुंकण्यास सांगितले तेव्हा वर्गातल्या मुलांनी सुद्धा त्या ‘नीच यहुद्याच्या’ तोंडावर थुंकण्यास मागेपुढे पाहिले नाही.
पुढे संधी मिळाल्यावर या मुलाने आपल्यावर झालेला अत्याचार समाजापुढे आणला. पण ६० वर्षांपूर्वी जर्मनी व आसपासच्या देशांत ज्यूंचा द्वेष करणाऱ्या नराधमांच्या छळाला बळी पडलेल्या साठ लाख यहुद्यांना आपली कहाणी सांगण्याची संधीच मिळाली नाही. नात्सींच्या गॅस चेंबर्समध्ये आणि छळछावण्यांमध्ये त्या यहुद्यांना नाहक आपले जीव गमवावे लागले; हा अत्याचार कशामुळे घडला? त्यांच्याविषयी पसरवण्यात आलेल्या खोट्या माहितीमुळे. ही माहिती खरी की खोटी हे पडताळून पाहण्याची अर्थातच कोणी तसदी घेतली नाही. खोट्या माहितीच्या प्रसारामुळे लाखो यहुदी लोकांना ठार मारण्यात आले.
एखाद्या जातीविषयी किंवा धर्माविषयी लोकांच्या मनात घृणा निर्माण करण्याखेरीज लोकांना आपल्या जाळ्यात पकडण्याकरता, त्यांच्या मनांवर ताबा मिळवण्याकरता देखील खोट्या मतप्रसाराचा किंवा प्रॉपगंडाचा उपयोग केला जातो. हुकूमशहा, राजकीय पुढारी, धर्मपुढारी, जाहिरातदार, व्यापारी, पत्रकार, रेडिओ व टीव्ही कलाकार आपल्या वाक्चातुर्याचा उपयोग करून लोकांच्या आचार-विचारावर प्रभाव पाडतात.
अर्थात मतप्रसार नेहमीच वाईट असतो असे नाही. उदाहरणार्थ, दारूबंदी इत्यादीबद्दल केलेला प्रसार समाजाच्या फायद्यासाठीच असतो. पण बऱ्याचदा अल्पसंख्याक लोकांविषयी द्वेष उत्पन्न करण्याकरता त्यांच्याविरुद्ध खोटा मतप्रसार केला जातो. शिवाय, प्रसार माध्यमांतून दाखवल्या जाणाऱ्या दिलखेचक जाहिराती पाहून बऱ्याच लोकांना सिगरेटचे व्यसन लागते. ॲन्थनी प्राट्कानिस आणि एल्यट अरान्सन या संशोधकांच्या मते, “आजकाल आपल्यावर दररोज नवनवीन जाहिरातींचा भडिमार होत आहे. नकळत या जाहिराती आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणत असतात. आणि हे साध्य करण्यासाठी या जाहिरातींतून केवळ विचारांचाच प्रसार केला जात नाही, तर वेगवेगळ्या प्रतिकांचा व संकेतांचा चलाखीने उपयोग केला जातो. शिवाय, मनुष्याच्या स्वाभाविक भावनांचा गैरफायदा घेतला जातो. याचे दूरगामी परिणाम चांगले असतील की वाईट हे तर सांगता येत नाही, पण वस्तुस्थिती ही आहे, की आज आपण मतप्रसाराच्या युगात राहात आहोत.”
अनेक शतकांपासून आजपर्यंत मनुष्याच्या विचारांवर प्रभाव टाकण्याकरता मतप्रसाराचा कशाप्रकारे उपयोग करण्यात आला? खोट्या प्रसारापासून तुम्ही स्वतःचा बचाव कशाप्रकारे करू शकता? भरवशालायक माहिती आपल्याला कोठे मिळेल? या आणि अशाच इतर प्रश्नांवर पुढच्या लेखांत चर्चा केली आहे.
[३ पानांवरील चित्र]
खोट्या मतप्रसारामुळे लोकांच्या मनांत यहुदी लोकांविषयी घृणा निर्माण झाली