व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माहितीचा गैरवापर

माहितीचा गैरवापर

माहितीचा गैरवापर

“खोटा मतप्रसार इतका प्रभावशाली असू शकतो की त्याच्या साहाय्याने लोकांना स्वर्गही नरक आहे असे पटवून देता येते आणि त्याच्याच उलट नरकासारखे जीवन स्वर्गसुखासारखे आहे असेही पटवून देता येते.”अडॉल्फ हिटलर, माईन कॅम्फ.

आपल्या या काळात संपर्काची अनेक माध्यमे उपलब्ध झाली आहेत—छापील साहित्य, टेलिफोन, रेडिओ, टीव्ही आणि आता यात इंटरनेटचीही भर पडली आहे. माहितीचे अत्यंत मोठे भंडार लोकांपुढे खुले झाले आहे. या माहितीतून दिले जाणारे संदेश लोकांना विशिष्ट प्रकारे विचार करायला व वागायला भाग पाडण्यासाठी तयार केलेले असतात. आणि बरेच जण या माहितीच्या प्रवाहात वाहवत जातात. म्हणजेच, ते कोणतीही माहिती फारसा विचार न करता, किंवा खात्री न करून घेताच स्वीकारतात.

डोळे झाकून लोकांनी आपल्या माहितीवर विश्‍वास ठेवावा हेच खोटा मतप्रसार करणाऱ्‍यांना हवे असते. लोकांना कोणत्या गोष्टींची काळजी, भीती वाटते हे त्यांना माहीत असते; ते लोकांना सहानुभूती दाखवून भावनावश बनवतात. लोकांची फसवणूक करण्यासाठी भाषेचा मोठ्या चतुराईने उपयोग करतात. मतप्रसारकांचे हे सर्व डावपेच किती परिणामकारक आहेत याला इतिहास साक्षीदार आहे.

मतप्रसाराचा इतिहास

अगदी प्राचीन काळापासूनच मनुष्य स्वतःच्या विचारांचा आणि स्वतःच्या कीर्तीचा प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करत आला आहे. उदाहरणार्थ, आपले साम्राज्य शक्‍तिशाली आणि अविनाशी आहे हे दाखवण्याकरता इजिप्तच्या राजांनी विशाल पिरॅमिड्‌सची रचना केली. रोमला आपल्या राज्याची कीर्ती दूरपर्यंत पोहंचवायची होती त्यामुळे त्याने संपूर्ण राज्यात मोठमोठे वास्तुशिल्प उभारले. पहिल्या महायुद्धापासून, “प्रॉपगंडा” किंवा मतप्रसार याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाऊ लागले. या युद्धादरम्यान, अनेक देशांनी स्वतःच्या फायद्याकरता, लोकांचा पाठिंबा मिळवण्याकरता वर्तमानपत्र आणि रेडिओ यांद्वारे मतप्रसार केला. दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी अडॉल्फ हिट्‌लर आणि योझेफ गोबल्स यांनीही प्रसार तंत्राचा अत्यंत कौशल्यपूर्ण उपयोग केला.

दुसऱ्‍या महायुद्धानंतर, अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांसारख्या मोठमोठ्या देशांनी त्यांच्या नीतिमूल्यांचा आणि विचारांचा प्रसार करून जगातील बाकीच्या देशांना आपल्या बाजूने करण्याचा खूप प्रयत्न केला. आजही मते मिळवण्यासाठी राजकीय पार्ट्या आपल्या पक्षाचा भरपूर प्रचार करतात. सिगरेट कंपन्याही प्रचार मोहिमेत मागे नाहीत. सिगरेट कंपन्यांच्या जाहिराती तयार करणारे तज्ज्ञ, लोकांना असे भासवतात की सिगरेट ओढल्यामुळे आरोग्याला कोणतीही हानी होत नाही, उलट ते प्रतिष्ठेचे आणि आकर्षक व्यक्‍तिमत्त्वाचे चिन्ह आहे.

खोटी माहिती!

प्रॉपगंडा करणाऱ्‍यांचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे, खोटी माहिती प्रसिद्ध करणे. उदाहरणार्थ, १५४३ साली युरोपमधील यहुद्यांविषयी लोकांच्या मनात तिटकारा, घृणा निर्माण करण्यासाठी मार्टिन लूथरने किती खोटी माहिती लिहिली होती ते पाहा: “त्यांनी [यहुद्यांनी] लोकांच्या विहिरींत विष घातले, कित्येक लोकांचे खून केले, लहान मुलांना उचलून नेले . . . ते अतिशय भयंकर, वाईट, खुनशी, कावेबाज, सैतानी लोक आहेत.” त्याने ख्रिस्ती लोकांना काय सल्ला दिला? “त्यांच्या धार्मिक स्थळांना, शाळांना आगी लावा . . . त्यांची घरं पण जमीनदोस्त करा.”

त्या काळातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा अभ्यास करणाऱ्‍या एका प्राध्यापकांनी सांगितले: “यहुद्यांनी काही वाईट केले होते म्हणून त्यांचा छळ करण्यात आला नव्हता. यहुद्यांचा विरोध करणाऱ्‍यांना खरे तर यहुदी लोकांबद्दल काहीच खरी माहिती नव्हती. त्यांच्याविषयी पसरवण्यात आलेल्या खोट्या अफवांमुळे, काहीही वाईट घडले की त्याचे खापर यहुद्यांच्या माथी फोडले जायचे.”

चुकीची धारणा निर्माण करणे

प्रॉपगंडा करणाऱ्‍यांचे आणखी एक हत्यार म्हणजे विशिष्ट प्रकारच्या जातीच्या, धर्माच्या किंवा वर्णाच्या लोकांबद्दल समाजात चुकीची धारणा निर्माण करणे. उदाहरणार्थ, “फासे पारधी चोर असतात” असा बऱ्‍याच भागांत सर्वसाधारण समज आहे. अशाप्रकारे विशिष्ट प्रकारच्या लोकांबद्दल चुकीची धारणा निर्माण केल्यामुळे सर्वसाधारण लोक माहिती न काढताच त्यावर विश्‍वास ठेवू लागतात. पण खरोखर तसे असते का?

वृत्त लेखक रीकार्डोस सोमेरीटिस यांनी सांगितले की लोकांबद्दल समाजात चुकीची धारणा निर्माण करण्याच्या या प्रवृत्तीमुळे एका विशिष्ट देशातल्या लोकांच्या मनात सर्व परदेशी लोकांबद्दल एक प्रकारची “भीती, घृणा व जातीय द्वेष निर्माण झाला.” पण या देशातल्या गुन्हेगारीचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की गुन्हे करणारे जितके परदेशी लोक होते, तितकेच त्या देशाचे रहिवासी देखील होते. उदाहरणार्थ, सोमेरीटिस यांच्या सर्वेवरून असे दिसून आले की ग्रीसमध्ये, “१०० गुन्ह्यांपैकी ९६ गुन्हे स्वतः [ग्रीक नागरिकांनी] केले होते.” सोमेरीटिस यांच्या मते “गुन्हेगारीची कारणे जातीय नसून आर्थिक व सामाजिक स्वरूपाची होती.” गुन्ह्यांचे वृत्त प्रसिद्ध करताना पूर्वग्रहदूषित माहिती देणाऱ्‍या प्रसार माध्यमांना त्यांनी परदेशी लोकांविषयी “भीती, घृणा व जातीय द्वेष” निर्माण करण्याबद्दल दोषी ठरवले.

लोकांवर ठप्पा लावणे

काही लोक त्यांच्याशी सहमत नसणाऱ्‍या सगळ्यांना वाईट ठरवतात; त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतात त्यामुळे वास्तविकता लोकांसमोर येत नाही. एखाद्या जातीला, वर्गाला असे नाव ठेवण्यात येते, की त्या जातीचे किंवा वर्गाचे नाव ऐकताच लोकांच्या मनांत घृणा निर्माण होते. लोकांना त्या विशिष्ट जातीची, किंवा समाजाची इतकी घृणा वाटते, की वास्तविकता जाणून घेण्याची त्यांची इच्छा देखील नसते.

उदाहरणार्थ, अलीकडे युरोपात व इतर काही देशांतही धार्मिक पंथांविषयी लोकांचा दृष्टिकोन चांगला राहिला नाही. कोणत्याही पंथाविषयी लोकांना भीती वाटू लागली आहे आणि यामुळे लहानमोठ्या धार्मिक गटांची बदनामी केली जाते. त्यांना समाजाचे शत्रू मानले जाते. “पंथ” (सेक्ट) हा शब्द ऐकताच लोकांचे कान टवकारतात. जर्मन प्राध्यापक मार्टिन क्रीला यांनी १९९३ साली असे लिहिले की, “‘सेक्ट’ म्हणजे पाखंडी. पूर्वीच्या काळी पाखंड्यांना जिवंत जाळायचे. आज जर्मनीत कोणत्याही पंथाच्या व्यक्‍तीला, अर्थात जिवंत जाळत नाहीत, पण त्यांचे चारित्र्यहनन केले जाते, त्यांना वाळीत टाकले जाते आणि आर्थिक दृष्ट्या त्यांना बरबाद केले जाते.”

द इनस्टिट्यूट फॉर प्रॉपगंडा अनॅलिसिसकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकांची “बदनामी केल्यामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत; शिवाय आपल्यालाही याचा अनुभव येतोच. लोकांवर असा विशिष्ट ठप्पा मारल्याने समाजात त्यांची अब्रू तर जातेच पण यामुळे बऱ्‍याच जणांना विनाकारण शिक्षा भोगावी लागते. कधीकधी तर यामुळे लढाया आणि रक्‍तपातही घडतो.”

लोकांच्या भावनांशी खेळणे

खरे तर एखाद्या विषयावर लोकांपुढे आहे ती वस्तुस्थिती मांडल्यास, ते स्वतः निवड करू शकतात. पण आपल्या मताचा प्रसार करू इच्छिणारे, असे करत नाहीत. त्यांना हे माहीत असते की लोकांना आपल्या मनाप्रमाणे वागायला व विचार करायला लावण्यासाठी त्यांच्या भावनांवर प्रभाव पाडणे गरजेचे आहे. म्हणूनच, जाहिरातदार व मतप्रसारक लोकांच्या भावना चेतवून त्यांना आपल्या बोटांवर नाचवतात.

उदाहरणार्थ, भीती. लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना विशिष्ट निर्णय घेण्यास भाग पाडले जाते. याचे एक उदाहरण पाहा. कॅनडात फेब्रूवारी १५, १९९९ च्या द ग्लोब ॲन्ड मेल नावाच्या वृत्तपत्राने मॉस्कोचे एक वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर वृत्तपत्रात असे म्हटले होते: “मागच्या आठवड्यात तीन मुलींनी आत्महत्या केल्यानंतर रशियन प्रसिद्धी माध्यमांनी अशी अफवा पसरवली की या तीन मुली यहोवाच्या साक्षीदारांच्या धर्मांध गटाच्या सदस्य होत्या.” यात “धर्मांध” हा शब्द मुद्दामहून वापरला गेला. साहजिकच अल्पवयीन मुलींना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्‍या धर्मांध गटाची कोणालाही भीती वाटेल. पण या दुर्दैवी मुली खरोखरच यहोवाच्या साक्षीदार होत्या का?

ग्लोब दैनिकात पुढे असे म्हटले होते: “पोलिसांनी नंतर कबूल केले की या मुलींचा यहोवाच्या साक्षीदारांशी काहीएक संबंध नव्हता. पण तोपर्यंत मॉस्कोच्या एक टीव्ही चॅनलने यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध वाटेल ती खोटी माहिती प्रसिद्ध केली होती. यहोवाच्या साक्षीदारांनी नात्सी जर्मनीत अडॉल्फ हिट्‌लरसोबत मिळून कार्य केले होते असा त्यांनी दावा केला. हा दावा अगदीच बिनबुडाचा आहे कारण इतिहासात याविषयी बराच पुरावा उपलब्ध आहे की उलट यहोवाच्या साक्षीदारांच्याच हजारो सदस्यांना नात्सींच्या मृत्यू शिबिरांत क्रूरपणे छळून मारण्यात आले होते.” पण अर्थातच, ज्या लोकांना इतिहासाची तितकी माहिती नाही, आणि जे आधीच घाबरट स्वभावाचे आहेत अशा लोकांना असे वाटणे साहजिक आहे की यहोवाचे साक्षीदार आपल्या सदस्यांना आत्महत्या करायला लावणारा कल्ट (गुप्त पंथ) आहे किंवा नात्सींचे समर्थन करणारा गट आहे!

द्वेष या आणखी एका भावनेचा खोटा मतप्रसार करणाऱ्‍यांनी गैरफायदा घेतला आहे. विशिष्ट जातीच्या, वंशाच्या किंवा धर्माच्या लोकांबद्दल द्वेषाची भावना भडकवण्यासाठी मार्मिक भाषेचा कसा वापर करावा हे या प्रॉपगंडा करणाऱ्‍यांना चांगले माहीत असते.

काही मतप्रसारक लोकांच्या अहंकाराचा गैरफायदा घेतात. एखाद्या व्यक्‍तीचा अहंकार जागृत करणाऱ्‍या कित्येक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील: “जाणकार कधी तडजोड करत नाहीत. . . ” किंवा “तुमच्यासारखी सुशिक्षित व्यक्‍ती स्वतःच पारख करू शकते . . . ” इत्यादी. जाहिरातींत सुचवल्याप्रमाणे आपण केले नाही तर आपण मूर्ख ठरू असे लोकांना वाटते. लोकांना आपल्या मताप्रमाणे वागायला लावण्यात तरबेज असणाऱ्‍या जाहिरातदारांना याची चांगली कल्पना असते.

घोषवाक्ये व प्रतिके

घोषवाक्यांचा देखील उपयोग केला जातो. घोषवाक्ये ही अस्पष्ट वाक्ये असल्यामुळे लोक फार विचार न करताच त्यांच्याशी सहमत होतात.

उदाहरणार्थ, युद्धाच्या वेळी किंवा इतर राष्ट्रीय संकटाच्या वेळी पुढारी अशाप्रकारची घोषवाक्ये वापरतात: “माझा देश महान,” “मातृभूमी, धर्म, कुटुंब” किंवा “जिंकू अथवा मरू” इत्यादी. पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीत लोक खऱ्‍याखोट्याचा विचार करतात का? की फक्‍त जे सांगितले जाते त्यावर विश्‍वास ठेवतात?

पहिल्या महायुद्धाविषयी विनस्टन चर्चिल यांनी म्हटले: “शांतीने राहणारे हजारो गरीब शेतकरी व मजूर फक्‍त एका इशाऱ्‍यावर एकमेकांना फाडून खाणाऱ्‍या जनावरांसारखे बनू शकतात.” त्यांनी पुढे असेही म्हटले की त्या काळात लोकांना अमुक अमुक करा असे म्हणताच बहुतेक लोक विचार न करता तसे करायचे.

प्रॉपगंडा करणारे आपला संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक प्रतिकांचा उपयोग करतात—२१ तोफांची सलामी, सॅल्यूट किंवा ध्वज ही त्यांपैकी काही उदाहरणे. माता-पिता यांसारख्या सहज हृदयाला भिडणाऱ्‍या प्रतिकांचाही उपयोग केला जातो. म्हणूनच, मातृभूमी, पितृभूमी किंवा राष्ट्रपिता यांसारख्या कल्पनांची लोकांच्या मनावर विशेष छाप पडते. प्रसार करणारे मोठ्या चलाखीने या प्रतिकांचा उपयोग करतात.

प्रॉपगंडाच्या साहाय्याने अगदी बेमालूमपणे लोकांना आपल्या मनाप्रमाणे विचार करायला किंवा वागायला लावणे ही एक कला आहे. कधीकधी यामुळे एक व्यक्‍ती नीट विचार न करता, खरेखोटे पारखून न बघता केवळ सर्वजण करत आहेत म्हणून विशिष्ट कृती करते. तुमच्या बाबतीतही असे घडू शकते का? खोट्या प्रसारापासून तुम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकता?

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

प्रॉपगंडाच्या साहाय्याने कधीकधी एखाद्या व्यक्‍तीला विचार न करता, खरेखोटे पारखून न बघता विशिष्ट कृती करण्यासाठी अगदी बेमालूमपणे भाग पाडले जाते

[७ पानांवरील चौकट/चित्रे]

यहोवाचे साक्षीदार प्रॉपगंडा करतात का?

यहोवाच्या साक्षीदारांच्या काही विरोधकांनी त्यांच्यावर झायनिझमचा अर्थात यहुदी धर्माचा व राष्ट्राचा प्रचार करत असल्याचा आरोप लावला आहे. तर काही जणांचे म्हणणे आहे, की यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रचारकार्याद्वारे कम्युनिझमचा प्रचार करत आहेत. काहींचे असेही म्हणणे आहे की यहोवाचे साक्षीदार ‘अमेरिकेचे दूत’ आहेत. तर काही जणांचा असा आरोप आहे की यहोवाचे साक्षीदार बेबंदशाही माजवतात; सामाजिक, आर्थिक, राजकीय यंत्रणेत बदल घडवून आणण्याकरता प्रॉपगंडा करतात, आणि कायदा व सुव्यवस्था भंग करतात. साहजिकच हे सर्वच्या सर्व परस्परविरोधी आरोप खरे असू शकत नाहीत.

वस्तुस्थिती ही आहे, की यांपैकी एकही आरोप खरा नाही. “पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल,” अशी जी आज्ञा येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना दिली होती ती आज्ञा केवळ विश्‍वासूपणे पाळण्याचा यहोवाचे साक्षीदार प्रयत्न करतात. (प्रेषितांची कृत्ये १:८) ते केवळ देवाच्या राज्याची सुवार्ता लोकांना सांगत आहेत. कारण या राज्याद्वारे यहोवा सबंध पृथ्वीवर शांतीची परिस्थिती आणेल.—मत्तय ६:१०; २४:१४.

यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात आलेल्या लोकांना माहीत आहे, की या समाजाने कोणत्याही देशाची शांती व सुव्यवस्था कधीही भंग केलेली नाही.

उलट बऱ्‍याच पत्रकारांनी, न्यामूर्तींनी आणि इतर लोकांनी यहोवाच्या साक्षीदारांची प्रशंसा केली आहे. यहोवाचे साक्षीदार समाज सुधारण्याच्या कामात मोलाचा हातभार लावतात असे त्यांनी म्हटले. काही उदाहरणांचा विचार करा. यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर दक्षिण युरोपातील एक महिला पत्रकाराने असे म्हटले: “या लोकांच्या कुटुंबांमध्ये किती सलोख्याचे संबंध असतात. त्यांना एकमेकांवर प्रेम करण्याची, नेहमी सद्‌सदविवेकानुसार चांगले तेच करण्याची व कधीही कोणाचे नुकसान न करण्याची शिकवण दिली जाते.”

एका पत्रकाराचे पूर्वी साक्षीदारांविषयी वाईट मत होते, पण आता तो त्यांच्याविषयी म्हणतो: “[यहोवाचे साक्षीदार] आदर्श नागरिक आहेत. ते नेहमी नीतिनियमांनुसार वागतात.” नागरिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्‍या एकाने म्हटले: “ते इतरांशी अतिशय दयाळूपणे, प्रेमळपणे व सौम्यतेने वागतात.”

यहोवाचे साक्षीदार अधिकाराच्या अधीन राहण्याच्या महत्त्वाविषयी शिकवतात. ते कधीही कायद्याचे उल्लंघन करत नाहीत; तर प्रामाणिकता, सत्यता आणि स्वच्छता यांसारख्या बायबलच्या तत्त्वांचे पालन करतात. स्वतःच्या कुटुंबांत ते नैतिकतेने वागतात आणि इतरांनाही असे वागायला मदत करतात. ते सर्वांशी सलोख्याने राहतात; आंदोलनांत किंवा राजकीय बंडखोरीत ते कधीही भाग घेत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या नियमांचे पालन करण्याच्या बाबतीतही यहोवाचे साक्षीदार आदर्श आहेत. पण असे करत असताना ते यहोवा देवाला सर्वोच्च अधिकारी मानतात. या पृथ्वीवर यहोवा आपले नीतिमान शासन आणील त्या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहतात.

यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रचार कार्याद्वारे लोकांना शिक्षण देखील देतात. बायबलचा आधार घेऊन ते लोकांना शिकवतात. बायबलमध्ये दिलेली तत्त्वे योग्य आहेत किंवा नाही हे पडताळून पाहण्याचे व त्यांनुसार नैतिक आचरण करण्याचे ते लोकांना प्रोत्साहन देतात. कुटुंबांतील समस्या व तरुणांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्या सोडवण्यासाठी सहायक ठरणारी तत्त्वे ते शिकवतात. लोकांना वाईट सवयी सोडून देण्याकरता आणि इतरांसोबत मिळूनमिसळून राहण्याकरता लागणारे गुण विकसित करण्यासाठी ते मदत करतात. त्यांच्या कार्याला निश्‍चितच “प्रॉपगंडा” म्हणता येणार नाही. वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यात सांगितल्यानुसार, आजच्या समाजात, विचारांची देवाणघेवाण अतिशय मोकळेपणाने केली जात आहे, आणि अशा या काळात “प्रॉपगंडा व शिक्षण यात फरक आहे” हे ओळखले पाहिजे.

[चित्रे]

यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांत कौटुंबिक शांतीला पोषक असणाऱ्‍या तत्त्वांविषयी व उच्च नैतिक दर्जांविषयी माहिती असते

[५ पानांवरील चित्रे]

युद्धांना किंवा धूम्रपानाला बढावा देणारा प्रॉपगंडा अनेक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे